mrityunjaymahanews
अन्य

रविवार – सातच्या बातम्या

रविवार दि.१५ नोव्हेंबर २०२६ 

जनसेवेचा वसा जपत विकासासाठी अखंड धडपड; सत्तरीतही कार्याचा उत्साह प्रेरणादायी – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

आजरा : प्रतिनिधी

वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही समाजकार्यासाठी असलेली तळमळ, विकासकामांचा ध्यास आणि सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याची जिद्द अशोकअण्णा चराटी यांच्यात आजही कायम आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने धडपडणारे त्यांचे नेतृत्व प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले.

आजऱ्याचे नगराध्यक्ष तथा अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शुभेच्छा सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमु अण्णा पाटील होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार शिवाजीराव पाटील, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गरजू रुग्णांना चष्मे आणि श्रवणयंत्रांचे वितरण करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

आबिटकर म्हणाले, आजरा शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून देण्यामध्ये अशोकअण्णांचा आग्रह आणि पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे. शहराच्या पाणीपुरवठा योजनेसह नगरपंचायत इमारत आणि क्रीडा संकुलाची कामे अंतिम टप्प्यात असून त्यांचे लवकरच लोकार्पण होईल. शहरातील नाट्यगृहाच्या कामालाही लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. तालुक्यात तीन धरणे असूनही सिंचनाचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेले नाही. यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन पाण्याच्या नियोजनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. तालुक्याच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कामांना प्राधान्य दिले जाईल. राजकीय चढ-उतारांकडे दुर्लक्ष करून विकासकामांचा ध्यास कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

आमदार शिवाजीराव पाटील यांनी आजरा तालुका एकाच विधानसभा मतदारसंघाला जोडण्याची गरज व्यक्त केली. अशोकअण्णा चराटी यांनी भविष्यात आमदार व्हावे, ही वाढदिवसानिमित्त आपली सदिच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. आजरा, चंदगड आणि राधानगरी हे तालुके पर्यटन तालुके म्हणून विकसित व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सत्काराला उत्तर देताना अशोकअण्णा चराटी यांनी आजरा शहराच्या विकासासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. शहराची पाणी योजना आणि क्रीडा संकुलाची कामे लवकरच पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजवर समाजासाठी काम केले असून उर्वरित आयुष्यही जनतेच्या सेवेसाठी समर्पित राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अध्यक्षीय भाषणात माजी राज्यमंत्री भरमु अण्णा पाटील यांनी अशोक चराटी यांच्या कार्याचा गौरव केला. अशा कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळेच सार्वजनिक जीवनात मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडता आल्या. समाजहित आणि जनतेचा विकास हेच प्रत्येकाच्या कामाचे केंद्र असावे, असे आवाहन त्यांनी केले.

भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी अशोकअण्णा वय आणि प्रकृतीची पर्वा न करता समाजासाठी कार्यरत असल्याचे सांगितले. अशा महाआरोग्य शिबिरांचे आयोजन सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद देसाई यांनी संस्थांच्या उभारणीपासून त्यांच्या सक्षम वाटचालीपर्यंत अशोकअण्णांनी घेतलेल्या परिश्रमांचा उल्लेख केला.

यावेळी आजऱ्याचे तहसीलदार समीर माने, चंदगडचे नगराध्यक्ष सुनील काणेकर, गोड साखरचे अध्यक्ष प्रकाश पताडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, माजी सभापती विष्णुपंत केसरकर, उदयराज पवार, रणजीत देसाई, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र गुरव, सुरेश डांग, विजयकुमार पाटील, आय.के.पाटील, रमेश कुरुणकर, डॉ . इंद्रजीत देसाई, ॲड.जानकी मडगावकर -सातोसकर, उपनगराध्यक्ष पूजा डोंगरे, नगरसेविका अश्विनी चव्हाण, डॉ. स्मिता कुंभार, ज्योत्स्ना चराटी, संजय चव्हाण, सिद्धेश नाईक, जयवंत सुतार, समीर पारदे, रमेश रेडेकर, संजय चव्हाण, दशरथ अमृते, सुधीर कुंभार, मारुती मोरे, अनिकेत शिंत्रे, ऋषिकेश महाळंक, हर्षवर्धन महागावकर- देसाई यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक आजरा अर्बन बँकेचे संचालक विजय पाटील यांनी केले. डॉ. अशोक बाचुळकर यांनी सूत्रसंचालन केले, तर विलास नाईक यांनी आभार मानले.

आई मुलीसह जावेचा मृत्यू…
चार दिवसात एकाच कुटुंबावर काळाचा घाला

आजरा : प्रतिनिधी

गत चार दिवसात कोवाडे (ता. आजरा) येथील होडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हिराबाई होडगे (वय ८०) यांच्या मृत्यनंतर रक्षा विसर्जनादिवशी त्यांची जाऊ तानुबाई दत्तात्रय होडगे (वय ९०) यांचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूचा धक्का बसून मुलगी पार्वती जानू पाटील (वय ६५) रा. होनेवाडी (ता. आजरा) यांचेही हदयविकाराने निधन झाले .सलग झालेल्या या घटनांच्यामु‌ळे होडगे कुटुंब दुःखात बुडाले आहे.

हिराबाई होडगे यांचे बुधवार (ता. १०) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे रक्षाविसर्जन शुक्रवार (ता.१३) रोजी होते. रक्षाविसर्जनासाठी हिराबाईची पुतणी पार्वती या कोवाडे येथे आल्या होत्या.

दरम्यान त्यांची आई तानुबाई यांची प्रकृती स्थिर नसल्याने त्या कोवाडे येथेच होत्या. शुक्रवारी सायंकाळी तानुबाईंची प्रकृती बिघडली. त्यांचे निधन झाले. हा धक्का मुलगी पार्वती पाटील यांना सहन झाला नाही. त्यांना हदय विकाराचा झटका आला. त्यांना तातडीने गडहिंग्लज येथील य रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचारापूर्वी त्यांचे निधन झाले. तीन दिवसात होडगे कुटुंबाला तिघांचा मृत्यू पहाण्याची वेळ आली आहे. या घटनामुळे होडगे व पाटील कुटुंबीय दुःखात बुडाले आहेत. हिराबाई होडगे या सातेरी पतसंस्थेचे व्यवस्थापक परशराम होडगे यांच्या आई होत. त्यांच्या मागे मुलगा, सुन व नातवंडे असा परिवार आहे. तानुबाई होडगे या कारखान्याचे कर्मचारी सुभाष होडगे यांच्या आई होत. त्यांच्या मागे. मुलगा, दोन सुना व नातवंडे असा परिवार आहे.

चार चाकींची समोरासमोर धडक, पाच जण जखमी

आजरा : प्रतिनिधी

आजरा तालुक्यातील दर्डेवाडी फाट्याजवळ पहाटेच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन पाच जण जखमी झाल्याची घटना घडली.

दि. १४ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी ॲड. तुकाराम पांडुरंग राजे हे कुटुंबीयांसोबत आंबोली मार्गे शिरोळकडे जात होते. त्यांची नेक्सॉन कार दर्डेवाडी फाट्याजवळ आली असता समोरून येणाऱ्या इन्नोव्हा गाडीच्या चालकाने गाडी भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून नेक्सॉन कारला समोरून जोरदार धडक दिली.

या अपघातात नेक्सॉन कारमधील स्नेहल राजे, मयूर कातकर, निर्मला कातकर, तेजस्विनी कांबळे आणि आर्यन यांच्यासह पाच जण जखमी झाले. तसेच दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी इन्नोव्हा चालक निलेश बाबासो नादुले, रा. कागलपार्क, ता. करवीर याच्याविरोधात आजरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

शेती कामास गेलेल्या महिलेचा मृत्यू

आजरा : प्रतिनिधी

दाभील येथील हणबर शेतात भात कापणीचे काम करताना सौ. भिकाबाई रामचंद्र कांबळे (वय ५५) यांना दि. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजता अचानक चक्कर येऊन त्या खाली पडल्या.

कुटुंबीयांनी त्यांना तातडीने आजरा येथील रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

या प्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

डॉ.देशपांडे व डॉ.सातोसकर यांचा गौरव 

महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशन चे २०२६ चे Mastacon हे राज्यस्तरीय अधिवेशन नागपूर येथे पार पडले या अधिवेशनामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचे आजरा तालुका अध्यक्ष डॉ. दीपक सातोस्कर व सचिव व सचिव डॉ. अनिल देशपांडे यांना राज्यस्तरीय प्रेसिडेंट ॲप्रिसिएशन अवॉर्ड’ देऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

एकाच वेळी एकाच शाखेच्या  दोन पदाधिकाऱ्यांना गौरवण्यात आलेली आजरा ही एकमेव शाखा आहे. यावेळी संस्थेचे राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.

‘रवळनाथ ‘तर्फे आजरा शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी बाकड्यांचे लोकार्पण

शहर सुशोभीकरणात पुढाकार : नागरिकांकडून उपक्रमाचे स्वागत

आजरा : प्रतिनिधी

समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपत श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी (मल्टी-स्टेट) प्रधान कार्यालय गडहिंग्लज या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले, चेअरमन प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी हे बाकडे बसविण्यात आले. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांतूनही संस्थेचे कौतुक होत आहे.

आजरा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी  डॉ. श्यामसुंदर सागर यांच्या हस्ते बाकड्यांचे लोकार्पण करण्यात आले. शहरातील आजरा-महागांव रोड, चित्री रोड, ग्रामीण रुग्णालय परिसर, कपिलेश्वरी मंदिर परिसर या सार्वजनिक जागा, तसेच फिरायला येणाऱ्या लोकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी ही बाकडी बसविली आहेत.

विशेषतः सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना थांबून विश्रांती घेण्यासाठी व एकत्र बसून गप्पा मारण्यासाठी, विरंगुळ्यासाठी या बाकड्यांचा उपयोग होणार आहे. सामाजिक उपक्रमातून शहर सुशोभीकरणात रवळनाथ संस्थेने पुढाकार घेतला आहे. रवळनाथच्या या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले व संस्थेचे आभार मानले.

यावेळी आजरा शाखेचे चेअरमन प्रा. जनार्दन दळवी, शाखा सल्लागार श्री. बाळकृष्ण दरी, प्रा. राजीव कर्पे, सौ. शामल हरेर, अधिवक्ता निर्मला निमसे, अधिवक्ता श्री. दयानंद उपासे, अधिपरिचारीका  वैशाली देवार्डे, श्री. दीपक शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक श्री. नामदेव होंडगे, श्री. रामचंद्र पंडित, श्री. मनोहर गव्हाणकर, ॲड. धनंजय देसाई आदी उपस्थित होते.

आजचे पंचांग

दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : कार्तिक
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : षष्ठी तिथी (१६ नोव्हेंबर पहाटे २ पर्यंत) त्यानंतर सप्तमी तिथी
नक्षत्र : उत्तराषाढा नक्षत्र (रात्री ११.२८ पर्यंत) त्यानंतर श्रवण नक्षत्र
योग : गण्ड योग (१६ नोव्हेंबर सकाळी ०७.१५ पर्यंत) त्यानंतर वृद्धि योग
करण : कौलव करण (दुपारी १२.४३ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : मकर राशी
सूर्य राशी : तूळ राशी
अशुभ मुहूर्त :
राहु काळ : सायंकाळी ०४.३५ ते सायंकाळी ०५.५९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०१ ते दुपारी १२.४५
सूर्योदय : सकाळी ०६.४७
सूर्यास्त : सायंकाळी ०५.५९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चित्री प्रकल्प १००% भरला…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मंगळवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!