शनिवार
दि.१० ऑक्टोबर २०२६


भास्करराव पेरे-पाटील मंगळवारी आजऱ्यात
शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळातर्फे जाहीर व्याख्यान

आजरा : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाचे ज्येष्ठ अभ्यासक, प्रभावी वक्ते आणि आदर्श सरपंच म्हणून ओळख असलेले भास्करराव पेरे-पाटील यांचे जाहीर व्याख्यान मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी आजरा येथे आयोजित करण्यात आले आहे. शहरातील शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम सायंकाळी ७.०० वाजता शिवाजीनगर येथे होणार आहे. या व्याख्यानातून ग्रामीण विकास, सामाजिक परिवर्तन, राजकारण, समाजकारण आणि व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे.
भास्करराव पेरे-पाटील यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी केलेले कार्य आणि ग्रामविकासाबाबतचा त्यांचा सखोल अभ्यास यामुळे महाराष्ट्रात त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकसहभाग, लोकजागृती आणि ग्रामपंचायतीची प्रभावी भूमिका किती महत्त्वाची आहे, याबाबत ते आपल्या व्याख्यानांतून सातत्याने मार्गदर्शन करतात. ग्रामीण भागातील नागरिकांच्या गरजा, गावांच्या विकासातील अडचणी आणि त्यावर करता येणारे उपाय यांची सोप्या व प्रभावी भाषेत मांडणी करण्याची त्यांची खासियत आहे.
ग्रामीण भागासाठी असलेल्या विविध शासकीय योजना, त्यांची अंमलबजावणी, गावांच्या विकासासाठी उपलब्ध असलेल्या संधी, स्थानिक राजकारण आणि समाजकारण यांसह व्यसनमुक्ती हे त्यांच्या अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत. समाजातील अनिष्ट प्रथा दूर करून लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, तरुण पिढीला योग्य दिशा देणे आणि ग्रामविकासाच्या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवणे, या विषयांवर ते प्रभावीपणे विचार मांडतात.
त्यांच्या व्याख्यानांमधून ग्रामीण भागातील प्रश्नांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळतो. गावाच्या विकासासाठी केवळ सरकारी निधी पुरेसा नसून लोकसहभाग, नियोजन, पारदर्शक कारभार आणि सामाजिक बांधिलकीही तितकीच महत्त्वाची असल्याचा संदेश ते आपल्या मार्गदर्शनातून देतात.
शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. भास्करराव पेरे-पाटील यांच्या अनुभवपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ आजरा तालुक्यातील नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि ग्रामविकासात रस असलेल्या नागरिकांना घेता यावा, हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे.
या जाहीर व्याख्यानाला तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विचारांचे मंथन अनुभवावे, असे आवाहन शिवाजीनगर नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

अमृत जल योजना पूर्णपणे सुरळीत झाल्याशिवाय ठेकेदाराला अंतिम देयक देऊ नका – आजरा नगरसेवकांची मागणी

आजरा : प्रतिनिधी
आजरा शहरासाठी सुमारे २७ कोटींची अमृत जल योजना मंजूर होऊन दोन वर्षे लोटली तरी पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. मोटार नादुरुस्त होणे व जळाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
नदीवरील पाणी उपशासाठी ५० एचपीच्या दोन मोटारी (मुख्य व स्टँडबाय) आवश्यक असताना केवळ एका मोटारीवर व ३० एचपीच्या मोटारीवर पुरवठा सुरू आहे. ३० एचपीची मोटार जळाल्याने सध्या शहराला सुरळीत पाणी मिळत नाही. त्यामुळे अतिरिक्त ३० एचपी मोटार स्टँडबाय ठेवण्याची सूचना ठेकेदाराला द्यावी, अशी मागणी आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी मुख्याधिकारी, नगरपंचायत आजरा यांना निवेदन दिले. योजना पूर्ण झाल्याचे दाखवण्यापूर्वी सर्व भागांना नियमित, पुरेशा दाबाने पाणी मिळते का याची प्रत्यक्ष पाहणी करावी, तांत्रिक तपासणी करावी आणि त्यानंतरच अंतिम देयकाबाबत निर्णय घ्यावा, अशा चार मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर अभिषेक शिंपी, परशुराम बामणे, अनिकेत चराटी, मुसासरफराज पटेल, आसिफ सोनेखान, निसार लाडजी, स्मिता परळरकर, कलाबाई कांबळे, आसावरी खेडेकर, रहिमतबी खेडेकर, निशात चांद, अश्विनी चव्हाण, डॉ. इंद्रजीत देसाई, विक्रम पटेकर यांच्यासह १३ नगरसेवकांच्या सह्या आहेत.

बेलेवाडी काळम्मा येथे उद्या स्थानिक स्वराज्य संस्था संविधान प्रबोधन शिबिराचे आयोजन
आजरा : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील जागृत तरुण, ग्रामस्थ, पंच, सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, विद्यार्थी, महिला आणि निमंत्रितांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था संविधान प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर उद्या रविवार दिनांक ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता भारती विद्यापीठाची आनंदराव पाटील प्रशाला, बेलेवाडी काळम्मा येथे होणार आहे.
१९६४ पासून गणित, इंग्रजी आणि तंत्रज्ञान सर्वांपर्यंत जावे यासाठी गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन हा वसा घेऊन काम करणारे भारती विद्यापीठाचे संस्थापक कार्याध्यक्ष म्हणून आजही कार्यरत असलेले, तसेच सन २००० पासून चिकोत्रा खोऱ्यातील ५२ गावांना नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंत समन्यायी पद्धतीने पाणी मिळावे यासाठी गेली २५ वर्षांहून अधिक काळ अविरत प्रयत्नशील असलेले आनंदरावदादा पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये विविध विषयांवर संवाद साधला जाणार आहे. विद्यार्थी केंद्र मानून विषयमित्र सारख्या विविध अध्यापन पद्धती वापरून जगातील एक नंबरची शाळा बनविणारे कृतीशील शिक्षणतज्ज्ञ दत्तात्रय वारे गुरुजी, लोकसहभागातून आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा कशी बनविता येते याविषयी संवाद साधणार आहेत.
७३ व्या घटनादुरुस्तीने ग्रामपंचायतीकडे येणारा सर्व निधी खर्च करण्याचा अधिकार ग्रामसभेलाच आहे, हे सांगण्यासाठी यशदा या प्रशिक्षण संस्थेमधून संपूर्ण महाराष्ट्राशी संवाद साधणारे पंचायत राज अभ्यासक दत्ता गुरव, सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी जे. के. गुरव आणि भारती विद्यापीठ पुणेचे प्राचार्य सगरे सर हे संवाद साधणार आहेत.
तसेच समन्यायी पद्धतीने काम करून आपली गावेच्या गावे बदलणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद होणार आहे.निसर्गातील जल, जंगल, जमीन यावर जसा सर्वांचा समान हक्क आहे, तसाच राज्याच्या आणि देशाच्या तिजोरीत जमा होणाऱ्या निधीवरही आपला तेवढाच हक्क आहे. तो मिळवून घटनात्मक अधिकाराद्वारे आपण स्वयंपूर्ण आणि निर्भय होऊया, यासाठी आपले संविधान समजून घेऊया या विषयावर संविधान अभ्यासक नूरखां पठाण सर, संविधान प्रचारक प्रा. नीलम पंडीत आणि संदीप बर्वे हे संवाद साधणार आहेत.
या सर्वांबरोबरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू अरुण अडसूळ सर आणि समन्यायी पाणी हक्क परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. विजय परांजपे हे विविध विषयांवर संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये आदरणीय आनंदरावदादांच्या वाढदिवसानिमित्त गुच्छ, फुले आणि तत्सम भेटवस्तू ऐवजी आपल्यामधील जागरूक नागरिकत्त्वाचा उत्स्फूर्त सहभाग, हीच दादांना वाढदिवसाची भेट ठरणार आहे. तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. मोहन पाटील, प्रा. विजय परांजपे, सरपंच कु. अबोली कांबळे आणि डॉ. विश्वजीत कदम यांनी केले आहे.

पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी प्रयत्न हवेत : टी. एस. गडकरी

आजरा : प्रतिनिधी
दुष्काळी परिस्थितीमधे पीक वाचवणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, अपव्यय टाळणे आवश्यक आहे. जलतारा पध्दतीचे पाणी मुरवण्याचे तंत्रज्ञान वापरून भविष्यात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जिरवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसाक्षरतेची गरज आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र शिक्षण मंडळ कोल्हापूर या संस्थेचे संचालक टी. एस. गडकरी यांनी केले.
येथील तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात जलसेवा संकल्प अभियान अंतर्गत जलसंपदा विभागाच्यावतीने मेळावा झाला. या वेळी श्री. गडकरी यांनी मार्गदर्शन केले. जलसंपदाच्या उपविभागीय अभियंता स्वाती उरुणकर अध्यक्षस्थानी होत्या. तहसीलदार समीर माने, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव तारळेकर, मंडळ कृषी अधिकारी प्रमोद मोने प्रमुख उपस्थित होते.
उरुणकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतु स्पष्ट केला. तहसीलदार माने म्हणाले, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याची गरज आहे. दुष्काळी पंचनामे सुरु असून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. वसंतराव तारळेकर म्हणाले, धावत्या पाण्याला चालवावे. चालत्या पाण्याला थांबवावे. थांबलेल्या पाण्याला जमिनमधे जिरवावे. असा उपक्रम ग्राम पातळीवर ग्रामपंचायतीने राबविणे गरजेचे आहे. सहाय्यक कृषी अधिकारी तृप्ती पाटील, रणरागीणी गटाच्या उज्वला कोलेकर, प्रगतशील शेतकरी संताजी सोले यांनी मार्गदर्शन केले.
जलसंपदा विभागाने आयोजन केले होते. कृषी अधिकारी विजयसिंह दळवी, उपकृषी अधिकारी पी. जी.पाटील, सतिश कुंभार, अमित कुमावत, सहाय्यक कृषी अधिकारी योगेश जगताप, शुक्राणी शिंदे, निता बोलके, किशोर कातकर, सरीता बोलके, रुपाली कोलेकर, सारीका बोलके यांच्यासह रणरागीणी गटाच्या सदस्या, इन्स्टिट्यूट ऑफ सोशल इकानामिक चेंजचे सहाय्यक संशोधक विद्यार्थी, शिवाजी इंजल, रामचंद्र इंजल व शेतकरी उपस्थित होते. कालवा निरीक्षक दीपक राजबन्शी यांनी सूत्रसंचालन तर कनिष्ठ अभियंता संजय यादव यांनी आभार मानले.

उसदराचा तिढा सुटल्याशिवाय एकही कांडे तोडू देणार नाही :
पेरणोली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सभेत निर्णय

आजरा : प्रतिनिधी
उस दराचा तिढा सुटल्याशिवाय उसाचे एकही कांडे तोडू द्यायचे नाही. तसेच शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला तीव्र विरोध करण्याचा निर्णय पेरणोली ता. आजरा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सभेत घेण्यात आला. संघटनेचे संजय देसाई अध्यक्षस्थानी होते.
जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई म्हणाले, यावर्षी दुष्काळ असल्याने साखरेचा तुटवडा निर्माण होणार आहे. त्यामुळे साखरेचा भाव वाढणार असल्याने यावर्षी ५ हजार रूपये टन घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. १५ आँक्टोबर पासून हंगाम सुरू करण्याचा घाट कारखान्यांनी घातला आहे. उसाची वाढ अजून व्हायची आहे.शेतक-यांचे नूकसान होऊ देणार नाही. हंगाम सुरू करण्याचा घाट जर घातला तर संघटना आक्रमक भूमिका घेणार आहे.
संजय देसाई म्हणाले, संघटनेमुळे आजपर्यंत शेतक-यांना दर मिळाला आहे. संघटनेच्या रेट्यामुळे १०० रूपयाचा अंतिम हप्ता द्यावा लागला. कर्जमाफी साठी पैसे नाहीत परंतु शक्तीपीठसाठी पैसे आहेत. उध्वस्त करणारा महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊ द्यायचा नाही.
सुभाष देसाई म्हणाले, पूर्वी टनेजच्या पावतीवर अनेक निधी कपातीचा गोषवारा असायचा. परंतु माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शेतकरी आंदोलनानंतर सर्व कपाती बंद होऊन एक हजाराच्या वरती दर मिळाला. यावेळी कारखाना संचालक हरिबा कांबळे,विष्णू जाधव आदींची भाषणे झाली.
यावेळी सर्जेराव देसाई, हिंदुराव कालेकर,जे एस देसाई, दिनेश कांबळे, भिमराव दळवी, शिवाजी देसाई, धनाजी सुतार, सुरेश कालेकर आदी उपस्थित होते. कार्याध्यक्ष कृष्णा पाटील यांनी प्रास्ताविक केले. संजय मोहीते यांनी स्वागत करून आभार मानले.

आजचे पंचांग
दिनांक : १० ऑक्टोबर २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : अमावस्या तिथी (रात्री ०९.१९ पर्यंत) त्यानंतर प्रथम तिथी
नक्षत्र : हस्त नक्षत्र (रात्री ०९.४२ पर्यंत) त्यानंतर चित्रा नक्षत्र
योग : इन्द्र योग (रात्री १०.०२ पर्यंत) त्यानंतर वैधृति योग
करण : चतुष्पाद करण (सकाळी ०९.२४ पर्यंत) त्यानंतर नागवा करण
चंद्र राशी : कन्या राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.२९ ते सकाळी १०.५७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०२ ते दुपारी १२.४९
सूर्योदय : सकाळी ०६.३२
सूर्यास्त : सायंकाळी ०६.१८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
