mrityunjaymahanews
अन्य

रविवार -सातच्या बातम्या

रविवार 

१९ जुलै २०२६

तरुणाची आत्महत्या…

विषारी औषध केले होते प्राशन


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

दोन दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केलेल्या नितीन शिवाजी कुंभार या कुंभार गल्ली येथील ३५ वर्षीय तरुणाचा गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात शनिवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी…

येथील स्थानिक पतसंस्थेत काम करणाऱ्या नितीन याने गुरुवारी दुपारी कीटकनाशक सदृश्य विषारी औषध प्राशन केले. त्याच्यावर आजरा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले व त्यानंतर पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विषारी औषध प्राशन करण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही.

नितीन याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

पावसाचा जोर वाढला…
सर्फनाला प्रकल्प पूर्ण क्षमतेकडे


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यात गेले दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली असून बळीराजा रोप लावणी मध्ये व्यस्त दिसत आहे तर तालुक्यातील प्रमुख प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढत असून सर्फनाला प्रकल्प पूर्ण क्षमतेने ९६+% भरत आला आहे.

दहा-बारा दिवसांच्या पूर्ण विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एक वेळ जोरदार हजेरी लावल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असणारा बळीराजा सुखावला आहे. पाण्याअभावी लांबणीवर पडलेली रोप लावणीची कामे वेगावली असून शेतकरी वर्ग दिवसभर शेतामध्ये दिसू लागला आहे.

चित्री, उचंगी, आंबे ओहोळ व सर्फनाला प्रकल्पामध्ये झपाट्याने पाणीसाठा वाढू लागले आहे. सर्फनाला प्रकल्पातून कोणत्याही क्षणी सांडव्यावरून पाणी खाली येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तूरच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, आश्वासनांनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूरच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी ‘ मृत्युंजय महान्यूज ‘ ने हा प्रश्न ठळकपणे मांडला होता. वृत्त प्रसिद्ध होताच पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतीने तातडीने घटनास्थळी पाहणी केली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासनही दिले. त्यावेळी या प्रश्नावर सकारात्मक हालचाली होण्याची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, कालांतराने हा विषय पुन्हा मागे पडला आणि वाहतूक कोंडीची समस्या आजही तशीच कायम आहे.

उत्तूर हे परिसरातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असल्याने मुख्य रस्त्यावर दिवसातील बहुतांश वेळ वाहनांची वर्दळ असते. सकाळी आणि सायंकाळी ही वर्दळ अधिक वाढते. बाजारपेठेकडे येणारी-जाणारी वाहने, मालवाहतूक करणारे ट्रक व इतर वाहने, यामुळे मुख्य रस्त्यावर वारंवार कोंडी निर्माण होते. परिणामी, काही मिनिटांचा प्रवासही अनेकदा वेळखाऊ ठरतो.

मुख्य रस्त्यावरील अनियमित पार्किंग, रस्त्यावर होणारी अतिक्रमणे, वाहतूक नियोजनाचा अभाव यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, अतिक्रमणांवर कारवाई आणि गर्दीच्या वेळेत पोलीस बंदोबस्त वाढविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.याच वेळेत शाळकरी विद्यार्थीही शाळेत ये-जा करत असतात. वाहतुकीचे प्रभावी नियोजन नसल्याने मुख्य रस्ता ओलांडताना अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागते. व्यापारी केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या गावात वाहतुकीचे शास्त्रीय नियोजन ही आता गरज नसून अपरिहार्यता बनली आहे.

 महिन्यांपूर्वी चर्चेत आलेला हा प्रश्न आजही त्याच कायम  असणे हे स्थानिक लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासनाचे अपयश म्हणावे लागेल.  उत्तूरच्या वाढत्या व्यापारी आणि शैक्षणिक महत्त्वाचा विचार करता, मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचे कायमस्वरूपी नियोजन, पार्किंग व्यवस्था, अतिक्रमणांवर नियंत्रण आणि गर्दीच्या वेळेत प्रभावी वाहतूक व्यवस्थापन याबाबत संबंधित यंत्रणांनी तातडीने निर्णय घेण्याची  निर्माण झाली आहे.

साळगाव येथे वृक्षदिंडी, विविध जातीच्या रोपांचे वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

साळगाव (ता. आजरा) येथे साळगाव ग्रामपंचायत व सरपंच परिषद, मुंबई महाराष्ट्र शाखा आजरा यांच्यावतीने साळगाव येथे वृक्षदिंडी काढण्यात आली. साळगाव विद्यामंदिरचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी ग्रामस्थांना विविध स्थानिक प्रजातीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

सरपंच धनंजय पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सरपंच परिषदेचे राज्य सदस्य राजू पोतनीस, जिल्हा अध्यक्ष जी. एम. पाटील, सरपंच परिषदेच्या महीला तालुका अध्यक्ष वनश्री देसाई, हरीतक्रांती बचतगटाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील प्रमुख उपस्थित होते.

समन्वयक महादेव निऊंगरे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात म्हणाले, वातावरण बदलाचा मोठा परिणाम जीवसृष्टीवर होत आहे. वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. जी. एम. पाटील म्हणाले, पर्यावरणाचा जगासमोर ज्वलंत प्रश्न तयार झाला आहे. वातावरण बदलाचे फटके पृथ्वीबरोबर शेतीला बसत आहेत. पाऊसमान बदलले आहे. अशावेळी वृक्षारोपण करून स्थानिक प्रजातीची झाडे लावणे गरजेचे आहे. साळगाव येथील वृक्षारोपणाचा कार्यक्रम तालुक्याला दिशा देईल. रामचंद्र माडभगत, शाळा समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव जाधव, प्रगतशील शेतकरी विलास दोरुगडे, मधुकर गुरव, बाळू केसरकर, श्रीधर जाधव, माजी कृषी सहाय्यक पांडुरंग वेंगरुळकर, शिवाजी कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

व्यंकटराव मध्ये एस.एस.सी. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

व्यंकटराव हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मधील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.

एसएससी मार्च २०२६, शिष्यवृत्ती परीक्षा, एन एम एम एस परीक्षा अशा विविध स्तरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पाडला. “बहुजनांच्या शाळेतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे” असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष व आजरा महाल शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष श्री.के.जी. पटेकर यांनी काढले.

प्राचार्य संजयकुमार पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करून शाळेच्या गौरवशाली इतिहासाची परंपरा अबाधित ठेवण्याचे आवाहन केले.

भगवान पाटील (प्रथम क्रमांक,) जुवेरीया समीर शेख( द्वितीय क्रमांक) सिमरन भिकाजी पाटील (तृतीय क्रमांक) शलाका ओमकार गिरी (चतुर्थ क्रमांक) साक्षी शिवाजी राणे (पाचवा क्रमांक,) तसेच प्रेम रमेश येसणे या एसएससी परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सत्कार करणेत आला.  पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता पात्र विद्यार्थी स्वरा मोटे,शोर्य आजगेकर, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा व एन एम एम एस परीक्षा वेदांग शिंदे, गझल मुल्ला, सिद्धी होरटे, तनिष्क देसाई या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

 खादिजा मुल्ला, गतिमा अडकूरकर, संदेश देसाई, सिद्धेश गुरव, मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. माजी शिक्षक व दाते श्री ए.के पावले, श्री एस जी इंजल यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्री रामदास होरटे व आभार सौ.ए.डी. पाटील यांनी मानले.

कार्यक्रमासाठी आजरा महाल शिक्षण मंडळाचे संचालक श्री. सचिन शिंपी, श्री. सुधीर जाधव, श्री. पांडुरंग जाधव, श्री. विलास पाटील, दाते व हितचिंतक आदम इंचनाळकर माजी शिक्षक श्री. जी.बी.ढेकळे उपस्थित होते.

निधन वार्ता
सोपान परीट

यरंडोळ ता. आजरा येथील श्री. सोपान रुकमाना परीट (वय ६८ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, असा परिवार आहे.

तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक स्व. धोंडीबा परीट यांचे ते भाऊ होत. रविवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


फोटो क्लिक…

घाटकरवाडी येथे हत्ती संगोपन केंद्र होणार आहे. कदाचित त्याचीच पहाणी करण्यासाठी हत्ती घाटकरवाडी परिसरात पोहोचला असावा.


वाहतुकीची शिस्त  आणि आजरेकरांचा काय संबंध…? आम्ही आमच्या पद्धतीनेच वागणार… गाड्या रस्त्यातच थांबवणार. मग रुग्णवाहिका येऊ देत नाहीतर शववाहीका… असे तर संबंधितांना म्हणायचे नसेल…?

आजचे पंचांग

दिनांक : १९ जुलै २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : षष्ठी तिथी ( २० जुलै रात्री ०३.२९ पर्यंत) त्यानंतर सप्तमी तिथी
नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी नक्षत्र (सायंकाळी ०६.११ पर्यंत) त्यानंतर हस्त नक्षत्र
योग : परिघ योग (रात्री ०७.२२ पर्यंत) त्यानंतर शिवा योग
करण : कौलव करण (दुपारी ०३.३० पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : कन्या राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०५.३९ ते सायंकाळी ०७.१८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१९ ते दुपारी ०१.११
सूर्योदय : सकाळी ०६.१२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

विशेष सूचना

बऱ्याच वेळा ‘ मृत्युंजय महान्यूज’ ची लिंक ओपन होत नाही अशा तक्रारी वाढलेल्या आहेत. लिंक ओपन करताना वायफाय वर ओपन न करता ती मोबाईल नेटवर्क सुरू करून ओपन केल्यास लवकर बातम्या पहावयास मिळतात.

कांही वेळा ट्राफिक जाममुळे लिंक लवकर ओपन होत नाही. थोडा वेळ थांबून लिंक ओपन करावी. काही तांत्रिक अडचणी सुरू आहेत. आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत.

....मुख्य संपादक

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

यरंडोळ येथील तरुणाची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!