mrityunjaymahanews
अन्य

शनिवार – सातच्या बातम्या

 

शनिवार  दि.२६ सप्टेंबर २०२६

डॉल्बीला फाटा देत आजऱ्यात बाप्पांना भावपूर्ण निरोप

आजरा : प्रतिनिधी

आजरा शहर व परिसरात डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाला फाटा देत पारंपारिक वाद्यांच्या निनादात श्री गणरायाला अत्यंत भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात निरोप देण्यात आला. स्थानिक पत्रकार व पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळांनी डॉल्बीमुक्त विसर्जनाचा आदर्श घालून दिला.

विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी आजरा पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे जवान तैनात होते. मिरवणूक मार्गावर वाहतूक नियंत्रण आणि गर्दीचे व्यवस्थापन चोखपणे करण्यात आले.

यावर्षी शहरातील पाच प्रमुख मंडळांनी एकत्र येत डॉल्बीमुक्त विसर्जनाचा निर्णय घेतला होता.भाजी मंडई व्यापारी गणेशोत्सव मंडळ,जय शिवराय गणेशोत्सव मंडळ, लिंगायत गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सुभाष चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या सर्व मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन भजन विविध पारंपारिक खेळ, बँड आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात आतषबाजी सह मिरवणुका काढून करण्यात आले.

डॉल्बी नसल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिरवणुकीचा मनमुराद आनंद घेता आला. बाप्पांच्या जयघोषात संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या गजरात भाविकांनी बाप्पाला निरोप दिला. पारंपारिक वाद्यांच्या तालावर तरुणाईने ठेका धरल्याने मिरवणुका भाविकांचे आकर्षण ठरल्या. दरवर्षीप्रमाणे प्रमाणात मंदिरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रथम मूर्ती विसर्जनाचा मान पटकावला.

जिल्हा पोलीस प्रमुखांच्या ध्वनी प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाच्या आवाहनाला आजरा शहराने १०० टक्के प्रतिसाद दिल्याबद्दल पोलीस प्रशासनाकडून मंडळांचे कौतुक करण्यात येत आहे.

वाघाने गाय नेली… की घसरून गुहेत पडली… वनविभागाची तारांबळ

आजरा : प्रतिनिधी

आजरा तालुक्यातील धनगर मोळा परिसरात वाघाने अथवा बिबट्याने गाय नेल्याची चर्चा पसरल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र प्रत्यक्ष पाहणीअंती ही गाय घसरून गुहा सदृश्य भागात पडल्याचे स्पष्ट झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, तर अफवेने वनविभागाची चांगलीच तारांबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, धनगर मोळा परिसरात आल्याची वाडी येथील एका शेतकऱ्याची गाय अचानक बेपत्ता झाली होती.  एका मोठ्या दगडांच्या गुहा सदृश्य ठिकाणी गाय अडकलेली दिसल्याने वाघ किंवा बिबट्याने गाय उडून गेली असल्याची चर्चा परिसरात पसरली. सोशल मीडियावरहशही उडती बातमी वाऱ्यासारखी पसरली.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी केली असता वाघ अथवा बिबट्याच्या पायाचे ठसे  किंवा इतर कोणतेही अस्तित्व आढळून आले नाही. वनविभागाने अधिक शोध घेतला असता, सदर गाय चारत असताना पाय घसरून जवळील एका गुहेत  दरीत अडकल्याचे निदर्शनास आले.

 या घटनेमुळे काही काळ वनविभागाची धांदल उडाली होती, येथे सापळा देखील लावण्यात आला आहे. मात्र सत्य समोर आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

आजरा महाविद्यालयात बांबू कार्यशाळा संपन्न

आजरा : प्रतिनिधी

आजरा महाविद्यालयात पर्यावरणशास्त्र व भूगोल विभाग, इको क्लब, पृथ्वी ग्रीन क्लब, आजरा बांबू क्लस्टर, हिरण्यकेशी बांबू ग्रामविकास शेतकरी गट आणि अश्वघोष बांबू उद्योग समूह पेरणोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बांबू : पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची मूल्यसाखळी’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळा दि. २५ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडली.

कार्यशाळेचे उद्घाटन बांबू संदर्भातील पुस्तक पत्रिका व पोस्टर प्रदर्शनाने झाले. प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांनी स्वागत केले, तर प्रास्ताविक रणजित कालेकर यांनी केले.

बांबू तज्ज्ञ सतीश कांबळे यांनी बांबूचे पर्यावरणीय, आर्थिक व सामाजिक महत्त्व विशद केले. रणजित कालेकर यांनी बांबू उद्योगातील रोजगार संधींवर मार्गदर्शन केले.

अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. किरण पोतदार होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी बांबू क्षेत्रातील संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक प्रा. मनोज पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. रणजित पवार यांनी तर आभार प्रा. तेजस्विनी जाधव यांनी मानले.

धनगरमोळा येथे विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

धनगरमोळा : प्रतिनिधी 

श्री. आदर्श कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, धनगरमोळा यांच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून धनगरमोळा पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन व लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आजरा तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते करण्यात आले.

महसूल विभागांतर्गत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, पुरवठा विभागामार्फत डिजिटल रेशन कार्ड, तसेच अंत्योदय/इतर पात्र लाभार्थी योजनांची माहिती, PM किसान योजना, आधार कार्ड, आरोग्य विभागामार्फत आयुष्मान भारत गोल्डन कार्ड यांसह विविध शासकीय योजनांचा लाभ व मार्गदर्शन या शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थांना देण्यात आले. तसेच ‘लक्ष्मी’ योजनेअंतर्गत सात-बारा उताऱ्यावर महिलांची नावे मोफत नोंदविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कृ. मोरुस्कर यांनी उपस्थितांचे स्वागत करून गणेशोत्सवानिमित्त मंडळाने राबविलेल्या विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली.

तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते लाभार्थ्यांना डिजिटल रेशन कार्ड, आयुष्मान कार्ड व गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले. धनगरमोळा ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार नवीन गावठाणातील प्लॉटधारकांना स्वतंत्र सात-बारा उतारा व प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही तहसीलदारांनी दिली. तसेच शेतजमिनीशी संबंधित प्रलंबित प्रश्नही तातडीने सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या कार्यक्रमास गवसे विभागाचे सर्कल अधिकारी प्रवीण खरात, पुरवठा निरीक्षक चव्हाण, संजय गांधी विभागाचे संतोष सांगळे, सुळेरान महसूल सहायक अधिकारी संतोष पाटील, गवसे महसूल विभागाच्या पाटील , आरोग्य विभागाचे साबखान व त्यांचे सहकारी, तसेच मंडळाचे सचिव तुषार खरुडे, कार्याध्यक्ष संतोष वि. शेटगे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 मंडळाचे उपाध्यक्ष नामदेव जाधव यांनी आभार मानले.

पं. दीनदयाळ विद्यालयात पं.दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

आजरा : प्रतिनिधी

पं.दीनदयाळ विद्यालय आजरा मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे खजानिस रमेश कारेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. राजोपाध्ये व्ही .व्ही. यांनी पंडित दीनदयाळ यांचे बालपण, देशासाठी कार्य करताना त्यांच्या जीवनातील खडतर प्रवास याबद्दल माहिती सांगितली . बी.पी.बुरुड यांनी दीनदयाळ यांनी केलेल्या कार्याची तसेच त्यांनी भारतीय समाजाच्या विकासात व्यक्ती ,समाज ,अर्थव्यवस्था आणि संस्कृती यांचा संबंध महत्त्वाचा मानला. त्यांचा ‘अंत्योदय’ हा विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ पोहोचवण्यावर भर देतो .त्यांनी पत्रकारिता व लेखनातूनही सामाजिक आणि राजकीय विचार मांडले यासंदर्भात माहिती सांगितली . दीनदयाजींचा एकात्म वाद याबद्दल माहिती सांगून महान व्यक्तींची जयंती साजरी करण्यामागचा उद्देश सांगितला.

कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे संचालक सुधीर कुंभार, विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार व्ही .व्ही . राजोपाध्ये यांनी मानले.

आजचे पंचांग

दिनांक : २६ सप्टेंबर २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : पौर्णिमा तिथी (रात्री १०.१८ पर्यंत) त्यानंतर प्रथम तिथी
नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा नक्षत्र (सकाळी ११.३१ पर्यंत) त्यानंतर उत्तराभाद्रपदा नक्षत्र
योग : गण्ड योग (दुपारी ०१.१६ पर्यंत) त्यानंतर वृद्धि योग
करण : विस्ती भद्रा करण (सकाळी १०.४६ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : मीन राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.२९ ते सकाळी १०.५९ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०६ ते दुपारी १२.५४
सूर्योदय : सकाळी ०६.२९
सूर्यास्त : सायंकाळी ०६.३०
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!