प्लास्टिक विरोधात नगरपंचायतीचा कारवाईचा धडाका… व्यापाऱ्यांकडून तीनशे किलो प्लास्टिक जप्त

आजरा शहरात बंदी असणाऱ्या ७५ मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक पिशव्या (कॅरीबॅग), प्लास्टीकची ताटे, कप, ग्लास, प्लेट्स, पॉलीथीन पिशव्या / नॉन – वोव्हन प्लास्टीक बॅग वापरणेस व विक्री करणेस बंदी करणेत आली. या नियमाचे उल्लंघन केलेबाबत नगरपंचायत मार्फत दंडात्मक कारवाई करणेत आली. अशी माहिती मुख्याधिकारी श्री. अजिंक्य पाटील यांनी दिली. अविघटनशील कचऱ्यामुळे स्वच्छ सर्वेक्षण – २२ व माझी वसुंधरा २.० अभियानाच्या अमलबजावणीवर अनिष्ठ परिणाम होत असलेणे महाराष्ट्रात प्लास्टीक व थर्माकॉल या अविघटनशील वस्तुंसाठी (उत्पादन, वापर, विक्री, वाहतुक, हाताळणी, साठवणूक व त्यानंतर केलेल्या वेळोवेळी सुधारणा) अधिसुचना २०१८ राज्यासाठी लागु करणेत आलेली आहे. त्यानुसार शहरातील सर्व व्यापारी, विक्रेते, नागरीकांनी बंदी असणाऱ्या ७५ मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीकच्या पिशव्या (कॅरीबॅग), प्लास्टीकची ताटे, कप, ग्लास, प्लेट्स, पॉलीथीन पिशव्या वापरणेस व विक्री करणेस बंदी असताना देखील नियमांचे उल्लंघन केलेल्या २५ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करणेत आला आहे. या २५ दुकानदारांकडून ३०० किलो प्लास्टीक मटेरीयल जप्त करणेत आलेले असून यापुढे देखील ही कार्यवाही अशीच चालु राहील. तथापि शहरातील सर्व व्यापारी व नागरीकांनी प्लास्टीक बंदीच्या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करणेबाबत मुख्याधिकारी यांनी आवाहन केले आहे. सदर कारवाईमध्ये मुख्याधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
प्लास्टिकबंदीसाठी आठ दिवसाची मुदत द्यावी… शिवसेनेची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
केवळ एक दिवस पुर्वसूचना देऊन आजरा नगरपंचायत इकडून प्लास्टिक बंदी अंतर्गत कारवाई केली जात आहे. दुकानदारांना याकरीता आठ दिवसाची मुदत द्यावी व त्यानंतर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना आजरा शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, महेश पाटील, अनपाल तकीलदार आदींनी केली आहे.

प्रथम पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावा त्यानंतर उचंगीच्या घळभरणीला हात घाला…
कॉ. धनाजी गुरव
कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व करणारे दोन कारभारी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे बैठकीकरता जिल्हाधिकार्यांना पाठवून मुख्य कारभारी हात वर करत आहेत. जिल्हाधिकारी आम्हाला काय सांगणार? हा प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून पुनर्वसनाचे आदेश घेऊनच या मगच घरभरणी ला हात घाला अशी जाहीर मागणी कॉम्रेड धनाजी गुरव यांनी उचंगी प्रकल्प स्थळ आयोजित महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त समितीच्या परिषदेत बोलताना केली. यावेळी बोलताना कॉ. गुरव म्हणाले कायद्याबाहेर आम्हाला काहीही नको आहे. हक्कासाठी लढणे याला आता पर्याय नाही. आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारका पर्यंत पायी लॉंग मार्च काढण्यात येईल पुनर्वसन आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी गौरव नायकवडी कॉ. अशोक जाधव कॉ. संजय तर्डेकर, कॉ. शिवाजी गुरव, मूसाभाई मुल्ला, दादासाहेब मोकाशी, श्रीपती पवार, उमेश कानडे आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली. परिषदेस आदित्य रेडेकर, वैभव रेडेकर, युवराज जाधव, संजय भडांगे, पद्मिनी पिळणकर, रणजीत सरदेसाई, धनाजी दळवी यांच्यासह परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समतावादी बीजे शोधण्यासाठी बहुजनांची खरीखुरी संस्कृती अभ्यासली पाहिजे- डॉ. राजेंद्र कुंभार

आजरा येथे विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने डोंगरमाथ्यावरील बहुजनांच्या आया या पुस्तकाचे प्रकाशन व सत्यशोधक विद्रोही शाहिरी जलसा या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि भारतीय संस्कृतीची सत्यकथा या विषयावर व्याख्यान असा संयुक्तिक कार्यक्रम संपन्न झालाा.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व व्याख्याते डॉ.राजेंद्र कुंभार यांनी आपल्या व्याख्यानात, बहुजनांच्या संस्कृतीची बीजे कुठे कुठे आहेत. बहुजनांच्या संस्कृती चा खरा इतिहास शोधण्याचं काम आता होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मिलिंद यादव यांनी लिहिलेले पुस्तक महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले.मिलिंद यादव यांनी पुस्तक लिहिण्यात पाठीमागची भूमिका स्पष्ट केली.
चर्चासत्रामध्ये सुभाष विभूते, संग्राम सावंत अँड. सुदीप कांबळे आदिनी भाग घेतला. कार्यक्रमाची भूमिका संजय घाटगे यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदीप दाभोलकर यांनी केले तर आभार विजय कांबळे यांनी मानले.
सत्यशोधक सेक्युलर फ्रंट, मुक्ती संघर्ष समिती, भारतीय मुस्लीम विकास परिषद, महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कास्ट्राईब शिक्षक संघटना, धरणग्रस्त चळवळ, महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन, गावठाणवाढ संघर्ष समिती या संघटनांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला होता.
या कार्यक्रमाला आजरा चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड या तालुक्यातून लोक आले होते.तसेच अलिबाग हून अतुल खरात, गडहिंग्लज अंनिसचे तानाजी कुरळे व पांडुरंग करमरकर गुरुजी ,भुदरगड वंचितचे अध्यक्ष कासमभाई शेख, डाकरे साहेब, लाल निशाण पक्षाचे शांताराम पाटील, अंनिसचे काशिनाथ मोरे व भिकाजी कांबळे, धरणग्रस्त चळवळीचे शिवाजी गुरव घरकामगार युनियनचे लक्ष्मी कांबळे,रेश्मा कांबळे,मुक्ती संघर्ष समितीचे बाळू कांबळे राजेंद्र देशमुख, मजीद मुल्ला, सविता कांबळे,वंचितचे युवा नेते सुहेब आजरेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कोरोना अपडेट्स… आजरा तालुका..
दिनांक १ फेब्रुवारी २०२२… ६ बाधित. (भावेवाडी, हालेवाडी, भादवण, मासेवाडी येथील)
एक मयत…वेळवट्टी
१० जानेवारी २०२२ पासुन एकूण बाधितांची संख्या १३८
सध्या उपचारा खालील रूग्ण ५२
एकूण मयत २
निधन वार्ता…उर्मिला बांदेकर

आजरा येथील उर्मिला आनंत बांदेकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
जयसिंगराव देसाई

वेळवट्टी(ता.आजरा) येथील जयसिंगराव शंकरराव देसाई (वय ६५)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, पत्नी नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा बँकेचे संचालक सुधिर देसाई यांचे ते चुलते होत.




