mrityunjaymahanews
अन्य

शनिवार – सातच्या बातम्या

शनिवार  

दि.१७ ऑक्टोबर २०२६

 रणरागिणींचा जलसंवर्धनाचा जागर !
बोलकेवाडीत  ओढ्यावर भव्य बंधारा; पशुधनासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत

आजरा : प्रतिनिधी

महिला केवळ शेतीत राबणाऱ्या हातांपुरत्या मर्यादित नसून गावाच्या विकासाला दिशा देणाऱ्या आणि निसर्ग संवर्धनाचा वसा घेणाऱ्या कर्तृत्ववान शक्ती आहेत, याची प्रचिती बोलकेवाडी येथे आली. महिला किसान दिवसाचे औचित्य साधून रणरागिणी शेतकरी गटाने बोलकेवाडी फाट्याजवळील बदबदा ओढ्यावर भव्य बंधारा उभारून जलसंवर्धनाच्या कार्यात मोलाची भर घातली. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्याच्या या उपक्रमातून महिलांच्या एकजुटीची, सामाजिक बांधिलकीची आणि पर्यावरण संवर्धनाच्या ध्यासाची प्रेरणादायी झलक पाहायला मिळाली.

आजरा तालुक्यात पावसाच्या अनियमिततेमुळे शेती आणि पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असताना रणरागिणी शेतकरी गटाने हाती घेतलेला हा उपक्रम विशेष महत्त्वाचा ठरत आहे. यापूर्वीही गटाने शाळकरी मुलांची गरज आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन बंदिरी ओढ्यावर बंधारा बांधला होता. आता जलसंवर्धनाची ही मोहीम पुढे नेत बदबदा ओढ्यावर माती नाला बांध आणि वनराई बंधारा या पद्धतींचा समन्वय साधत भव्य बंधारा उभारण्यात आला.

या बंधाऱ्यात साचणारे पाणी परिसरातील जनावरांसाठी उपयुक्त ठरणार असून, आजूबाजूच्या शेतांनाही त्याचा लाभ होण्याची अपेक्षा आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर उपयोग करण्याचा हा प्रयत्न भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
जलसंधारणाची कामे केवळ शासनाच्या योजना किंवा प्रशासनाच्या प्रयत्नांपुरती मर्यादित न राहता ग्रामस्थांच्या सहभागातून लोकचळवळ बनू शकतात, हे रणरागिणी शेतकरी गटाने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. महिला किसान दिनाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या या कामामुळे ग्रामीण भागातील महिलांची संघटनशक्ती आणि गावाच्या गरजा ओळखून काम करण्याची वृत्ती अधोरेखित झाली.
बंधारा बांधण्याच्या कामावेळी तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील, कृषी विस्तार अधिकारी डी. बी. कुंभार व पृथ्वीराज चव्हाण, पाणी फाउंडेशनच्या संजना मदने, मेंटर मनीषा पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी योगेश जगताप, स्वप्नील कमते, तृप्ती पाटील, ग्रामपंचायत अधिकारी वैभव गुरव यांच्यासह सुरेश बोलके, लहू सुतार, विवेक कोलेकर, शिवाजी कोलेकर, उत्तम कातकर, महादेव डोंगरे, आण्णासो बोलके, हौसाबाई कोलेकर, वैशाली बोलके तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. तुकाराम बोलके आणि मारुती बोलके यांच्या हस्ते बंधारा बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी रणरागिणी शेतकरी गटाच्या या उपक्रमाचे कौतुक करून जलसंवर्धनासाठी अशा लोकसहभागातून होणाऱ्या कामांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाची प्रस्तावना तृप्ती पाटील यांनी केली. निमंत्रक नीता बोलके व किशोर कातकर तसेच गटाच्या सदस्य उज्वला कोलेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

…पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचा संकल्प, महिलांच्या हातून प्रत्यक्ष कृतीत उतरला. बोलकेवाडीतील हा उपक्रम केवळ एका बंधाऱ्यापुरता मर्यादित नसून, जलसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ग्रामीण महिलांच्या कर्तृत्वाचा आणि सामूहिक प्रयत्नांच्या सामर्थ्याचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला आहे.

 आजरा  साखर कारखान्याच्या २८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ २० ऑक्टोबरला

आजरा : प्रतिनिधी

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. अमृतनगर-गवसे, ता. आजरा, जि. कोल्हापूर या कारखान्याच्या सन २०२६-२७ या २८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवार दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे.

या शुभारंभ सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. श्री. हसन मुश्रीफ साहेब यांचे शुभहस्ते तर माजी आमदार आजरा-चंदगड-गडहिंग्लज  श्री. राजेश नरसिंगराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.

कारखाना प्रशासनाच्या वतीने सर्व सभासद बंधू-भगिनी, ऊस पुरवठादार, शेतकरी, ठेवीदार, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, कंत्राटदार, मालपुरवठादार, व्यापारी, हितचिंतक यांनी या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन चेअरमन मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई, व्हा. चेअरमन अनिल भीमा फडके, कार्यकारी संचालक संभाजी कृष्णा सावंत, संचालक मंडळ सदस्य तसेच अधिकारी आणि सेवक वर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा…

आजरा: प्रतिनिधी

रस्त्यावर सापडलेले रोख रकमेसह महत्त्वाचे दस्तऐवज असलेले पाकीट मूळ मालकाला परत मिळवून देत येथील पंडित दीनदयाळ विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणाचा नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या सचोटीबद्दल शाळेसह परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

​येथील पंडित दीनदयाळ विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये शिकणारे विद्यार्थी कु. संदेश कोरे व कु. नैतिक कांबळे हे नेहमीप्रमाणे शाळेत येत असताना सीड फार्माजवळ त्यांना एक पैशांचे पाकीट सापडले. पाकीट उघडून पाहिल्यानंतर त्यात पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे समजताच, कोणत्याही मोहाला बळी न पडता या दोघांनी ते पाकीट तातडीने शाळेतील शिक्षकांकडे आणून सुपूर्द केले.

​शिक्षकांनी पाकिटाची पाहणी केली असता ते पाकीट सौ. कृष्णाबाई तुकाराम धडाम यांचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये एसटी बस पास, आधार कार्ड आणि ₹ २,२००/- रोख रक्कम होती. शाळेने तत्काळ संपर्क साधून कृष्णाबाई यांचे सुपुत्र सुनील धडाम यांना विद्यालयात बोलावून घेतले आणि सर्व ऐवजासह पाकीट त्यांच्या स्वाधीन केले.

​आपल्या आईचे हरवलेले पाकीट सुरक्षित परत मिळाल्याने सुनील धडाम यांनी समाधान व्यक्त करत संदेश कोरे व नैतिक कांबळे या दोन्ही विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक वृत्तीबद्दल त्यांना ₹ ५००/- चे रोख बक्षीस देऊन गौरवले. आजच्या युगात शिक्षणासोबतच संस्कार आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

आजरा महाविद्यालयाच्या व्होकेशनल विभागात वाचन प्रेरणादिन उत्साहात साजरा

आजरा : प्रतिनिधी 

आजरा महाविद्यालय, आजरा येथील व्होकेशनल विभागाच्या वतीने वाचन प्रेरणादिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे आणि ज्ञानाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास साधता यावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक मनोजकुमार पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, वाचनाच्या माध्यमातून मिळवलेल्या ज्ञानाच्या बळावर माणसामध्ये जग जिंकण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. वाचन हे केवळ माहिती मिळवण्याचे साधन नसून विचारांना दिशा देणारे, व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारे आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा देणारे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून आपले ज्ञान, विचारशक्ती आणि आत्मविश्वास वाढवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमात व्होकेशनल विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विभागातील प्रत्येक विद्यार्थ्याने वाचन उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी वाचनाच्या माध्यमातून ज्ञानार्जनाचे महत्त्व जाणून घेतले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांविषयी प्रेम निर्माण होण्यासोबतच त्यांची भाषिक कौशल्ये, आकलनशक्ती आणि वैचारिक प्रगल्भता वाढण्यास मदत होते.

या कार्यक्रमासाठी प्रा. नेहा पेडणेकर, प्रा. सुषमा पारकर, प्रा. तेजस्विनी जाधव, प्रा. नार्वेकर मॅडम आणि प्रा. गिरीश कुरुणकर उपस्थित होते. उपस्थित प्राध्यापकांनीही वाचन संस्कृती जोपासण्याचे आणि विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात वाचनाला महत्त्वाचे स्थान देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे नियोजन प्रा. संदीप देसाई यांनी केले. .

निधन वार्ता

विठाबाई रायकर

कोरीवडे तालुका आजरा येथील विठाबाई नारायण रायकर ( वय ७५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

पांडुरंग रायकर यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे.

उकाडा वाढला, शीतपेय विक्रेत्यांची सुगी

आजरा : प्रतिनिधी

ऑक्टोबर महिना सुरू होऊन अर्धा महिना उलटला तरी पावसाने पाठ फिरवली आहे आणि ऑक्टोबर हिटने सर्वांचीच काहिली केली आहे. सकाळपासूनच सूर्याचे कडक ऊन आणि दुपारी अंगाची लाहीलाही करणारा उकाडा यामुळे जनजीवन त्रस्त झाले आहे. पाऊस पडेना आणि उकाडा सोसवेना अशी अवस्था आजरा तालुक्यातील नागरिकांची झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाली असून शेतातील कामे सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिरा करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. वयोवृध्द नागरिक व शाळकरी मुलांनाही या उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

मात्र या वाढत्या उकाड्यामुळे शीतपेये, उसाचा रस, नारळपाणी, आईस्क्रीम आणि कुल्फी विक्रेत्यांची चांगलीच सुगी झाली आहे. आजरा शहरासह गावागावातील चौकांमध्ये शीतपेयांच्या दुकानांवर गर्दी दिसत आहे. थंडगार पेयांसाठी नागरिक २० ते ५० रुपये मोजूनही उकाड्यापासून दिलासा मिळवत आहेत. 

हवामान विभागाने अजून काही दिवस असेच हवामान राहण्याचा अंदाज वर्तवलाआहे.

आजचे पंचांग 

दिनांक : १७ ऑक्टोबर २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : आश्विन
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : सप्तमी तिथी
नक्षत्र : मूळ नक्षत्र (सकाळी ०९.४६ पर्यंत) त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र
योग : अतिगण्ड योग (रात्री ११.०२ पर्यंत) त्यानंतर सुकर्मा योग
करण : गराजा करण (रात्री ०७.११ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : धनु राशी
सूर्य राशी : कन्या राशी ( रात्री ०७.५१ पर्यंत) त्यानंतर तूळ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.२९ ते सकाळी १०.५६ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०० ते दुपारी १२.४७
सूर्योदय : सकाळी ०६.३४
सूर्यास्त : सायंकाळी ०६.१३
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

दुर्गा माता दर्शन…

शारदीय नवरात्र उत्सव मंडळ, उत्तुर


भगवा रक्षक नवरात्र उत्सव मंडळ आजरा


सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ गांधीनगर


 

संबंधित पोस्ट

सोमवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मोटरसायकल अपघातात एक ठार… एक जखमी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

वझरे येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू…?

mrityunjay mahanews

शनिवार सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!