mrityunjaymahanews
अन्य

सोमवार – सातच्या बातम्या

सोमवार

३ ऑगस्ट २०२६

चर्चा दरोड्याची…
प्रकरण आर्थिक देवघेवीचे

एक जखमी… दोघे ताब्यात


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरात गजबजलेल्या संभाजी चौकात असणाऱ्या एक्सपर्टो बेकरीच्या मालकास व त्याच्या मुलग्याला मारहाण करून मुलग्याला खोलीत कोंडून घालून ५० लाख रुपयांची मागणी केली जात असल्याची बातमी रविवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास शहरभर पसरली. नागरिकांनी मोठ्या संख्येने संभाजी चौकात गर्दी केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून जिस्नू दिवाकर नायर /पुथनपुरोईल हा २४ वर्षीय तरुण संशयितांबरोबरच्या झटापटीत जखमी झाला. हा प्रकार म्हणजे सशस्त्र दरोडा की आर्थिक देवघेवीतून घडलेला प्रकार याबाबत रात्री उशिरापर्यंत शहरवासीयांमध्ये उलट सुलट चर्चा होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मात्र हा प्रकार याच बेकरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी थकलेल्या पगारापोटी उचललेले पाऊल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कांहीही असले तरी शहरांमध्ये या प्रकरणाने चांगलीच खळबळ उडाली.

रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास दिवाकर नायर/पुथनपुरोईल या बेकरी मालकांनी बेकरीच्या वरील निवासी मजल्यावरून खाली येऊन दोघा अज्ञातांनी आपले हातपाय बांधले होते व त्यातून आपण सुटका करून घेऊन खाली आलो आहोत. आपल्या मुलाला पैशाची मागणी करत अज्ञातांनी मारहाण करून डांबून ठेवले असल्याचे आजूबाजूच्या नागरिकांना सांगितले. हळूहळू संभाजी चौकात मोठी गर्दी होऊ लागली. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी जिस्नू हा जखमी अवस्थेत आढळून आला.

जिस्नूवर आजरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथे हलवण्यात आले आहे. याप्रकरणी समोकीलाल निशाद व राजकुमार निशाद या नंगलानंदा,या.टुंडला, उत्तर प्रदेशच्या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या दोघांनी गडहिंग्लज येते स्वतंत्र व्यवसाय सुरू केला होता. परंतु त्यामध्ये त्यांना आर्थिक तोटा झाल्यानंतर जुनी पगार वसुली करण्यासाठी नायर यांच्याकडे आल्यानंतर घडलेला हा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याकडून रिव्हॉल्वर सदृश्य वस्तू व चाकू हस्तगत केला आहे.

अफवांचे पीक आणि गोंधळ…

या प्रकरणामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. फायरिंग झाले आहे. दरोडेखोर बंदुका घेऊन आहेत अशा विविध अफवा अल्पावधीतच पसरल्याने गोंधळात भरच पडत गेली. प्रत्यक्षात मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट झाले. आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आईसह सात वर्षाचा मुलगा बेपत्ता, आजरा पोलिसात तक्रार दाखल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील किटवडे येथील ३२ वर्षीय सौ. शुभांगी विनायक पाटील आणि तिचा ७ वर्षीय मुलगा विराट विनायक पाटील हे दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वा. च्या सुमारास घरातून  निघून गेले असून ते अद्याप घरी परतलेले नाहीत. याबाबत शुभांगी यांचे बंधू प्रशांत शंकर गुरव रा. खानापूर यांनी आजूबाजूला व नातेवाईकांकडे शोध घेऊनही ते मिळून आलेले नाहीत. याबाबत त्यांनी आजरा पोलिसात वर्दी दिली आहे.

पुढील तपास पो.हे.कॉं.पांडुरंग येलकर करत आहेत.

ओव्हरटेक अधिक सुरक्षित करणाऱ्या संशोधनाला पेटंट

धामणेतील निवृत्ती पाटील यांची अभिनव ओव्हरटेक सिग्नल प्रणाली

उत्तूर : मंदार हाळवणकर

रस्ते अपघातांमध्ये ओव्हरटेक करताना होणारा गोंधळ हे एक प्रमुख कारण मानले जाते. ही बाब लक्षात घेऊन आजरा तालुक्यातील धामणे येथील संशोधक निवृत्ती शिवराम पाटील यांनी विकसित केलेल्या वाहन ओव्हरटेक सिग्नल सिस्टीम या संशोधनाला पेटंट प्राप्त झाले आहे. या प्रणालीमुळे ओव्हरटेक करताना चालकांमधील संभ्रम कमी होऊन अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. सध्या ओव्हरटेकसाठी पुढील वाहनाचा उजवा इंडिकेटर वापरला जातो. मात्र, चालक उजवीकडे वळणार आहे की मागील वाहनाला पुढे जाण्यासाठी संकेत देत आहे, याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. यामुळे अपघाताचा धोका वाढतो. ही अडचण दूर करण्यासाठी पाटील यांनी वाहनाच्या मागील बाजूस लाल व हिरव्या रंगाची स्वतंत्र सिग्नल प्रणाली विकसित केली आहे.

रस्ता सुरक्षित नसल्यास लाल सिग्नलद्वारे ओव्हरटेक करू नये, तर रस्ता मोकळा व सुरक्षित असल्यास हिरव्या सिग्नलद्वारे पुढे जाण्याचा स्पष्ट संकेत दिला जातो. त्यामुळे मागील वाहनचालकाला योग्य वेळी योग्य निर्णय घेणे अधिक सुलभ होते.या संशोधनासाठी निवृत्ती पाटील यांनी सुमारे सहा महिन्यांचा सखोल अभ्यास केला. देश-विदेशातील सुमारे २५० पेटंटचा अभ्यास करून त्यांनी ही प्रणाली विकसित केली. त्यानंतर पुणे येथील पेटंट कार्यालयाकडे अर्ज दाखल करण्यात आला आणि अवघ्या ५० दिवसांत या संशोधनाची पेटंट नोंद झाली. विशेष म्हणजे, यापूर्वीही त्यांच्या चार संशोधनांना पेटंट मिळाले असून, हे त्यांचे पाचवे पेटंट ठरले आहे. त्यांच्या या अभिनव संशोधनामुळे भविष्यात रस्ते सुरक्षेला चालना मिळून ओव्हरटेकदरम्यान होणारे अपघात कमी करण्यास मोठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आजरा हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी श्री. ए. आर. व्हसकोटी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जनता शिक्षण संस्था संचलित आजरा हायस्कूल, आजरा येथे मुख्याध्यापकपदी श्री. ए. आर. व्हसकोटी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीदिनी पदभार स्वीकारला. यानिमित्त त्यांचा तसेच नवनियुक्त पर्यवेक्षक श्री. एम. एस. गोरे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

       आजचे पंचांग 

दिनांक : ३ ऑगस्ट २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : पंचमी तिथी (रात्री १०.५४ पर्यंत) त्यानंतर षष्ठी तिथी
नक्षत्र : उत्तराभाद्रपदा नक्षत्र (रात्री ०९.५९ पर्यंत) त्यानंतर रेवती नक्षत्र
योग : सुकर्मा योग (रात्री ०९.१२ पर्यंत) त्यानंतर धृति योग
करण : कौलव करण (सकाळी ११.०८ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : मीन राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.५४ ते सकाळी ०९.३१ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१९ ते दुपारी ०१.१०
सूर्योदय : सकाळी ०६.१७
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१२
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

निधन वार्ता…
अब्दुलरशीद पठाण

जवाहर नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी संचालक हाजी अब्दुल रशिद बाबालाल पठाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.ते ७३ वर्षाचे होते.आजरा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मैमुना पठाण यांचे ते पती होत.

आजरा कारखान्याचे माजी संचालक स्व.सिलेमान दिडबाग यांचे ते कट्टर समर्थक होते.अनेक वर्षे रशिद पठाण यांनी जवाहर नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक म्हणून काम केले.एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून आजऱ्यातील मुस्लिम समाजामध्ये त्यांची ओळख होती.त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे.

शिवाजी साठे

कोवाडे ता.आजरा येथील शिवाजी तुकाराम साठे यांचे ( वय वर्षे ७५ ) अल्पशा आजाराने निधन झाले. ते मलिग्रे हायस्कूल मधून सेवानिवृत्त क्लार्क होते.

मितभाषी, समंजस व विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

रक्षा विसर्जन मंगळवारी आहे.

पुन्हा पावसाचा जोर वाढला…

आजरा : मृत्युंजय महान्यूज

रविवारी पुन्हा एकदा जोरदार पावसाने आजरा तालुक्याला झोडपले. दिवसभर पावसाच्या मोठ्या सरी कोसळत होत्या.पावसाचा जोर वाढल्याने हिरण्यकेशी व चित्री नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

काल दिवसभर पर्यटकांनी रामतीर्थ परिसरात मोठी गर्दी केली होती.


संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तालुका खरेदी – विक्री संघ निवडणूक…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गुरुवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!