गुरुवार दि.१५ जानेवारी २०२६

पतंगाच्या नादाने जीवनाची दोर तुटली…
शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ऐन संक्रातीदिवशी पतंग उडवत असताना तोल जाऊन लाकडी ओंडक्यावर पडून आदर्श किरण पवार (वय ११, सध्या रा. राईस मिल जवळ आजरा, मूळ गाव येरमाळा ता. कळंब जी. धाराशिव) या शाळकरी बालकाचा जागीच मृत्यू होऊन पतंगाच्या नादात जीवनाची दोर तुटल्याची दुर्दैवी घटना आजरा येथे काल बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी…
धाराशिव जिल्ह्यातील किरण पवार कुटुंबीय व त्यांचे नातलग लोहार कामाच्या निमित्ताने आजरा येथे आले आहेत. त्यांनी राईस मिल शेजारील जागेत लोहार काम सुरू केले होते. त्यांच्या समवेत पत्नी व मुलगा आदर्श राहत होते. बुधवारी सकाळी पवार हे लोहार काम करत होते. त्यावेळी आदर्श हा मोकळ्या जागेत असलेल्या लाकडांच्या ढिगार्यावर उभारून पतंग उडवत असताना तो तोल जाऊन/घसरून पडला व त्याचे डोके ढिगार्यातील लाकडी ओंडक्यावर आपटून तो गंभीर जखमी झाला. डोक्यातून अति रक्तस्त्राव झाल्याने आदर्शचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची वर्दी त्याचे आजोबा देवा गोपीनाथ चव्हाण (सध्या राहणार निमजगा माळ, आजरा) यांनी आजरा पोलिसात दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बेनके करीत आहेत.
आवास योजनांचे थकीत हप्त्यांबाबत शिवसेना आक्रमक… जनआंदोलन छेडण्याचा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, रमाई आवास योजना, अहिल्यादेवी होळकर आवास योजना, अटल बांधकाम आवास योजना, बालकल्याण योजना तसेच रोजगार हमी योजनेतील लाभार्थ्यांचे थकीत हप्ते तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करावेत, अन्यथा शासनाविरोधात जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा शिवसेना( उ.बा.ठा.) पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. या मागणीचे लेखी निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले.
या विविध आवास योजनांतून अनेक गोरगरीब लाभार्थ्यांनी घरकुल बांधकामास सुरुवात केली आहे. मात्र शासनाकडून दुसरा व तिसरा हप्ता वेळेत न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढावले आहे. काही लाभार्थ्यांना ५ ते १० टक्के व्याजाने सावकारी कर्ज काढून बांधकाम सुरू ठेवावे लागत आहे. तर काही कुटुंबे जनावरांच्या गोठ्यात राहण्यास, तर काहींना भाड्याच्या घरात राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अनेकांची घरे पूर्ण झाली असतानाही हप्ता न मिळाल्याने आर्थिक अडचणी अधिकच वाढल्या आहेत. सदर थकीत हप्ते त्वरित न दिल्यास पंचायत समितीवर शासनाचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, शिवाजी आढाव, सुनील डोंगरे, संजय येसादे, रंगा माडभगत, महेश पाटील, बिलालभाई लतीफ, सुयश पाटील, अमित गुरव, सूरज पाटील, किरण पाटील, आदित्य पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

आजरा व सरोळी येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जय सियाराम जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने संत गोरा कुंभार हॉल आजरा व सरोळी तालुका आजरा या ठिकाणी सामाजिक उपक्रमांतर्गत जीवनदान महाकुंभ २०२६ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदानासाठी १३३ रक्तदात्यांनी आपले रक्तदान देऊन सहकार्य केले
यावेळी आजरा तालुका अध्यक्ष श्री आकाराम देसाई, आजरा तालुका सचिव श्री शिवाजी सरंबळे, कोल्हापूर जिल्हा धर्मक्षेत्र प्रमुख श्री महेश पाटील, आजरा तालुका कॅप्टन श्री महादेव कुंभार, आजरा तालुका महिला अध्यक्षा सौ. उज्वला कळेकर,आजरा तालुका आध्यात्मिक उपक्रम प्रमुख श्री. विठ्ठल जाधव आणि तालुक्यातील इतर भाविक भक्तगण उपस्थित होते.

व्यंकटराव हायस्कूलचे शासकीय चित्रकला परीक्षेत यश

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी चित्रकला ग्रेड परीक्षा इलेमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षेमध्ये उज्वल सुयश संपादन केले.
एलिमेंटरी परीक्षेसाठी इ एकूण ६८ विद्यार्थी प्रविष्ट झाले पैकी ६७ उत्तीर्ण झाले.
त्यामधील “अ “श्रेणी प्राप्त विद्यार्थी…
अन्मया रणजीत देसाई,कल्याणी सुभाष सुतार,सोहम सचिन केरकर
“ब”श्रेणी प्राप्त विद्यार्थी….
अथर्व शांताराम नाईक, बाणी विजय यादव,ज्ञानेश्वरी संतोष देसाई, राजवीर सुरज जाधव
उर्वरित ६० विद्यार्थी “क” श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले.
त्याचबरोबर “इंटरमिजिएट” परीक्षेसाठी ५२ विद्यार्थी बसले पैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
त्यातील “अ” श्रेणी प्राप्त विद्यार्थी…
आस्था सचिन गुरव, अवधूत अमित सावंत, चिराग सागर चौगुले ,निरंजन गणेश पाटील,पौरस संदीप देवरकर, प्रेम रमेश येसणे,साक्षी नरेंद्र कुंभार,सिद्धार्थ बाळू सुतार,वैभव विठ्ठल कांबळे
ब श्रेणी प्राप्त विद्यार्थी…
अंशुमन हिम्मत भोसले ,अर्चना सागर इलगे, चैतन्य विशाल वडवळे व,धनश्री महेश देसाई ,ईशान सुरजीत मोटे,कार्तिक सुरेश हुबळे, माधवी जीवन आजगेकर, रिया अरविंद देशमुख,रुद्र अनिल भिसोरे,साहिल दीपक पाटील,सानवी लक्ष्मण सोले व,श्रीतेज संदीप नरके व,स्वराली प्रशांत चौगुले.
उर्वरित २८ विद्यार्थी “क “श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले.
वरील सर्व यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ प्राचार्य श्री.एम.एम.नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे. शेलार यांचे प्रोत्साहन लाभले व कलाशिक्षक कृष्णा दावणे यांचे मार्गदर्शन लाभले.

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे कार्य आजच्या काळातही तरुणांना दिशादर्शक : प्रा. जिज्ञासा उफराटे
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांनी आपापल्या काळात तरुणांमध्ये चेतना निर्माण करण्याचे कार्य केले. त्यामुळे त्यांचे कार्य आजच्या काळातही तरुणांना दिशादर्शक असे आहे, असे मत प्रा. जिज्ञासा उफराटे यांनी नुकतेच येथे व्यक्त केले.
आजरा महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.यावेळी उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, पर्यवेक्षक प्रा. मनोजकुमार पाटील, कार्यालय अधीक्षक श्री. योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आनंद बल्लाळ यांनी केले, प्रा. रमेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन तर प्रा. विनायक चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

छाया वृत्त

मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा कडून आजरा नगरपंचायतीचे नवनियुक्त नगरसेवक डॉ. इंद्रजीत देसाई व डॉ.सौ. स्मिता सुधीर कुंभार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

छाया वृत्त

मराठा महासंघाच्या आजरा शाखेच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठा महासंघाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



