बुधवार दि. १८ डिसेंबर २०२४


ठसे सापडले…
खबरदारीच्या सूचना

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील किटवडे, धनगरमोळा परिसरात पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांना फस्त करणाऱ्या पट्टेरी वाघाच्या पावलांचे ठसे मिळवण्यात वन विभागाला यश आले असून या भागातील वाघाचा वावर स्पष्ट झाला आहे. वनविभागाने या भागातील नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
आजरा तालुक्यातील किटवडे आणि सुळेरान येथे पट्टेरी वाघाच्या हल्ल्यात बैल, व म्हैशीसह तीन जनावरे मृत्युमुखी पडल्याने या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या विशेष पथकाने वाघाच्या पंजाचे ठसे मिळवले आहेत. त्यामुळे वाघाचे येथील अस्तित्व अधोरेखित झाले आहे. वाघाच्या हल्ल्यात बचाराम विष्णू चव्हाण, मधुकर पांडुरंग राणे ( किटवडे ) व रघुनाथ भाऊ पाटील ( सुळेरान ) यांची पाळीव जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.
हाळोली गावानजिकच्या पाणवठ्याशेजारी देखील रक्ताचे सडे पडलेले ग्रामस्थांना आढळले तर दोन दिवसापूर्वी काही स्थानिक महिलांनी या परिसरात वाघाची डरकाळीही ऐकली असल्याचे सांगितले जाते. एकंदर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये हत्ती आणि गव्यांनंतर पट्टेरी वाघाने दहशत निर्माण केली आहे.

‘भूमी अभिलेख ‘ चा पेरणोलीत सावळा गोंधळ… एकाची मालमत्ता दुसऱ्याच्या नावावर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील पेरणोली येथे भूमी अभिलेख विभागाच्या कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसू लागला असून यापूर्वी केलेले सिटी सर्वे रद्द करावेत अशी मागणी सरपंचांसह ग्रामस्थांनी तालुका भूमी लेख अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे
पेरणोली ता. आजरा गावचा गावाचा सिटीसर्वे करणेची प्रक्रिया १९९७ साला पासून सुरु आहे. याबाबतची कोणतीही कागदपत्रे भूमी अभिलेख कार्यालयाने ग्रामपंचायतीला संपर्क न करता पूर्ण केलेली आहेत असे निदर्शनास आले आहे. ही प्रक्रिया पार पाडत असताना शासनाच्या नियमानुसार कोणतीही नियमावली अवलंबलेली नाही. आणि चुकीच्या पध्दतीने मालमत्ता पत्रक ऑनलाईन अपलोड केलेली आहेत. यामुळे गावातील १००% मालमत्ता धारकांच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे येत असून याबाबत आपले कार्यालयाकडून माहिती घेतली असता त्याकरिता फी भरून अपील दाखल करणेबाबत सुचना केली जात आहे. गावातील ५ ते १०% लोकांच्या तक्रारी असल्यास फी भरून अपील दाखल करणे सोयीचे झाले असते पण १००% मिळकत धारकांच्या तक्रारी असल्यामुळे फी भरून अपील दाखल करणे गावच्या नुकसानीचे ठरत आहे. व प्रत्येक वेळी जिल्ह्याच्या कार्यालयाकडे तक्रारी दाखल करणे ग्रामीण भागातील नागरिकांना शक्य नसलेने आपण जिल्ह्याच्या कार्यालयास शिफारस करून जुन्या नियमाने झालेली सिटीसर्वे प्रक्रिया पूर्णपणे रद्द करून ऑन लाईन केलेला डाटा डिलीट करावा व नवीन नियमानुसार ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करून नाविन अद्यावत मालमत्ता पत्रके मिळावीत अशी मागणी प्रेरणावली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतची लेखी निवेदन तालुका भूमी लेख अधिकाऱ्यांना सरपंच सौ.प्रियांका जाधव, ग्रामसेवक संदीप चौगले, संतोष जाधव निलेश चव्हाण आदींनी दिले आहे.

बापरे…
सिरसंगीजवळ धडकी भरवणारा गव्यांचा कळप
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वन्य प्राणी आणि आजरा तालुका यांचे अनोखे नाते निर्माण झाले आहे. हत्तीसह गवेही आता दिवसाढवळ्या तालुकावासीयांना दर्शन देत आहेत. सिरसंगी (ता. आजरा) येथील आजरा-नेसरी रस्त्यावर रामलिंग मंदिराजवळ गव्याच्या कळपाचा वावर आहे. त्यामुळे वाहनधारकांत भीतीचे वातावरण आहे. वाहन चालवताना दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सिरसंगीनजीक रामलिंग मंदिर आहे. येथून आजरा-नेसरी मार्ग जातो. या मार्गावर वाहतूक मोठी आहे. मात्र, गेले काही दिवस या परिसरात गव्याचा कळपाचा वावर आहे. हा कळप रस्त्यावर उतरत असल्याने वाहतूक ठप्प होण्याचे प्रमाण वाढले आहे. मोठ्या संख्येने गवे अचानक रस्त्यावर येत असल्याने वाहनधारकांची तारांबळ उडते. अनेकदा अपघातही घडले आहेत. रविवारी रस्त्यावर गव्यांचा कळप उतरला होता. धडकी भरवणारा हा प्रकार पहा👇

केंद्र शाळा व कन्या शाळा उत्तूर शाळेस जनरल चॅम्पियनशिप...

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अध्यक्ष चषक उत्तूर केंद्रांअंतर्गत झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये केंद्र शाळा व कन्या शाळेने घवघवीत यश मिळवले.
विजयी स्पर्धक पुढील प्रमाणे
लहान गट –
उंच उडी – वैभवराज यमगेकर – प्रथम
विराज जाधव – द्वितीय,१०० मी धावणे – श्रीतेज उत्तूरकर, प्रथम
मोठा गट –
खोखो मुले/मुली प्रथम,
कबड्डी मुले/मुली प्रथम
गोळा फेक – समर्थ धुरे-प्रथम,विभावरी घोरपडे -प्रथम, धनश्री भाटले -द्वितीय, थाळी फेक – स्वरांजली काटे – प्रथम,१०० मी धावणे – श्लोक सरावणे – प्रथम,नेहा लाड-द्वितीय
४०० मी धावणे – देवयानी ठाकूर – द्वितीय
४ x १०० मिटर रिले -मुले – द्वितीय,लांब उडी – श्लोक सरावणे प्रथम, वेदिका कुंभार प्रथम, उंच उडी – श्लोक सरावणे प्रथम, समर्थ कुराडे -द्वितीय, वेदिका कुंभार – प्रथम
या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संतोष गुरव,अनिल बामणे केंद्र प्रमुख संतोष बिल्ले तसेच क्रीडा शिक्षक दिपक कांबळे, प्रशांत पाटील, दिलीपकुमार राजदीप व शिवाजी कुदळे यांचे मार्गदर्शन मिळाले .
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सुभाष आजगेकर, दिनकर खवरे,संतोष शिवणे व सौ.अलका बामणे यांनी प्रयत्न केले.

जि.प.अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक
चाफवडे शाळेत उत्साहात संपन्न

. आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२४-२५ केंद्रशाळा चाफवडे येथे उत्साहात पार पडल्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख सुभाष विभुते होते. ग्रामपंचायत सदस्या सौ. तनुजा तुकाराम बापट, विजय भडांगे. शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष प्रकाश ठाकर, सौ.मनिषा रायकर सौ. सुगंधा हरळकर, हरिष दळवी यावेळी उपस्थित होते.
या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य व शाळा व्यवस्थापन कमिटीने विशेष परिश्रम घेतले.

निधन वार्ता
गणपती पोतदार

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर येथील गणपती गोविंद पोतदार ( वय ८५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
प्रशांत पोतदार व प्रा. किरण पोतदार यांचे ते वडील होत.





