मंगळवार २६ मे २०२६


पोलीस बंदोबस्तात पेरणोली येथील अतिक्रमणे हटवली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली तालुका आजरा येथील मुख्य रस्त्यावरील आजरा- गारगोटी मार्गावरील पेरणोली गावातून जाणाऱ्या रस्त्यावर केलेली अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढून घेण्यात आली. यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यामध्ये अतिक्रमण केलेल्या कमानी जवळील अतिक्रमणे स्थानिक ग्रामस्थांच्या दृष्टीने व वाहन चालकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरली होती. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव, युवराज लोंढे यांच्यासह ग्रामस्थांनी आवाज उठवून अतिक्रमणे काढून घेण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला दोन दिवसापूर्वी निवेदनही दिले होते. याचबरोबर पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे कॉंक्रिटीकरण, त्वरित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली होऊन काल अतिक्रमणे हटवण्यात आली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कचरे, कनिष्ठ अभियंता एस.एन. कुंभार, प्रोजेक्ट मॅनेजर कंपनीचे अधिकारी विनय आवसेकर, गणेश मुसळे, रवींद्र देसाई, पोलीस पाटील सौ.दिपाली कांबळे, उपसरपंच संकेत सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्रभाऊ सावंत,संदीप सासुलकर, पांडुरंग दोरुगडे, डॉ.उल्हास त्रिरत्ने, नामदेव मोहिते, सोपान फगरे, भाऊ भोकरे, काका देसाई ,संभाजी कांबळे, आनंदराव कांबळे, नामदेव सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

वेळवट्टी येथे गव्यांकडून काजू झाडांचे नुकसान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वेळवट्टी येथे उंबराचे पाणी नावाच्या शेतातील डॉ.धनाजी राणे यांच्या शेतातील काजू फळपिकांची झाडें रेड्यांच्या कळपाने मोडली आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त दहा ते पंधरा टक्के काजू बिया उत्पादन मिळत असताना
दुसरीकडे मात्र काजू फळपीक झाडांचे गवारेड्यांकडून नुकसान करणे सत्र सुरूच आहे. त्यातच यावर्षी काजू बिया उत्पादन कमी झाले आहे. भरीस भर म्हणून गव्याचा उपद्रव सुरू आहे.
एकीकडे आजरा हा डोंगराळ आणि मागास तालुका असताना तालुक्याचे पश्चिम भागामध्ये जलसिंचन सुविधा अपुरे असताना फक्त काजू उत्पादन व मेसकाटी उत्पादनावर येथील शेतकरी आर्थिक बाबीवर अवलंबून आहे.यावर्षी गवा रेड्यांकडून काजू फळ पिकांचे वारंवार होणारे नुकसान आणि दहा-वीस टक्केच मिळालेल्या काजू बी उत्पादन आणि त्यातच सध्याचा मिळणारा प्रति किलो कमी दर या तिहेरी संकटामध्ये येथील शेतकरी सापडला आहे .

आंबोली घाटात दि बर्निंग कारचा थरार…
जळीत कार गडहिंग्लज येथील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आंबोली येथून जवळच असणाऱ्या घाटातील
मुख्य धबधब्यानजिक गोवा येथे पर्यटनासाठी गेलेल्या गडहिंग्लज येथील अमरनाथ अशोकराव गवळी यांच्या थांबवलेल्या कारने अचानक पेट घेतल्याने कार जळून खाक झाली.
सुदैवाने जेवणासाठी कारमधून उतरलेले सर्व कुटुंबीय बचावले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. बॅटरीचा स्फोट झाल्याने सदर कार जळाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त होत आहे.
सुधीर देसाई यांच्या फंडातून आवंडी येथे विकास कामांचा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद गटनेते सुधीर देसाई जिल्हा परिषदेच्या फंडातून २० लाख रुपयांचा विकास कार्याला शुभारंभ करण्यात आला. यावेळी सुधीर देसाई यांचा सत्कार आवंडी ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आला. सर्वसामान्यांकरिता आपल्या पदाचा वापर केला जाईल असे यावेळी सुधीर देसाई यानी सांगितले.
सदर कार्यक्रम प्रसंगी आजरा पंचायत समिती उपसभापती सौ. यशोदा पोवार, बांधकाम विभागाचे एस. एस.नाईक, वृषाल हुक्केरी ,युवराज पोवार , अभिजीत हुक्केरी, सरपंच बयाजी मिसाळ, माजी सरपंच बाबू ,तुकाराम येडगे,विठ्ठल मिसाळ ,भैरू बाबू गावडे ,गंगाराम बाबू येडगे ,गंगाराम,भैरू गावडे ,रामचंद्र बळीराम गावडे गंगाराम भैरू येडगे, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
व्यंकटराव येथे एच .पी .व्ही. लसीकरण मार्गदर्शन संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी व उपकेंद्र पारेवाडी येथील आरोग्य सेवक दीपक हरणे तसेच आरोग्य सेविका सुचिता यांनी एच. पी .व्ही. लसीकरणासंदर्भात प्रशालेतील शिक्षक शिक्षिका ,पालक व विद्यार्थिनी यांना आयोजित कार्यक्रमांमध्ये सांगितली.
प्रथम प्राचार्य श्री. एम. एम. नागुर्डेकर यांनी आरोग्यसेवकांचे स्वागत केले त्यानंतर आरोग्य सेविका सुचिता मॅडम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भारतामध्ये दर दिवशी कमीत कमी २८ व्यक्ती कॅन्सर सारख्या आजारानी मृत्यूमुखी पडतात. या आजाराविषयी जनजागृती व्हावी आणि काळजी घेणे कामी महाराष्ट्र शासनाने अथवा भारत सरकारने हा आजार होण्याअगोदरच त्याची लस जर वय वर्ष १४ ते १५ या वयोगटातील शालेय मुलींना दिली तर त्यांचे जीवनमान समृद्ध होईल. महत्त्वाचे म्हणजे हि लस प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनामार्फत मोफत दिली जाते. त्यामुळे प्रसार माध्यमांमध्ये पसरलेल्या अफवांवर विश्वास न ठेवता कॅन्सरसारखा जीवघेणा भयंकर आजार भविष्यकाळात होऊ नये म्हणून मुलींनी ही लस घेणे गरजेची आहे. तुझ्यासाठी संबंधित मुलीना त्यांच्या पालकांनी आरोग्य केंद्रात स्वतः घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले.
प्राचार्य श्री. एम. एस. नागुर्डेकर यांनी शासनाच्या या मोफत लस टोचणे उपक्रमाचे स्वागत करून आभार मानले.. कारण बाहेर खाजगी दवाखान्यात भरमसाठ पैसे देऊन तीन- तिन डोस घ्यावे लागतात.. म्हणून संबंधित पालकांनी जागृत होऊन या योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पाटील- अर्दाळकर पी.जी. यांनी व आभार श्री.एम. ए. पाटील यांनी मांडले
कार्यक्रमासाठी प्र.प्राचार्य श्री पन्हाळकर , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या
♦ दहा दिवसात चौथ्यांदा पेट्रोल दरात वाढ झाली असून पेट्रोल प्रति लिटर २ रुपये ६१ पैशांनी तर डिझेल २ रुपये ७१ पैशांनी महागले आहे.
♦ चंदगड तालुक्यातील हुंदळेवाडी – किणे दरम्यानच्या शेततळ्यामध्ये पाय घसरून पडल्याने धनुष्का पुंडलिक सांबरेकर/ वय १५ रिया चंद्रकांत सांबारेकर /वय १० व स्वराली जयवंत नाईक/ वय १३ या तीन मुलींचा गुदमरून मृत्यू झाला.
♦ कोलोली तालुका पन्हाळा येथे औषध फवारणीसाठी गेलेल्या छबुताई सर्जेराव पाटील /५५ वर्षे या महिलेच्या डोक्यावर धारदार शस्त्राने घाव घालून खून करण्यात आला आहे..

आयपीएल न्यूज
आजचा सामना
बंगरूळू विरुद्ध गुजरात
वेळ : सायंकाळी ७.३० पासून
प्ले ऑफ मधील पहिले चार संघ
बंगरूळू १८ गुण
गुजरात. १८ गुण
हैदराबाद १८ गुण
राजस्थान १६ गुण

आजचे पंचांग
दिनांक : २६ मे २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : एकादशी
नक्षत्र : हस्त नक्षत्र (२७ मे पहाटे ०५.५६ पर्यंत) त्यानंतर चित्रा नक्षत्र
योग : सिद्धि योग ( २७ मे पहाटे ०३.०९ पर्यंत) त्यानंतर व्यातीपात योग
करण : वाणीजा करण (सायंकाळी ०५.४२ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : कन्या राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.५३ ते सायंकाळी ०५.३१ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०९ ते दुपारी ०१.०२
सूर्योदय : सकाळी ०६.०२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत


