mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार २४ एप्रिल २०२६

चव्हाणवाडीत पाला-पाचोळा पेटविताना आगीचा भडका; वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

उत्तूर : मंदार हाळवणकर

चव्हाणवाडी येथे आज सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास शेतातील पाला-पाचोळा पेटविण्यासाठी गेलेल्या शंकर बापू चव्हाण (वय ७० वर्षे ) यांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शेताच्या बांधावरील सुकलेल्या पाला-पाचोळा व गवत पेटवित असताना अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याने आगीचा भडका उडाला. आग झपाट्याने पसरल्याने चव्हाण यांना बाहेर पडता आले नाही आणि ते आगीत अडकले.

चव्हाण यांच्या पश्चात पत्नी व दोन विवाहित मुली असा परिवार असून, त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या वर्दीवरून आजरा पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे.

चौरंगी लढतीत बाजी कोण मारणार…?
पेरणोली सरपंचपद निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पेरणोली तालुका आजरा येथील सरपंचांनी राजीनामा दिल्यानंतर नूतन सरपंच निवड बिनविरोध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना निवडणूक रिंगणात तब्बल चार उमेदवार एकमेकांविरोधात उभी ठाकल्याने या निवडणुकीकडे तालुका वासीयांचे लक्ष लागून आहे.

माजी सरपंच सौ. राजश्री उदय पवार, सौ. वनश्री रवींद्र देसाई, सौ.शितल लक्ष्मण हाळवणकर व सौ.संजीवनी मारुती नावलकर या चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यापैकी पवार या माजी सरपंच असून त्या आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व पंचायत समितीचे माजी सभापती उदयराज पवार यांच्या पत्नी आहेत. राष्ट्रवादीची ताकद त्यांच्या पाठीशी राहणार आहे. सौ. धनश्री देसाई यांच्या पाठीशी पालकमंत्री आबिटकर यांच्या कार्यकर्त्यांबरोबरच कांही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी दिसत आहेत. तर सौ संजीवनी नावलकर यांना भाजपाची साथ असल्याचेही बोलले जाते. सौ.शितल नावलकर यांच्यासाठी मात्र चुकी प्रचार यंत्रणा कार्यरत दिसत आहे.

सुमारे २२०० इतके मतदान असून गावच्या विकासाच्या मुद्द्यावर सर्वच उमेदवारांच्या प्रचाराचा जोर दिसत आहे. मयत व बाहेरगावी असणारे मतदान मोठे असल्याने ७० टक्के मतदान होण्याची शक्यता आहे.

निवडणुकांच्या मतदान प्रक्रियेमध्ये कॉं. संपत देसाई, राजेंद्रभाऊ सावंत, संतोष जाधव, तानाजीराव देसाई, हरिभाऊ कांबळे, पांडुरंग दोरुगडे, पांडुरंग लोंढे आदींच्या भूमिकाही महत्त्वाच्या ठरणार आहेत.

उमेदवारांकडून घर टू घर प्रचार मोहीम राबवली जात आहे. एकंदर पेरणोली ग्रामपंचायतची नूतन सरपंच निवड निवडणूक चुरशीची दिसत आहे.

तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी महादेव हेब्बाळकर…
संभाजी तांबेकर उपाध्यक्ष

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी महादेव ज्योतिबा हेब्बाळकर व्हाईस चेअरमन पदी श्री.संभाजी मारुती तांबेकर यांची बिनविरोध निवड पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंध सुशील कुमार एचडी होते.

यावेळी श्री. अल्बर्ट डिसोजा, श्री. डी. ए. पाटील, श्री. एम. के. देसाई, सुधीर देसाई यांनी आपली शुभेच्छा पर मनोगते व्यक्त केले.

स्वर्गीय राजारामबापू देसाई यांनी हा संघ जोपासला. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इथून पुढचा कारभार करणार असल्याची ग्वाही अध्यक्ष हेब्बाळकर व उपाध्यक्ष संभाजी तांबेकर यांनी दिली.

आभार गणपतराव सांगले यांनी मानले.

ज्येष्ठ संचालक विठ्ठलराव देसाई, राजाराम पाटील, राजलक्ष्मी देसाई, मायादेवी पाटील, उदयराज पवार, मधुकर यलगार, ज्ञानदेव पोवार, सुनील देसाई, रवींद्र होडगे, जोतिबा चाळके, संजय उत्तूरकर, गणपती कांबळे, महेश पाटील, भाऊसाहेब किल्लेदार, आदी सर्व संचालक हजर होते.

हारुर  येथे दलित वस्तीतील रस्ते विकास कामाचे उद्घघाटन

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मौजे कानोली पैकी हारुर ता. आजरा येथे समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती विकास योजनेअंतर्गत दलित वस्तीतील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण या विकास कामाचे उद्घघाटन आज माजी आमदार राजेश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या कामामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने वस्तीतीमधील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या प्रसंगी आजरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अनिल फडके, एम.के.देसाई,अभय देसाई, सरपंच सौ.सुषमा पाटील, विलास सुतार, सदस्य सुधीरकुमार पाटील, सौ. दिपाली सुतार, गणपती कळसकर, सुरेश रेडेकर, सुभाष पाटील, प्रकाश देसाई, ग्रामसेवक स्नेहदीप सरदेसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

गर्जना संघटनेच्या आंदोलनामुळे चिमणे–बेलवाडी रस्त्याचे काम बंद; निकृष्ट दर्जावरून ठेकेदाराला इशारा


उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर : चिमणे ते बेलवाडी हु!! रस्त्याच्या सुधारणा कामात निकृष्ट दर्जा आढळल्याने स्थानिक ग्रामस्थ व गर्जना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित काम बंद पाडले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या या कामाबाबत गंभीर तक्रारी पुढे आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ५.१२५ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी अंदाजे ₹४३९.४४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. माहिती फलकानुसार कामाची सुरुवात ४ ऑक्टोबर २०२४ रोजी झाली असून पूर्णता मुदत ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत निश्चित आहे. मात्र, प्रत्यक्ष काम करताना आवश्यक तांत्रिक निकषांचे पालन होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
रस्त्याच्या बांधकामात मुरूम, खडी व काँक्रीटचे थर नियमांनुसार टाकले जात नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत असून भविष्यातील टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यावेळी गर्जना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदार व कनिष्ठ अभियंता यांना स्पष्ट इशारा देत गुणवत्ता तपासणी पूर्ण होईपर्यंत काम सुरू न करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कामात सुधारणा न झाल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी संबंधित कंपनीला जबाबदार धरले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनात संतोष बेलवाडे, दिगंबर मिसाळ, जोतिबा नादवडेकर, गणपती शिंत्रे, आनंदा शिंत्रे, मारुती सुतार, शिवाजी चव्हाण यांच्यासह इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तीन हजार वरील कारखाना सभासदांना साखर वाटप करावी :मार्क्सवादी – लेनिनवादी संघटना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गेल्या ३० वर्षापासून कारखाना उभारणी करीता स्थानिक शेतकरी वर्गान कर्ज काढून आपल्या कारखान्याचा शेअर्स घेतला आहे. सर्व सामान्य सभासद शेतकऱ्याना परवडेल असा शेअर्स रक्कम असताना दोन हजार दोनशे वरून, तीन, पाच, दहा, पंधरा हजार रक्कम करून, मुळ सभासदाच्यावर आपण अन्याय करत आहात. तरी तीन व पाच हजार शेअर्स रक्कम असणाऱ्या सभासदाना साखर वाटप करावी. तसेच सवलतीच्या दरात साखर ही वाटप करत असताना इतर साखर कारखान्या प्रमाणे दर असावा साखर देता येत नसेल तर अनामत रक्कमा परत कराव्यात अशी मागणी मार्क्सवादी – लेनिनवादी संघटनेने आजरा कारखाना प्रशासनाकडे केली आहे.कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

स्मार्ट मीटर बाबत सक्ती नको
पेरणोली येथील संवाद मेळाव्यात ग्रामस्थांचा सूर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

स्मार्ट मीटर बसवण्याबाबत कोणावर सक्ती करू नका. संबंधीताच्या संमतीने मीटर बसवा. स्मार्ट मीटरबाबत संबंधीताला पूर्ण माहीती द्यावी अशी भावना ग्रामस्थ व ग्राहकांनी व्यक्त केली.

येथील हनु‌मान मंदिरामधे वीज वितरणकडून स्मार्ट मीटरबाबत संवाद मेळावा झाला. वीज वितरण कंपनी गडहिंग्लज विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पोवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्रमिक मुक्ती दलाचे राज्य कार्याध्यक्ष का. संपत देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई, पेरणोलीचे उपसरपंच संकेत सावंत, सहाय्यक अभियंता सुशांत शिवणे, दीपक जमुने प्रमुख उपस्थित होते.

सहाय्यक अभियंता श्री. शिवणे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात बैठकीचा हेतु स्पष्ट केला. श्री. पोवार म्हणाले, केंद्र विद्युत प्राधीकरणे स्मार्ट मीटर बसवण्याबाबत बंधनकारक केले आहे. त्यामुळे ग्राहक जितका वीजेचा वापर करेल तितकेच वीज बिल येईल. पूर्वीचे मीटर व स्मार्ट मीटरमधे फारसा फरक नाही. काही तांत्रिक दोष असल्यास मीटर तपासून मिळले. ही सर्व प्रक्रिया पारदर्शक असून ग्राहकाला त्याच्या वीजेचा वापराबाबतची माहीती तासागणिक मोबाईमधील अॅपवर उपलब्ध होईल. त्याचबरोबर बिलही उपलब्ध होईल. यामध्ये तक्रार करण्याची तरतूदही आहे. त्यामुळे याबाबत असलेला गैरसमज दूर व्हावा. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ८५ पैसे प्रतियुनिट इतक्या दराने घरगु‌ती ग्राहकांना वीज दरात सवलत देण्यात येत आहे. स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांना ७ लाख ४२ हजार रुपयांची सवलत मार्च महीन्यात मिळाली आहे. का. देसाई म्हणाले, स्मार्ट मीटरला विरोध नाही. वीज वितरणने मीटर बसवणे गरजेचे आहे. याचे पैसे खासगी उ‌द्योजकांच्या खिशात जावयास नको. याला आमचा विरोध आहे. तानाजी देसाई यांनीही शंका विचारल्या. या वेळी सुरेश कालेकर, मारुती देसाई, ज्ञानोबा फगरे, बाब्राव देसाई, रोहीदास दारुडकर, बाळासाहेब पाईम, उपस्थित होते.

दोषींवर कारवाई करा : शिवसेना
उबाठा गटाची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथे घडलेल्या भिंत दुर्घटना प्रकरणामध्ये जी मंडळी दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आजरा शहर शिवसेना उबाठा च्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.

सदर इमारत पाडण्यापूर्वी नगरपंचायतीची रीतसर परवानगी घेतली होती का ? इमारत वाढत असताना कॉन्ट्रॅक्टरने योग्य ती काळजी घेतली होती का ? असे प्रश्न उपस्थित करत दोन निष्पाप महिलांचा यामध्ये बळी गेला असून याची चौकशी सखोल व्हावी अशी मागणी केली आहे.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख समीर चांद, महेश पाटील, अमित गुरव, सागर नाईक, सुरेश पाटील,शरद कोरगावकर, तुषार सुतार, चंदर पाटील, संजय येसादे, प्रदीप पाचवडेकर ,रोहन गिरी उपस्थित होते.

 आजचे पंचांग 

दिनांक : २४ एप्रिल २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : अष्टमी (रात्री ०७.२१ पर्यंत) त्यानंतर नवमी तिथी
नक्षत्र : पुष्य नक्षत्र (रात्री ०८.१३ पर्यंत) त्यानंतर आश्लेषा नक्षत्र
योग : शूल योग (२५ एप्रिल रात्री ०१.२३ पर्यंत) त्यानंतर गण्ड योग
करण : विस्ती भद्रा करण (सकाळी ०८.०१ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : कर्क राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ११.०२ ते दुपारी १२.३७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.११ ते दुपारी ०१.०२
सूर्योदय : सकाळी ०६.१६
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५७
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज

संजू सॅमसनच्या ५४ नाबाद १०१ धावांच्या जोरावर चेन्नईने मुंबईला गुडघ्यावर आणले. चेन्नईने समोर ठेवलेले २०७ धावांचे उद्दिष्ट गाठताना मुंबईचा डाव १९ षटकात १०४ धावात संपुष्टात आला.

आजचा सामना

बंगळुरू विरुद्ध गुजरात

स्थळ : बंगळूरु

वेळ : सायंकाळी ७:३० पासून

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मसोली नजीक मालवाहू टेम्पो खड्ड्यात कोसळला… एक जखमी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!