mrityunjaymahanews
अन्य

गुरुवार – सातच्या बातम्या

गुरूवार दि.२४ सप्टेंबर २०२६

खरीप हंगाम भात पीक नैसर्गिक शेती शेतीशाळा कार्यक्रम उत्साहात 

आजरा : प्रतिनिधी

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत खरीप हंगाम भात पीक नैसर्गिक शेती शेतीशाळा कार्यक्रम दाभिल आणि सुलगाव व नाचणी शेतीशाळा कार्यक्रम आरदाळ येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री युवराज पाटील, सरपंच दाभिल,  सौ रुपाली पाटील सरपंच आरदाळ व  सौ नंदिनी डोंगरे सदस्या ग्रामपंचायत सुलगाव उपस्थित होते.

या कार्यक्रमात श्री प्रतीक पाटील IPM प्रोजेक्ट हेड, ग्रीन रिव्होल्यूशन कोल्हापूर यांनी भात पिकावरील कीड व रोग ओळख व त्यांचे जैविक आणि नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण याबाबत प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले. मार्गदर्शन पर भाषणात बोलताना त्यांनी भात पिकात पिवळा खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, तुडतुडे, गादमाशी आणि विविध प्रकारचे करपा रोग हे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट आणणारे मुख्य शत्रू आहेत.
या सर्व किडी व रोगांपासून पिकाचे शाश्वत संरक्षण करण्यासाठी जैविक, भौतिक आणि रासायनिक उपायांचा मेळ घालणारे एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) अत्यंत प्रभावी ठरते. पिवळ्या खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी आणि सर्वेक्षणासाठी शेतात प्रति एकरी 8 ते 10 कामगंध सापळे (YSB Lure आणि Funnel Traps) पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळातच लावावेत.कामगंध सापळ्यांमधील ल्यूरच्या (Lure) वासाने नर पतंग आकर्षित होऊन ट्रॅप मध्ये अडकतात, ज्यामुळे नर-मादीचे मिलन रोखून किडीची पुढील पिढी नष्ट होते.हे कामगंध सापळे शेतात पिकाच्या जमिनीपासून किंवा पानांच्या उंचीपासून साधारण १ फूट उंच राहतील अशा प्रकारे बांबूच्या काठीला व्यवस्थित बांधावेत.मावा, तुडतुडे आणि इतर लहान उडणाऱ्या कीटकांना आकर्षित करून मारण्यासाठी प्रति एकरी ३०ते ४०पिवळे व निळे चिकट सापळे (Sticky Traps) वापरावेत.

चिकट सापळे रोपांच्या पानांच्या रेषेत (कॅनोपीच्या पातळीवर) लावल्यास तुडतुडे व इतर रसशोषक कीटक त्यावर सहज चिकटून मरतात.करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युरियाचा अतिवापर टाळावा, पिकात पाण्याचा निचरा योग्य ठेवावा आणि बुरशीनाशक बीजप्रक्रिया आवर्जून करावी असे सांगितले.

श्री अमित यमगेकर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रगतशील शेतकरी नंदकुमार वाजे यांनी आभार मानले. यावेळी शरद मस्कर,सूर्यकांत पाटील, शिवाजी जाधव,जनार्दन पाटकर, बाळू शिवने, रामदास पुंडपळ, रणजीत कदम, गणपती लांडे, विजया वर्देकर, सुगंधा गुरव, सरिता कुंभार, पुनम गायकवाड,सुधा कांबळे आदी शेतकरी उपस्थित होते.

संगणक शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर !
 संगणक शिक्षकांचे समायोजन प्रलंबित

आयसीटी विषय तिसरीपासून स्वतंत्रपणे सुरू करण्याची मागणी 

आजरा : प्रतिनिधी

राज्यातील संगणक शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रलंबित असल्याने संगणक शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. न्यायालयाने शासनाला आवश्यक कार्यवाहीसाठी दिलेली सहा महिन्यांची मुदत संपत आली असतानाही शासनाकडून ठोस निर्णय झालेला नाही, असा आरोप महाराष्ट्र राज्य संगणक शिक्षक संघटनेने केला आहे.

केंद्र पुरस्कृत आयसीटी स्कूल योजना बंद झाल्यानंतर राज्यातील अनेक अनुभवी संगणक शिक्षकांच्या सेवा खंडित झाल्या आहेत. या शिक्षकांचे शासन सेवेत समायोजन करावे, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. एकीकडे अनुभवी संगणक शिक्षक समायोजनाच्या प्रतीक्षेत असताना दुसरीकडे शासकीय शाळांमध्ये संगणक शिक्षकांची नव्याने पदभरती सुरू असल्याने शिक्षकांमध्ये असंतोष वाढला आहे.

न्यायालयीन आदेशाचा विचार करून नव्याने पदभरती करण्यापूर्वी अनुभवी संगणक शिक्षकांचे समायोजन करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. अनुभवी शिक्षकांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.

आयसीटी विषय तिसरीपासून सुरू करण्याची मागणी

दरम्यान, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), पुणे येथे सुरू असलेल्या नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमात ‘माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान’ (आयसीटी) हा विषय इयत्ता तिसरीपासून स्वतंत्रपणे शिकवावा, तसेच इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी आयसीटी विषय पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी आयसीटी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे.

या मागणीसंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एससीईआरटी, पुणेचे संचालक हेमंत वसेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना संगणक व डिजिटल कौशल्यांचे शिक्षण लहान वयापासून मिळावे, तसेच माध्यमिक स्तरावर आयसीटी विषयाला अधिक महत्त्व मिळावे, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे.

नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमात आयसीटी विषयाचा स्वतंत्र समावेश केल्यास विद्यार्थ्यांमध्ये संगणक साक्षरता वाढण्यास मदत होईल. तसेच भविष्यातील शिक्षण, रोजगार आणि तंत्रज्ञानातील बदलांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये विद्यार्थ्यांना लहान वयातच आत्मसात करता येतील, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

निवेदन सादर करताना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे महानगर कार्यवाह विष्णू मोरे, आयसीटी शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष सुशांत लुगडे, सचिन पाटील, सचिव मनोज कांबळे, कविराज पाटील, किशोर यादव आणि अनुप रेडेकर उपस्थित होते.

फ्युचर फाउंडेशन तर्फे मोफत वह्या वाटप उपक्रम

 

आजरा : प्रतिनिधी

विद्यामंदिर, मासेवाडी. ता. आजरा येथील जिल्हा परिषद शाळेत फ्युचर फाउंडेशनच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. रवींद्र हरी पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांनी फ्युचर फाउंडेशनचे  आभार मानले.

उत्तूर-होन्याळी रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी भ्रमण सर्वेक्षण पूर्ण

उत्तूर : प्रतिनिधी

उत्तूर -होन्याळी या सुमारे पाच किलोमीटर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या प्रस्तावित कामासाठी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या वतीने भ्रमण सर्वेक्षण बैठक पार पडली. या रस्त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून तो साडेपाच मीटर रुंदीचा करण्यात येणार आहे.बैठकीत सामाजिक, रस्ता सुरक्षा, पर्यावरण तसेच बांधकामाशी संबंधित विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायतीने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारे उभारणे, रस्त्यालगतच्या विहिरी सुरक्षित करणे, ओढ्यांवरील संरक्षक कठड्यांची उंची वाढविणे आणि वृक्षलागवड करण्याच्या सूचना मांडल्या.

अधिकाऱ्यांनी या सूचनांचा समावेश अंदाजपत्रकात करून पुढील प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रियेसाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे सांगितले. निविदा व कार्यादेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या रस्त्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पाठपुरावा केला आहे. बैठकीस सरपंच किरण आमणगी, उपसरपंच सुनीता हत्तरगी, ग्रामपंचायत अधिकारी संदेश रायकर, संभाजी कुराडे, अनिता घोडके, सुवर्णा नाईक, बाळू सावंत, प्रशांत पोतदार, पराग देशमाने, जयवंत निंबाळकर, प्रशांत पारकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

माजी पंचायत समिती सभापती स्व. मसणू सुतार यांचा आज स्मृतिदिन : आरोग्य शिबिराचे आयोजन

आजरा :  प्रतिनिधी

आजरा पंचायत समितीचे माजी सभापती स्व . मसणू रावजी सुतार यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या समन्वयाने आरोग्य केंद्र मलीग्रे व देसाई हॉस्पिटल गडहिंग्लज यांच्या सहकार्याने शिवपार्वती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज गुरुवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी किणे येथे सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संजय गांधी निराधार समिती गडहिंग्लजच्या अध्यक्षा सौ. भारती जाधव, आजऱ्याचे नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी, डॉ.चंद्रकांत परुळेकर, डॉ. सुधाकर जाधव, डॉ रोहित देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आजचे पंचांग

दिनांक : २४ सप्टेंबर २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : त्रयोदशी तिथी (रात्री ११.१८ पर्यंत) त्यानंतर चतुर्दशी तिथी
नक्षत्र : धनिष्ठा नक्षत्र (सकाळी १०.३४ पर्यंत) त्यानंतर शततारका नक्षत्र
योग : धृति योग (दुपारी ०३.५४ पर्यंत) त्यानंतर शूल योग
करण : कौलव करण (सकाळी ११.०९ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : कुंभ राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.०१ ते दुपारी ०३.३१ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०६ ते दुपारी 12:54
सूर्योदय : सकाळी ०६.२९
सूर्यास्त : सायंकाळी ०६.३२
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत


छाया वृत्त 

‘मृत्युंजय” कार शिवाजीराव सावंत स्मृती दालनामध्ये आरोग्य विभाग ,आजरा नगरपंचायत व शिवसेना पुरस्कृत जय शिवराय गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आरोग्याचा श्री गणेशा हे आरोग्य शिबिर पार पडले.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

राज्यपाल कोशारी यांच्या विरोधात आजऱ्यात शिवसैनिक आक्रमक… संभाजी चौकात केले जोडे मारो आंदोलन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!