बुधवार दि.१८ नोव्हेंबर २०२६

बापरे…
एकाच महिन्यात अर्धा किलोमीटरच्या अंतरावर सात वेळा उसाने घेतला पेट

आजरा : प्रतिनिधी
कोवाडे व पेद्रेवाडी ता. आजरा सिमेवर एकाच महिन्यामध्ये तब्बल सात वेळा शॉर्टसर्किटने उसाने पेट घेतल्याने सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर वारंवार या घटना घडल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत तर आला आहेच परंतु वीज वितरणच्या कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
अनिल मारुती डोंगरे संताजी विठ्ठल डोंगरे सुशाबाई राजाराम डोंगरे / गट नंबर ७५१ बाबू मसु डोंगरे, कृष्णा मसु डोंगरे/ गट नंबर ७५३ व विष्णू रखमाजी डोंगरे गट नंबर ७५२ या डोंगरे कुटुंबीयांच्या उसाच्या फडाला शॉर्टसर्किट मे आग लागून उसाचे मोठे नुकसान झाले आहे. महिन्याभरात तब्बल सात वेळा सदर प्रकार घडल्याने डोंगरे कुटुंबीय वैतागले असून याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
वीज वितरण विभागाने तातडीने याबाबत योग्य ती उपाययोजना करून हे प्रकार थांबवावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील डोंगरे यांनी केली आहे.

पाणी नियोजनाबाबत गावपातळीवर जागृती करा : सदस्यांच्या सूचना
आजरा पंचायत समिती मासिक सभा

आजरा : प्रतिनिधी
आजरा पंचायत समितीच्या मंगळवारी झालेल्या मासिक सभेत दुष्काळाच्या अनुषंगाने पाणी नियोजन, चारा टंचाई यासह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. पाणी नियोजनाबाबत गावपातळीवर जागृती करण्याबाबतच्या सूचना सर्वच सदस्यांनी या बैठकीत केल्या. सभापती यशोदा पोवार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.
स्वागत गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी केले. पाटबंधारे विभागाच्या आढावा घेताना तालुक्यातील पाणी प्रकल्पांमधील उपलब्ध पाण्याबाबत चर्चा करण्यात आली. ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेल अशा पद्धतीने पाटबंधारे विभागाने नियोजन केले असल्याचे सांगितले. पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे नियोजन काटेकोर पणे करण्याबाबतच्या सूचना करताना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याबाबत ग्रामपंचायत पातळीवर जागृती करण्याच्या सूचनाही या बैठकीत करण्यात आला.
पशुसंवर्धन विभागाच्या आढाव्यावेळी चारा टंचाईबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामीण रूग्णालयातील कामकाजा आढावा प्रताप जाधव यांनी घेतला. यावेळी डायलेसीस विभागाबाबत सभापती पोवार यांनी प्रश्न उपस्थित केले. तालुका कृषी विभागाच्या आढाव्यावेळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. ५ कोटी ३६ लाख ९६ हजार रूपयांची मागणी शासनाकडे करण्यात आल्याचे सांगितले. तर काही शेतकऱ्यांना दीवाळीपूर्वी पाच हजार रूपयांची रक्कम अदा झाल्याचे सांगण्यात आले. यावर तालुक्यातील लाभार्थ्यांची संख्या किती असा प्रश्न सदस्य विकास चोथे यांनी उपस्थित केला. काजू नुकसानभरपाईचे काय झाले असा सवाल सभापती पोवार यांनी केला. कृषी सहाय्यकांच्या गावातील उपस्थितीबाबतही पोवार यांनी प्रश्न केला. तर कमी पाण्याची चारा पिके घेण्याबाबतच्या सूचना गटविकास अधिकारी सावंत यांनी सांगितले.
आजरा आगाराच्या आढाव्यावेळी महिलांच्या अर्ध्या तिकीटाबाबत चर्चा करण्यात आली. वनविभागाचा आढावा राठोड यांनी घेतला. शिक्षण विभागाचा आढावा गटशिक्षण अधिकारी बसवराज गुरव यांनी घेतला. आरोग्य विभागाच्या आढाव्यावेळी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र. उपकेंद्रांमध्ये आवश्यक मनुष्यबळ आहे का प्रश्न चोथे यांनी केला. तुमच्याकडे माणसं नाही म्हणून रूग्णांनी बाहेर जायचे का असा प्रश्नही त्यांनी केला. उत्तूर येथील शवागृहाच्या कामावरूनही आरोग्य अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले.
एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाची माहिती मनिषा कांबळे यांनी दिली. तालुक्यात तीव्र कमी वजनाच्या बालकांची संख्या आठ असून त्यांना अतिरिक्त पोषण आहार देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. बचत गटांकडून पोषण आहार घेणं का बंद केले असा प्रश्न चोथे यांनी उपस्थित केला. अन्न व औषध प्रशासनाकडुन फूड लायसन्स बंधनकारक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावर संबंधित बचत गटांकडून लागणारी कागदपत्रे घेऊन त्यांना लायसन्स मिळवून देण्यासाठी मदत करा अशा सूचना सदस्य चोथे व पारदे यांनी केल्या. तर पोषण आहार तयार करण्यासाठी बचत गटांना प्राधान्य द्या अशी सूचना सभापती पोवार यांनी केली.
बैठकीस सर्व सदस्यांसह अधिकारी उपस्थित होते.

आजरा येथे न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप सुरू

आजरा : प्रतिनिधी
समान काम, समान वेतन’ या न्याय्य मागणीसाठी राज्यातील दुय्यम व जिल्हा न्यायालयांमधील कर्मचाऱ्यांनी अखेर बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. उच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने राज्यातील सुमारे ३४ हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (दि. १७) बेमुदत संप पुकारला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा व तालुका न्यायालयांमधील कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला आहे.
न्यायालयीन व्यवस्थेतील कामकाज सुरळीत चालविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रबंधक, अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक, नाझीर, लघुलेखक, लिपिक, बेलिफ, वाहनचालक, कोर्ट किपर, झेरॉक्स ऑपरेटर, शिपाई आणि सफाईगार अशा विविध संवर्गांतील कर्मचाऱ्यांनी १६ सप्टेंबरपासून आंदोलनाला सुरुवात केली होती. सुरुवातीला काळ्या फिती लावून काम करण्यात आले. मात्र, शासनाने प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी आता संपाचा निर्णय घेतला आहे. बेमुदत संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे नवीन दावे दाखल करणे, अर्जांची नोंदणी, आदेशांच्या प्रमाणित प्रती मिळविणे, तसेच जामीन आदेशांची अंमलबजावणी आदी प्रक्रियांवर परिणाम झाला. सुनावणीसाठी उपस्थित असलेल्या वकिलांनाही कामकाजातील अडचणींचा सामना करावा लागला. विशेषतः तातडीच्या न्यायालयीन कामांसाठी आलेल्या पक्षकारांची गैरसोय झाली.
उच्च न्यायालयाने जिल्हा व दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत सविस्तर शिफारशींसह वेतनवाढीचा प्रस्ताव ३१ जानेवारी २०२५ रोजी राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. मात्र, तब्बल २२ महिने उलटूनही राज्य शासनाने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसोबतच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे. आपल्या न्याय्य हक्कांच्या मागणीसाठी कार्यरत कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून सेवानिवृत्त कर्मचारीही उभे राहिले आहेत. त्यामुळे आंदोलनाला मोठे नैतिक पाठबळ मिळाले आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे संघटनेने सांगितले. न्यायालयांमध्ये अपुरे मनुष्यबळ, वाढती प्रकरणसंख्या आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा ताण असतानाही वेतनातील असमानता दूर होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
आजरा येथेही आंदोलन सुरू झाले असून न्यायातील कर्मचारी अधीक्षक श्री. रवींद्र घायताडक,योगिता चव्हाण लघुलेखक, भारत सारंग सिनियर क्लार्क, प्रवीण येणे चवंडीकर, हेड बैलिफ श्री मधुकर नाईक तसेच बेलीफ प्रकाश गोंधळी, विनायक माजगावकर, क्लार्क श्री. बस कोंडा कतगर, श्री. परवेज इनामदार, श्री. चेतन गवळी, मोहन बुरुड, मदन करपे, सौ. शुभांगी स्वामी, शिपाई श्री. राहुल भारमल श्री. विनायक पाटील श्री. बळीराम वाडकर आदी आंदोलनात सहभागी झाले.

उत्तूरच्या विकासाचा गाडा समन्वयाच्या अभावात रुतला ?
उत्तूरला विकास निधीची प्रतीक्षा...

उत्तूर : मंदार हाळवणकर
उत्तूरच्या विकासासाठी निवडणुकीच्या काळात मोठमोठी आश्वासने देण्यात आली. पालकमंत्री आणि वैद्यकीय मंत्री यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तूरला भेट देऊन विविध विकासकामांबाबत आश्वासने दिली होती. मात्र, सहा महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही या आश्वासनांची प्रत्यक्ष पूर्तता झालेली नाही. विशेष म्हणजे, विधानसभा मतदारसंघाला दोन मंत्रिपदे आणि जिल्हा परिषद सदस्यांचे प्रतिनिधित्व लाभले असतानाही उत्तूरच्या विकासाची गाडी अपेक्षित वेगाने पुढे सरकत नसल्याचे चित्र आहे.सुमारे 15 हजार लोकसंख्या असलेल्या उत्तूरमध्ये अंतर्गत रस्ते आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. गावातील अनेक अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, अपुऱ्या सुविधा आणि पाणीपुरवठ्याबाबतच्या अडचणी यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाणीपुरवठा योजनेची कामे आणि प्रत्यक्ष घरांपर्यंत पाणी पोहोचण्यातील अडचणी यांमुळे या प्रश्नाची तीव्रता अधिक जाणवत आहे. गावाच्या विकासाच्या चर्चा सुरू असताना मूलभूत गरजांचे प्रश्नच प्रलंबित राहणे ही चिंतेची बाब बनली आहे.
याशिवाय आरोग्य सुविधा, शाळा, अंगणवाड्या, सभागृह, क्रीडांगण, स्मशानभूमी परिसरातील सुविधा आणि पेव्हर ब्लॉक अशा अनेक कामांची आवश्यकता आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत उपलब्ध सुविधा अपुऱ्या पडत असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधीची गरज आहे.ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असलेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सर्व विकासकामे करणे शक्य नाही. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी), आमदार निधी आणि विविध शासकीय योजनांमधून निधी मिळविण्यासाठी प्रभावी पाठपुरावा होणे आवश्यक आहे. मात्र, यासाठी ग्रामपंचायतीकडूनही अपेक्षित सक्रियता आणि सातत्यपूर्ण प्रयत्न दिसणे गरजेचे आहे. काही वेळा ग्रामपंचायतीची उदासीनताही जाणवत असून स्थानिक पातळीवर प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक असलेला पुढाकार कमी पडत असल्याचे चित्र आहे.दुसरीकडे, ग्रामपंचायतीमध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांच्या माध्यमातून निवडून आलेल्या सदस्यांमध्ये अपेक्षित समन्वयाचा अभाव जाणवत आहे. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न होणे अपेक्षित असताना परस्पर समन्वयातील कमतरतेचा फटका विकासकामांना बसत आहे. गावाच्या प्रश्नांवर एकत्रित भूमिका आणि सामूहिक पाठपुरावा न झाल्यास उपलब्ध संधी आणि निधी मिळविण्यातही अडथळे निर्माण होऊ शकतात. निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने, विधानसभा मतदारसंघाला लाभलेली दोन मंत्रिपदे आणि जिल्हा परिषद सदस्यांचे प्रतिनिधित्व या सर्व बाबींचा विचार करता उत्तूरच्या विकासाबाबत अधिक ठोस कामगिरी अपेक्षित आहे. मात्र, मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या पातळीवरील पाठपुराव्याबरोबरच ग्रामपंचायतीनेही आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडणे आवश्यक आहे. केवळ एकमेकांकडे बोट दाखवून गावाचे प्रश्न सुटणार नाहीत.
उत्तूरच्या विकासासाठी आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष निधी, मंजूर कामांचा तपशील आणि कामे पूर्ण करण्याचे नियोजन नागरिकांसमोर येणे गरजेचे आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, मंत्री, जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न केले तरच गावाच्या विकासाला दिशा मिळू शकते. अन्यथा दोन मंत्रिपदे आणि जिल्हा परिषद सदस्यांचे प्रतिनिधित्व असूनही उत्तूरच्या मूलभूत प्रश्नांची प्रतीक्षा कायम राहणार आहे.

रायन कुतीनो याचे यश
आजरा : प्रतिनिधी
पार्वती शंकर शैक्षणिक संस्थेच्या वतीने आयोजित ‘ चतुरंग २०२६’ अंतर शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये रोझरी हायस्कूल आजराचा विद्यार्थी रायन रूजायो कुतीनो याने १४ वर्षाखालील गटामध्ये तृतीय क्रमांक पटकावला.
त्याला रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले, यावेळी विश्वनाथअण्णा करंबळी, वर्षा होनकट्टी, प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


शिवसेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

आजरा : प्रतिनिधी
शिवसेनेची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून नूतन सहसंपर्कप्रमुख श्री.संभाजी पाटील, नूतन उपजिल्हाप्रमुख(चंदगड विधानसभा) श्री.युवराज पोवार व नूतन तालुकाप्रमुख आजरा श्री.संजय येसादे यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी जिल्हाप्रमुख प्रा.सुनील शिंत्रे, उपतालुकाप्रमुख शिवाजी आढाव,उपतालुका प्रमुख सागर वाघरे,शेतकरीसेना तालुकाप्रमुख दिनेश कांबळे, महिला तालुकासंघटिका गीता देसाई,युवासेना उपजिल्हा अधिकारी महेश पाटील, आरोग्य सेना तालुकाप्रमुख दयानंद भोपळे,युवा प्रमुख महादेव सुतार, उपविभाग प्रमुख रवी खोराटे, ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू रेडेकर, महादेव होडगे, जयसिंग पाटील, युवासेनेचे सुयश पाटील,अमित गुरव, हरिश्चंद्र व्हरकटे इ तसेच शाखाप्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुहृदयसम्राटांना अभिवादन…

आजरा : प्रतिनिधी
शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त आजरा येथे अभिवादन करण्यात आले.
आजरा पंचायत समितीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमप्रसंगी सभापती सौ. यशोदा पोवार, गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
शिवसेना आजरा कार्यालयात संपर्कप्रमुख संभाजी पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख युवराज पोवार यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.



निधन वार्ता
गंगाधर परीट

उत्तूर येथील प्रतिष्ठित व्यापारी गंगाधर परीट (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने शाळकरी विद्यार्थ्यांचे गणवेश मोफत इस्त्री करून देण्याचा उपक्रम अनेक वर्षे राबविला. देशसेवेच्या भावनेतून त्यांनी जपलेली ही सेवावृत्ती विशेष उल्लेखनीय होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.


आजचे पंचांग
दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : कार्तिक
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : नवमी तिथी
नक्षत्र : शततारका नक्षत्र (१९ नोव्हेंबर सकाळी ०६.०९ पर्यंत) त्यानंतर पूर्वाभाद्रपदा नक्षत्र
योग : ध्रुव योग (सकाळी ००४ पर्यंत) त्यानंतर व्याघात योग
करण : बलवा करण (सायंकाळी ०६.४१ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : कुंभ राशी
सूर्य राशी : वृश्चिक राशी
अशुभ मुहूर्त :
राहु काळ : दुपारी १२.२४ ते दुपारी ०१.४७ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.४९
सूर्यास्त : सायंकाळी ०५.५९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
