शुक्रवार दि.२४ आक्टोंबर २०२५



महायुती म्हणूनच जि.प., पं. स. निवडणुकीला सामोरे जावे लागण्याची शक्यता : माजी आमदार राजेश पाटील
वाटंगी येथे हाय मास्ट सोलर लॅम्पचे लोकार्पण
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीमध्ये महायुतीच्या माध्यमातूनच सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. वरिष्ठ पातळीवरून याबाबत जो निर्णय होईल त्याच्याशी बांधील राहून कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहन माजी आमदार राजेश पाटील यांनी केले. वाटंगी येथे हाय मास्ट दिव्यांच्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
उपस्थितांचे स्वागत अनिल देसाई यांनी केले. यावेळी आजरा साखर कारखान्याचे संचालक शिवाजी नांदवडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी महिला तालुका अध्यक्षा रेजिना फर्नाडिस , दौलत साखर कारखान्याचे चेअरमन एस.एल.पाटील, कोल्हापूर जिल्हा बाजार समितीचे उपाध्यक्ष अभय देसाई , आजरा साखर कारखान्याचे संचालक संभाजी पाटील , वाटंगीच्या सरपंच सौ.इंदुबाई कुंभार , उपसरपंच सौ.सुनिता सोनार,माजी सरपंच मधुकर जाधव , माजी उपसरपंच संजय पवार , ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.


पावसाचा धिंगाणा सुरूच…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दिवाळीची धूम सुरू असतानाच ऐन भाऊबीजेदिवशी जोरदार पावसाने आजरा शहरासह परिसरात हजेरी लावल्याने रंगाचा बेरंग करून टाकला.
दिवसभर ढगाळ वातावरण व त्यानंतर दुपारी सुरू झालेला पाऊस उशिरापर्यंत सुरूच होता. दोन दिवसाच्या तुलनेमध्ये काल पावसाने लावलेली हजेरी दमदार होती. एकीकडे कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभाची जय्यत तयारी असताना सुरू असलेल्या पावसामुळे तोडणी व वाहतूक यंत्रणेवर मर्यादा आल्या आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास गळीत हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
सलग तीन दिवसाच्या पावसामुळे भात पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. ऐन भाऊबीजे दिवशी पावसाचा जोर वाढल्याने दुचाकीवरून भाऊबीजेला ये-जा करणाऱ्या मंडळींची चांगलीच तारांबळ उडाली. गावोगावी जाणाऱ्या प्रवाशांना पुरेशा बस फेऱ्या नसल्याने पावसामुळे दुचाकीवरून प्रवास करताना मर्यादा येताना दिसत होत्या.


आजरा जनता बँकेकडे एका दिवसात १२ कोटी ४१ लाखांच्या ठेवी जमा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील जनता सहकारी बँक लि. आजरा या बँकेकडे दिपावली पाडव्यानिमित्य एका दिवसात तब्बल ₹. १२ कोटी ४१ लाखाच्या ठेवी जमा झाल्या आहेत.
बँकेने आज पर्यत अनेक यशाची शिखरे पार करीत जिल्ह्यात तसेच देशात सर्वोत्कृष्ठ बँक, बेस्ट सीईओ, बेस्ट चेअरमन असे अनेक सतत १० वर्षे पुरस्कार प्राप्त केले आहेत.
बँकेने घरबांधणी करिता सावली गृहकर्ज योजना, कार लोन ९% व्याज दराने सुरु केले आहे. तसेच इतर सर्व कर्जे ११ . ५०% व्याजदराने कमीत कमी कागदपत्र, कोणतेही हिडन चार्जेस न घेता सर्व शाखांमधून सुरु करणेत आल्या आहेत.
ग्राहकांसाठी विविध सेवा उपलब्ध –
बँकेने सर्व अद्यावत टेक्नॉलोजी सर्व्हीस चालू केली असून यु.पी.आय., गुगल पे, फोन पे, क्यु. आर. कोड, भिम अँप इत्यादी सेवा चालू करून ग्राहकांना त्वरीत पेमेंट करणेची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. बँकेकडे ₹. ४६० कोटी ठेवी व ₹.२७८ कोटी कर्जे एकूण बॅकेचा मिश्र व्यवसाय ₹. ७३८ कोटी इतका आहे.बँकेचा ऑडीट वर्ग सतत ‘ अ ‘ आहे. तसेच ₹. ५७ कोटी इतके स्वभांडवल असून बँकेने एकूण ₹. २१३ कोटी गुंतवणूक असून एन.पी.ए. ०% राखून बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा आर्थिक दृष्ट्या सक्षम व सुनियोजित व्यवस्थापन (FSWM) हा निकष पूर्ण केलेला आहे. मार्च २०२६ पर्यत ५०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण करणेचा संकल्प आहे. असे बँकेचे अध्यक्ष, मुकूंदराव देसाई यांनी सांगितले.
बँकेने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ योजने अंतर्गत तरुण उद्योजकांना बिनव्याजी कर्ज, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ यांची परतावा कर्ज योजना, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ व्याज परतावा कर्ज योजना व पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFE) मार्फत दिल्या जाणाऱ्या ₹.१० लाखापर्यतची सबसिडीची कर्ज देवून तरुण उद्योजकांना उभारी देण्याचे काम बँक करत आहे.
बँकेने ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा संकल्प केला आहे. रिझर्व्ह बॅकेकडून बँकेला नवीन शाखा – गारगोटी चालू करणेची मंजुरी दिली असून शाखेचे संपूर्ण फर्निचरचे कामकाज पुर्ण झाले असून दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी शाखा – गारगोटी सुरु करीत आहोत. असे बँकेचे अध्यक्ष श्री. मुकूंददादा देसाई व बँकेचे सीईओ श्री. एम.बी. पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. यासोबत बॅकेचे सर्व संचालक व अधिकारी वर्ग उपस्थित होते.


सना चॉंद यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद…
मान्यवरांकडून गौरवोदगार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आज पर्यंत कुठेही चित्रात न येता सेवाभावी वृत्तीने सना चांद यांनी सुरू ठेवलेले सामाजिक कार्य निश्चितच कौतुकास्पद असून त्यांच्या या कार्याची दखल वरिष्ठ मंडळी घेतील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. सामाजिक कार्यकर्ते सना चांद यांच्या वाढदिवस कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी आजरा अर्बन बँकेचे संचालक विलास नाईक, जनता शिक्षण संस्थेचे संचालक विजयकुमार पाटील, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुधीर कुंभार , तालुका भाजपा अध्यक्ष अनिकेत चराटी आदींची शुभेच्छापर भाषणे झाली. चांद यांच्या कार्याची दखल घेऊन नेतेमंडळी त्यांना अपेक्षित असलेला न्याय देतील असेही यावेळी मान्यवरांनी बोलून दाखवले.
कार्यक्रम प्रसंगी संभाजी पाटील, दिलावर चांद, रियाज तकिलदार, जुबेर चांद, रशीद लाडजी,निहाल चांद, शमशुद्दीन चांद, जमीर लाडजी, इरफान नेसरीकर, अझरुद्दीन दरवाजकर, इरफान दरवाजकर, मुस्ताक खेडेकर, मुजीब मुराद मुबारक चांद, असिफ हिंग्लजकर यांच्यासह तडाखा ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा ओबीसी अल्पसंख्याक सेलचे समीर चांद यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.


उत्तूर मध्ये लक्ष्मी विहीर परिसराची स्वच्छता मोहीम संपन्न

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत लक्ष्मी मंदिर परिसरातील जुनी लक्ष्मी विहीर परिसराची स्वच्छता करण्यात आली. विहिरीची स्वच्छता करून विहिरीच्या पाण्यात टीसीएल टाकून पाणी स्वच्छ करण्यात आले. या स्वच्छता उपक्रमात गावचे लोकनियुक्त सरपंच किरण आमणगी ग्रामपंचायत सदस्य संजय उत्तूरकर, महेश करंबळी संभाजी कुराडे, संदेश रायकर, सुनिता हत्तीर्गे ,सरिता करूनकर, सविता सावंत, सुवर्णा नाईक, बाळू सावंत ,महालक्ष्मी तरुण मंडळाचे कार्यकर्त्ते व्यंकटेश मुळीक, धनाजी गुरबे, ओंकार उत्तुरकर, बबलू लमतुरे, मारुती घोरपडे, विश्वास उत्तुरकर, इरफान लमतुरे , क्रांतिवीर रेडेकर, सोहम थोरवत ,सोहम भाईगडे ,धैर्यशील उत्तूरकर, विठ्ठल भाईगडे, सोहम उत्तूरकर, विश्वजीत उत्तूरकर ग्रामपंचायत कर्मचारी संजय पाटील, सचिन फाळके, महादेव मोरवडकर ,चंद्रकांत इंगळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वागत ग्रामपंचायत सदस्य संजय उत्तूरकर यांनी केले व आभार संभाजी कुराडे यांनी व्यक्त केले.


जनता गृहतारण संस्थेमध्ये दिपावली पाडव्याला १ कोटी ९८ लाख ४५ हजार ५०० रुपये ठेवींचे संकलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जनता सहकारी गृहतारण संस्था मर्या., आजरा या संस्थेमध्ये आजरा, गडहिंग्लज, गारगोटी, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली व पाटणे फाटा (चंदगड) शाखांमध्ये मिळून दीपावली पाडव्याच्या दिवशी तब्बल १ कोटी ९८ लाख ४५ हजार ५०० रुपये इतक्या ठेवींचे संकलन झाले असल्याची माहिती जनता सहकारी गृहतारण संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी दिली
संस्थेने कर्मचाऱ्यांना दिपावलीनिमित्त वाढीव वेतन वाढ दिलेने सर्व कर्मचाऱ्यांनी एकजूटीने प्रयत्न केलेने संस्थेमध्ये ठेवीचे प्रमाण वाढले असून ठेवीदारांचा व हितचिंतकांचा विश्वास वाढला आहे. “महाराष्ट्र राज्य “कार्यक्षेत्र मिळवणारी महाराष्ट्रातील एकमेव गृहतारण सहकारी संस्था आहे व आय एस ओ ९००१: २०१५ मानांकन प्राप्त संस्था आहे ही संस्थेची जमेची बाजू आहे. सर्व शाखा संगणीकृत आहेत. संस्था गृहकर्जासाठी १ कोटी ५० लाख पर्यंत व प्लॉट खरेदीसाठी १ कोटी पर्यंत कर्ज देत. संस्थेकडे SMS सुविधा. लाईट बील भरणा, RTGS / NEFT या सुविधा चालु आहेत. गडहिंग्लज व कोल्हापूर या ठिकाणी स्वमालकीच्या इमारतीत संस्थेची कार्यालये आहेत. सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांनी दाखविलेल्या प्रचंड विश्वासाबद्दल व कर्मचारी यांनी ठेव संकलनासाठी केलेल्या विशेष परिश्रमाबददल संस्थेचे चेअरमन मारुती मोरे व व्हा. चेअरमन प्रो. (डॉ) अशोक बाचूळकर व संचालक मंडळ, मॅनेजर मधूकर खवरे व प्रशासकीय अधिकारी मारूती कुंभार यांनी सर्वांचे अभिनंदन केले व ठेवीदारांचे आभार व्यक्त केले.


हरपवडे येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान धारकरी यांच्याकडून धनगर बांधवांना फराळ वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान, हरपवडे विभाग -आजरा यांच्या वतीने धनगर समाजातील बांधवांना फराळ वाटप करण्यात आले.
समाजातील एकोपा वाढवणे, परस्पर स्नेह वृद्धिंगत करणे आणि पारंपरिक सण आनंदाने साजरा करणे या उद्देशाने सदर कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत फराळाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमात धारकरी आदर्श भिमदिप हळवणकर यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान हरपवडे यांच्या कार्याविषयी माहिती दिली.या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी कुमार महादेव पाटील,प्रविण श्रीधर हळवणकर, अनिकेत सुरेश लटम,जोतिबा पांडुरंग पोवार, अविनाश महादेव पाटील उपस्थित होते.


अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथून सूतगिरणीच्या दिशेने सकाळच्या वेळी फिरावयास गेलेल्या अर्जुन रावजी भुईंबर ( रा. गडहिंग्लज रोड आजरा ) या ६३ वर्षीय व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सदर अपघात झाला.


आज तालुक्यात…
♦ वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
♦ स्व. विमलाबाई सरदेसाई सेवा संस्थान यांच्या वतीने नाम. प्रकाश आबीटकर यांच्या अध्यक्षतेखाली व अशोकअण्णा चराटी यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालय, आजरा येथे सकाळी १० वाजता ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.





