मंगळवार २८ एप्रिल २०२६


पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
पेरणोलीत चौरंगी, तर कोरीवडेत सरपंचदासाठी दुरंगी सामना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील पेरणोली व कोरीवडे येथील सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी बहिरेवाडी, धामणे येथील सदस्यपदाच्या जागांसाठी आज मतदान होत आहे.
कोरीवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाकरीता दामाजी पाटील व विवेक पाटील हे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात राहीले असून तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक डी. ए. पाटील यांच्यासह दत्तात्रय पाटील, संतोष पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
बहिरेवाडी व धामणे येथे प्रत्येकी एका जागेसाठी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
पेरणोलीचे सरपंचपद हे सर्वसाधारण महीलेसाठी राखीव आहे. या ग्रामपंचायतीसाठी राजश्री उदयराज पवार, संजीवनी मारुती नावलकर, शीतल लक्ष्मण हळवणकर, वनश्री रविंद्र देसाई यांच्यात सरळ सामना होत आहे. आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व आजरा पंचायत समितीचे माजी सभापती उदयराज पवार यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते.
बहिरेवाडी प्रभाग १ मधे अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गसाठी प्रिती सचिन कांबळे, मंगल कल्लाप्पा आयवाळे तर धामणे प्रभाग ३ सर्वसाधारण प्रवर्गासाठी पांडुरंग दत्तात्रय मगदूम, शंकर दादू लोकरे यांच्यात दूरंगी सामना आहे.
प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

किटवडे येथून एकजण बेपत्ता

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कीटवडे ता. आजरा येथून बिरप्पा फकीरप्पा कुरबर ( वय ३० मुळगाव ता. जिल्हा हवेली) ही व्यक्ती बेपत्ता झाल्याची वर्दी तुलसी कूरबर यांनी आजरा पोलिसांत दिली आहे
मजुरी करणारा बिरप्पा २७ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकी मध्ये पेट्रोल टाकून येतो असे सांगून निघून गेला असून तो अद्याप परतला नसल्याचे वर्दीत म्हटले आहे.
पोलीस हवालदार अनिल सरंबळे पुढील तपास करीत आहेत.

सोहाळे येथील महालक्ष्मी यात्रा आजपासून
उद्या मुख्य दिवस

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सोहाळे ता. आजरा येथील श्री महालक्ष्मी देवी यात्रेस आज मंगळवार दिनांक २८ एप्रिल पासून सुरुवात होत आहे. आज श्री महालक्ष्मी देवी पूजा व लक्ष्मी खेळवण्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी चार वाजता मंदिरातून प्रस्थान होऊन चार ते सहा विधिवत पूजा व सायंकाळी सात ते आठ नैवेद्य व गा-हाणे व त्यानंतर रात्री दहा पासून देवी खेळण्याचा कार्यक्रम सुरू होईल.
बुधवार दिनांक २९ एप्रिल रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून सकाळी सहा वाजता श्री महालक्ष्मी देवीला ठाणकाला बसविणे, सकाळी सात वाजता बळ पाडणे व अकरा वाजता देवीला नैवेद्य, मानकरी व सुहासिनी वाढणे ओटी भरणे व त्यानंतर ठीक ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे
यात्रेनिमित्त गुरुवार दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी स्टार ऑर्केस्ट्रा कोल्हापुर यांचा रात्री दहा वाजता करमणुकीचा कार्यक्रम तर शुक्रवार दिनांक एक मे रोजी माऊली संगीत सोंगी भजनी मंडळ साके यांचा करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे. रविवार दिनांक ३ मे रोजी थळ यात्रा होईल .
यात्रा कमिटीने यात्रेची जय्यत तयारी केलेली आहे. यात्रा कालावधीत गावामध्ये सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून डिजिटल फलक लावण्यास मज्जाव करण्यात आला आहे. लक्ष्मी खेळताना कोणताही अडथळा होऊ नये म्हणून गावामध्ये मंडप घालण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे त्याचबरोबर विजेचा अतिरिक्त लोड येऊन वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी विद्युत रोषणाईस मनाई करण्यात आली असल्याचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष सूर्यकांत दोरुगडे, उपाध्यक्ष शिवाजी कोंडुसकर, सूर्यकांत देसाई , सचिव महादेव देसाई, उपसचिव मदन देसाई, खजिनदार महादेव पाटील व उपखजिनदार सचिन कळेकर यांनी सांगितले.

उपनगराध्यक्षा पूजा डोंगरे यांचा जातीचा दाखला वैध

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सौ. पूजा अश्विनी डोंगरे यांच्या जातीचा दाखला वैध ठरण्यात आला आहे.
जातीच्या दाखल्यावर महेश संभाजी पाटील यांनी आक्षेप घेतला होता. परंतु सदर अक्षय आक्षेप जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने फेटाळून लावत डोंगरे यांचा दाखला वैध ठरवला आहे.

आजरा येथे गौ सन्मान अभियानानिमित्त गाईचे पूजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
काल दिनांक २७ एप्रिल रोजी देशभरात गौ सन्मान दिवस साजरा करण्यात आला. गाईला राष्ट्रमाता घोषित करण्याच्या पार्श्वभूमीवर साजऱ्या करण्यात आलेल्या या दिनानिमित्त आजरा शिवसेनेच्या वतीने गौपूजन करण्यात आले.
सौ. अनुसया संभाजी पाटील, सौ शालन कोरवी यांच्यासह महिलांनी गायीचे पूजन केले. यावेळी महिला व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बागेश्वर बाबांचा मराठा महासंघातर्फे निषेध
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि राष्ट्रपुरष आहेत त्यांचा इतिहास अत्यंत दैदिप्यमान असून तो पुराव्यांवर आधारीत आहे. नुकतेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री ज्यांना बागेश्वर बाबा म्हणून ओळाखले जाते यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात/ व्हिडीओमध्ये असे वक्तव्य केले आहे की, समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते. ऐतिहासिक पुराव्यांनुसार आणि आधुनिक संशोधनानुसार, छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाल्याचे कोणतेही सबळ पुराव नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकिय गुरु राजमाता जिजाऊ माँ साहेब होत्या. राजांचे स्वराज्य निर्माण करणे हेच ध्येय होते. जाणीवपूर्व चुकीचा इतिहास सांगून जनसामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न व त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवप्रेमींच्या आणि तमाम महाराष्ट्र वासियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत तसेच धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या वादग्रस्त वक्च्यांमुळे वारंवार चर्चेत असतात त्यांनी केवळ छत्रपती शिवाजी महाराजच नव्हे, तर इतर अनेक धार्मिक आणि सामाजिक विषयांवर अशी विधाने केली आहेत ज्यावरुन मोठे वाद निर्माण झाले आहेत. आजरा तालुका अखिल भारतीय मराठा महासंघ त्यांचा “जाहिर निषेध करत आहोत.” असे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आजरा शाखेच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
असे वक्तव्य करुन हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत कोणताही ऐतिहासिक पुरावा दाखवावा आणि मगच अशी वक्तव्य करावीत जाणिव पूर्वक चुकीचा इतिहास समाजामध्ये पसरवून सामाजिक सलोखा बिघडवून व आमच्या देवताचा घोर अपमान केला आहे. महापुरुषांचा इतिहास चुकीच्या पध्दतीने मांडणे हे सामाजिक सलोखा बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकते त्याबददल भारतीय दंड सहितेच्या (IPC) संबधित कलमांनुसार कायदेशीर गुन्हा दाखल करावा आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी अखिल भारतीय मराठा महासंघ कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

पार्वती-शंकर विद्यालयाचे NMMS परीक्षेत यश

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री पार्वती शंकर विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत आजरा तालुक्यात उल्लेखनीय यश संपादन केले. शाळेच्या ९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली असून तालुक्यातील प्रथम व द्वितीय क्रमांकही याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकावले.
इयत्ता आठवीतील ५० विद्यार्थ्यांपैकी ४९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल ९८ टक्के लागला. कु. राशिका सुनील चव्हाण (१५२ गुण) हिने तालुक्यात प्रथम, तर कु. साक्षी संतोष पोवार (१५० गुण) हिने द्वितीय क्रमांक मिळवला.
यशस्वी ९ विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरवर्षी ₹१२,००० प्रमाणे प्रत्येकी एकूण ₹४८,००० असा एकत्रित सुमारे ₹४,३२,००० शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.सलग १८ वर्षे शाळेचे विद्यार्थी या शिष्यवृत्तीस पात्र ठरत असून आतापर्यंत १४३ विद्यार्थी लाभार्थी झाले आहेत. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाले असून, सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.

आजचे पंचांग
दिनांक : २८ एप्रिल २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : द्वादशी (सायंकाळी ०६.५१ पर्यंत) त्यानंतर त्रयोदशी तिथी
नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी नक्षत्र (रात्री १०.३५ पर्यंत) त्यानंतर हस्त नक्षत्र
योग : व्याघात योग (रात्री ०९.०३ पर्यंत) त्यानंतर हर्षण योग
करण : भाव करण (सकाळी ०६.३० पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : कन्या राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.४७ ते सायंकाळी ०५.२३ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.११ ते दुपारी ०१.०३
सूर्योदय : सकाळी ०६.१४
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज
दिल्ली विरुद्ध बंगळूर सामन्यांमध्ये दिल्लीचा डाव अवघ्या ७५ धावात गुंडाळला. ६.३ षटकात बंगळूरूने सदर आव्हान पूर्ण केले.
आजचा सामना
पंजाब विरुद्ध राजस्थान
वेळ : दुपारी ३.३०
गुण तक्ता- पहिले चार संघ
१. पंजाब -१३ गूण
२. बंगळुरू -१२ गुण
३. हैदराबाद-१० गुण
४. राजस्थान-१० गुण



