कारण नसताना विरोधकांनी निवडणूक लादली : ग्रामविकास मंत्री मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक विरोधकांनी कारण नसताना लादली आहे. कोणत्याही परिस्थितीत शाहू विकास आघाडीची सत्ता येणार असून आजरा तालुका विकास सेवा संस्था गटातून सुधीर देसाई यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला ते राजर्षी शाहू विकास आघाडीच्या प्रचार सभेमध्ये आजरा येथे बोलत होते.
नामदार मुश्रीफ म्हणाले, येत्या वर्षभरात दहा हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण करण्याबरोबरच बँकेला दोनशे कोटी रुपयांचा नफा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जिल्हा बँकेच्या सहकार्याने आजरा साखर कारखाना सुरळीत चालण्यास मदत झाली आहे यापुढे कारखाना विस्तार वाढ, को-जनरेशन प्रकल्प, इथेनॉल निर्मिती प्रकल्प या सर्वासाठी जिल्हा बँक आजरा साखर कारखान्याच्या पाठीशी हिमालयासारखी राहील. प्रदीर्घ कालावधीकरता जिल्हा बँकेमध्ये नोकऱ्यांचा बाजार असतानाही एक रुपयाही न घेता तालुक्यातून अनेकांचे संसार उभा करणारे व तालुक्याचे प्रतिनिधित्व केलेले स्व. राजारामबापू यांचे चिरंजीव या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांना निवडून देऊन एक वेगळ्या प्रकारची आदरांजली बापूंना वाहूया, असे आवाहनही ना. मुश्रीफ यांनी केले. उपस्थितांचे स्वागत करताना गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी केवळ ना. मुश्रीफ यांच्या सहकार्यामुळे आजरा साखर कारखान्याचे संचालक आज तालुक्यात ताठ मानेने फिरत आहेत असे स्पष्ट केले. यावेळी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, जि. प. सदस्य उमेश आपटे, सभापती उदयराज पवार यांनीही मनोगत व्यक्त केले सभेस आमदार राजू आवळे, आमदार राजेश पाटील, संग्रामसिंह कुपेकर, माजी उपसभापती दीपक देसाई,अनिरुद्ध रेडेकर सुभाष देसाई, रणजित देसाई, रवी भाटले, राजू मुरकुटे, नौशाद बुड्डेखान, महादेव पोवार, भैय्या माने, सुधिर देसाई, स्मिता गवळी, माजी उपसभापती कामीना निवृत्ती कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मारुती घोरपडे यांनी आभार मानले.
निवडणुकीचा अट्टाहास का…?
निवडणुकीच्या माध्यमातून बँकेची कोणतीही बदनामी होऊ नये यासाठी निवडणूक एकोप्याने व्हावी म्हणून आपण प्रयत्न केले शिवसेनेला स्वीकृतसह ३ जागा देण्याचे कबूल केले होते. तरीदेखील शिवसेनेने स्वतंत्र पॅनल करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत आपला कोणताही आक्षेप नाही परंतु किमान नऊ जागांवर शिवसेनेने उमेदवार उभा करण्याची गरज होती. पॅनल रचनेमध्ये असे दिसत नसल्याने निवडणुकीचा अट्टाहास का केला ? असा प्रश्नही ना.मुश्रीफ यांनी उपस्थित केला.
मंत्री मुश्रीफ यांनी बँकेला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिले : पालकमंत्री सतेज पाटील

एक वेळ जिल्हा बँक प्रचंड आर्थिक अडचणीत होती अशावेळी अध्यक्ष पदाची जबाबदारी मंत्री मुश्रीफ यांच्यावर सोपविण्यात आली मुश्रीफ यांनी सक्षम पणे ही जबाबदारी पेलत तोट्यातील बँक नसात आणून दाखवली. ग्रामीण भागामध्ये आर्थिक चक्र हे विकास सेवा संस्था व जिल्हा बँकेवर अवलंबून आहे शेतकरी अडचणीत येऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.



भांडण प्रकरणी मुरुडे येथील आठ जणाविरोधात गुन्हा नोंद
मेसकाट्या तोडल्याने झालेल्या वादाचे पर्यवसान भांडण, शिवीगाळ व धक्काबुक्कीत झाल्यामुळे मुरुडे येथील आठ जणांविरुद्ध आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी देण्यात आले आहेत.
याबाबत आजरा पोलिसातून मिळालेली माहिती अशी की सौ.सोनल महेश पाटील यांचे चुलते सुभाना बाबुराव पाटील हे सोनल यांच्या वडिलांच्या घराला लागून असलेल्या सामायिक गट नंबर ३१३ मध्ये मेसकाटया तोडत होते तेव्हा सोनल यांचा भाऊ अजित बाळासाहेब पाटील हा रस्त्यावर येऊन त्यांचे चुलते सुभाना पाटील यांना सदर जागेचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने अद्याप निकाल न लागल्याने मेसकाट्या तोडू नयेत असे सांगत असताना येथे जोरदार वाद झाला. त्यानंतर या वादाचे पर्यवसान भांडण व एकमेकाला शिवीगाळ धक्काबुक्की करण्यात आले. याबाबतची फिर्याद सौ. सोनल महेश पाटील (सध्या राहणार मुरुडे मुळगाव कुर्ला, नेहरूनगर मुंबई) यांनी दिल्याने या फिर्यादीवरून सूभाना बाबुराव पाटील, अनंत सुभाना पाटील, सुमन सुभाना पाटील( सर्व रा. मूरुडे ता. आजरा) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान आपणाला शिवीगाळ केल्याची फिर्याद सूमन सुभाना पाटील (रा. मुरुडे ,ता. आजरा) यांनी अजित बाळू पाटील, अमित बाळू पाटील, सोनल महेश पाटील, बाळू बाबुराव पाटील, गिता बाळू पाटील(रा.मुरुडे) यांच्या विरोधात दिल्याने या पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.






