mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाठळक बातम्याराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

रविवार  ९ नोव्हेंबर २०२५

वाटंगी येथून महिला बेपत्ता...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वाटंगी ता. आजरा येथून निकिता राहुल ठाकूर ( वय २४ वर्षे ) ही ऊसतोड कामगार महिला ३ नोव्हेंबर पासून बेपत्ता असल्याची तक्रार पती राहुल मनीराम ठाकूर यांनी आजरा पोलिसांत दिली आहे.

मध्यप्रदेशातील खांडवा जिल्ह्यातून आलेल्या ठाकूर कुटुंबातील सदर महिला वाटंगी येथून अचानकपणे बेपत्ता झाली आहे. दोनच दिवसापूर्वी एका ऊसतोड मजुराचा मृतदेह हाजगोळी येथे गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता. त्यानंतर सदर महिला बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल झाल्याने ऊसतोड कामगारात खळबळ उडाली आहे.

आता गायही चोरीला…
खेडे येथील प्रकार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

खेडे ता. आजरा येथील गौतम आनंदा कांबळे या शेतकऱ्याची सहा वर्षाची गाय अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद गौतम कांबळे यांनी पोलिसात दिली आहे.

सहा नोव्हेंबर रोजी कांबळे यांनी आपल्या मळवी नावाच्या शेतामध्ये बांधलेली सदर गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली आहे. चक्क बांधलेली गायच चोरीला गेल्याने या अजब प्रकाराची चर्चा सध्या खेडे येथे सुरू आहे . पुढील तपास हवालदार पांडुरंग येलकर करीत आहेत.

मुहूर्त तर ठरला…
पण ना याद्या…ना वाटाघाटी..

आजरा : ज्योतिप्रसाद सावंत 

आजरा नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम उद्या सोमवार दिनांक १० नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. एकीकडे निवडणूक कार्यक्रम निश्चित झाला असताना दुसरीकडे आघाड्यांबाबतची संभ्रमावस्था कायम आहे. यामुळे इच्छुकांची घालमेल चांगलीच वाढली आहे.

शह – काटशह, पक्षांतर्गत हेवेदावे, कुरघोड्या, व्यक्तीद्वेष , आपलीच समर्थक प्यादी पुढे ढकलण्यासाठी सुरू असलेली धडपड यावेळी प्रकर्षाने आघाडी बांधणीच्या पार्श्वभूमीवर दिसत आहे. यामुळे निवडून येण्याची पात्रता असणारे अनेक इच्छुक उमेदवार रिंगणातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

काही मोजक्या उमेदवारांच्या उमेदवाऱ्या सत्तारुढ व विरोधी आघाडीकडून निश्चित असल्या तरीही आघाड्यांच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असल्याने अनेक मंडळी वेटिंगवर गेली आहेत. अचानकपणे आघाड्यांमध्ये बदल झाल्यास अशा मंडळींची उमेदवारी जर- तर वर आधारलेली आहे.

सद्यस्थितीस उमेदवार निश्चित करण्यात अशोक चराटी व भाजपा पुरस्कृत आघाडी पुढे दिसत आहे. नगराध्यक्षपदासाठी अशोकअण्णा चराटी यांचे नाव निश्चित असल्याने त्यांना इतर हालचाली करणे सोपे झाले आहे.

याउलट विरोधी आघाडीकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या नावाबद्दल काथ्याकुट सुरूच असून नावावर एकमत न झाल्याने नगरसेवक पदांकरीता प्रभागवार निवडींवर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.

अनेक इच्छुकांना दोन्ही आघाड्यांच्या प्रमुख मंडळींनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दृष्टीने कामाला लागा असे खाजगीत सांगितले असले तरीही आज रविवारी सायंकाळपर्यंत आघाड्यांचे अंतिम स्वरूप निश्चित होणे गरजेचे आहे. अन्यथा उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत ही चर्चा सुरूच राहिली तर अनेक इच्छुक ऐनवेळी अपक्ष म्हणून रिंगणात राहून आघाडी प्रमुखांची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माकडांचा उच्छाद…
वेळवट्टी ग्रामस्थ त्रस्त

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वेळवट्टी ता. आजरा येथे माकडांच्या उपद्रवामुळे स्थानिक ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

पंधरा ते वीस माकडांचा कळप घरांच्या कौलावर उड्या मारून कौलांचे नुकसान तर करत आहेच परंतु त्याच बरोबर वाळत घातलेला भुईमूग, फळझाडे, दारात व परसात लावलेले विविध शेंगांचे वेल, फुलझाडे यांचे मोठे नुकसान करत आहेत.

गेल्या कित्येक दिवसांपासून हा माकडांचा उपद्रव सुरूच असून वनविभागाने या माकडांचा बंदोबस्त करून वेळवट्टी वासियांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

निधन वार्ता

स्वप्निल गोटेकर

आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

आजरा/ पारेवाडी येथील स्वप्निल सतीश गोटेकर (वय ४१ वर्षे) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, लहान भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. इंजिनीयर साईश गोटेकर यांचे ते ज्येष्ठ बंधू होत .

शशिकांत सावंत यांचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

बुरुडे ता.आजरा येथील पं.स.चे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी शशिकांत आप्पासो सावंत यांची तालुका संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यपदी निवड झालेबद्दल  दलित संघटनांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात  सत्कार करण्यात आला.

शशिकांत सावंत यांच्या सामाजिक कामाची दखल घेत त्यांना या पदावर नियुक्ती करण्यात आली हीच त्यांच्या काम पोहोच पावती असलेबद्दल प्रास्ताविकपर भाषणात आर. पी.आय.(गवई गटाचे) तालुकाध्यक्ष सूर्यकांत कांबळे यांनी सांगितले.

शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांचा आपणाला अभ्यास असून या निवडीमुळे सर्वसामान्यांकरिता आपणाला काहीतरी करता येईल याचे समाधान असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

यावेळी विष्णू कांबळे, गोपाळ होन्याळकर, अशोक कांबळे, मोहन कांबळे, सुरेश दिवेकर, दौलती कांबळे, सुधाकर कांबळे, महेश कामत, गणपती कांबळे, परशुराम कांबळे, अविनाश कांबळे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

हत्तीने दिली ट्रॅक्सला धडक…. रामतीर्थ यात्रा नाही तर राजकीय कार्यक्रमांना परवानगी देऊ नये… ‘सर्वोदय’ मध्ये सत्ताधारीच

mrityunjay mahanews

बेकायदेशीर गाळे प्रकरणी सत्ताधारी नगरसेवकाचे उपोषण सुरू…. रामतीर्थ परिसरात लिंबुटाचन्यांचा खच…

mrityunjay mahanews

उचंगी प्रकल्पस्थळी पुन्हा संचारबंदी…आजरा तालुक्यात महिला दिन उत्साहात.. आजरा कारखाना गळीत हंगामाचा समारोप

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!