
उचंगी घळभरणीप्रश्नी प्रशासन आक्रमक… प्रचंड बंदोबस्तात प्रकल्पाचे काम सुरू
आजरा तालु्क्यातील उचंगी धरणात यंदा कोणत्याही परिस्थितीत पाणीसाठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून आज गुरुवारी पोलीस बंदोबस्तात धरणाचे काम सुरु करण्यात आले. धरणावर दिवसभर पाटबंधारे व महसूलचे अधिकारी थांबून होते. एकंदर उचंगी प्रकल्पस्थळी सुरू असणाऱ्या हालचाली पाहता प्रशासन प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
पुनर्वसन प्रश्नांसाठी उचंगी धरणग्रस्तांनी दि. २९ जानेवारी रोजी काम बंद पाडले होते. काम बंद पाडून प्रकल्पस्थळीच धरणग्रस्तांनी ठीय्या आंदोलन सुरु केले होते. आंदोलन काळात प्रशासनाने वेळोवेळी धरणग्रस्तांची भेट घेवून चर्चा केली. तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत पुनर्वसन प्रश्नांबाबत आजरा तहसील कार्यालय व चितळे येथे बैठक होवून धरणग्रस्तांशी चर्चा करण्यात आली. तीन तास चाललेल्या बैठकीत धरणग्रस्तांच्या संकलन रजिस्टरमध्ये असणाऱ्या कुटुंबाची व्याख्या, गायरान जमिनी देण्यास प्रकल्पग्रस्तांचा सुरू असणारा विरोध असे विविध मुद्दे चर्चेत आले. यावेळी बळजबरीने घळभरणीचे काम सुरु केल्यास धरणात जलसमाधी घेवू असा इशाराही धरणग्रस्तांनी दिला होता.
शासनाने मात्र यंदा कोणत्याही परिस्थितीत पाणीसाठा करण्याचा घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभुमीवर गुरुवारी पोलीस बंदोबस्तात उचंगी धरणाचे काम सुरु केले. जवळपास शंभरपेक्षा अधिक पोलीसांचा फौजफाटा धरणस्थळी तैनात करण्यात आला होता. पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणाचे काम सुरु करण्यात आले. गत महीनाभरापासून प्रशासन व प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षामध्ये अडकलेल्या उचंगी प्रकल्पाचे काम आज पासून सुरु झाले आहे. पंधरा दिवसापूर्वी प्रकल्पग्रस्तांनी घळभरणीचे काम रोखले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी व प्रकल्पग्रस्तांमध्ये बैठक झाली होती. पण चर्चा फिस्कटली होती. त्यामुळे या प्रकल्पाचे काम बंद होते. आज प्रशासनाने घळभरणीची पूर्वतयारी म्हणून गाळ काढून साफसफाईच्या कामाला सुरवात झाली असून लवकरच घळभरणीला सुरवात केली जाणार आहे.
यावेळी प्रांताधिकारी वसुधा बारवे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र नवले, तहसिलदार विकास अहिर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनया बदामी, उपअभियंता विजय राठोड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
………….
संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन दक्ष
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनावरून प्रशासन व प्रकल्पग्रस्त यांच्यात संघर्ष उफाळला आहे. याबाबत वेळोवेळी बैठका झाल्या असून मार्ग काही निघालेला नाही. प्रशासनाकडून पुनर्वसनाचे काम जवळपास ८० टक्केच्यावर पूर्ण झाल्याचे सांगीतले जात आहे. तर प्रकल्पग्रस्त जून्या संकलन रजिष्टरनुसार पुनर्वसन करावे. ते रजिष्टर कायदयाला धरून होते यावर ठाम आहेत. त्यामुळे मार्ग निघालेला नाही. गेल्या महीन्याच्या २९ तारखेला प्रकल्पग्रस्तांनी मोर्चाने जावून रोखले होते. या वेळी या परिसरात तणावाचे वातावरण होते. त्यानंतर प्रकल्पस्थळावर मांडव घालून धरणग्रस्तांनी राखणी आंदोलन सुरु केले होते. दरम्यान या महीन्यात शुक्रवार (ता. ४) चितळे येथे जिल्हाधिकारी राहुल रेखावार व प्रकल्पग्रस्तांच्यामध्ये चर्चा झाली. पण काही मुद्द्यावर मतभेद झाल्याने चर्चा फिस्कटली होती. त्यानंतर या प्रकल्पाचे काम बंद होते. आज घळभरणीची पूर्वतयारी म्हणून जेसीबीच्या सहाय्याने गाळ काढण्याला सुरवात करण्यात आली आहे. याबाबत जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे म्हणाले, घळ भरणीसाठीची पूर्वतयारी म्हणून गाळ काढला जात आहे. लवकरच घळभरणीच्या कामाला सुरवात करण्यात येईल. या तीन महीन्यात काम मार्गी लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
……
विभागीय तायकांदो मध्ये देवचंद कॉलेजने महिला व न्यु कॉलेजने पुरुष विभागात मिळवले सर्वसाधारण विजेतेपद

शिवाजी विद्यापीठ विभागीय तायकांदो स्पर्धा आजरा महाविद्यालय च्या अण्णा भाऊ सांस्कृतिक हॉल मध्ये १५ फेब्रुवारी रोजी पार पडल्या. या स्पर्धासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अनिकेत चराटी, प्राचार्य डॉ. अशोक सादळे ,
उप प्राचार्य राजीव टोपले, कार्यालयीन प्रमुख योगेश पाटील, आय. के. पाटील,भैय्या टोपले , पद्माकर कांबळे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. धनंजय पाटील, अल्बर्ट फर्नाडिस हे उपस्थित होते.

महिला सर्व साधारण विजेत्या देवचंद कॉलेज पुरुष संघांचे बक्षीस वितरण प्राचार्य डॉ. अशोक सादळे व महिला सर्व साधारण विजेत्या न्यू कॉलेजचा सत्कार अनिकेत चराटी यांच्या हस्ते पार पडला.
या स्पर्धा साठी २२ पुरुष संघ व महिलांचे १४ संघ सहभागी झाले होते, विविध महाविद्यालयामधील क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक उपस्थित होते. जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी, शिवाजी विद्यापीठाचे झोनल सेक्रेटरी आय. एच. आणि मुल्ला, तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष पद्माकर कांबळे यांच्याहस्ते स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. स्पर्धेबाबतची माहिती पद्माकर कांबळे, डॉ. मुल्ला यांनी दिली.
प्राचार्य डॉ. अशोक सादळे,
उप प्राचार्य राजीव टोपले, कार्यालयीन प्रमुख योगेश पाटील, आय. के. पाटील,भैय्या टोपले , पद्माकर कांबळे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. धनंजय पाटील, अल्बर्ट फर्नाडिस जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील खेळाडू मार्गदर्शक प्राध्यापक उपस्थित होते. महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे यांनी आभार मानले.
उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या जमीन देण्यास चितळे ग्रामस्थांचा विरोधच… शासकीय यंत्रणेसमोर पेच

चितळे ग्रामस्थांना भविष्यात शाळेसह विविध कामासाठी लागणाऱ्या दोन गट नंबर मधील जमिनीचे केलेले वाटप रद्द करावे व प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनी द्याव्यात जेणेकरून भविष्यामध्ये तिकडे गायरानातील जमिनी स्थानिक ग्रामस्थांना उपलब्ध होतील अशी भूमिका घेत आज पुन्हा एक वेळ चितळे ग्रामस्थांनी या जमिनी देण्यास विरोध दर्शवला. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी चितळी येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे प्रशासनाच्या विनंती नंतर त्यांनी टोलबंद आंदोलन मागे घेतले आहे परंतु या आंदोलनावर ठाम असल्याने आज तहसीलदार विकास अहीर, उपविभागीय अधिकारी वसुधा बारवे यांनी आजरा व चितळे आंदोलनस्थळी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. ग्रामस्थांनी आपली भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केल्याने समोरील अडचणी वाढल्या आहेत. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे, सरपंच मारुती चव्हाण उपसरपंच प्रकाश तर्डेकर, मारुती गुरव, प्रकाश धुरे, बंडू सुतार, शामराव दोरुगडे, शिवाजी ठोंबरे, सौ. मनीषा सरदेसाई, एकनाथ घुरे यांच्यासह जिऊर भावी वाडी धनगरवाडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय राऊतांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर… नारायण राणेंचा आरोप
🔸शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल(मंगळवार) शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला होता. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. परंतु केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांना एकप्रकारे प्रत्यूत्तर दिलं आहे. संजय राऊत यांचं लक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे, अशा प्रकारचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी राऊतांवर केला आहे.
राऊतांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर…
संजय राऊत हे शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी पक्षात नाहीयेत. तर त्यांचं लक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे. राऊत शिवसेनेचे नसून संपूर्ण राष्ट्रवादीचे आहेत. राऊतांनी शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीने सुपारी दिली आहे. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची विचारणा करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटायला गेले होते. तेव्हा फक्त मुख्यमंत्र्यांसोबत आदित्य ठाकरे आणि राऊत होते, असं नारायण राणे म्हणाले.
ईडीने गप्प न बसता त्यांची पूजा करावी…
मुख्यमंत्र्यांनी केलेले व्यवहार हे राऊतांपेक्षा मला माहिती आहेत. तसेच त्यांनी ईडीवर देखील आरोप केले आहेत. त्यामुळे ईडीने आता गप्प न बसता त्यांना आत घेऊन त्यांची पूजा करावी. या मंत्रिमंडळात किती लोकं आत गेले आणि किती जाणार आहेत, यावर राऊत का बोलले नाहीत. तसेच त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या चुकीच्या वक्तव्याबाबत माझ्याकडे साक्षीदार असल्याचं राणेंनी म्हटलंय.
प्रविण राऊतांशी काय संबंध?
तुम्ही पत्रकार आणि संपादक असून तुमचा प्रविण राऊतांशी काय संबंध आहे. तुम्ही किती व्यवहार केले आहेत. ईडीने प्रविण राऊत यांची चौकशी केल्यानंतर आता आपण सुद्धा अडचणीत येणार आहोत. त्यामुळे अनिल परब यांच्यासह आपल्याला पण अटक होणार अशी भिती निर्माण झाल्याचं राणेंनी म्हटलंय.

💫औरंगाबादच्या रँचोचं भन्नाट संशोधन; एकच बाईक पेट्रोल आणि बॅटरीवर चालणार
बाजारात मोठ्याप्रमाणात इलेक्ट्रिक मोटारसायकल येत आहेत. पण ही मोटारसायकल खरेदी करत असताना आपल्यासमोर प्रश्न पडतो की, मध्येच जर चार्जिंग संपली अथवा बॅटरीमध्ये काही अडचण निर्माण झाली तर काय करायचं, पण औरंगाबादच्या एका तरुणाने यावर उपाय शोधला आहे. पेट्रोल आणि बॅटरी दोन्हीवर चालणारी मोटारसायकल या तरुणाने बनवली आहे तेही फक्त २० हजारात.
औरंगाबाद शहरातील हर्सूल परिसरात राहणाऱ्या अफरोज शेख नावाच्या तरुणाने भंगारमधून घेतलेल्या दुचाकीच चक्क इलेक्ट्रिक बाईकमध्ये रूपांतर केलं आहे. विशेष म्हणजे ही बाईक फक्त चार्जिंगवरच चालत नाही तर बॅटरी संपल्यावर पेट्रोलवर सुद्धा चालते. ही बाईक तयार करण्यासाठी तीन महिने लागले तर एकूण २० हजार रुपयांचा खर्च आला आहे. तर तीन तास चार्ज केल्यावर ही बाईक २० किलोमीटर चालते. तर पेट्रोलवर ४५ ते ५० किलोमीटरचं ॲव्हरेज देते.
विशेष म्हणजे आपली चालू गाडी इलेक्ट्रिक करण्यासाठी जास्त मॉडिफिकेशन करण्याची गरज नाही. ही टेक्नॉलॉजी वापरून आपण महिंद्रा, बजाज, टीव्हीएस, होंडा, या कोणत्याही प्रकारच्या दुचाकीला सहज इलेक्ट्रिक बाईकमध्ये बदलू शकतो. तसेच ज्या दुचाक्या पंधरा वर्षानंतर स्क्रॅप होतात,त्यांच्या चेसिस आणि इतर गोष्टी वापरून इलेक्ट्रिक बाईक तयार केली तर ५० टाक्यांपर्यंत किंमत कमी होऊ शकते.
अशी सुचली कल्पना….
अफरोज एकदा आपल्या आईला घेऊन जात असताना, त्याच्या गाडीतील पेट्रोल अचानक संपले. त्यामुळे त्याला गाडी ढकलून आणावी लागली, तसेच आईला सुद्धा पायी चालावे लागलं. त्यामुळे पेट्रोल संपल्यावर सुद्धा गाडी चालली पाहिजे अशी गाडी आपण तयार करायला पाहिजे अशी कल्पना अफरोजला सुचली. त्यामुळे भंगारातून ३ हजारात घेतलेल्या दुचाकीवर तीन महिने मेहनत करत त्याने अखेर ही बाईक तयार केली.

🔰भारतीय अत्तराचा न्यूयॉर्कमध्ये सुगंध
🔸 उत्तर प्रदेशातील सुगंधी शहर कन्नौज येथे उत्पादित करण्यात आलेल्या परफ्युमचे अनावरण अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये करण्यात आले आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमधील भाराताचे वाणिज्यदूत रणधीर जैस्वाल यांच्या हस्ते या मेड इन इंडिया अत्तराचे अनावरण करण्यात आले. लवंग, वेलदोडा, जायफळ अशा मसाल्यांच्या पदार्थांचा वापर करून तयार करण्यात आलेले हे अत्तर व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्त बाजारात उपलब्ध करून देण्यात आले .
या कार्यक्रमात जैस्वाल म्हणाले की, कदाचित अमेरिकेत पहिल्यांदाच भारतात तयार करण्यात आलेले आणि ते देखील कन्नौजमध्ये तयार करण्यात आलेले अत्तर प्रथमच उपलब्ध झाले असेल. पुन्हा भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ऐतिहासिक घटनेला ७५ वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय अत्तर अमेरिकेत उपलब्ध होणे ही देखील एक ऐतिहासिक गोष्ट आहे. उद्योजक विकास खन्ना यांच्या झिग्राना कंपनीने हे अत्तर उत्पादित केले आहे. या कार्यक्रमात झिग्रानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील पाठक-शर्मा म्हणाल्या की, भारताताली उत्पादनाचे न्यूयॉर्कमध्ये लॉचिंग होणे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. कन्नौज आणि भारताला जागतिक व्यासपीठावर सादर करणे ही आनंदाची बाब आहे.
या अत्तरामध्ये लवंग, वेलदोडा, जायफळ, चंदन, चमेली, गुलाब यांच्या अर्काचे वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण आहे. शुद्ध गुलाब तेलाचे वापर या अत्तरासाठी करण्यात आला आहे. गुलाबाचे वीस ग्रॅम तेल मिळवण्यासाठी शंभर किलो गुलाबाची गरज भासते, अशी माहिती त्यांनी दिली. भारतात अशा नैसर्गिक सुगंधापासून अत्तरे बनवण्याची प्राचीन काळापासून परंपरा आहे. त्यामुळेच सुगंधी शहर कन्नौजला समर्पित आणखी एक अत्तर सादर करण्याची कंपनीची इच्छा आहे, असे पाठक-शर्मा यांनी सांगितले. झिग्रानाच्या मूळ कंपनीचा १९११ पासून अत्तरे बनवण्याचा इतिहास आहे.





