अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरण खटला अंतिम टप्प्यात
कुरुंदकर यांच्या अडचणीत वाढ
कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे- गोरे हत्याकांड खटला अंतिम टप्प्यात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते हे मुळगाव असणाऱ्या अश्विनी बिद्रे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर (आजरा,जि. कोल्हापूर )ने माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे राजू( ज्ञानदेव) पाटील, वाहनचालक कुंदन भंडारी व महेश फळणीकर यांच्या मदतीने हत्या करून लाकूड कापण्याच्या मशीनने मृतदेहाचे तुकडे करून ते भाईंदरच्या वसई खाडी मध्ये टाकण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आले. पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या या प्रकरणाबाबत महाराष्ट्रभरातून उलट सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला अटक करण्यात आली. त्याच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर या प्रकरणातील अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या.२०१२-१३ च्या दरम्यान अश्विनी बिद्रे व अभय कुरुंदकर यांची ओळख झाली. याच दरम्यान दोघांमधील जवळीक वाढत गेली. याची पोलिस दलात उलटसुलट चर्चा सुरू होती .सांगलीवरून बढतीवर रत्नागिरी येथे अश्विनी यांची बदली झाली. बदली झाल्यानंतर कुरुंदकरचे त्यांच्याकडे येणे-जाणे सुरूच राहिले. अश्विनी यांनी कुरुंदकरकडे लग्नाचा तगादा लावल्यामुळे या दोघांमध्ये वारंवार शाब्दिक वादही होत असल्याचे समजते . या संबंधांची माहिती अश्विनी यांच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर कुरुंदकरकडून अश्विनी यांना ठार मारण्याची धमकीही दिली जात होती. एप्रिल २०१६ मध्ये कळंबोली (नवी मुंबई) येथे अश्विनी यांची बदली झाली. प्रत्यक्षात मात्र त्या बदलीच्या ठिकाणी हजर झाल्या नाहीत. त्या हजर झाल्या नसल्याचे पत्र कुटुंबीयांना मिळाल्यानंतर कुटुंबीयांचे धाबे दणाणले. १४ जुलै २०१६ रोजी अश्विनी यांच्या कुटुंबियांनी त्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली. तक्रार देऊनही यामध्ये फारशी प्रगती नाही हे लक्षात आल्यानंतर पुन्हा गुन्हे शाखेकडे सदर तपास सोपवण्याची त्यांनी मागणी केली. अखेरीस ऑक्टोबर २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याबाबत दाद मागण्यात आली.
२५ ऑक्टोबर २०१६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी स्वतंत्र अधिकारी नेमून चौकशी करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार नवी मुंबई परिमंडळ २ च्या उपायुक्त संगीता अल्पान्सो यांच्या नेतृत्वाखाली प्रकरणाची चौकशी सुरु झाली. प्राथमिक चौकशीमध्ये अनेक धक्कादायक बाबी पुढे येऊ लागल्यानंतर ३१ जानेवारी २०१७ रोजी कुरुंदकर विरोधात बिद्रे यांच्या अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला. परंतु याच दरम्यान अल्फान्सो यांची बदली झाली. कुरुंदकर पाठोपाठ दोनच दिवसात राजू पाटील, वाहन चालक कुंदन भंडारी, महेश फळणीकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस तपासात कुरुंदकर यांच्याकडून अश्विनी यांना होणारी मारहाण याचबरोबरचे विविध संवाद याचे पुरावे लॅपटॉपच्या माध्यमातून हस्तगत करण्यात यश आले.
अश्विनी यांची हत्या करून त्यांचे अवयव फ्रीज व एका पेटीमध्ये ठेवण्यात आलेेे होते .दुसऱ्या दुसऱ्या दिवशी ते भाईंदर वसई खाडीत टाकण्याचीही तपासात निष्पन्न झाले . अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने एका सहाय्यक पोलीस निरीक्षक महिला अधिकार्याची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. तब्बल तेवीस महिन्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाल्याने पोलीस दलाच्या कार्यपद्धतीबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश अस्मर यांच्या समोर सदर खटला सुरू होता परंतू अस्मर यांनी हा खटला सोडल्यानंतर न्यायाधीश माधुरी आनंद यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे.
खटल्यांमध्ये पोलिस साक्षीदार न्यायालयात माहिती देण्यास टाळाटाळ करत असून यासंदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार करण्याचा इशारा सरकारी वकील ॲड. प्रदीप घरत यांनी दिला होता. मध्यंतरीच्या कालावधीत लॉकडाऊनमुळे या खटल्याची सुनावणी लांबली होती . डझनभर साक्षीदारांची उलट तपासणी या प्रकरणात करण्यात आली. पोलीस हवालदार विजय सोनवणे यांनी कुरुंदकर याने आपणाला सत्तुर( मोठा कोयता) व बॅटरी या दोन वस्तू आणुन देण्यासाठी भाग पाडले अशी साक्ष जिल्हा सत्र न्यायालयासमोर दिली आहे. नुकतेच आयडियाचे नोडल अधिकारी विजय शिंदे यांनी न्यायालयात अश्विनी यांची हत्या झालेल्या रात्री या प्रकरणातील मुख्य आरोपी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरच्या फ्लॅटमधून तब्बल बारा मिनिटे राजू पाटील यांचे संभाषण झाल्याचे जीपी आय वरून सिद्ध होत असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. यापूर्वीही व्होडाफोनचे नोडल अधिकारी चांगदेव गोडसे यांनी मोबाईल लोकेशन बाबत न्यायालयासमोर हीच माहिती दिली होती. या साक्षीमुळे कुरुंदकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे . कुरुंदकर याला निलंबित करण्यात आले आहे .सध्या हा खटला अंतिम टप्प्यात असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे पुन्हा एक वेळ या खटल्याच्या निकालाकडे लक्ष लागून आहे.
अश्विनी बिद्रे- गोरे यांच्या हत्याप्रकरणाचा घटनाक्रम
सन २००० पासून अश्विनी बिद्रे स्पर्धा परीक्षे करिता प्रयत्नशील
२००५ राजू गोरे यांच्याशी बिद्रे विवाहबद्ध
२००६ सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी निवड (२०१२-१३ पर्यंत पुणे ,सांगली येथे सेवा)
२०१२ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्याशी ओळख
२०१३ बढतीवर बिद्रे या रत्नागिरी येथे हजर
२०१५ कळंबोली(नवी मुंबई) येथे बदली
११ एप्रिल २०१६ पासून बेपत्ता
१४ जुलै २०१६ रोजी पोलीस स्टेशनला कुटुंबीयांकडून बिद्रे यांची बेपत्ता असल्याबद्दल तक्रार
३१ ऑगस्ट २०१६ रोजी गुन्हे शाखेकडे प्रकरणाचा तपास सोपवण्याची मागणी
४ ऑक्टोबर २०१६ मुंबई उच्च न्यायालयात कुटुंबियांकडून दाद
२५ ऑक्टोबर २०१६ उच्च न्यायालयाकडून स्वतंत्र अधिकारी म्हणून चौकशी करण्याचे आदेश
नवी मुंबई परिमंडळ २ च्या उपायुक्त संगीता अल्पान्सो नेेतृत्वाखाली चौकशी सुरू
३१ जानेवारी २०१७ अभय कुरुंदकर विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद.
(याच दरम्यान अल्फान्सो यांची बदली)
७ डिसेंबर २०१७ अभय कुरुंदकरला अटक पाठोपाठ राजू( ज्ञानदेव) पाटील यालाही अटक.
पुन्हा तपास अल्पान्सो यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर ड्रायव्हर कुंदन भंडारी व महेश फळणीकर या दोघांना अटक
आजरा तालुकाही हादरला
अभय कुरुंदकर यांचे शालेय शिक्षण आजरा येथे झाल्याने आजरा येथे त्याचा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात आहे. कुरुंदकरचे आज-यात नेहमी येणे-जाणे होते.अधिकारी मित्राशी असणारी सलगी अभिमानाने मिरवणारा मित्रपरिवार कुरुंदकर याची दुसरी बाजू समोर येताच हादरून गेला. या प्रकरणाच्या तपासात कुरुंदकर यांच्या मालकीच्या हाळोली(आजरा) येथील फार्म हाऊसची व या परिसराची झडतीही पोलिसांनी घेतली होती तर महेश फळणीकर हादेखील आजरा येथीलच आहे
.


अश्विनी बिद्रे- गोरे यांच्या हत्याप्रकरणाचा घटनाक्रम