

पिण्याच्या पाण्यासाठीची माता-भगिनींची पायपीट थांबल्याचे समाधान :
राजे समरजितसिंह घाटगेवझरेपैकी घागरवाडीत कुपनलिकेच्या पाण्याचे पूजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पिण्याच्या पाण्याच्या सोयीमुळे माता-भगिनींची पायपीट थांबल्याचे समाधान वाटते.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.वझरेपैकी घागरवाडी (ता.आजरा) ग्रामपंचायत व त्यांच्या सहकार्याने खोदलेल्या कुपनलिकेच्या पाणी पूजनवेळी ते बोलत होते.
घाटगे पुढे म्हणाले,केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कागल,गडहिंग्लज-उत्तूर विधानसभा मतदारसंघांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांची कुपनलिका, सौर प्रकल्प अशा पर्यायातून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.नागरिकांना पिण्याचे शुद्ध व मुबलक पाणी उपलब्ध करून देणे लोकप्रतिनिधी म्हणून आमचे कर्तव्य असून त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत.
उपसरपंच मंगल भालेकर म्हणाल्या, समरजितसिंह घाटगे यांच्याकडे घागरवाडीच्या महिलांनी महिनाभरापुर्वी पिण्याच्या पाण्याबाबत कैफियत मांडली होती. त्यांनी त्याची त्वरित दखल घेतली व कुपनलिकेच्या माध्यमातून पाण्याची सोय करून दिली.राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूर जिल्हा पाणीदार झाला. त्यांचाच वारसा त्यांनी या माध्यमातून जोपासला आहे.
यावेळी सरपंच शांताबाई गुरव, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम कुंभार, शितल कांबळे, विद्या जाधव,मधुकर खोत,जनार्दन निऊंगरे,सुर्यकांत पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्सव पाणी पूजनाचा…
घाटगे यांच्या प्रयत्नातून खोदलेल्या कुपनलिकेमुळे घागरवाडीतील तीनशेहून अधिक नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली. त्याचा पाणी पूजन सोहळा नागरिकांनी उत्सव म्हणून साजरा केला.महिलांनी आंबील घुगऱ्यासह मिरवणुकीने आणलेल्या गारव्यासह घाटगे यांची वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली व त्यांच्याच हस्ते विधिवत पाणी पूजन केले. पिण्याच्या पाण्याची सोय केल्याबद्दल घाटगेंचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

केवळ अंदाजच…
ऑरेंज अलर्ट आणि पावसाची हुलकावणी…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज ॲलर्ट दिला होता. रविवार, सोमवार, मंगळवार तर तुफान पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याचे अंदाज होते. परंतु असा कोणताही प्रकार घडला नसून कांही ठिकाणी वादळी पाऊस वगळता अन्यत्र पावसाने हुलकावणीच दिली आहे.
आजरा तालुक्यामध्ये तर गेले तीन दिवस उघडीप आहे. पावसाचे वातावरण होते परंतु पाऊस नाही अशी स्थिती आहे. हवामान खात्याच्या अंदाजामुळे बळीराजा सुखावला होता. प्रत्यक्षात मात्र पावसाने पाठ फिरवली आहे.
भाताचे प्रचंड उत्पादन घेणाऱ्या आजरा तालुक्यातील शेतकरी वर्ग सध्या जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

कानोली येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कानोली (ता. आजरा) येथे १० वी १२ वी परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
येथील भैरवनाथ मंदिर येथे झालेला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ .सुषमा पाटील होत्या.
स्वागत व प्रास्तविक सुभाष पाटील यांनी केले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणार आला.
१० वी व १२ वी हा करीअर घडविण्याचा मार्ग आहे. यापुढे शैक्षणिक काळात दिशा देण्याचे काम अन विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठेवून वाटचाल करावी असे आवाहन सुभाष पाटील यांनी केले.यावेळी ग्रा. पं. सदस्य सुधीर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमास शंकर देसाई, अनंत पाटील, चंद्रकांत पाटील, अनिल पाटील पाठीक यांच्यासह १० वी १२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.



