बुधवार
२९ जुलै २०२६


रुग्णांना फळे व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटून कै. वैष्णवीचा वाढदिवस साजरा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
एप्रिल महिन्यात भिंत अंगावर पडून अपघाती मृत्यू झालेल्या वैष्णवी तुकाराम/उत्तम भोसले या शालेय विद्यार्थिनीच्या स्मृती प्रित्यर्थ तिचा वाढदिवस रुग्णांना फळे व विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला.
भोसले कुटुंबीयांच्या वतीने आजरा ग्रामीण रुग्णालयामध्ये माजी नगरसेवक बाळ केसरकर, पत्रकार ज्योतिप्रसाद सावंत, तुफेल आगा, मिलिंद गुरव, बाळासाहेब पाचवडेकर सचिन भोसले कुणाल भोसले राजू मेत्रे आर्यन भोसले ताहीर लमतुरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते फळ वाटप व येथील शासकीय वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
विविध उपक्रमातून वैष्णवीच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केला जाईल असे यावेळी गौतम भोसले यांनी स्पष्ट केले.
यावेळी गौतम भोसले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना वैष्णवीच्या स्मृती प्रित्यर्थ शिष्यवृत्ती जाहीर केली.

विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजाराला कंटाळून दोन दिवसापूर्वी प्राशन केलेल्या सौ.नयना योगेश देसाई ( वय ३५ वर्षे, रा. सुतार गल्ली, आजरा ) या विवाहितेचा गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नयना या मानसिक त्रासाने आजारी होत्या. आजाराला कंटाळून त्यांनी दोन दिवसापूर्वी कीटकनाशक प्राशन केले होते. आजरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांच्यावर गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा काल मंगळवारी मृत्यू झाला असे गडहिंग्लज पोलिसांनी सांगितले.
त्यांच्या पश्चात पती, दीर, सासू असा परिवार आहे.

जलजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून सूचना

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत या काळात जलजन्य रोगांचा गॅस्ट्रो, टायफॉइड काविळ प्रसार होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन प्राथमिक आरोग्य केंद्र,वाटंगी उपकेंद्र, पारेवाडी यांचे मार्फत शहरातील सर्व उपहारगृहे हॉटेल्स या ठिकाणी आरोग्य विषयक स्वच्छते विषयक सुचना देण्यात आल्या.
पाणी शुद्धीकरण करण्यासाठी मेडिक्लोर चे वाटप करण्यात आले यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आरती गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्र पारेवाडी येथील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

रोझरी शिक्षण संकुलात पालक सन्मान दिन साजरा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रोझरी हायस्कूलमध्ये पालक सन्मान दिल उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून फादर वॉल्विन फर्नांडिस उपस्थित होते. ते म्हणाले, ” विद्यार्थ्यांत संस्कार, मूल्ये आणि आदर निर्माण होण्यास पालकांची भूमिका मोठी असून यातूनच भविष्याची घडवणं होत असते.”तसेच शाळा मुख्याध्यापक मनवेल बार्देसकर यांनी “मातृदेव, भव:,पितृदेव भव:, गुरु देव भव: यांचे जीवनातील स्थान व्यक्त करत असताना उपस्थित पालकांचे आभार व्यक्त केले.”
या कार्यक्रमास पर्यवेक्षक श्री विजय केसरकर , सर्व शिक्षक वृंद ,शाळा समिती सदस्य, पालक वर्ग या मोठ्या संख्येने उपस्थित होते याच कार्यक्रमात विविध स्पर्धा परीक्षेत सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले .
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मॅनेजर मेल्विन पायस , स्टीफन डिसोजा ,सौ. शैलजा कांबळे, स्टीफन फर्नांडिस यांनी विशेष परिश्रम घेतले. तर आभार सौ सांचीझ डिसोझा यांनी मानले.

पाऊस पाणी…

आजरा तालुक्यामध्ये पावसाचा जोर कायम असून या पावसामुळे प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. चित्री प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून पावसामुळे मेढेवाडी येथील गोपाल चंद्रु दळवी यांचा गोठा कोसळून मोठे नुकसान झाले आहे.

निवड…

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुमेवाडीच्या अध्यक्षपदी करण बेलकर व उपाध्यक्षपदी आदित्य काटे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारणीमध्ये सचिव सार्थक परीट, खजिनदार दशरथ सावेकर, कार्याध्यक्ष किरण पाटील आदींचा समावेश आहे.

आजचे पंचांग
दिनांक : २९ जुलै २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : पौर्णिमा तिथी (रात्री ०८.०५ पर्यंत) त्यानंतर प्रथम तिथी
नक्षत्र : उत्तराषाढा नक्षत्र (दुपारी ०३.३६ पर्यंत) त्यानंतर श्रवण नक्षत्र
योग : प्रीति योग (रात्री ११.५७ पर्यंत) त्यानंतर आयुष्मान योग
करण : विस्ती भद्रा करण (सकाळी ०७.१४ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : मकर राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.४५ ते दुपारी ०२.२२ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.१५
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१४
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
निधन वार्ता
सदाशिव गुरव

साळगाव तालुका आजरा येथील सदाशिव नारायण गुरव ( वय ५६ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, मुलगा, सून, विवाहित दोन मुली असा परिवार आहे.


