रविवार २२ जून २०२५


अन्याय निवारण पाठोपाठ अशोक अण्णाही गरजले… नगरपंचायत निवडणुकीचे नगारे वाजू लागले…

ज्योतिप्रसाद सावंत
पावसाळा संपताच आजरा नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम लागणार असून भर पावसात सत्ताधाऱ्यांसह विरोधक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अन्याय निवारण समितीने यापूर्वीच बैठक घेऊन नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासह १७ नगरसेवकांच्या जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
शुक्रवारी झालेल्या अण्णाभाऊ संस्था समूहाच्या पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमांमध्ये अशोक अण्णा चराटी यांनी थेट पालकमंत्र्यांच्या झेंड्याखाली आपण निवडणुकीला सामोरे जाणार व आपल्याच जागा निवडून येणार असा दावा केला आहे. भविष्यात काहीही होवो परंतु तूर्तास अशोक अण्णांसह अन्याय निवारण समिती निवडणुकीच्या तयारीला लागली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
निवडणुका पक्षाच्या लेबलवर होणार की स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरी देखील स्थानिक आघाड्याच होतील असा कयास बांधण्यास हरकत नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये विरोधकांनी थेट सत्ताधाऱ्यांची हात मिळवणी केल्यामुळे सभागृहात विरोधकच नाहीत अशी अवस्था तयार झाली. प्रभाग रचनेसह आरक्षण अद्याप झालेले नाही. तरी देखील गतवेळच्या आरक्षणाचा अंदाज घेऊन व संभाव्य आरक्षण गृहीत धरून अनेक मंडळी कामाला लागलेली आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून सत्ताधारी अशोकअण्णा चराटी यांनी तीनही विद्यमान आमदारांचा प्रचार करून त्यांचे पाठबळ मिळवले आहे. असे असले तरी आजरा शहरात पालकमंत्री अबिटकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पालकमंत्र्यांचे अनेक समर्थक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विधाने करताना दिसत आहेत. याचाच परिणाम म्हणून शुक्रवारच्या कार्यक्रमांमध्ये अशोक अण्णांनी तुमचीच कांही मंडळी आमच्या विरोधात आहेत असे पालकमंत्र्यांना जाहीरपणे सांगितले. त्यामुळे कांही आबिटकर समर्थक मंडळी अशोक अण्णांच्या थेट विरोधात जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
राष्ट्रवादीचे व शिवसेनेचे प्रत्येकी दोन गट, भाजपाचेही जुने व नवे कार्यकर्ते असे गट, राष्ट्रीय काँग्रेस व इतर छोट्या मोठ्या गटांच्या भूमिका अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. बाहेरगावचे मतदार व प्रभाग रचनेपासूनच निवडणूक प्रक्रियेवर अंकुश ठेवण्याचे काम अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून केले जात आहे. शहरातील मुस्लिम मतदारांचीही भूमिका निर्णायक ठरणार आहे. १७ पैकी सात मुस्लिम नगरसेवक सध्या प्रतिनिधित्व करत आहेत. भविष्यात यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने मुस्लिम समाजातील एखादी उमेदवारी पुढे येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
तूर्तास अन्याय निवारण समितीच्या पाठोपाठ अशोक अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हळूहळू इतर पक्ष व गटांच्या भूमिका स्पष्ट होत जातील त्यानंतर निवडणुकीतील संभाव्य आघाड्यांचे चित्र स्पष्ट होईल असे दिसते.

सुळे पोश्रातवाडी नजीक बिबट्याचा वावर… कुत्रे पळवले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सुळे पोश्रातवाडी येथे बिबट्याचा वावर असून दोन दिवसापूर्वी त्याने पोश्रातवाडी परिसरातील गंगाराम कोकीतकर यांचे कुत्रे पळवून नेले.
गंगाराम कोकितकर यांनी शेतामध्ये बाळगलेल्या दोन कुत्र्यांपैकी एक कुत्रे बिबट्याने पळवले. परिसरातील शेतीमध्ये बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले.
वाटंगी परिसरात आठवडाभरापूर्वी असणारा हा बिबट्या पोश्रातवाडीच्या दिशेने गेला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातमी आली...
गटर्सच्या कामाला सुरुवात झाली…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संकेश्वर – बांदा महामार्गावरील रस्त्याशेजारील गटर्स न बांधल्यामुळे आजूबाजूच्या घरामध्ये पाणी घुसण्याचे प्रकार धनगरमोळा परिसरात सुरू आहेत. जून महिन्यात ही परिस्थिती असेल तर पावसाळा कसा काढायचा ? असा प्रश्न येथील यशवंत जाधव यांच्यासह अन्य रहीवाशांनी उपस्थित केला होता. याबाबतची बातमी ‘मृत्युंजय महान्यूज’ मधून छायाचित्रासह प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर तातडीने बातमीची दखल घेत पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने पाईप टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
रस्त्यावरील संपूर्ण पाणी आजूबाजूच्या परिसरात पसरत असल्याने घरांना बेटाचे स्वरूप प्राप्त होत आहे. यामुळे प्रापंचिक साहित्याचे नुकसान तर होत आहेच परंतु सातत्याने येणाऱ्या या पाण्यामुळे पावसाळा कसा काढायचा ? हा प्रश्न आता अधोरेखित होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर सदर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. महामार्ग विभाग आणि तातडीने हालचाली सुरू केल्या असून पाणी पुढे जाण्याकरता पाईप टाकण्याचे काम सुरू केले आहे..

निधन वार्ता
तुळसाबाई पाटील

गवसे ता. आजरा येथील तुळसाबाई शंकर पाटील (वय ७२ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सचिव सुनील पाटील यांच्या त्या आई होत.

निधन वार्ता
आनंदा केसरकर

सुळे ता. आजरा येथील आनंदा आप्पाजी केसरकर ( वय ८८ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, दोन मुले,सूना, जावई , नातवंडे असा परिवार आहे
विजय केसरकर व अशोक केसरकर यांचे ते वडील होत.

जागतिक योगा दिन
आजरा महाविद्यालय

व्यंकटराव हायस्कूल
. पंडित दीनदयाळ विद्यालय
. रवळनाथ बालक मंदिर 
डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल
भादवण हायस्कूल 

फोटो क्लिक….आठवडा बाजार




