रविवार
२ ऑगस्ट २०२६


आजरा तालुक्यातील चार गावांत बिबट्याचा वावर स्पष्ट; वन विभागाचे सतर्कतेचे आवाहन…

उत्तूर: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील झुलपेवाडी, बेलेवाडी, बहिरेवाडी आणि हणबरवाडी येथे गेल्या पंधरा दिवसांपासून पाळीव कुत्र्यांवर हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. ग्रामस्थांनी वारंवार बिबट्याचा वावर असल्याची माहिती वन विभागाला दिली होती. सुरुवातीला पाऊलखुणांवरून तो तरस असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, बहिरेवाडी येथे वन विभागाने लावलेल्या सापळ्याजवळ बिबट्याच्या स्पष्ट पाऊलखुणा आढळल्याने परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यानंतर वन विभागाने गस्त वाढवून सापळे लावले असून वन्यजीव बचाव पथकाच्या मदतीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या घटनांमुळे चारही गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सायंकाळनंतर शेतात जाणे टाळले जात असून पाळीव जनावरे व कुत्र्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वन विभागाकडून बिबट्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
वनपाल सागर पवार यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, रात्री एकट्याने बाहेर पडणे टाळावे आणि बिबट्या दिसल्यास तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.

मेघोली आणि बांद्राई धनगर वाड्यावरील कारवाईचा निषेध

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील बांद्राई धनगरवाडा आणि भुदरगड तालुक्यातील मेघोली धनगरवाडा येथील गरीब धनगर कुटुंबावर त्यांची शेती घरे नासधूस करून ऐन पावसाळ्यात त्यांचे संसार उध्वस्त करण्याचे काम वन खात्याने केले आहे. वन खात्याच्या या कृत्याचा श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने निषेध करण्यात आला. याबरोबरच ही कारवाई कोणाच्या आदेशाने झाली त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, जे कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते त्यांच्यावर त्यांचे निलंबन केले पाहिजे. अशीही मागणी करण्यात आली आहे.
२००६ आणि २००८ चा वनाधिकार कायदा झाल्यानंतर पिढ्यानपिढ्या जंगलात राहणाऱ्या आदिवासी आणि पारंपारिक वननिवासी ना जंगल जमीन व जंगलाचे अधिकार मिळाले आहेत. वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी न करता त्यांना जंगलातूनच हद्दपार करणे त्यांचे संसार उध्वस्त करणे ही बाब कायद्याच्या विरोधात आहे. म्हणूनच या बाधित धनगर कुटुंबांना ताबडतोब न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आज श्रमिक मुक्ती दल वनाधिकार संघर्ष समिती आजरा यांच्या वतीने तहसीलदार आजरा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर कॉ. संपत देसाई, प्रकाश मोरुस्कर, संजय तरडेकर, युवराज जाधव ,नामदेव फगरे, देविदास शेडगे,संतोष शेडगे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठेंना अभिवादन
व्यंकटराव शिक्षण संकुल…

व्यंकटराव शिक्षण संकुलमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी* प्राचार्य एस एन पाटील व पर्यवेक्षिका व्ही.जे.शेलार यांनी प्रतिमेचे पूजन केले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे महाराष्ट्र निर्मितीतील योगदान, मराठी साहित्य क्षेत्रातले योगदान याबद्दल माहिती सांगितली. राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील लोकमान्य टिळकांचे योगदान, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच ही क्रांतीची प्रेरणा जागृत करणारे लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती देण्यात आली. आर्या कांबळे व हार्दिक सय्यद यांनी भाषणे सादर केली. आस्था गुरव व सृष्टी कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार साक्षी कुंभार हिने मानले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
पं. दीनदयाळ विद्यालय

पंडित दीनदयाळ विद्यालय मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. उपसभापती पंचायत समिती आजरा सौ.यशोदा पोवार , मुख्याध्यापक संजीव देसाई व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी प्रास्ताविकेमध्ये वर्षभर विद्यालयांमध्ये राबवण्यात येणाऱ्या शालेय उपक्रमांचा , शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला.
विद्यालयातील सहा. शिक्षिका सौ .शालन कांबळे यांनी आपल्या मनोगतातून लोकमान्य टिळक यांनी आपले संपूर्ण जीवन देश सेवेसाठी समर्पित केले त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात. लोकमान्य ही उपाधी त्यांना मिळाली, त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान दिले . त्यांनी लिहिलेले साहित्य याबद्दल आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘ देशभक्त लोकमान्य टिळक’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. लोकमान्य टिळकांचे आचार व विचार,त्यांच्या कार्याची प्रेरणा आपण घेतली पाहिजे. असे विचार विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा व त्यांच्या साहित्याचा प्रकाश प्रभू यांनी आढावा घेतला. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश प्रभू, श्रीम.शुभांगी निर्मळे तसेच आभार विजय राजोपाध्ये यांनी मानले.
आजरा महाविद्यालय…

माणूस हा अण्णा भाऊ साठे यांच्या चिंतनाचा केंद्रबिंदू होता त्यामुळे अण्णा भाऊ साठे मार्क्सवादी की आंबेडकरवादी या वादापेक्षा अण्णा भाऊ मानवतावादी होते, असे मत विचारवंत डॉ. अविनाश वर्धन यांनी येथे व्यक्त केले.
आजरा महाविद्यालयातील मराठी विभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉक्टर वर्धन बोलत होते. प्रभारी प्राचार्य डॉ. किरण पोतदार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ पोतदार, पर्यवेक्षक प्रा. मनोज पाटील, कार्यालय अधीक्षक श्री. योगेश पाटील आदींच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
विभागप्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. वैशाली देसाई यांनी सूत्रसंचालन तर प्रा. सुवर्णा भोकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

बसस्थानकाला नाही, भ्रष्टाचाराला विरोध… प्रकाश बेलवाडे

उत्तूर (ता. आजरा) येथील प्रलंबित बसस्थानकाच्या प्रश्नावर अखेर सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. बसस्थानकासंदर्भातील तक्रारदार प्रकाश बेलवाडे आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत विविध पर्यायांवर सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे दीर्घकाळ रखडलेल्या या प्रश्नावर सर्वमान्य तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. यावेळी प्रकाश बेलवाडे यांनी, “माझा विरोध बसस्थानकाला नाही; होणाऱ्या भ्रष्टाचाराला आहे,” अशी स्पष्ट भूमिका मांडली.
उत्तूरसाठी ५० बेडचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करावे, तसेच बसस्थानकासाठी ग्रामपंचायतीने दिलेल्या जागेच्या मोबदल्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने व्यावसायिक गाळे उभारून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे ग्रामपंचायतीला भविष्यात कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.
सरपंच किरण आमणगी यांनी बसस्थानकासाठी सुरुवातीला मंजूर झालेला सुमारे ४ कोटी रुपयांचा निधी विविध मागण्यांनंतर २.८३ कोटी रुपयांपर्यंत कमी झाल्याची माहिती देत, हा प्रश्न अधिक न लांबविता सर्वांनी एकत्रितपणे मार्ग काढण्याची गरज व्यक्त केली. बैठकीस सरपंच किरण आमणगी, ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, संदेश रायकर आदी उपस्थित होते.

आजचे पंचांग
दिनांक : २ ऑगस्ट २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : चतुर्थी तिथी (रात्री ११.१५ पर्यंत) त्यानंतर पंचमी तिथी
नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा नक्षत्र (रात्री ०९.३६ पर्यंत) त्यानंतर उत्तराभाद्रपदा नक्षत्र
योग : अतिगण्ड योग (रात्री १०.२९ पर्यंत) त्यानंतर सुकर्मा योग
करण : भाव करण (सकाळी ११.१४ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : कुंभ राशी (दुपारी ०३.२६ पर्यंत) त्यानंतर मीन राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०५.३६ ते सायंकाळी ०७.१३ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१९ ते दुपारी ०१.११
सूर्योदय : सकाळी ०६.१७
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१३
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत



