mrityunjaymahanews
अन्य

, शुक्रवार सातच्या बातम्या

गुरूवार 

२६ जून २०२६

तरुणी बेपत्ता…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

धामणे तालुका आजरा येथील एक १९ वर्षीय तरुणी उत्तुर बस स्थानकावरून बेपत्ता झाल्याची वर्दी तरुणीच्या पालकांनी आजरा पोलिसातील आहे.

संबंधित तरुणी उत्तूर बसस्थानकावरून बेपत्ता झाली असून दिनांक २४ जून रोजी उत्तुर बस स्थानकावर आढळून आली होती. त्यानंतर ती अद्याप परतलेली नाही असे तिच्या पालकांनी वर्दीत म्हटले आहे.

पुढील तपास हवालदार कांबळे करीत आहेत.

उत्तूर बसस्थानक रखडले, नेत्यांच्या मौनासह, ठेकेदाराची भूमिकाही अस्पष्ट

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

एक वर्षांपूर्वी बसस्थानकासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर उत्तूरकरांना लवकरच सुसज्ज बसस्थानक मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र आजही काम रखडलेले असून या संपूर्ण प्रकरणात स्थानिक सर्वपक्षीय नेते, संबंधित विभाग आणि ठेकेदार यांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. बसस्थानकाच्या कामासंदर्भात तक्रारदाराने माहितीच्या अधिकाराखाली विविध माहिती मागवून कामावर स्थगिती आणली. त्यानंतर हा विषय अधिक गुंतागुंतीचा बनला. मात्र या संपूर्ण कालावधीत कोणत्याही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेत तक्रारदाराशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला नाही. तक्रारी नेमक्या कोणत्या आहेत? त्यांचे निराकरण कसे करता येईल? काम पुन्हा सुरू करण्यासाठी कोणती पावले उचलावीत याबाबतही कोणती ठोस भूमिका जनतेसमोर मांडण्यात आलेली नाही.

नागरिकांच्या मते, केवळ निधी मंजूर करून आणल्याचे श्रेय घेण्यापलीकडे संबंधित लोकप्रतिनिधींकडून कोणतीही हालचाल दिसून आलेली नाही. बसस्थानकाचे काम थांबल्यानंतर अनेक वेळा नागरिकांनी पाठपुरावा केला, प्रश्न उपस्थित केले,मात्र नेत्यांकडून ठोस उत्तर मिळाले नाही. तक्रारदार आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून तोडगा काढण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींनी स्वीकारणे अपेक्षित होते, परंतु तसे प्रयत्न कधीच झाले नाहीत.
विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीने या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली. बसस्थानकासाठी ग्रामपंचायतीकडून कोणताही अडथळा निर्माण झालेला नसून, आवश्यक ती सर्व मदत करण्याची तयारी असल्याचे सरपंच किरण आमणगी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बसस्थानक रखडण्यामागे ग्रामपंचायत कारणीभूत असल्याच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.

निवडणुकीच्या काळात जनतेसमोर येणारे नेते आता बसस्थानकाच्या प्रश्नावर का बोलत नाहीत? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. बसस्थानकाचा प्रश्न केवळ निधी मंजूर करण्यापुरता नसून तो पूर्णत्वास नेण्याची नैतिक जबाबदारीही लोकप्रतिनिधींची असल्याचे नागरिकांचे मत आहे.

विशेष बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणात संबंधित ठेकेदाराची नेमकी भूमिका काय आहे? याबाबतही कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. काम थांबल्यानंतर ठेकेदाराने कोणती भूमिका घेतली?काम पुन्हा सुरू करण्यासाठी कोणते प्रयत्न केले, संबंधित विभागाशी कोणता पाठपुरावा केला किंवा अडचणींबाबत जनतेसमोर कोणते स्पष्टीकरण दिले, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उत्तूरसारख्या मध्यवर्ती गावाच्या विकासासाठी महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प रखडलेला असताना सर्वपक्षीय नेत्यांनी मौन सोडून एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, तक्रारदार, प्रशासन आणि संबंधित विभाग यांच्यात समन्वय साधून प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी आता ग्रामस्थांमधून होत आहे.

उत्तूर बसस्थानक प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

▪️चार कोटींचा निधी मंजूर होऊनही काम ठप्प.
▪️तक्रारदाराशी संवाद साधण्यातही लोकप्रतिनिधी अपयशी?

वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राची जनजागृती मोहीम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आरोग्य विभागामार्फत १ जून ते ३० जून हा कालावधी हिवताप जनजागरण महिना म्हणून साजरा करण्यात येत असून या अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी यांच्या वतीने हिवताप प्रतिबंध व नियंत्रणासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

हिवतापाची लक्षणे, आजाराचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वेळेवर निदानाचे महत्त्व याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

मोहिमेदरम्यान साचलेले पाणी नष्ट करणे, पाण्याच्या टाक्या व भांडी झाकून ठेवणे, घर व परिसर स्वच्छ ठेवणे, मच्छरदाणीचा वापर करणे तसेच आठवड्यातून एक दिवस ‘ड्राय डे’ पाळणे याबाबत जनजागृती करण्यात आली. ताप, थंडी वाजणे, घाम येणे, डोकेदुखी अथवा अशक्तपणा यांसारखी लक्षणे आढळल्यास तात्काळ रक्त तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले.

सदर मोहीम तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. ए. शेख आरोग्य निरीक्षक अतुल पाथरवट, आरोग्य सहाय्यक जे. एच. साबखान, आरोग्य सहायिका रंजना गावडे तसेच आरोग्य सेवक युनुस सय्यद, दर्शन भालेराव, दिपक हरणे, लक्ष्मण घोरपडे व रोहित शेंडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

आजरा महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा महाविद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान वर्गाचा पालक मेळावा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. के. जी. पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

स्वागत व प्रस्ताविक प्रा. आर. एस. विभुते यांनी केले. पालक मेळाव्याला मार्गदर्शन करताना डॉ.ए. एस.वर्धन यांनी महाविद्यालयात सुरू केलेल्या अण्णाभाऊ करिअर अकॅडमीचे माहिती पालकांना करून दिली. यामध्ये लेखी व शारीरिक परीक्षेची तयारी करून घेण्यात येईल या संदर्भात पालकांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी. पी. संकपाळ यांनी मार्गदर्शन करताना बोर्ड परीक्षेच्या तयारी संदर्भात वर्षभराचे नियोजन विद्यार्थी पालकांनी विद्यार्थी हित लक्षात घेऊन करावे. कॉपीमुक्त अभियाना विषयी माहिती दिली. तसेच महाविद्यालयात सुरू असलेल्या एमएचटी-सीईटी वर्गाचे मार्गदर्शनाविषयी पालकांना माहिती देण्यात आली .

अध्यक्षीय मनोगतात डॉ.के. जी. पोतदार यांनी विद्यार्थ्यांचे करिअर निवडताना विद्यार्थी व पालक यांच्या सुसंवाद होणे गरजेचे आहे तसेच इंजिनीयर व डॉक्टर व्यतिरिक्त इतरही अनेक क्षेत्रात करिअर करता येते असे सांगितले.

कार्यक्रमासाठी कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, प्रा. व्ही. जी. चव्हाण व इतर सर्व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक एस.एस. कुलकर्णी यांनी केले तर प्रा. एस. यु .सरदेसाई यांनी आभार मानले

कानोलीत राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत भुईमूग बियाणे वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

कानोली ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रीय खाद्यतेल अभियान २०२६-२७ अंतर्गत भुईमूग प्रमाणित बियाणे वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.

सरपंच सौ. सुषमा सुभाष पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी योगेश जगताप यांनी भुईमूग पिकाच्या आधुनिक लागवड तंत्रज्ञानावर सविस्तर मार्गदर्शन केले.राष्ट्रीय खाद्यतेल अभियानाचा मुख्य उद्देश तेलबिया उत्पादन वाढवून खाद्यतेलातील आयात कमी करणे हा आहे. भुईमूग हे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख तेलबिया पीक असल्याने या वाटपाला महत्त्व आहे असे त्यांनी सांगितले.

त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. या कार्यक्रमाला कानोली परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो क्लिक

तोच रस्ता… तोच पाऊस… तीच समस्या…

स्थळ : राईस मिल शेजारी गांधीनगर रोड

आजचे पंचांग 

दिनांक : २६ जून २०२६
वार : शुक्रवार

माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : द्वादशी (रात्री १०.२२ पर्यंत) त्यानंतर त्रयोदशी तिथी
नक्षत्र : विशाखा नक्षत्र (सायंकाळी ०७.१५ पर्यंत) त्यानंतर अनुराधा नक्षत्र
योग : सिद्ध योग (सकाळी ११.३८ पर्यंत) त्यानंतर साध्य योग
करण : भाव करण (सकाळी ०९.१४ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : तुळ राशी (दुपारी १२.३२ पर्यंत) त्यानंतर वृश्चिक राशी
सूर्य राशी : मिथुन राशी

अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ११.०२ ते दुपारी १२.४१ पर्यंत

शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१५ ते दुपारी ०१.०८

सूर्योदय : सकाळी ०६.०४
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१८

संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गणेशमूर्ती सांभाळण्याच्या नादात एकाचा मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!