

गणेशवाडीत राडा…
९ जखमी.. ३ गंभीर
११ जणांविरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील गणेशवाडी येथे जमीन कसण्याच्या वादातून जोरदार हाणामारी होऊन यामध्ये ९ जण जखमी झाले आहेत.यापैकी तिघांना गडहिंग्लज येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल झालेल्या असून पोलिसांनी एकूण ११ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की…
गणेशवाडी (ता.आजरा) येथील गट नंबर २४६ मधील बांबर नावाच्या शेतामध्ये सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये तरवा काढण्याचे काम चाळके कुटुंबीयांकडून सुरू होते. सदर जमीन कसण्यावरून वाद असल्याने तेथे संजय मनगूतकर, सिताराम पारपोलकर, दत्तात्रय पारपोलकर, उमेश डेळेकर, मसु डेळेकर वगैरे मंडळी आली. तरवा काढण्यासंदर्भात पुन्हा जोरदार वाद सुरू झाला. वादाचे पर्यवसान लाठी काठी व शेती उपयुक्त साहित्याने मारामारीत झाले. यामध्ये शोभा संजय चाळके, संजय शंकर चाळके, चंद्रकांत कृष्णा चाळके, वसंत जयराम चाळके, आप्पा कृष्णा चाळके, सुमन महेश चाळके, संजय भाऊ मनगुतकर,सिताराम नारायण पारपोलकर,दत्ता नारायण पारपोलकर हे नऊ जण जखमी झाले असून यापैकी संजय शंकर चाळके, चंद्रकांत कृष्णा चाळके व आप्पा कृष्णा चाळके यांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संजय मनगुतकर यांच्या फिर्यादीवरून संजय चाळके,चंद्रकांत चाळके, वसंत चाळके, आप्पा चाळके, शोभा चाळके व सुमन चाळके यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर शोभा संजय चाळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय भाऊ मनगुतकर, सिताराम नारायण पारपोलकर ,दत्तात्रय नारायण पारपोलकर, उमेश चिमाजी डेळेकर व मसू तुकाराम डेळेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.


कॉ.संपत देसाई यांचे ‘ एका लोकलढ्याची यशोगाथा ‘
शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष आणि रस्त्यावरचा लढाऊ बाण्याचा कार्यकर्ता अशी ज्यांची ओळख आहे त्या कॉ. संपत देसाई यांचे ‘ एका लोकलढ्याची यशोगाथा ‘ हे पुस्तक शिवाजी विद्यापीठातील कला शाखेत मराठी विभागाच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमाला लावले असून या पुस्तकामुळे आजरा परिसरात लढला गेलेला कष्टकऱ्यांचा लढा विद्यापीठीय पातळीवर अभ्यासाला जाणार आहे.
सर्वार्थाने फाटकी असलेली माणसं नैतिकता आणि आत्मविश्वासाच्या बळावर शासनासारख्या सर्वशक्तिमान अशा बलाढ्य व्यवस्थेला कशी नामोहरण करू शकतात, आपल्या न्याय मागण्यांसाठी संविधानाच्या चौकटीत राहून सूत्रबद्ध आणि रचनात्मक संघर्ष कसा उभा करू शकतात याचे दर्शन या पुस्तकातून घडते. आपली बाजू न्याय असेल तर अशावेळी परस्पर विश्वासाने आणि लोकशाही मार्गाने लढा कसा उभारावा आणि तो कसा यशस्वी करावा याचे शास्त्र या पुस्तकात लेखक कॉ. संपत देसाई यांनी उलगडून सांगितले आहे. लोकांच्या प्रश्नावर मोठे लढे होतात आणि नोंदी अभावी काळाच्या उदरात ते गायब होतात किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जातात, या दृष्टीने या पुस्तकाचे अनन्यसाधारण महत्व आहे.
या पुस्तकात जसे लढ्याबद्दलचे वास्तव आहे तसेच या परिसराच्या स्थानिक संस्कृतीबद्दलही हे पुस्तक तितक्याच आत्मीयतेने बोलते. आजरा परिसरातील रूढी, परंपरा, प्रथा इथलं समाजजीवनही या पुस्तकात सुंदररीत्या आलं आहे. अनेक व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्यांसह या परिसरातील जशी माणसं भेटतात तसा इथला निसर्गही भेटतो. इथल्या माणसांचं निसर्गाशी असलेलं अतूट नातं, या माणसांचं अभावग्रस्त जगणं याबद्दलची आस्था या लेखनात पाझरत राहते. तीच आस्था तोच कळवळा संपूर्ण पुस्तकभर पसरला आहे.


पुन्हा आजरा परिसर विद्यापीठाच्या अभ्यासात…
यापूर्वी ‘ मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या ‘ अशी मने असे नमुने ‘ या पुस्तकानंतर हे पुस्तक अभ्यासाकरता ठेवण्यात आले होते. आजरा तालुक्यातील कॉ. संपत देसाई यांचे हे दुसरे पुस्तक शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात अभ्यासक्रमाला लागले असल्याने आजरा परिसराचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास या निमित्ताने विद्यापीठातील अनेक विद्यार्थी अभ्यासणार आहेत.

पाऊस -पाणी

आजरा मंडल मध्ये शनिवार दिनांक ६ जुलै २०२४ सकाळी सात वाजल्यापासून ते रविवार दिनांक ७ जुलै २०२४ सकाळी सात वाजेपर्यंतच्या २४ तासात ५० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

