mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


शासन जबाबदारी घेईना..?

३५५ प्रकल्पग्रस्त खातेदार दि.१० जुलै रोजी आंबेओहोळ प्रकल्पात जलसमाधी घेणार…?

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     स्वेच्छा पुनर्वसन व आर्थिक पॅकेज बाबत मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देऊनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने आंबेओहळ प्रकल्पग्रस्त संतप्त झाले असून त्यांनी याप्रकरणी १० जुलै रोजी जलसमाधी घेण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

     आंबेओहोळ प्रकल्पात एकूण ८२२ खातेदार आहेत या पैकी ३५५ शेतक-यांना त्यांची कोणतीही मागणी नसताना निवाडयातील सर्व रक्कम उचला व तुम्हाला भरघोस स्वेच्छा पुनर्वसन देवू असे अमिष दाखवून तत्कालीन भूसंपादन अधिकारी यांनी तूटपुंज्या रकमेवर शेतक-यांची जमिन संपादन केली आहे व बेकायदेशीर स्वेच्छा निवाडे करुन प्रकल्पग्रस्तांना एकरी एक लाख सात हजार इतके तुटपुंजे स्वेच्छा अनुदान मंजूर केले आहे. परंतु काही सुशिक्षित शेतक-यांनी तात्कालीन अधिका-यांना न जुमानता निवाडयातील रकमेपैकी ६५ टक्के रक्कम भरून पर्यायी जमिन किंवा विशेष आर्थिक पॅकेज एकरी १४ लाख ४० हजार इतकी भरघोस अनुदान मिळालेले आहे.

     प्रकल्प एक निवाडा एक जमिनीही एकच मग स्वेच्छा पुर्नवसन व आर्थिक पॅकेज याच्यात एवढा फरक का असा प्रश्न शेतक-यांना पडल्यानंतर यातील जवळ जवळ २०० लोकांनी याबाबत उच्चन्यायालय, मुंबई येथे अनेक दावे दाखल केले होते. यावर मुंबई उच्चन्यायालयाने ते प्रकल्पग्रस्त आहेत का हे तपासा व असतील तर त्यांचे ६५ टक्के रक्कम भरून घ्या असा आदेश केला असतानासुध्दा तत्कालीन जिल्हा पुर्नवसन अधिकारी श्री. तुषार ठोंबरे यांनी यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

     तसेच याबाबत मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी अनेक बैठका घेवून आम्हा प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रशासन याबाबत कोणताच निर्णय घेण्यास तयार अथवा जबाबदारी घेत नाही. या पार्श्वभूमीवर ३५५ प्रकल्पग्रस्त खातेदार यांनी दि.१० जुलै २०२४ रोजी आंबेओहोळ प्रकल्पात सविनय पध्दतीने जलसमाधी घेणार असल्याचे लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

    या पत्रावर शंकर पावले, संजय येजरे,पांडुरंग पाटील, जोतिबा गुरव, संभाजी पाटील, शिवाजी खवरे, विलास पाटील, विश्वनाथ आजगेकर आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

रासूबाई मंदिर अखेर उघडले...

पूजेची जबाबदारी आजर्‍यातील रवळनाथ देवस्थान उप समितीकडे

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान उपसमितीचा निर्णय


         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     हरपवडे येथील श्री रासूबाई मंदिराच्या पार्श्वभूमीवर स्थानिक देवस्थान समिती ग्रामस्थ व गुरव समाज आपापल्या मतावर ठाम असल्याने गेले काही दिवस हे मंदिर कुलूप बंद अवस्थेत होते. या प्रश्नी गुरव समाजाने वेळोवेळी आंदोलनेही केली होती. परंतु काही ग्रामस्थ, उप समिती सदस्य व गुरव समाज यांच्यातील हा वाद सोडवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न होऊनही हा वाद सुटला नव्हता. या वादाच्या पार्श्वभूमीवर देऊ खुले करावे अशी मागणी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत करण्यात आली होती.

     अखेर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सदर देऊळ उघडण्याचा निर्णय घेतला असून आज पोलीस बंदोबस्तात मान्यवरांच्या उपस्थितीत देऊळ खुले करण्यात आले. पूजाअर्चेसह इतर जबाबदारी आजरा येथील रवळनाथ मंदिर देवस्थान उपसमितीला पुढील आदेश येईपर्यंत देण्यात आली आहे.

     यावेळी स्थानिक ग्रामस्थ, गुरव मंडळी व आजरा येथील रवळनाथ मंदिर देवस्थान उप समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

धोकादायक झाडे हटवा …वनविभाग, बांधकामला  तहसीलदार माने यांच्या सूचना

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा- पेरणोली मार्गावर धोकादायक अवस्थेत सुबाभू‌ळची झाडे आहेत. ही झाडे वादळी पावसात कोसळण्याची भिती आहे. दोन दिवसांपूर्वी याच मागोवर रात्रीच्या वेळी एक झाड कोसळले होते. त्यामुळे या मार्गावरील वहातू‌क ठप्प झाली होती. या पार्श्वभूमीवर आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांनी आज पहाणी दाउँरा केला. या मार्गावरील धोकादायक अवस्थेत असलेली झाडे हटवण्याची सूचना वनविभाग व बांधकाम विभागाला तहसीलदार माने यांनी केली आहे.

     आजरा- पेरणोली मार्गावर बांबूरीयम परिसर व साळगाव गायरानात धोकादायक अवस्थेत असलेली सुबाभूळची झाडे आहेत. ही झाडे पावसाळ्यात कोसळण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. यामुळे वहातुक ठप्प झाली आहे. वहानधारक व स्थानिक रहिवाशानी धोकादायक झाडे हटवण्याची मागणी अनेकदा वनविभाग व बांधकाम विभागाकडे केली आहे. तरीही याबाबत हालचाली झालेल्या नाहीत. ही झाडे हटवावीत अशी मागणी पेरणोली ग्रामपंचायतीने वनविभाग व बांधकाम विभागाकडे केली आहे. दोन दिवसांपूर्वी या मार्गावर सुबाभूळचे झाड पडल्याने वहातू‌क ठप्प झाली होती. मोठ्या वादळी पावसात ही झाडे कधीही कोसळ्याची भिती व्यक्त होत आहे. तहसीलदार श्री. माने यांना ही बाब लक्षात आणून दिल्यावर त्यांनी आज या मार्गावरचा पहाणी दौरा केला. त्यांनी वनविभाग व बांधकाम विभागाला धोकादायक अवस्थेत असलेली झाडे काढण्याची सूचना केली आहे. लवकरच या बाबत कार्यवाही केली जाणार असल्याचे समजते.

     सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव या वेळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या हाताला कौशल्य देण्याचे काम व्होकेशनल विभागात – प्राचार्य डॉ. सादळे


         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     विद्यार्थ्यांच्या हाताला कौशल्य देण्याचे काम आजरा महाविद्यालयातील व्होकेशनल विभागामध्ये गेले अनेक वर्ष सुरू आहे. विद्यार्थ्यांनी या विभागाचा निकाल, रोजगार व स्वयंरोजगाराची परंपरा यापुढेही कायम ठेवावी असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी केले. ते अकरावीच्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात बोलत होते. प्रमुख उपस्थिती कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील होते.

     महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. व्होकेशनल विभागाची गौरवशाली परंपरा यापुढील काळातही विद्यार्थ्यांनी कायम ठेवावी असे आवाहन कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील यांनी केले. व्होकेशनल विभागातील विविध अभ्यासक्रमांची माहिती मनोजकुमार पाटील यांनी सांगितली.

     साक्षी देसाई, लहू सावंत व साहील कांबळे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

     सर्व विभाग व त्या ठिकाणाहून चालणारे कामकाजाची माहिती संदीप देसाई यांनी करून दिली.कार्यक्रमास नेहा पेडणेकर, सुषमा पारकर, तेजस्विनी शेवाळे, अल्बर्ट फर्नांडिस यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन संदीप देसाई यांनी केले.


.

संबंधित पोस्ट

दरोड्याचा २४ तासात तपास ….

mrityunjay mahanews

आजरा तालुक्यातील सहकार आदर्शवत… माजी खासदार महाडिक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

स्वामी विवेकानंद पतसंस्था ही जिल्ह्यातील अग्रणी पतसंस्था : चंद्रकांत दादा पाटील…कोरीवडे येथे चोरी…आजरा तालुक्यात जोरदार पाऊस

mrityunjay mahanews
error: Content is protected !!