mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 शुक्रवार दिनांक १६ मे २०२५       

     आजपासून उत्तूरची महालक्ष्मी यात्रा…

          उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       चालू हंगामातील शेवटची व मोठी यात्रा अशी ओळख असणारी उत्तुर येथील महालक्ष्मी देवीची यात्रा आज शुक्रवार दिनांक १६ मे पासून सुरू होत आहे. उत्तूर बरोबर चव्हाणवाडीचीही यात्रा आज सुरू होत आहे.

       आज शुक्रवारी रात्री अकरा वाजता देवी महालक्ष्मीची मिरवणूक निघेल. त्यानंतर उद्या शनिवारी देवीची ओटी भरण्यासह भर यात्रा होईल.

     यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यती, क्रिकेट स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, रस्सिखेच स्पर्धा, वधु – वर परिचय मेळावा, यासह ऑर्केस्ट्रा व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

      यात्रेसाठी संपूर्ण उत्तूर नगरी सजली असून वाहतुकीचेही योग्य नियोजन करण्यात आले आहे. यात्रेसाठी पुणे – मुंबईसह ठिक ठिकाणचा चाकरमानी उत्तूर येथे हजर झाला आहे.

पावसाचा व्यत्यय…?

     ग्रामस्थांनी व यात्रा कमिटीने यात्रेचे नेटके नियोजन केले असले तरीही वातावरणात झालेल्या बदलामुळे पावसाचा यात्रेत व्यत्यय येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पावसाळी वातावरण…
मान्सूनची सुरुवात…?


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यामध्ये कालपासून मान्सून सदृश्य वातावरण निर्माण झाले असून मृग नक्षत्राप्रमाणे पाऊस सुरू झाल्याने शेतकरी वर्गामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

      पेरणीपूर्व मशागतीची कामे अद्याप सुरू असल्याने वळीव पावसाच्या जोरदार हजेरीनंतर आता गुरुवारपासून पावसाची रीपरिप सुरू झाली आहे. पावसामुळे काजू हंगाम संपुष्टात आला आहे.

        अचानक वातावरणातील बदलामुळे शेतकरी वर्ग मात्र संभ्रमावस्थेत आहे. यावर्षी उन्हाळी हंगामातील शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या यात्रा, जत्रा, धार्मिक कार्यक्रम व विवाह सोहळ्यांवर मात्र या पावसामुळे मर्यादा येताना दिसत आहेत.

जलसंधारण विभागाने लेखी पत्र दिल्याने गंगाराम आडूळकर यांचे उपोषण स्थगित…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      पाझर तलावात जमीन बुडीत होऊन तीन वर्षे झाली पण अजूनही जमिनीची रक्कम न मिळाल्याने मोरेवाडी ता.आजरा येथील शेतकरी गंगाराम आडूळकर यांनी कॉ. संपत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहकुटुंब उपोषण करणार असल्याचे लेखी पत्र तहसीलदार आजरा यांना दिले होते. काल गुरुवारी सकाळी ११ वाजता गंगाराम आडूळकर यांनी तहसील कार्यालयासमोर सहकुटुंब उपोषण सुरू केले.

      तहसीलदार समीर माने यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतले. जलसंधारणचे उपविभागीय अधिकारी सं.मु.कामेरीकर यांच्यासह कॉ. संपत देसाई चर्चेसाठी उपस्थित होते. चर्चेमध्ये प्रत्यक्ष स्थळपाहणी करून वहिवाटीप्रमाणे पंचनामे करण्यासाठी गुरुवारी महसूल विभागाचे अधिकारी, जलसंधारणचे अधिकारी आणि प्रकल्पग्रस्त यांच्यासह संयुक्त पाहणी करण्याचे ठरले. त्यानंतर खाजगी वाटाघाटीने जमिनीचा मोबदला बुडीत क्षेत्रप्रमाणे देण्याचे ठरले. तसे लेखी पत्र जलसंधारण विभागाने दिल्यानंतर बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

कानोलीत अर्चना देसाई ठरल्या होम मिनिस्टर विजेत्या….

महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कानोली (ता. आजरा) येथे लक्ष्मीदेवी यात्रेचे औचित्य साधून सरपंच सौ. सुषमा पाटील यांनी महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, स्पर्धेत ४३ महिलांनी सहभाग घेतला. सुप्रसिद्ध निवेदक विशाल बेलवळेकर-पाटील यांनी स्पर्धेत महिला भगिनींना शेवटपर्यंत खिळवून ठेवले, वयोवृद्ध महिलांनीही स्पर्धेत भाग घेऊन आनंद लुटाला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक – पैठणीच्या मानकरी सौ. अर्चना देसाई, द्वितीय क्रमांक सौ. स्नेहा देसाई तर तृतीय क्रमांक सौ. सुनीता सावरतकर यांनी पटकावला.

       स्पर्धेचे उद्घाटन श्रीमती लक्ष्मी गावडे, दयानंद गावडे यांनी केले, कार्यक्रमास सरपंच सौ. सुषमा पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुधीरकुमार पाटील, चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, शुभांगी पाटील,दिपाली सुतार, शंकर देसाई चंद्रकांत पाटील, चंद्रकांत आपगे, जयसिंग पाटील, प्रशांत देसाई, शंकर पाटील, अरविंद आपगे, गोपाळ भोगण भगवंत पाटील, यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. आभार सुभाष पाटील यांनी मानले.

वाटंगीत रवळनाथ महोत्सव उत्साहात

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      वाटंगी ता‌. आजरा येथील येथील ग्रामदैवत रवळनाथ महोत्सव सन २०२५ सर्व धार्मिक वातावरणात उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नोकरी निमित्य मुंबई,पुणे,गोवा ,कोल्हापूर व इतर ठिकाणी असणारे वाटंगीकरांनी कार्यक्रमात सहभागी होवून कार्यक्रम यशस्वी करण्यात हातभार लावला.

      जागराच्या निमित्ताने पुन्हा एकदा सोंगी भजनाच्या माध्यमातून वाटंगीच्या कलाकारांचा पूर्वीचा सुवर्णकाळ आठवला. मुलांचा हरिपाठ , महिला भजनी मंडळाची काकडा आरती,दिंडीमध्ये सहभागी झालेले सर्व वारकरी व महिला भगिनी , गावातील सर्व भजनी मंडळी, क्रिकेट स्पर्धा यामुळे कार्यक्रम अधिकच चांगला होण्यास मदत झाली. उत्सवानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रमही पार पडला.

     देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष विजय देसाई व सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

इस्रो उत्तुंगतेज बालवैज्ञानिक मुलाखत स्पर्धेत व्यंकटरावची गरुड भरारी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      इस्त्रो बाल वैज्ञानिक मुलाखत स्पर्धेत महाराष्ट्रातून निवड झालेल्या ५० विद्यार्थ्यांमध्ये व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजराच्या सौश्रुती अमित पुंडपळ , (राज्यात ३ री),स्वराज प्रवीण निंबाळकर, (राज्यात ८ वा) या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

       दोन्ही विद्यार्थ्यांना व्यंकटराव प्रशालेतील सौ. ए. डी. पाटील, श्री पी. एस. गुरव व श्री. व्ही.ए. चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ, प्राचार्य श्री. आर. जी. कुंभार, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार यांचे प्रोत्साहन लाभले.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

गवसेत आमदार आबिटकर यांच्या हस्ते आरोग्यकेंद्राचे उद्या भूमीपूजन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!