रविवार
२० जून २०२६

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मूल्यमापन पडताळणी समितीची सोहाळे-बाची ग्रामपंचायतीस भेट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींच्या कामकाजाचे मूल्यमापन व पडताळणी करण्यासाठी नियुक्त समितीने ग्रामपंचायत मौजे सोहाळे-बाची येथे भेट दिली.
यावेळी समितीमध्ये श्रीमती दीपाली पाटील (डेप्युटी सीईओ, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, पुणे), श्री. सकलेन मुल्लानी (ABDO, जिल्हा परिषद रायगड), श्री. रवींद्र मठकरी (विस्तार अधिकारी) तसेच श्री. बी. टी. कुंभार (विस्तार अधिकारी, आजरा) यांचा समावेश होता.
समितीने ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची, प्रशासकीय नोंदींची, स्वच्छता, पाणीपुरवठा, कर वसुली, डिजिटल सेवा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची सविस्तर पाहणी केली. ग्रामपंचायतीने केलेल्या विकासकामांची माहिती समितीसमोर सादर करण्यात आली.
यावेळी सरपंच सौ. भारती कृष्णा डेळेकर, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी श्री. रणदिवे, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, रोजगार सेवक, सीआरपी (CRP) तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी समितीचे स्वागत करून ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची व उपक्रमांची माहिती दिली.
समितीने ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले. तसेच ग्रामपंचायतीने लोकसहभागातून राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या प्रयत्नांची यावेळी दखल घेण्यात आली.

‘ नालंदा ‘ कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिक्षण हा समाज परिवर्तनाचा सर्वात प्रभावी मार्ग असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे, या उदात्त हेतूने विद्यामंदिर, बोलकेवाडी येथे नालंदा प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
नालंदा प्रतिष्ठानचे संस्थापक कै. रवि शेंडे (शिक्षक नेते) यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थ, पालक, शिक्षक व मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती उपसभापती सौ. यशोदा युवराज पोवार होत्या.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, निवृत्ती शेंडे, सुरेश बोलके, शंकर शेंडे, ॲड. रोहिणी शेंडे, मुख्याध्यापिका मीना खाडे, सहाय्यक शिक्षक मारुती पाटील, उमाजी कुंभार, सरपंच विलास जोशीलकर, ग्रामपंचायत सदस्य सरिता बोलके, अमर डोंगरे, सतीश बोलके, पांडुरंग बोलके, लहू सुतार, किशोर कातकर, परशराम रेडेकर, नीता बोलके तसेच नालंदा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते विघ्नेश शेंडे, प्रतीक बोलके, अभय कांबळे, स्वप्नील शेंडे उपस्थीत होते.

जिल्हा बँकेकडून मृत शेतकऱ्यास आर्थिक मदत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मेढेवाडी येथील शेतकरी श्रावण दळवी याचे अपघाती निधन झाले होते. त्याच्या पत्नी संगीता श्रावण दळवी यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून अपघाती विमा योजनेतून आर्थिक मदत म्हणून दोन लाखाचा चेक संचालक सुधीर देसाई यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी बँकेचे अधीकारी व मेढेवाडी गावा मधील नागरिक नाना पाटील, प्रमोद पाटील, अविनाश हेब्बाळकर, शंकर सुतार, जयसिंग पाटकर उपस्थित होते.

अखेर नागझरी परिसर प्रकाशमान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
तब्बल पाच वर्षांनी काल शनिवारी रात्री सात वाजता नागझरी परिसरातील आठ पोल वरील बल्ब चालू करण्यात आले. संपूर्ण परिसर प्रकाशमान झाला. या भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
स्थानिक नगरसेविका पूनम लिचम व नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांचा पाठपुरावा व सकारात्मक भूमिकेमुळे नागझरीवर प्रकाश पडला.
या मार्गावरून जाणाऱ्या चाफे गल्लीतील नागरिकांसह परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले आहे.
नागरिकांनी प्रश्न मांडून व ‘मृत्युंजय महान्यूज’ मधून बातमी प्रसिद्ध केली होती. याची गांभीर्याने दखल घेत तातडीने स्थानिक नगरसेविका सौ. पूनम लीचम यांनी यांनी याबाबत पाठपुरावा सुरू करून अखेर हा भाग प्रकाशमान केला आहे.

पेरणोलीत शाळा शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना बँग वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता. आजरा येथील मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळा शताब्दी महोत्सव समितीच्या वतीने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बँगचे वाटप करण्यात आले.
यावेळी समितीचे सदस्य तानाजी देसाई यांनी मराठी शाळेचा महोत्सव साजरा करण्याचे भाग्य सर्वांना लाभले असून विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी स्कूल बँगेचे वाटप करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी समितीच्या सर्व सदस्यांच्या हस्ते बँगेचे वाटप करण्यात आले.
यावेळी समिती सदस्य काँ. संपत देसाई, राजेंद्र सावंत, उपसरपंच संकेत सावंत, व्यवस्थापन समिती अध्यक्ष अविनाश जोशीलकर, कृष्णा सावंत, सुरेश कालेकर, मारूती वरेकर, अमित सावंत, काका देसाई, नामदेव मोहीते, पवन कालेकर, संदीप पारदे, सुरेखा नाईक, शिवाजी बोलके आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक एकनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. तानाजी पावले यांनी सूत्रसंचालन केले. धनाजी रावण यांनी आभार मानले.

थोडक्यात बातम्या
♦ कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे पंधराशे कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प उभा करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी दिली आहे.
♦ धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा कारचालक समद काजी यांच्या हत्याकांड प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने तब्बल वीस वर्षांनी निकाल देत राज्याचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आठ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
♦ पेपर फुटी आरोपानंतर रद्द करण्यात आलेली नीट परीक्षा आज पुन्हा एक वेळ होत असून कडक सुरक्षा व्यवस्थेत होणाऱ्या या परीक्षेत २२ लाख ७९ हजार विद्यार्थी बसणार आहेत.
♦ छत्रपती संभाजीनगर येथील पाच तरुण गणपतीपुळे येथील समुद्रात अंघोळीसाठी उतरले असताना बुडाले. पैकी प्रेम दीपक आदमाने/१९ याचा मृतदेह सापडला असून आदित्य संतोष राऊत, अनिकेत बंडू हिवराळे, आनंद राजू नरवडे, यश रामेश्वर कांबळे या चौघांचा शोध सुरू आहे.
निधन वार्ता
दाजीबा सासुलकर

पेरणोली ता. आजरा येथील दाजीबा विठू सासुलकर ( वय ७६ वर्ष ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहीत मुले, मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. तुळशीराम सासुलकर यांचे ते वडील होत.
रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी आहे.

आजचे पंचांग
दिनांक : २१ जून २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : सप्तमी (दुपारी ०३.२० पर्यंत) त्यानंतर अष्टमी तिथी
नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी नक्षत्र (सकाळी ०९.३१ पर्यंत) त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र
योग : सिद्धि योग (सकाळी ११.२० पर्यंत) त्यानंतर व्यातीपात योग
करण : वाणीजा करण (दुपारी ०३.२० पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : सिंह राशी (दुपारी ०३.३९ पर्यंत) त्यानंतर कन्या राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०५.३८ ते सायंकाळी ७.१८पर्यंत.
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१४ते दुपारी ०१.०७
सूर्योदय : सकाळी ०६.१३
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत


