mrityunjaymahanews
अन्य

अण्णाभाऊ समूहाचा शिवाजीराव पाटील यांना पाठिंबा जाहीर…

रविवार  दिनांक २० ऑक्टोबर २०२४

आपले भाऊ शिवाजी भाऊ चराटी समुहाचा शिवाजी पाटील यांना पाठिंबा कागलमध्ये पक्षाच्या आदेशाशी बांधिल

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

        चंदगड विधानसभा मतदार संघामध्ये गेली पाच वर्षे मतदारसंघाची विकासकामे आणून मशागत करणाऱ्या शिवाजीराव पाटील यांच्या पाठिशी आपण भक्कमपणे राहणार आहे. कागल मतदारसंघात मंत्री मुश्रीफ हे आपले शत्रू असले तरी वरीष्ठांच्या आदेशाशी बांधिल राहून त्यांना मदत करू. राधानगरी- भुदरगड मतदारसंघात मात्र गेली दहा वर्षे आमदार प्रकाश आबिटकर यांना आपण प्रामाणिकपणे साथ दिली आहे. परंतू त्यांचे विरोधकांना सोबत घेऊन काम सुरू असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत असल्याने राधानगरीबाबतचा प्रलंबित ठेवण्यात आला असल्याचे प्रतिपादन आण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी व्यक्त केले. कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या आजरा येथील आयोजित मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

       प्रास्ताविकात सी. आर. देसाई यांनी कोळिंद्रे जि. प मतदारसंघच शिवाजीराव पाटील यांच्या विजयाचा शिल्पकार राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी शिवाजीराव पाटील म्हणाले, गतवेळी अशोकअण्णांनी साथ दिली असती तर हा विधानसभा मतदारसंघ दहा वर्षे मागे गेला नसता. कोणतेही पद नसताना तब्बल ९० कोटींचा निधी मतदारसंघात आणण्याचे काम आपण केले आहे. लोकसभा निवडणूकीत कोणताही पूर्वग्रह दुषितपणा न ठेवता प्रामाणिकपणे संजय मंडलिक यांचे काम केले. चालून आलेल्या आमदारकीवर गतवेळी लाथ मारणाऱ्या नंदाताईंना पुन्हा आमदार व्हावेसे आता वाटू लागले आहे. चंदगड, आजऱ्यासह या परिसराला पर्यटनाच्या दृष्टीने भरपूर वाव असताना गटातटाच्या राजकारणात शिक्षण, आरोग्य, पर्यटन यामध्ये तालुका मागे पडला. भविष्यात या परिसराला विविध उद्योगांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

आपल्या रक्तात भाजप असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली व भरमूअण्णा पाटील अशोकअण्णा चराटी यांच्यासह कार्यकर्त्यांच्या जोरावर विधानसभा निवडणूक लढायची आहे आणि जिंकायचीही आहे हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे असे त्यांनी सांगितले.

      यावेळी सुरेश रेडेकर, यांनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्याला उत्तम रेडेकर, विजकुमार पाटील, दशरथ अमृते, सुरेश डांग, रमेश कुरूणकर, समीर पारदे, संभाजी सरदेसाई, आतिषकुमार देसाई,एम.टी.पाटील, विकास बागडी,कुमार पाटील, सुरेश सावंत, संतोष चौगले,एम. टी. पाटील,योगेश पाटील ,सिद्धेश नाईक,प्रकाश पाटील यांच्यासह कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध संस्थांचे पदाधिकारी व आण्णा भाऊ गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचलन विलास नाईक यांनी केले तर सुरेश सावंत यांनी आभार मानले.

त्यांचा पक्ष कोणता…?

      त्यांचे वडील, मेव्हणे, सासरे यांचे नेमके पक्ष कोणते होते हे अद्याप मतदारांना समजलेले नाही. धड एक पक्ष नसणाऱ्यांनी स्व विकासाला प्राधान्य देणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये असा टोला राजेश पाटील यांना उद्देशून शिवाजी पाटील यांनी लगावला.

तीनही आमदार आपल्याच विचाराचे…

        कागलसह राधानगरी, भुदरगड व चंदगड विधानसभा मतदारसंघ या तीनही मतदार संघातील आमदार हे आपल्याच विचाराचे निवडून येतील असा विश्वास यावेळी अशोकअण्णा यांनी व्यक्त केला. आपले भाऊ… शिवाजी भाऊ… असे उपस्थितांकडून त्यांनी वधवून घेतले.

पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ…

दोघे जखमी


         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      पेरणोली ता.आजरा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने काल शनिवारी धुमाकूळ घालत ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण केली. कुत्र्याच्या हल्ल्यात दोघे जखमी झाले आहेत. किरण पांडुरंग सावंत, संगीता ज्ञानोबा घुरे अशी जखमींची नावे आहेत.

      शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याचे पेरणोलीत आगमन झाले. शेतावरून परतणारे ग्रामस्थ, डेअरीकडे दूध घालावयास जाणाऱ्या महिला व यांच्या दिशेने त्याने जोरदार हल्ला चढवला. यामध्ये दोघेजण जखमी झाले.

       जखमींवर आजरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.ग्रामसंस्कार वाहिनीवरून कुत्र्यापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राधानगरीबाबत अशोकअण्णांकडे निर्णयाचे सर्वाधिकार

प्रमुख कार्यकर्त्यांचा निर्णय

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आमदार आबिटकर यांना येत्या विधानसभा निवडणुकीत मदत करायची की नाही यासह  निवडणुकीत राधानगरी भुदरगड मतदारसंघात कोणती भूमिका घ्यायची याचे सर्वाधिकार पश्चिम भागातील अशोकअण्णा चराटी गटाच्या कार्यकर्त्यांनी चराटी यांना दिले आहेत.

      आजरा येथे चराटी गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी बैठकीमध्ये राधानगरी भुदरगड मतदारसंघात नेमकी कोणती भूमिका घ्यायची यावर जोरदार चर्चा झाली.गत पाच वर्षात आलेले बरे – वाईट अनुभव लक्षात घेऊन या पुढील भूमिका ठरवावी जेणेकरून कार्यकर्त्यांचा सन्मान राहील असा सूर या बैठकीत उमटला. यावेळी पश्चिम भागातील प्रमुख कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या भूमिका मांडल्या.

      येत्या विधानसभेसाठी राधानगरी मतदारसंघाबाबत अशोकअण्णांनीच निर्णय घ्यावा. त्याला आम्ही बांधील राहू. असे सांगत निर्णयाचे अधिकार चराटी यांच्याकडे सोपवले.

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे इच्छुक उमेदवारांकडून तालुक्यातील नेतेमंडळीच्या भेटी गाठीतून मनधरणी सुरु झाली आहे. तर दुसरीकडे तालुका पातळीवरील नेते प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेवून त्यांची मत जाणून घेत आहेत. त्यामुळे तालुक्यात राजकीय घडामोडींना ऊत आला आहे. अशावेळी राधानगरी- भुदरगड विधानसभा मतदारसंघाबाबत चराटी यांनी सावध भूमिका घेतली आहे. बैठकीतील एकंदरी सूराचा आढावा घेतला असता या गटाकडून राधानगरी – भुदरगड मध्ये धक्कादायक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चंदगडबाबत आज रविवारी बैठक…?

      चंदगडबाबत पूर्व भागातील कोळींद्र जिल्हा परिषदेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आज रविवारी बैठ होणार असल्याचे समजते.

चंद्रकांत गडकरी यांचे निधन

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       सरंबळवाडी तालुका आजरा येथील चंद्रकांत तुकाराम गडकरी (वय वर्ष वर्षे ६४ ) यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी महात्मा फुले विद्यालय महागाव येथे शिक्षक म्हणून काम केले असून, पदोन्नतीने मलिग्रे हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक म्हणून काम केले आहे. अभ्यासू व शिस्तप्रिय शिक्षक म्हणून ते परिचीत होते.

     त्यांच्या पश्चात आई ,पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.

अभिजातच्या दर्जामुळे मराठीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल : प्रा. डॉ. दत्ता पाटील           मराठी अभिजात भाषा गौरव समारंभ उत्साहात

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. यामुळे नव्या पिढीला भाषेबद्दल आस्था, प्रेम तयार होईल. भाषेचे जतन, संवर्धन व संगोपन करण्यास मदत होईल. मराठी भाषा समृध्द होईल. असे प्रतिपादन डॉ. घाळी महाविद्यालय गडहिंग्जलचे प्राचार्य डॉ. दत्ता पाटील यांनी केले.

       येथील चैतन्य सृजन व सेवा संस्था, आजरा आणि शिक्षण तपस्वी डॉ. जे. पी. नाईक नागरी पतसंस्था यांच्यावतीने मराठी भाषा गारव समारंभ उत्साहात झाला. या वेळी कविता वाचनाचा कार्यक्रमही झाला. या वेळी प्रा. डॉ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. जे. पी. नाईक पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवशंकर उपासे, सुभाष विभुते, सुनिल सुतार, सुरेश दास प्रमुख उपस्थित होते.

      रविंद्र देसाई यांनी स्वागत केले.  प्रा. पाटील म्हणाले, मराठी भाषेतील पहिला शिलालेख सुमारे २२०० वर्षापुर्वीचा मिळाला आहे. नाणेघाटात याची नोंद असून तो ब्राम्ही लिपीत आहे. येथून पुढे सलग या भाषेत साहित्यासह ज्ञान परंपरा चालत आलेली आहे. याची नोंद समितीने घेतली. अभिजात भाषेच्या दर्जामुळे मराठी भाषा समृध्द होण्यास मोठी मदत होणार आहे.  डॉ. शिवशंकर उपासे, दयानंद उपासे, अनुष्का गोवेकर, राजश्री गाडगीळ क्षितीजा उपासे, उत्तम कोकीतकर यांनी कविताचे वाचन केले. प् या वेळी डॉ. मारुती डेळेकर यांनी सुत्रसंचालन व बळवंत शिंत्रे यांनी आभार मानले.

       कार्यक्रमाचे नियोजन मुख्य व्यवस्थापक संतोष जाधव, संजय तेजम, प्रताप होलम, निकिता स्वामी, तुषार येरुडकर, उत्तम कुंभार, सुभाष पाटील यांनी केले.

पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी…
ग्राहक पंचायतीची मागणी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     अवकाळी पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व शेतकऱ्याला आर्थिक संकटातून बाहेर काढावे अशी मागणी ग्राहक पंचायतीने शासन दरबारी केली आहे.

     कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड अवकाळी पाऊस पडला असून अजूनही पाऊस पडत आहे. हातातोंडाला आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. काढणी पश्चात सतत पावसामुळे पिकांची वाळवणी होत नाही त्यामुळे भात, भुईमूग, सोयाबीनसह सर्वच खरीप हंगामातील पिके खराब होत आहेत. भात पीक आडवे पडले असून भुईमुगाच्या शेंगा जमिनीतच उगवल्या आहेत. घातलेला खर्च सुद्धा निघत नाही. याच्यावर त्वरित शासकीय यंत्रणेने पंचनामे करून अहवाल मागवून नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच पिकविमा कंपनीला सुद्धा आदेश व्हावेत अशी विनंती करत आहोत. एक रुपया मध्ये विमा त्याचबरोबर स्वतंत्रपणे सोसायटीमार्फत विमा असे विमा उतरून सुद्धा जर त्यांना नुकसान भरपाई मिळत नसेल तर हे शेतकरी ग्राहक यांच्यावर अन्याय होणारे आहे. असेही या निवेदनात म्हटले आहे

     ग्राहक पंचायत महाराष्ट्र आजरा- गडहिंग्लज- चंदगड- भुदरगड विभाग प्रमुख शिवाजी गुरव व अन्य पदाधिकाऱ्यांनी सदर मागणी केली आहे.

ओढ्यात वाहून आल्या चक्क ५०० रुपयांच्या नोटा ! पैसे हुडकण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी !!


      ओढ्याच्या पाण्यातून कचरा, सांडपाणी वाहतानाचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. मात्र सांगली जिल्ह्यातील आटपाडी या शहरात लोकांना चक्क पाचशे रुपयांच्या नोटा वाहताना दिसून आल्या. नागरिकांनी ते मिळवण्यासाठी ओढ्यात शोधाशोध केल्याचे एका व्हिडीओत दिसून येत आहे. आटपाडीत शनिवारचा बाजार होता. आटपाडीच्या गदिमा पार्कच्या समोरून जाणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून पाचशे रुपयांच्या नोटा वहात आल्या. आटपाडीतील शनिवारच्या बाजारासाठी आलेल्या लोकांना या नोटा ओढ्यात सापडल्या. अनेक लोक नोटांची शोधाशोध करत असल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे. पाण्यात हात घालून, कचरा बाहेर फेकून पैसे मिळतात की नाही ते बघत होते. अनेकांना  पाचशे रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्या.

      सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या गदिमा पार्कच्या समोरून जाणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून पाचशे रुपयांच्या नोटा वाहून आल्या. नोटा हुडकण्यासाठी लोकांची गर्दी तर बघणाऱ्यांचीही तुफान गर्दी झाली.

     ओढ्याजवळ बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. लोक कचरा साचलेल्या ओढ्यात पैशांची शोधाशोध करत होते. ५०० रुपयांच्या नोटा मिळातात की काय ? या उत्सुकतेने लोक ओढ्याकडे बघत होते. एक महिला नोट दाखवत असल्याचे व्हिडीओत दिसून येते. नोट परत करणार असल्याचं देखील ती म्हणाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

        (viral news…online news)

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969



 

 

संबंधित पोस्ट

सौ.शोभा घाटगे यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!