
शनिवार दि.१४ नोव्हेंबर २०२६


बिनधास्त…अण्णा

आजरा तालुक्याच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक पटलावरील धडाडीचा व बिनधास्त स्वभावाचा कार्यकर्ता म्हणून अण्णाभाऊ संस्था समूहाचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांची संपूर्ण जिल्ह्याला ओळख आहे.
स्व. काशिनाथअण्णा चराटी, माधवराव देशपांडे यांच्या पश्चात अण्णाभाऊ संस्था समूहाची जबाबदारी अशोकअण्णा चराटी यांच्याकडे आली. माणसे हाताळण्याचे कौशल्य असणाऱ्या अशोकअण्णांनी ही जबाबदारी अत्यंत लीलया पेलली. केवळ अण्णाभाऊ संस्था समूहच नव्हे तर आजरा साखर कारखाना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती, राज्य वस्त्रोद्योग महामंडळात आपल्या कामाची छाप पाडली.
परिणामांची पर्वा न करता स्पष्ट बोलणे व धडाडीचे निर्णय घेणे यात त्यांचा विशेष हातखंडा राहिला आहे. मनात आणलेले शक्य करून दाखवणार व पटेल तेच करणार अशी त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. अण्णाभाऊ संस्था समूहातील स्व. काशिनाथ अण्णा व माधवराव देशपांडे यांच्यासोबत काम केलेल्या नव्या – जुन्या साथीदारांच्या मदतीने त्यांनी अण्णाभाऊ संस्था समूहाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे .
शिक्षण संस्था, आजरा अर्बन बँक अथवा अण्णाभाऊ सूतगिरणी असो या संस्थांची नावे त्या त्या क्षेत्रात अदबीने घेतली जातात यातूनच त्यांचे संस्थात्मक नेतृत्व सिद्ध होते. शहराच्या विकासाचा आजरा ते मुंबई मंत्रालयाच्या वाऱ्या करण्यामध्ये कधीही थकलेले दिसत नाहीत. साठी ओलांडल्यानंतरही त्यांचा असणारा हा समाजसेवेचा अखंड वसा
तरुणांच्या दृष्टीने निश्चितच मार्गदर्शक असाच आहे.
अशा या ‘राजा’ मनाच्या बिनधास्त
अण्णांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!
अण्णा शतायुषी व्हा…
…ज्योतिप्रसाद सावंत


निंगुडगे येथे घरातून ३ लाख २० हजारांचे सोन्याचे गंठण चोरीला
आजरा : प्रतिनिधी
निंगुडगे ता. आजरा येथे राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने सोन्याचे गंठण चोरून नेल्याची घटना घडली आहे.
दि. १० नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाली. फिर्यादी उमा महेश सरदेसाई यांच्या घरातील बेडरूममधील लाकडी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेले ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरट्याने लबाडीने चोरून नेले. या गंठणात काळे मणी ओवलेले असून मधोमध दोन वाट्या होत्या. चोरीला गेलेल्या गंठणाची किंमत सुमारे ३ लाख २० हजार रुपये आहे.
या प्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, अज्ञात चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत.

आजरा कारखान्याकडून होणारे वायू व जल प्रदूषण थांबवा…
गवसे ग्रामस्थांची मागणी

गवसे : प्रतिनिधी
आजरा साखर कारखाना गाळप हंगाम सुरू झाला असून कारखान्याच्या चिमणीतून बाहेर पडणारी काळी राख व धुराचे कण वाऱ्याच्या दिशेने गावातील लोकवस्तीमध्ये येत आहेत. सदर राख अंगणात, पिण्याच्या पाण्यात तसेच अन्नपदार्थावर पडत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
येत्या दहा दिवसात कारखाना प्रशासनाने यावर उपाययोजना न केल्यास येत्या २३ तारखेला सर्व ग्रामस्थांसोबत कारखान्याला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबतचे लेखी निवेदन कार्यकारी संचालकांना देण्यात आले असून निवेदनावर मारुती रामचंद्र डोंगरे, सचिन पाटील, अविनाश हेब्बाळकर, गिरीश सूर्याजी पाटील, संतोष नेवगे, महादेव पाटील ,रवींद्र दिवेकर, शिवराज पाटील, मॅक्वीन फर्नांडिस, दिगंबर पाटील, गजानन पाटील, मिल्टन फर्नांडिस, आकाश पाटील, पांडुरंग पाटील, सर्जेराव हेब्बाळकर, रमेश पाटील, स्वप्निल पाटील, उदय चौगुले यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

आजरा ते आंबोली रस्त्यावर भरधाव पिकअपची दुचाकीला धडक; तिघे जखमी
आजरा : प्रतिनिधी
आजरा ते आंबोली जाणाऱ्या रस्त्यावर वेलवट्टी गावाजवळ लक्ष्मीच्या ओढ्यालगत झालेल्या अपघातात दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास संभाजी रामचंद्र पाटील हे आपल्या मुलांसह दुचाकीवरून आजरा ते मेंढेवाडी जात होते. समोरून आंबोलीकडून आजऱ्याकडे येणाऱ्या पोल्ट्रीच्या बोलेरो पिकअपने भरधाव वेगात येऊन त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
या अपघातात संभाजी पाटील यांच्यासह त्यांचे दोन्ही मुले प्रतीक पाटील आणि प्रथमेश पाटील हे गंभीर जखमी झाले. धडकेनंतर पिकअपने रस्त्यालगत उभ्या असलेल्या चारचाकी गाडीलाही धडक दिल्याने तिचेही नुकसान झाले.
जखमींना तातडीने गडहिंग्लज येथील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद आजरा पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.


दिवाळीत माणुसकीचा प्रकाश : होडगे कुटुंबाला हितचिंतकांचा आधार

आजरा : प्रतिनिधी
दिवाळीच्या सणाला केवळ आपल्या घरातच नव्हे, तर गरजूच्या आयुष्यातही आनंदाचा दिवा पेटवावा, या भावनेतून कासार कांडगाव येथील तरुण व ग्रामस्थांनी एकत्र येत एक कौतुकास्पद सामाजिक उपक्रम राबवला.
श्री. अशोक तुकाराम होडगे आणि श्रीमती. पार्वती तुकाराम होडगे यांच्या घरी जाऊन हितचिंतकांनी त्यांना दिवाळीची भेट दिली. यावेळी जमा केलेली २० हजार ८०० रुपयांची रोख रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. ही रक्कम सुरक्षित राहावी, यासाठी ती थेट त्यांच्या पोस्ट खात्यात जमा करण्यात येणार आहे.
त्यासोबतच दिवाळी फराळ, अशोक होडगे यांना शर्ट-पॅन्ट आणि पार्वती होडगे यांना साडी-चोळी देण्यात आली. घरात विजेची तात्पुरती सोय करून दरवाजावर सुंदर आकाशकंदीलही लावण्यात आला. त्यांच्या आजारपणाची आस्थेने चौकशी करून आवश्यक मदतीचे आश्वासनही देण्यात आले.
व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून गावातील अनेक हितचिंतक या उपक्रमात सहभागी झाले होते. मिळालेल्या रकमेचा गरजेनुसार योग्य वापर करावा, अशी विनंतीही यावेळी कुटुंबाला करण्यात आली.यावेळी चेतन हरेर, गणपतराव सरदेसाई, तानाजी घाटगे, सागर हरेर, विजय पारके, अमोल पारके, आकाश पारके, ओंकार हरेर, भिकाजीराव सरदेसाई, रमेश शिप्पूरकर, अमर जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
दिवाळीचा सण खऱ्या अर्थाने प्रकाशमय करणाऱ्या या माणुसकीच्या उपक्रमाचे गावातून कौतुक होत आहे.


प्रवाशाचे ४० हजार रुपये लंपास
आजरा : प्रतिनिधी
चारचाकी दुरुस्तीसाठी आलेल्या अनफ बुll ता. भुदरगड येथील सिकंदर शेख या प्रवाशाचे आजरा बस स्थानकावरून अज्ञात चोरट्यांनी खिसा कापून ४० हजार रुपये लंपास केल्याची घटना शुक्रवार आठवडा बाजारात दिवशी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
शेख हे आपली चारचाकी दुरुस्तीसाठी आजरा येथे घेऊन आले होते. गॅरेजला चार चाकी सोडून ते गावी परतत असताना आजरा बस स्थानकावर सदर प्रकार घडला.


आजचे पंचांग
दिनांक : १४ नोव्हेंबर २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : कार्तिक
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : पंचमी तिथी (रात्री ११.२३ पर्यंत) त्यानंतर षष्ठी तिथी
नक्षत्र : पूर्वाषाढा नक्षत्र (रात्री ०८.२३ पर्यंत) त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र
योग : शूल योग (१५ नोव्हेंबर सकाळी ०६.२२ पर्यंत) त्यानंतर गण्ड योग
करण : भाव करण (सकाळी १०.०२ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : धनु राशी (१५ नोव्हेंबर सकाळी ०३.१० पर्यंत) त्यानंतर मकर राशी
सूर्य राशी : तूळ राशी
अशुभ मुहूर्त :
राहु काळ : सकाळी ०९.३५ ते सकाळी १०.५९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२ ते दुपारी १२.४५
सूर्योदय : सकाळी ०६.४६
सूर्यास्त : सायंकाळी ०५.५९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

निवेदन…
आज माझा वाढदिवस आहे. आपल्या शुभेच्छा नेहमीच माझ्या पाठीशी आहेत. घरगुती कामानिमित्त मी बाहेरगावी जात असल्याने आज दिवसभर मी घरी उपलब्ध राहणार नाही. कृपया याची मित्रमंडळींनी नोंद घ्यावी…
धन्यवाद..!
…ज्योतिप्रसाद सावंत /९६३७५९८८६६
