रविवार दि.२७ सप्टेंबर २०२६

विश्वास, शिस्त अन् एकजुटीच्या बळावर रवळनाथ पतसंस्थेची घोडदौड : अभिषेक शिंपी
३० लाखांवर नफा; ठेवींमध्ये अडीच कोटींची भर

सभासद, ठेवीदार व ग्राहकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून गेल्या ४२ वर्षांपासून पारदर्शक आणि विश्वासार्ह कारभार करणाऱ्या श्री रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने आर्थिक प्रगतीची घोडदौड कायम ठेवली आहे. चालू आर्थिक वर्षात संस्थेला ३० लाखांहून अधिक निव्वळ नफा झाला असून गतवर्षाच्या तुलनेत नफ्यात साडेपाच लाखांहून अधिक वाढ झाली आहे. तसेच ठेवींमध्ये सुमारे अडीच कोटी रुपयांची वाढ झाली असून संस्थेकडे सध्या २६ कोटींहून अधिक ठेवी असल्याची माहिती चेअरमन अभिषेक शिंपी यांनी दिली. संस्थेच्या नवीन सभागृहात आयोजित ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. संस्थेचे संस्थापक तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी प्रमुख उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेची सुरुवात झाली. संस्थेचे मॅनेजर विश्वास हरेर यांनी स्वागत केले. दिवंगत सभासद व संबंधितांच्या स्मृतीस अभिवादन करण्याचा श्रद्धांजलीचा ठराव संचालक किरण कांबळे यांनी मांडला. अध्यक्ष अभिषेक शिंपी म्हणाले, गेल्या वर्षभरात संस्थेने आर्थिक व्यवहाराबरोबरच विविध क्षेत्रांत सकारात्मक प्रगती केली आहे. ठेवींमध्ये सातत्याने वाढ होत असून कर्ज वितरणामध्ये पारदर्शकता आणि शिस्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. सभासद, ग्राहक आणि ठेवीदारांचा संस्थेवरील विश्वास हीच संस्थेची खरी ताकद असून, त्यांच्या विश्वासाला पात्र ठरेल असा कारभार करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. रवळनाथ पतसंस्था ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून लोकजीवन उन्नत करणारी, रोजगाराच्या संधी निर्माण करणारी आणि गरजेच्या वेळी समाजाला आर्थिक आधार देणारी चळवळ आहे,’ असेही शिंपी यांनी स्पष्ट केले.
भविष्यात संस्थेच्या माध्यमातून डिजिटल बँकिंगसदृश आधुनिक सेवा सुरू करण्याबरोबरच शेतकरी व उद्योजकांना आर्थिक मदतीचा हात देणे, पर्यावरणपूरक उपक्रम राबविणे आणि सभासदाभिमुख सेवा अधिक सक्षम करणे यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर संस्थेचा वार्षिक अहवाल व सभेपुढील विषयांचे वाचन मॅनेजर विश्वास हरेर यांनी केले. सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना संचालक मंडळाकडून समर्पक उत्तरे देण्यात आली. संस्थेच्या आर्थिक प्रगतीबरोबरच भविष्यातील वाटचालीबाबतही सभासदांनी समाधान व्यक्त केले.

संस्थापक जयवंतराव शिंपी म्हणाले, पतसंस्था स्थापनेमागील मुख्य उद्देश सभासदांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि गरजेच्या वेळी त्यांना विश्वासाने आर्थिक आधार उपलब्ध करून देणे हा आहे. सभासदांमध्ये बचतीची सवय निर्माण करून त्यांच्या कष्टाच्या पैशाला सुरक्षित आणि योग्य दिशा देणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे. सभासदांचा आर्थिक विकास हाच संस्थेच्या प्रगतीचा खरा पाया असून, सभासदांचा विश्वास, सहकार्य आणि संस्थेच्या कारभारातील पारदर्शकता हीच रवळनाथ पतसंस्थेची खरी ताकद आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सभासदांच्या दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत पाल्यांचा तसेच ज्येष्ठ सभासदांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने गणेशमूर्ती, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
सभेला व्हा. चेअरमन समीर गुंजाटी, सर्व संचालक, तसेच सचिन शिंपी, सुनील पाटील, सुनील शिंदे, विलास पाटील, अशोक पोवार, सिकंदर दरवाजकर, हुसेन दरवाजकर, नगरसेवक आसिफ पटेल यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संचालक विक्रम पटेकर यांनी मानले.

जे.पी. नाईक पतसंस्थेची वार्षिक उलाढाल २७० कोटी; १२ टक्के लाभांश जाहीर

आजरा : प्रतिनिधी
शिक्षणतपस्वी जे.पी. नाईक नागरी सहकारी पतसंस्था, आजरा ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. संस्थेची वार्षिक उलाढाल २७० कोटी असून ७५ कोटींच्या ठेवी व ६१ कोटींचे कर्जवाटप असल्याची माहिती अध्यक्ष प्रा.डॉ. शिवशंकर उपासे यांनी दिली. सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यात आला आहे.
संस्थेचे भागभांडवल १ कोटी ९४ लाख, गुंतवणूक १७ कोटी तर राखीव व इतर निधी २ कोटींहून अधिक आहे. गडहिंग्लज व कोल्हापूर येथे दोन शाखा कार्यरत आहेत.
प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने सुरु झालेल्या सभेत दिवंगतांना श्रद्धांजलीचा ठराव रवींद्र देसाई यांनी मांडला. प्रा.डॉ.उपासे यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. उपाध्यक्ष सुभाष विभुते यांनी ताळेबंद पत्रक, श्रावण जाधव यांनी नफा-तोटा पत्रक, शिवाजी बिद्रे यांनी नफा विभागणी तर शिवाजी कांबळे यांनी अंदाजपत्रकाचा ठराव मांडला. दयानंद उपासे यांनी येणे कर्ज यादी वाचन केले. लेखापरीक्षक नेमणूक व दोष दुरुस्ती अहवाल वाचन, तसेच कोल्हापूर शाखा इमारत खरेदी व शाखाविस्तारास मंजुरी घेण्यात आली. प्रशिक्षण अधिकारी एस.एस.देसाई यांनी मार्गदर्शन केले.
एकसष्टी, पंच्याहत्तरी पूर्ण सभासद व दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सभेच्या चर्चेत प्रा. बळवंत शिंत्रे, विनय फळणीकर, देवदास पाचवडेकर, एकनाथ गिलबिले, किरण कुंभार यांनी सहभाग घेतला.
यावेळी पुष्पलता घोळसे, भारती सूर्यवंशी, सुनील पाटील, चंद्रशेखर बंटकडली, प्रकाश ओतारी, रुपाली सातार्डेकर, जाई साळुंखे, संजय कडगावे, बसाप्पा आरबोळे, अंजनी तेली, मनोज गुंजाटी, मॅनेजर कुरळे, मॅनेजर कोंडुसकर, कोल्हापूर व गडहिंग्लज शाखा सल्लागार मंडळ सदस्य व सभासद उपस्थित होते.
सभेचे नियोजन संजय तेजम, निकीता स्वामी, तुषार येरुडकर, सुभाष पाटील, उत्तम कुंभार, एकनाथ कांबळे, कुणाल गुरव यांनी केले. अनिल कांबळे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

उत्तुर व परिसरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप

उत्तूर : प्रतिनिधी
दहा दिवसांच्या भक्तिमय वातावरणानंतर उत्तूर विभागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शनिवारी सायंकाळी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. सायंकाळी पाचच्या सुमारास विविध मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. बँड पथक, भजन, हलगी, लेझिम तसेच ढोल-ताशांच्या गजराने बाजारपेठेसह संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.विसर्जन मिरवणुका बाजारपेठ, शिवाजी पुतळा, हनुमान मंदिर आणि मेन रोड या प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झाल्या. प्रत्येक मंडळाने शिस्तीचे पालन करत मिरवणूक पुढे नेली.
विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या मंडप परिसरात जाऊन श्रीफळ व पुष्पगुच्छ देत परस्परांचे स्वागत केले. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे दर्शन घडले.
यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे बहुतांशी मंडळांनी डॉल्बीला बगल देत पारंपरिक वाद्यांना दिलेले महत्त्व होय. हलगी, लेझिम, बँड, भजन आणि ढोल-ताशांच्या तालावर तरुणाईसह आबालवृद्ध सहभागी झाले. इंदिरानगर परिसरात अवधूत मंडळाच्या वतीने लेझिम पथक व ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. लेझिम पथकाच्या आकर्षक सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.मिरवणुकीदरम्यान मंडळांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.’ गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ … च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. नियोजित मार्गाने मिरवणुका वेळेत मार्गस्थ झाल्याने विसर्जन सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

तालुकास्तरीय व्हॉलीबॉल क्रिडा स्पर्धेत आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी मारली बाजी.

आजरा: प्रतिनिधी
तालुकास्तरीय व्हॉलीबॉल क्रिडा स्पर्धेत आजरा हायस्कूलच्या १४ वर्षांखालील मुला-मुलींच्या संघाने व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरावर आपली निवड निश्चित केली आहे. तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने खो-खो स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या क्रिडा स्पर्धेतसहभागी विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
व्हॉलीबॉल स्पर्धा (१४ वर्षांखालील गट – जिल्हास्तरासाठी निवड):
सहभागी मुली: श्रावणी तानाजी इलगे,अन्वी राहुल नेवरेकर, आराध्या अनिल शेणवी, वंदना भागोजी शेळके, ईश्वरी प्रकाश यादव, उत्कर्षा अनिल निर्मळे, स्वरा सुधाकर मनोळकर, त्रिषा अतुल पाटील, मनस्वी मारुती जाधव, अद्विका अनिल प्रधान.
सहभागी मुले: आरुष नितीन कुंभार, उत्कर्ष उमेश जाधव, सक्षम जयसिंग खापरे, रोचक सर्जेराव पाटील, नचिकेत संजय पोतदार, संभव धनाजी जाधव, नियंत अजित पोवार, वेदांत विनायक कामत.
खो-खो स्पर्धा (१७ वर्षांखालील मुलींचा गट – तृतीय क्रमांक):
सहभागी विद्यार्थिनी: कृतिका विजय पाटील, हर्षिता तुळशीराम चव्हाण, सृष्टी बाबु लाड, सुरभी संदीप पाटील, साक्षी गंगाराम गावडे, श्रेया गजानन पाटील, श्रेया प्रदिप पाचवडेकर, श्रद्धा उत्तम सलामवाडे , राधिका महादेव बां दिवडेकर, नेहा बाळकृष्ण पाटील, दीक्षा गोपाळ नाईक, दिपा रामचंद्र गावडे.
या सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री. ए. आर. व्हसकोटी यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. तसेच पर्यवेक्षक व क्रिडा शिक्षक श्री. एम. एस. गोरे सौ . एम. पी. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

पोलीस डायरी…
थंड भात वाढला म्हणून मुलाची आईला बेदम मारहाण; आई जखमी
आजरा : प्रतिनिधी
थंड भात वाढला या कारणावरून मुलाने ६५ वर्षीय आईला भाताच्या पळीने आणि काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना आजरा तालुक्यातील होन्याळी गावात घडली आहे. याप्रकरणी आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शांताबाई गुंडू चव्हाण (वय ६५, रा. होन्याळी, ता. आजरा) या घरकाम व शेती करतात. त्यांचा मुलगा संदीप गुंडू चव्हाण याची पत्नी त्याच्यासोबत राहत नसून तिने घटस्फोट घेतला आहे. त्यामुळे तो आईच्या घरातील एका जाप्त्यामध्ये राहत असून आईच्या घरीच जेवण करत असतो.
दि. २६/०९/२०२६ रोजी पहाटे ०१.०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी घरात झोपलेल्या असताना आरोपीला भूक लागल्याने त्याने आईला उठवून “मला भूक लागली आहे, मला जेवण वाढ” असे सांगितले. फिर्यादीने झोपेतून उठून त्याला जेवण वाढले. त्यावेळी ‘भात गरम का केली नाहीस, थंड का वाढलीस .. असा जाब विचारून व शिवीगाळ करून भाताच्या पळीने कपाळावर मारहाण करून जखमी केले, तसेच काठीने गुडघ्यावर आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद आहे.
जखमी शांताबाई यांनी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे उपचार घेत असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आजरा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे..
आजऱ्यात दोन दुकाने फोडली ; ३६ हजारांची रोकड लंपास
आजरा : प्रतिनिधी
आजरा शहरात अज्ञात चोरट्यांनी दोन दुकाने फोडून ३६ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे.
मिनर्व्हा हॉटेल समोरील आजरा शेतकरी मंडळ तांदूळ आणि काजू शॉप तसेच हॉटेल शिवनेरी शेजारील महालक्ष्मी ॲग्रो मार्ट समर्थ कृषी सेवा केंद्र या दोन दुकानांच्या पत्र्याचे स्क्रू काढून चोरट्यांनी प्रवेश केला. पहिल्या दुकानातून २४ हजार तर दुसऱ्या दुकानाच्या टेबलाच्या ड्रॉवरमधून १२ हजार अशी एकूण ३६ हजार रुपयांची रोकड लंपास केली.
या प्रकरणी व्यापारी मुदस्सर आक्रम मणेर (रा. रामदेव गल्ली, आजरा) यांनी आजरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

आजचे पंचांग
दिनांक : २७ सप्टेंबर २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : प्रथम तिथी (रात्री ०८.५८ पर्यंत) त्यानंतर द्वितीया तिथी
नक्षत्र : उत्तराभाद्रपदा नक्षत्र (सकाळी ११.०७ पर्यंत) त्यानंतर रेवती नक्षत्र
योग : वृद्धि योग (सकाळी ११.१६ पर्यंत) त्यानंतर ध्रुव योग
करण : बलवा करण (सकाळी ०९ .४१ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : मीन राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०४.५९ ते सायंकाळी ०६.२९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०५ ते दुपारी १२.५८
सूर्योदय : सकाळी ०६.२९
सूर्यास्त : सायंकाळी ०६.२९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
