दि. १५ सप्टेबर २०२४


ज्ञान व वाचन मंदिरांबरोबरच आरोग्य मंदिरे उभारण्याचे भाग्य : आम. प्रकाश आबिटकर
गवसे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेली २४ वर्षे विविध कारणांनी रखडलेले गवसे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर पूर्णत्वास जात असल्याचा आनंद आपणाला असून आजरा तालुक्यातील पश्चिम भागातील आरोग्यसेवेचे गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण असणारे स्वप्न पूर्ण करण्याचे भाग्य लाभले यांचे समाधान असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.
गवसे (ता.आजरा) येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार आबिटकर बोलत होते. यावेळी आमदार आबिटकर यांच्या हस्ते गवसे प्राथमिक आरोग्य केंद्र नूतन इमारतीचा लोकार्पण तसेच गवसे परिसरातील २५ कोटी ३९ लाखांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी केले.
आमदार आबिटकर म्हणाले,१९७८ पासून या भागातील लोकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी होती मात्र अनेक कारणांमुळे ते रखडले होते. आपण २०२२ साली प्रशासकीय मंजुरी घेत दोन वर्षांच्या आत काम पूर्ण केले. ठरवले तर कोणतीही गोष्ट शक्य होते याचे गवसे प्राथमिक आरोग्य केंद्र हे उदाहरण आहे. तालुक्यातील पश्चिम भागासाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरणारे आहे. निर्णायक टप्पा पूर्ण केल्याचे समाधान मिळाले. सुसज्ज असे उभारलेले हे आरोग्य केंद्र १४ हजार लोकांसाठी उपयुक्त ठरणारे आहे. आरोग्य सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यापुढे चांगली सेवा द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, रणजीत पाटील व अप्पर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संजय रणवीर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास तहसीलदार समीर माने, जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, प्रा.अर्जुन आबिटकर, माजी नगराध्यक्षा जोस्त्ना चराटी, सौ. सुनीता रेडेकर, मुकुंद देसाई, उदय पवार, सौ.रचना होलम, सौ.मनीषा देसाई,सौ.रेखा पाटील ,अभिषेक शिंपी, सहदेव नेवगे, रणजित सरदेसाई, दशरथ अमृते, रवींद्र होडगे, सुरेश होडगे, परशुराम बामणे, संजयभाऊ सावंत, अशोक जांभळे, इंद्रजित देसाई, सुधीर कुंभार, गोविंद पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ .यशवंत सोनवणे, बांधकाम उपअभियंता सूर्यकांत नाईक, चिंतामणी लोंढे, निलेश चौगुले, नेताजी कातकर, विश्वास जाधव, विलास पाटील, गोविंद पाटील, धनंजय पाटील, इंद्रजीत देसाई, डॉ. रवींद्र गुरव, युनूस सय्यद,सौ. प्रियांका जाधव, मारुती डोंगरे, एस. पी. कांबळे, सुनील देसाई, संतोष भाटले, लहू वाकर, लहू पाटील, अंकुश पाटील, अविनाश हेब्बाळकर, राजू होलम, विजय थोरवत,सौ. सरिता कांबळे यांच्यासह परिसरातील सरपंच, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
संतोषची आठवण…
गवसे भागातील विकास कामांचा पाठपुरावा करणाऱ्या कै. संतोष दिवेकर याची आठवण आमदार आबिटकर यांनी कार्यक्रम प्रसंगी आवर्जून काढली. या कार्यक्रमास संतोषची अनुपस्थिती निश्चित जाणवली असेही ते म्हणाले.
लवकरच सर्फनाल्याचे पाणी पूजन…
सर्फनाला प्रकल्प पूर्णत्वास गेला असून तालुक्याच्या हरितक्रांतीचे स्वप्न साकार करण्यात यापुढे महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्फनाला प्रकल्पाचे लवकरच समारंभपूर्वक पाणी पूजन केले जाईल असे यावेळी आम.आबिटकर यांनी सांगितले.
लाडक्या बहिणीची गर्दी…
गवसे येथील या कार्यक्रमास महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. लाडक्या बहिणीच्या या गर्दीमुळे सभामंडप तुडुंब भरला होता.

कारखाना नूतन संचालक दिगंबर देसाई यांचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा सहकारी साखर कारखान्याच्या शासन नियुक्त तज्ञ संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री. दिगंबर देसाई यांचा कसबा नूल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री रामगोंड पाटील, धोंडीराम शिंदे, मोहन काका उर्फ आप्पासाहेब यादव, अरविंद काका मोहिते, माजी सभापती काजी , रामगोंडा अण्णा पाटील, आजप्पा मास्तोळी,, मारुती चितारी, पी. एम. चव्हाण, जयसिंग चव्हाण, इमाम मुल्ला , आनंदराव काळे, विकास शिंदे, तुकाराम गायकवाड, शिवानंद देसाई, उमाकांत चव्हाण, चंद्र वदन भोसले व मान्यवर उपस्थित होते.


निधन वार्ता…
कृष्णा शिंत्रे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बेलेवाडी हुबळगी (ता.आजरा) येथील माजी सरपंच व आजरा तालुका शेतकरी संघाचे माजी संचालक कृष्णा रामू शिंत्रे (वय ७८) यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन आज रविवारी आहे.


गणेश दर्शन
अष्टविनायक तरुण मंडळ किणे

अध्यक्ष : रितेश सुतार
उपाध्यक्ष : साहिल केसरकर
सचिव : किशोर नांदवडेकर
खजिनदार : दिगंबर घोळसे
क्रांतिकारी भगतसिंग तरुण मंडळ, शिरसंगी

अध्यक्ष : प्रसाद माटले. उपाध्यक्ष : योगेश बुडके खजिनदार : निवृत्ती बुडके मूर्ती देणगीदार : अनंत विठ्ठल सुतार


आज तालुक्यात…

♦आज रविवार दिनांक १५ रोजी सकाळी ८.०० वाजता बाजारपेठ मित्र मंडळ , उत्तूर यांच्यावतीने उत्तूर मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
♦भाजी मार्केट व्यापारी गणेशोत्सव मंडळ आजरा यांच्या वतीने आज रविवारी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत देसाई हॉस्पिटल, गडहिंग्लज व श्री ऑप्टिशियन, नेसरी यांच्यातर्फे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
♦सुभाष गल्ली गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आजरा येथे दुपारी बारा ते तीन या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुगली…की यॉर्कर…
‘युक्त’ ते ‘मुक्त’…बैठकीतलाच निर्णय

तसे ते ‘राजकीय दृष्ट्या संवेदनशील’ गाव अशीच त्या गावाची ओळख. पण बहुतांशी तरुणाई गांजाच्या आहारी गेल्याची असणारी चर्चा गावगाडा चालवणाऱ्यांच्या दृष्टीने एक मोठी डोकेदुखीच ठरत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रमुखांच्या उपस्थितीत याबाबत बैठकही पार पडली. अखेर गाव ‘गांजा’ मुक्त करण्याचा निर्धार वृत्तपत्रांच्या बातम्यातून प्रसिद्ध झाला.
बातम्या पाहून तालुकावासीयांचे डोळे विस्फारले . अप्रत्यक्षरीत्या प्रसिद्ध बातम्यांमुळे संपूर्ण गाव गांजाच्या आहारी गेले आहे की काय ? अशी चर्चा आता तालुक्यात सुरू झाली आहे. असतीलही काही महाभाग गांजाच्या आहारी गेलेले. पण चर्चा मात्र संपूर्ण गावाची सुरू झाली. यात इतर सरळमार्गी तरुणांचा काय दोष…?


