mrityunjaymahanews
अन्य

गुरूवार – सातच्या बातम्या

गुरूवार 

१६ जुलै २०२६

अस्मिताला न्याय द्या…
तालुकावासिय आज
एकवटणार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील लाटगाव येथील सौ. अस्मिता काटकर या नवविवाहितेचा कोल्हापूर येथे सासरी संशयास्पद मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यातून संताप व्यक्त होत असून या प्रकरणी तिच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या सासरच्या मंडळींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आजरा तालुकावासीय आज गुरुवारी सकाळी १० वाजता एकत्र येऊन आजरा तहसीलदारांना निवेदन देणार आहेत.

सौ.अस्मिता हिने रविवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अस्मिताच्या पालकांनी संशय व्यक्त केल्यानंतर पती प्रतीक विरेंद्रसिंह काटकर, सासू मनीषा वीरेंद्रसिंह काटकर, सासरे विरेंद्रसिंह काटकर व नणंद ऋतुजा काटकर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे. मुलीच्या जन्मामुळे सासरच्या लोकांकडून दिले जाणारे टोमणे वारंवार होणारा मानसिक छळ अशा विविध कारणामुळे अस्मिताने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे.

याबाबत आजरा तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणाचा सीबीआय मार्फत तपास व्हावा व फास्टट्रॅक कोर्टामध्ये तातडीने सुनावणी होऊन आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे. 

२१ जुलै रोजी नगरपंचायतीसमोर भजन व ढोल-ताशासह आंदोलनाचा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

अन्याय निवारण समितीच्या वतीने प्रभाग क्र. १५ व ११ मधील प्रलंबित नागरी सुविधांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करणारे निवेदन आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

निवेदनात भाई-भाई टॉकीज ते शिवकॉलनी आणि चाफे गल्ली ते सरकारी दवाखाना रस्त्यावरील खड्डे बुजविणे, मंजिरी परिसरातील बंद स्ट्रीट लाईट सुरू करणे, चराटी कॉलनी–आपटे कॉलनी येथील मुख्य पाणीपुरवठा लाईन बदलणे, शुद्ध पाणी, नवीन स्ट्रीट व सोलर लाईट, रुक्मिणी कॉलनीतील अंतर्गत रस्ते, चर्च गल्लीतील विहिरीजवळ पेव्हींग ब्लॉक, रामदेव गल्लीतील रामाची विहीर स्वच्छ करणे, विरंगुळा केंद्राचे दोन गाळे देणे, जोशी गल्लीतील मंजूर रस्त्याचे काम सुरू करणे आणि गटारीतील गाळ २४ तासांत उचलणे यांसह मागण्या केल्या आहेत.

सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर शांततापूर्ण “भजन व ढोल-ताशा वाद्य, भारतीय बैठक” आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

निवेदनावर नगरसेवक तथा अध्यक्ष श्री. परशुराम बामणे, नगरसेविका डॉ. सौ. स्मिता कुभांर, श्री. गौरव देशपांडे, श्री. पांडुरंग सावरतकर, श्री. जावेद पठाण, श्री. बंडोपंत चव्हाण, श्री. संजय जोशी, श्री. जोतिबा आजगेकर, श्री. मिनीन डिसोझा, श्री. रामचंद्र पंडीत, श्री. सईद पेंटर, श्री. संतोष बांदिवडेकर आणि श्री. अभिजित परीट यांच्या सहया आहेत.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन महागावकर


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भाजपा नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. नाथाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदी हर्षवर्धन महागावकर यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र कोल्हापूर येथे नुकतेच देण्यात आले.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संयोजक विक्रम पावसकर, ग्रामविकास व पंचायतराज विभाग जिल्हा उपाध्यक्ष जयवंत सुतार, जिल्हा अध्यक्ष भाजयुमो रवीशजी पाटील तसेच राहूल चिकोडे, विजय जाधव आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी शिस्तीसह गुणवत्ता वाढवावी – प्राचार्य डॉ. किरण पोतदार


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा महाविद्यालयाच्या व्यावसायिक विभागातील अकरावीच्या नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी प्राचार्य प्रो. डॉ. के. जी. पोतदार म्हणाले, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची शिस्त पाळून कौशल्याधारीत शिक्षण व विविध उपक्रमात सहभाग घेऊन गुणवत्ता वाढवावी. पर्यवेक्षक मनोजकुमार पाटील यांनी व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व सांगितले. अधीक्षक योगेश पाटील यांनी कौशल्य विकास व व्यक्तिमत्व विकासावर भर दिला.

उपप्राचार्य डी. पी. संकपाळ यांनी मिळालेल्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
नवागत विद्यार्थ्यांचे सदाशिव मोरे यांनी स्वागत केले.

सलोनी कांबळे, श्रेयश डोंगरे, सिद्धी ठाकूर* यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कौशल्यावर आधारित फनीगेम्स घेण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन संदीप देसाई, नेहा पेडणेकर, सुषमा नलवडे, पल्लवी नार्वेकर, तेजस्विनी जाधव, गिरीष कुरुणकर यांनी केले. सूत्रसंचालन गौरी बागडी यांनी केले तर आभार ऋतुजा नाईक यांनी मानले.

आजरा शहर एकसंघ व्यापारी मंडळातर्फे पंढरपूर पायी वारीतील वारकऱ्यांना भोजन शिधा व प्रथमोपचार पेटीचे वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आस धरून गोवा राज्यातील डिचोली येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या पायदळी वारीतील वारकरी भाविकांचे आजरा शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने स्वागत करण्यात आले.
या पायी वारीतील वारकरी भक्तांच्या प्रवासातील सोय लक्षात घेऊन, ‘आजरा शहर एकसंघ व्यापारी मंडळ’ यांच्या वतीने एका विशेष सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वारीतील वारकऱ्यांना प्रवासात भोजन बनवण्यासाठी आवश्यक असणारा संपूर्ण भोजन शिधा (धान्य व किराणा माल) आणि प्रवासादरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ‘प्रथमोपचार पेटी’ (First Aid Box) भेट देण्यात आली.

याप्रसंगी आजरा शहर एकसंघ व्यापारी मंडळाचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष महेश नार्वेकर, खजिनदार संजय हरेर , सचिन इंदुलकर, श्रीपाद कुलकर्णी, मनोज गुंजाटी, मल्लिकार्जुन तेरणी, मुन्ना लमतुरे, राजेश विभुते, बाळासाहेब पाचवडेकर, अभिजीत इंजल, गौरव देशपांडे, भास्कर बूरुड, विनायक अमनगी, सतीश कुरुणकर स्थानिक व्यापारी बांधव, आणि डिचोली वारीतील वारकरी व मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छाया वृत्त

पंडित दीनदयाळ विद्यालयाचा दहावी परीक्षेत शंभर टक्के निकाल लागण्याबरोबरच कुमारी खतिजा मुल्ला हिने गणित व विज्ञान विषयांमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवल्याबद्दल विषय शिक्षकांसह खतिजा हिचा आजरा हायस्कूल येथे पार पडलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमांमध्ये विशेष गौरव करण्यात आला.

निधन वार्ता
सौ.रुक्मिणी टकेकर

पेरणोली ता. आजरा येथील सौ. रुक्मिणी पांडुरंग टकेकर (वय ८० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, तिन विवाहित मुली, पती, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

आजचे पंचांग

दिनांक : १६ जुलै २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : द्वितीया तिथी (सकाळी ०८.५२ पर्यंत) त्यानंतर तृतीया तिथी
नक्षत्र : आश्लेषा नक्षत्र (रात्री ०७.५१ पर्यंत) त्यानंतर मघा नक्षत्र
योग : सिद्धि योग (१७ जुलै रात्री ०१.२१ पर्यंत) त्यानंतर व्यातीपात योग
करण : कौलव करण (सकाळी ०८.५२ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : कर्क राशी (रात्री ०७.५१ पर्यंत) त्यानंतर सिंह राशी
सूर्य राशी : मिथुन राशी (रात्री ११.३७ पर्यंत) त्यानंतर कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.२३ ते सायंकाळी ०४.०१ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१८ ते दुपारी ०१.११
सूर्योदय : सकाळी ०६.११
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

विशेष सूचना

बऱ्याच वेळा ‘ मृत्युंजय महान्यूज’ ची लिंक ओपन होत नाही अशा तक्रारी वाढलेल्या आहेत. लिंक ओपन करताना वायफाय वर ओपन न करता ती मोबाईल नेटवर्क सुरू करून ओपन केल्यास लवकर बातम्या पहावयास मिळतात.

कांही वेळा ट्राफिक जाममुळे लिंक लवकर ओपन होत नाही. थोडा वेळ थांबून लिंक ओपन करावी. काही तांत्रिक अडचणी सुरू आहेत. आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत.

….मुख्य संपादक

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादी आजरा कारखान्याच्या रिंगणातून बाहेर…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!