mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार दिनांक १९ एप्रिल २०२५       

बापूसाहे

राजा मनाचा दानशूर उद्योजक

           ‌‌   ज्योतिप्रसाद सावंत….

     आयुष्याचा प्रवास साऱ्यांच्याच नशिबात असतो. पण यशस्वी प्रवास मात्र एखाद्याच्या नशिबात असतो. स्वतःच्या प्रगती बरोबर समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना ठेवून विधायक कार्यक्रमांची जोड देत सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात धडाडीने काम करणारे बापूसाहेब सरदेसाई म्हणजे राजा मनाचा दानशूर उद्योजक असेच म्हणावे लागेल. वयाच्या ७५ व्या वर्षीदेखील त्यांचा उत्साह आणि जिद्द निश्चितच तरूणांना लाजवणारी आहे.

      उद्योगपती बापूसाहेबांचा जन्म ८ एप्रिल १९५० या साली आजरा तालुक्यातील निंगुडगे या ग्रामीण भागामध्ये झाला.घरची परस्थिती बेताची असताना ११ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्यानंतर टुल डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला. घरची जबाबदारी खांद्यावर असल्यामुळे पुण्याला जाऊन एका कंपनीत नोकरी करण्यास सुरूवात केली. नोकरी करत असताना त्यांच्या अंगी असलेला उद्योजकतेचा पिंड स्वस्थ बसु देत नव्हता. त्यामुळे ७ ते ८ वर्षे नोकरी करून नोकरीचा राजीनामा दिला व पुण्यामध्ये मंगळवार पेठेत १० x १० च्या खोलीमध्ये एक साधी ड्रील मशिन आणि तुटपुंजी साधने यांच्या सहाय्याने आपल्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.

      उद्योगाची सुरूवात केल्यानंतर त्यांना अनेक संकटे हाल-अपेष्ठा व आर्थिक अडचर्णीचा सामना करावा लागला. परंतु त्यातून ही हार न मानता बजाज ॲटो, पुणे या कंपनीची पहिली ऑर्डर मिळवली व त्यानंतर मागे वळून न पाहता. टेल्को, कायनेटीक होंडा, थरमॅक्स, कमीन्स इंडिया, फ्लीटगार्ड इ. अशा अनेक कंपन्यांसोबत आज ते काम करत आहेत.

      आज देसाई ऑटोकॉम पुणे च्या नावाने सुरू केलेल्या कंपनीचे पुण्यामध्ये वडगाव शेरी व वाघोली या ठिकाणी स्वतःच्या जागेमध्ये प्लांट सुरू आहेत. आज या कंपनीमध्ये जवळपास २०० कर्मचारी काम करत आहेत. तसेच आपण ज्या तालुक्यातून आलोय त्या तालुक्यासाठी सामाजिक व शैक्षणिक उद्देश ठेवून काहीतरी करावे या हेतून गवसे या गावी २० एकर जागेमध्ये बापूसाहेब सरदेसाई औद्योगिक, प्रशिक्षण संस्था व मार्सन मेटल इंडस्ट्रिज सुरू आहे. तसेच बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसेच्या इमारतीसाठी जागा. निंगुडगे गावामध्ये बापूसाहेब सरदेसाई ज्युनिअर कॉलेजची स्थापना. अशा अस्थापना निर्माण केल्या.

        भविष्यामध्ये या तालुक्यासाठी व जिल्ह्यासाठी इंजिनिअरींग कॉलेज व फार्मसी कॉलेज इंडस्ट्रिज निर्माण करून दुर्गम भागातील नागरीक व विद्यार्थी यांना सक्षम बनवणे हा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. पत्नी सौ. सुनंदा, एक मुलगा व दोन मुली यांची त्यांना समर्थ साथ आहे.

       आज त्यांचा अमृत महोत्सव सोहळा गवसे, ता. आजरा येथे संपन्न होत आहे. मृत्युंजय परिवारा मार्फत त्यांना हार्दिक शुभेच्छा…!

विवाहितेचा छळ प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      माहेरहून सोने व गाडी घेण्यासाठी पैसे आणण्याचा तगादा लावत जीवे मारण्याची धमकी देऊन शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी उत्तूर ता. आजरा /सध्या राहणार कापशी ता. कागल येथील दिपाली तेजस इंगळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती तेजस इंगळे व अन्य दोघे असे तिघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे असे पोलिसांनी सांगितले.

      पुढील तपास हवालदार बाजीराव कांबळे करीत आहेत.

‘व्यंकटराव ‘ मध्ये उद्या विशेष व्याख्यान…

         आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      आजरा महाल शिक्षण मंडळ संचलित व्यंकटराव प्रशालेच्या वतीने प्रसिद्ध वक्ते, लेखक, इतिहास अभ्यासक व कवी प्रा. मधुकर पाटील यांचे ‘उद्याच्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थी शिक्षक व पालक यांची भूमिका ‘ या विषयावर विशेष व्याख्यान उद्या रविवार दिनांक २० रोजी सकाळी आठ वाजता प्रशालेच्या शिमला मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे.

     विद्यार्थी व पालक यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या व्याख्यानाकरीता प्रवेश विनामूल्य असून विद्यार्थी व पालकांनी व्याख्यानाला उपस्थित राहावे असे आवाहन आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी व संचालक मंडळाने केले आहे.

आजरा साखर कारखाना अध्यक्ष निवडीच्या हालचाली वेगावल्या…

आज मुलाखती

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     वसंतराव देसाई आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवड मंगळवार दिनांक २३ रोजी होणार असून या निवडीच्या पार्श्वभूमीवर संचालकांची मते जाणून घेण्याकरिता वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांनी संचालकांना भेटीकरीता बोलावले असल्याचे समजते.

     वसंतराव धुरे यांनी कारखाना अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सदर पद हे रिक्त आहे. नूतन अध्यक्ष निवडी मध्ये सध्यातरी माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर व जनता बँकेचे विद्यमान अध्यक्ष मुकुंदराव देसाई ही दोनच नावे चर्चेत आहेत.

      सद्यस्थितीस कारखाना हा आर्थिक दृष्ट्या अडचणीत आहे. केवळ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व जिल्हा पातळीवरील काही प्रमुख नेते मंडळींच्या मदतीवर सध्या साखर कारखान्याची वाटचाल सुरू असल्यामुळे या निवडीमध्ये मंत्री मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

       आज मंत्री मुश्रीफ संचालकांची मते जाणून घेतील व त्यानंतर प्रत्यक्ष अध्यक्ष निवड पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीपूर्वी बंद लखोट्यातून नूतन अध्यक्षांचे नाव ऐनवेळी दिले जाण्याची शक्यता आहे.

आजरा ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस विभाग कार्यरत

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा येथे मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी अत्याधुनिक व सर्व अत्यावश्यक सेवांनी सुसज्ज डायलिसिस विभाग काल शुक्रवारपासून कार्यरत झालेला आहे. आजरा व शेजारील सर्व खेड्यापाड्यातील गरजू गोरगरीब रुग्णांना सदर सेवेचा लाभ देण्याच्या उद्देशाने सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाच स्वतंत्र सुसज्ज डायलिसिस मशीन, तज्ञ व अनुभवी डायलिसिस तंत्रज्ञ व कुशल सुज्ञ सपोर्टिंग स्टाफची व्यवस्था करण्यात आली आहे.

खेडे येथे रौप्यमहोत्सवी हरिनाम सप्ताहसोहळ्यास उत्साहात प्रारंभ

दींडी सोहळ्यात अबालवृद्धांसह महिलांचाही सहभाग

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      खेडे ता.आजरा येथील अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. खेडे येथील अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे यंदाचे २५ वे वर्ष आहे. यंदाच्या रौप्यमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहसोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष नियोजन करण्यात आले होते. या दींडी सोहळ्यात वारकरी, अबालवृदांसह महिलांचाही सहभाग होता.

       सकाळी सरपंच डॉ. संदीप देशपांडे यांच्या हस्ते पालखी पूजन तर उपसरपंच राहुल कातकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पालखी मिरवणूक व दींडी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. अखंड हरिनामाचा गजर आणि विठोबा-रखुमाई असा जयघोष करीत दींडी गावातील प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झाली. यावर्षी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गावातील दींडी बरोबरच सुलगांव, श्रृगांरवाडी येथील वारकरी दींड्याही या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. व्यासपीठ अधिकारी ह. भ. प. आनंदराव घोरपडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होत आहे.

     सप्ताहकाळात दररोज पहाटे काकडा आरती, पारायण, हरीपाठ, प्रवचन, किर्तन व भजन असे कार्यक्रम होणार आहेत. या सप्ताहसोहळ्याचा लाभ घेण्याचे अवाहन वारकरी सांप्रदाय, खेडे ग्रामस्थ, मुंबईकर ग्रामस्थ मंडळ खेडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत वंदना गाईंगडे चे यश

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत मुलींमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या गटात वंदना सुरेखा बाबू गाईंगडे हिने महाराष्ट्रात नववे स्थान प्राप्त केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील यमेकोंड या गावची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेली या मुलीने यश मिळवून कुटुंबाचे नाव उज्वल केले आहे. वंदना हिच्या यशाबाबत सर्वत्र कौतुक होत आहे.

शिल्पा डेळेकर-पाटील यांचे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत पारपोली गावठाण येथील शिल्पा संदीप डेळेकर-पाटील यांनी यश संपादन केले. त्यांची मंत्रालयात महसूल सहाय्यकपदी निवड झाली आहे.

      आजरा तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्फनाला धरणातील धरणग्रस्त असलेल्या पाटील यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वडिल महादेव पाटील हे सामाजिक कार्यकर्ते असून आजरा तालुका मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत. तर पती संदीप डेळेकर राज्य विक्रीकर निरिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

प्राजक्ता कांबळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     बुरुडे गावची सुकन्या कु. प्राजक्ता प्रमोद कांबळे हिने जिद्द व प्रयत्नांच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) २०२३ अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये यश मिळवले आहे.

       कोल्हापूर वनविभागांमध्ये तिची नियुक्ती झाली आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!