शनिवार दि.८ मार्च २०२५


कशासाठी अविश्वास…?

ज्योतिप्रसाद सावंत
विधानसभा निवडणुकांनंतर आजरा तालुक्यातील राजकीय समीकरणे बऱ्यापैकी बदलली आहेत. या बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास ठराव दाखल करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. सरपंच विश्वासात घेऊन काम करत नाहीत असा साक्षात्कार (?) होऊ लागल्यानंतर दाखल करण्यात येणारे हे ठराव प्रशासनाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहेत. कोरीवडे, भादवण येथे नुकतेच मतदारांना पुन्हा एक वेळ लोकनियुक्त सरपंचांवरील अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीला सामोरे जावे लागले. यातून काय साध्य झाले हे सर्वश्रृत आहे. अशा प्रकारामुळे गावातील राजकारण पुन्हा एक वेळ उफाळून येऊन गावच्या विकासाला खीळ बसत असल्याने कशाला हवेत हे अविश्वास ठराव ? असे म्हणण्याची वेळ आता मतदारांवर आली आहे.
वास्तविक अंतर्गत राजकारणाचा ग्रामीण भागाच्या विकासावर परिणाम होऊ नये म्हणून शासनाने लोकनियुक्त सरपंच ही संकल्पना पुढे आलेली. सरपंच निवडण्याचा अधिकार केवळ सदस्यांपुरता मर्यादित न ठेवता तो संपूर्ण गावातील सर्वच मतदारांना बहाल करण्यात आला. यामुळे लोकांच्या मर्जीने सरपंच निवडले जाऊ लागले. सत्तेवर बसलेल्या सरपंचाला अंतर्गत राजकारणातून बाजूला करण्यासाठी त्याच्यावर सुरुवातीला सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल करणे व पुढे तो मतदारांसमोर कौलाकरीता ठेवणे अशी प्रथा आता पडू लागली आहे.
यामुळे शासकीय यंत्रणा तर कामाला लागतच आहे परंतु त्याचबरोबर स्थानिक राजकारणामुळे विकास कामात अडथळे निर्माण होत आहेत. लोक नियुक्त सरपंच निवडीमुळे अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंच एका गटाचा तर इतर सदस्य दुसऱ्या गटाचे अशी अवस्था निर्माण झाली आहे. बहुमताच्या जोरावर सरपंचांना त्यांच्या विविध निर्णयांना सभागृहात रोखण्याबरोबरच विरोध करता येतो. असे असताना अविश्वास ठरावाचे नाट्य छोट्या छोट्या ग्रामपंचायतीच्या दृष्टीने निश्चितच हानिकारक आहे . लोकनियुक्त सरपंचांनीही कारभार करताना दक्षता बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा पाच वर्षाचा कालावधी हा विश्वास आणि अविश्वास नाट्यातच निघून गेल्यास आश्चर्य वाटू नये…
अडीच वर्षात दुसरी निवडणूक…?
भादवण येथील सरपंचावरील अविश्वास ठराव मतदान प्रसंगी टोकाची इर्षा दिसून आली. दोन्ही बाजूने लागलेली यंत्रणा पाहता या मतदानाला पुन्हा एक वेळ निवडणुकीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सभा, प्रचार यापासून ते अगदी मतदार आणण्यापर्यंत जय्यत तयारी दोन्ही बाजूने करण्यात आली होती. त्यामुळे अडीच वर्षात भादवणकरांनी पुन्हा एक वेळ ग्रामपंचायतीची निवडणूक अनुभवली असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

आजऱ्यात भैय्याजी जोशींचा निषेध
शिवसेना उबाठाकडून संभाजी चौकात निदर्शने

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भैय्याजी जोशी यांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने निषेध करण्यात आला. येथील संभाजी चौकात निदर्शने करण्यात आली.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे, उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शिवसैनिक एकत्र आले. त्यांनी श्री. जोशी यांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.
जिल्हा प्रमुख प्रा. शिंत्रे म्हणाले, छ. शिवराय व महाराष्ट्रातील महापुरुषांचा, मराठी माणसांचा स्वाभिमान दुखावण्याचे काम भाजपची मंडळी करीत आहेत. तरी देखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. एकीकडे छ. शिवरायांच्या विजयाच्या घोषणा द्यावयाच्या दुसरीकडे त्यांचा अपमान करणाऱ्यावर कोणतीही कारवाई करायची नाही. उलट त्यांना अभय देण्याचे काम या सरकार कडून होत आहे. हे निंदनीय आहे. युवराज पोवार यांचेही भाषण झाले.
गडहिंग्लजचे तालुका प्रमुख दिलीप माने, ओमकार माद्याळकर, विश्वास किल्लेदार, महादेव सुतार, संजय येसादे, दिनेश कांबळे, नारायण भडांगे, संजयभाई सावंत, बिलाल लतीफ, आनंदा येसणे, नारायण कांबळे, विष्णु रेडेकर, रवि सावंत, महेश पाटील, रोहन गिरी, रवी यादव, वसंत भुईंबर,रवी सावंत यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समग्र शिक्षा अभियानाच्या उपोषणात आज-यातील कर्मचारी सहभागी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सर्व शिक्षा अभियानातील विविध मागण्यासाठी आजरा तालुक्यातील सर्व कर्मचा-यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या उपोषण आंदोलनात सहभागी झाले आहेत.
ही योजना २००२ साली सुरू झाली आहे. सदर स्कीममध्ये ६००० कर्मचारी कार्यरत होते.यामध्ये वरिष्ठ लेखा सहाय्यक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, विषय तज्ञ, एम आय एस कॉर्डिनेटर ,इंजिनीयर, प्रोग्रॅमर वरिष्ठ लेखा लिपिक कार्यरत आहेत.यापैकी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालावधीमध्ये यातील ३हजार लोक परमनंट केले गेले असून,उर्वरित ३००० लोक हे अद्यापही प्रतीक्षेमध्ये आहेत.
आठ महिन्यापूर्वी कमिटी स्थापन केली गेली होती. पण त्याची एकही बैठक अध्याप लागली नाही. पुन्हा आता नव्याने कमिटी स्थापन करण्यात आली असून त्याला तीन महिन्याचा कालावधी दिलेला आहे. त्यामुळे निर्णय लवकर घेण्यासाठी कर्मचारी उपोषणाला बसले आहेत.यामध्ये वरिष्ठ लेखा सहाय्यक राकेश मोरे ,डाटा एन्ट्री ऑपरेटर वनिता घस्ती,विषय तज्ञ अरविंद कापसे व नामदेव माने आदींचा समावेश आहे.

लिंगवाडी- आजरा बसफेऱ्या सुरु करा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मौजे लिंगवाडी (ता. आजरा) या गावात एसटीच्या फेऱ्या सुरु कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आजरा आगार प्रमुखांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, लिंगवाडी हे गाव दुर्गम डोंगराळ भागात वसलेले आहे. गेली अनेक वर्ष येथील ग्रामस्थ एसटीच्या सेवेपासून वंचित आहेत. ग्रामस्थांची एसटी सोडण्याची सततची मागणी असून देखील एसटीच्या फेऱ्या सोडलेल्या नाहीत. विद्यार्थी, वयोवृध्द, रुग्ण, महीला यांना एसटी सेवा उपलब्ध नसल्याने पायपीट करावी लागते. या भागात वन्यप्राण्यांचा त्रास असल्याने जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. ग्रामस्थांना शासकीय कामे, बाजारहाट, वैदयकिय सेवा, शिक्षण यासाठी आजरा शहरात यावे लागते. त्यामुळे ग्रामस्थांना लिंगवाडीसाठी एसटीची सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने आंदोलन केले जाईल. असा इशारा दिला आहे.
निवेदनावर विजय कांबळे, शामराव कांबळे, विष्णुपंत कांबळे, पांडुरंग कांबळे, शशिकांत कांबळे, शिवाजी भादवणकर, बबन कांबळे, हर्षद लोंढे, अरविंद लोखंडे आदींच्या सह्या आहेत.

आजरा साखर कारखान्यात आरोग्य शिबिर संपन्न…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गवसे तालुका आजरा येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना येथे राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कारखान्याकडील सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जनरल तपासणी बरोबरच बीपी ,शुगर, हिमोग्लोबिन अशा प्रकारच्या ही तपासण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर उपचारही करण्यात आले.
यामध्ये एकूण १२५ कर्मचाऱ्यांची तपासणी केली आणि उपचार करण्यात आले. यामध्ये वाटंगी पी.एच.सी. चे वैद्यकीय अधिकारी डॉ. मलाईका शेख यांच्या नेतृत्वाखाली डॉ.विक्रम गदळे डॉ.वैष्णवी पाटील डॉ. अलका जाधव यांच्यासह सुपरवायझर व आरोग्य सेवक १५ जणांच्या टीमने काम पाहिले. शिबिर यशस्वी पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे सर्व खाते प्रमुख उपखाते प्रमुख व स्टाफ यांनी परिश्रम घेतले


निधन वार्ता…
परशराम पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हाजगोळी तिठ्ठा येथील शासकीय लेखा परीक्षक परशराम बंडू पाटील ( वय ७३ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. विजय प्रेस, खेडेचे ते मालक होत.
रविवार दिनांक ९ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता रक्षा विसर्जन कार्यक्रम आहे.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

सोमवार पासून चित्रानगर येथे श्री. नागनाथ सप्ताह सोहळा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चित्रानगर येथे सालाबादाप्रमाणे यंदाही दिनांक १० व ११ मार्च २०२५ रोजी नागनाथ सप्ताह सोहळा साजरा होत आहे.
सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ०८ रोजी रात्री ठीक ९ वाजता ४५ किलो वजनी गटातील भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक ०९ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता खास महिलांसाठी “खेळ पैठणीचा” (होम मिनिस्टर) त्यानंतर ठीक ९ वाजता महिलांसाठी हळदी कुंकू तर दिनांक १० रोजी दुपारी ठीक १२ वाजता विणा उभारणी कार्यक्रम व रात्री ११ वाजता “गर्जा महाराष्ट्र” (ऐतिहासिक कार्यक्रम) होणार आहे.
दिनांक ११ रोजी सकाळी ठीक ७ वाजता पालखी सोहळा व त्यानंतर दुपारी ठीक १२ ते महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे.
ग्रामस्थ मंडळ, चित्रानगर, अष्टप्रधान प्रतिष्ठान चित्रानगर. मुंबई ग्रामस्थ मंडळ, चित्रानगर सप्ताह सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.



