

हात्तीवडे येथे दोन ठिकाणी घरफोडी : संसारोपयोगी साहित्य लंपास
आजरा तालुक्यातील हात्तीवडे येथे रवळनाथ मंदिराशेजारी असणाऱ्या सुतार बंधूंच्या दोन घरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी पाठच्या दाराने प्रवेश करून संसारोपयोगी साहित्य लंपास केले. याबाबतची नोंद उशिरापर्यंत पोलिसांत झाली नव्हती.

आजरा पं. स. आज उपसभापती निवड : सौ. वर्षा कांबळे यांना संधी
आजरा पंचायत समितीच्या सभापती सौ. वर्षा बागडी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या उपसभापती पदाची आज निवड करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दुपारी दोन वाजता तहसीलदार विकास आहिर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलवण्यात आली आहे. उर्वरित कालावधी करीता राष्ट्रवादीच्या सौ.वर्षा कांबळे यांची निवड निश्चित आहे आज दुपारच्या बैठकीत त्यावर अधिकृत शिक्का मोर्तब केले जाईल.

कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाटयमहोत्सव स्थगित
आजरा येथील जेष्ठ नाट्य दिग्दर्शक कै रमेश टोपले यांचे स्मृतीप्रित्यर्थ नवनाट्य मंडळ, आजरा यांचे वतीने दि. ८ जानेवारी ते १५ जानेवारी २०२२ या कालावधीत ७ वा राज्यस्तरीय नाट्यमहोत्सव आयोजित करणेत आला होता. या महोत्सवाच्या आयोजनाची तयारी पूर्ण झाली होती परंतू ओमीक्रॉन कोरोना संसर्ग फैलावण्यास प्रतिरोध करणेच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे दि.३१/१२/२०२१ रोजीच्या आदेशातील निर्बंधानुसार जास्तीत जास्त ५० व्यक्तींनाच नाट्यमहोत्सवास उपस्थित राहणेस परवानगी आहे. त्यामूळे हा नाटयमहोत्सव शासनाच्या पुढील योग्य त्या आदेशापर्यंत स्थगित करण्यात आला असून कोरोना पार्श्वभूमीवर लावलेले निर्बंध शासनाकडून शिथील झालेनंतर हा महोत्सव आयोजित करणेत येईल असा निर्णय नवनाटय मंडळाचे अध्यक्ष अशोक आण्णा चराटी आजरा बॅकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे, नाटयमहोत्सव अध्यक्ष चंद्रशेखर फडणीस यांनी नवनाटय मंडळाचे वतीने जाहीर केला.

व्यंकटराव हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आजरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करणेत आले.
आजरा महाल शिक्षण मंडळ,आजराचे अध्यक्ष श्री.जयवंतरावजी शिंपी यांच्या हस्ते क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्री.एस.पी.कांबळे संचालक व माजी प्राचार्य श्री.सुनील देसाई प्राचार्य श्री.एस.बी.गुरव पर्यवेक्षक श्री.एस.जी.खोराटे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सदर दिनाचे औचित्य साधून प्राचार्य श्री.एस.बी.गुरव यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री-शिक्षण कार्याची माहिती दिली. यावेळी डॉ. सुरज पाटणे व सर्व शिक्षक वृंद,कर्मचारी विध्यार्थी यावेळी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आर.पी.होरटे यांनी केले.

देवर्डे शाळांमध्ये बालिकादिन उत्साहात..
क्रांतिमा सावित्रीमाईंना अभिवादन !

बालिकादिनाच्या निमित्ताने विद्यामंदिर देवर्डे व रवळनाथ हायस्कूल देवर्डे या शाळांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत रेश्मा बोलके यांनी करून सावित्रींबाईंच्या कार्याची ओळख थोडक्यात करून दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा संयोगिता सुतार, सरोजिनी कुंभार, जयश्री तानवडे, रेश्मा बोलके आणि अंगणवाडीच्या महिला शिक्षिकांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्रेया कासले, आर्या पाटील, श्रुतिका गुरव, आर्या चाळके, स्वरा चाळके, सलोनी कासले, हर्षदा कांबळे या विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून सावित्रीबाईंच्या कार्याचा आढावा घेतला. प्रांजल कांबळे या विद्यार्थिनीने सावित्रीबाईच्या वेषात येऊन मनोगत व्यक्त केले. देवेंद्र शिखरे, सुनील सुतार यांनी मनोगते व्यक्त केली. रेश्मा बोलके यांनी सूत्रसंचालन तर वंदना जाधव यांनी आभार मानले.
कार्यक्रमास अंगणवाडी सेविका जयश्री तानवडे, सुगंधा तानवडे, सुलोचना गुरव, शीतल बुरुड यांचेसह मुख्याध्यापक नामदेव माईनकर, सुभाष सावंत, चंद्रकांत घुरे, महेश नावलगी, राजेंद्र पाटील, महादेव तेजम हे शिक्षक उपस्थित होते. नियोजन धनाजी चाळके, मारुती बुरुड व राजीव गुरव यांनी केले.

पंडित दीनदयाळ विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

पं. दीनदयाळ विद्यालय व आर्टस, कॉमर्स व सायन्स ज्यु.कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
आज-यातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. गीता पोतदार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनी यांची भाषणे झाली. कु सानिका ठाकूर हिने सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती सांगतली. मुख्याध्यापक श्री. विजय राजोपाध्ये यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. गीता पोतदार यांचा परिचय करून दिला.
सौ. गीता पोतदार यांनी आपल्या प्रमुख भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या विषयीची माहिती सांगितली. ‘जबरदस्ती कसली मर्दानगी’ या पोस्टरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. अगदी घरातून मुलीला कमी दर्जाची वागणूक दिली जाते. अनेक मुली घाबरून,लाजून राहतात त्याच्यावर झालेले अत्याचार त्या सांगत नाहीत. त्यांनी मुलींना सांगितले की तुम्ही न घाबरता आपल्यावरील अन्याय घरी सांगितला पाहिजे. सावित्रीबाईंचे मुलिंच्या शिक्षणात मोलाचे योगदान आहे. आज मुली पुरुषाच्या खांदयाला खांदा लावून काम करतात. रिक्षा चालकापासून ते अवकाशयात्रीपर्यंत आज मुली कार्यरत आहेत, हे सर्व सावित्रीबाईंच्या योगदानामुळेच शक्य झाले आहे. मुलीनी घाबरून न जाता शाळा शिकून विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवावा असा उपदेश त्यांनी आपल्या भाषणामधून केला.
सौ. कुंभार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कै.लक्ष्मीबाई शेवाळे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती

कै.लक्ष्मीबाई शेवाळे सार्वजनिक वाचनालय ,पोळगाव याच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन सरपंच वृशाली धडाम व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.नवनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विष्णू जाधव, किरण चव्हाण, बाळू नार्वेकर,लक्ष्मण खामकर, गुणाजी कांबळे, अर्जुन कांबळे, बापू सुतार, लता खामकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉ. शिंदे यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनवृत्तान्त मांडला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘व्यंकटराव’ येथे कोवॅक्सिन लसीकरण सत्र उत्साहात संपन्न

पंधरा ते अठरा शालेय वयोगटातील मुलां मुलींचे कोव्हॅक्सिन लसीकरण सत्र व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आजरा येथे आरोग्य विभाग मार्फत घेण्यात आले.यावेळी आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा या संस्थेचे चेअरमन व जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, संस्थेचे सचिव श्री. एस. पी. कांबळे, प्रशालेचे माजी प्राचार्य व विद्यमान संचालक श्री. सुनील देसाई, प्राचार्य श्री.शिवाजी गुरव, नगरसेवक श्री. किरण कांबळे, पर्यवेक्षक श्री. सुरेश खोराटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज पाटणे यांच्यासह आरोग्य विभागाचा कर्मचारी वर्ग व सर्व शिक्षक वृंद यावेळी हजर होते. जि.प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे हस्ते लसीकरण सत्राचे उद्घाटन करण्यात आले. आजरा तालुक्यातील ही पहिलीच शाळा कोव्हॅक्सीन लसीकरणासाठी निवडण्यात आली आहे.

आजरा साखर कारखाना गाळप स्थिती
दिवस -६३
एकुण गाळप- १,८३,३६० मे.टन
एकुण साखर उत्पादन – २,११,३५० क्विंटल
सरासरी उतारा-११.६०


