

‘वंचित’ चे शिलेदार शाहू छत्रपतींसाठी उठवताहेत रान
. आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया व महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी ‘वंचित’चे शिलेदार ताकतीने रणांगणात उतरले असून ग्रामीण भागामध्ये प्रचाराचे रान उठवत आहेत.
‘वंचित बहुजन विकास आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डि.के. कांबळे, जिल्हा संघटक पंचरत्न कांबळे,तालुका उपाध्यक्ष दीपक कांबळे, तालुका संघटक सागर कांबळे, शशिकांत कांबळे, दयानंद कांबळे, मोहन कांबळे, मारुती कांबळे, तुषार कांबळे, राजु केदारगोळ, सचिन कांबळे प्रचार आदींनी सकाळपासूनच गाववार संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
साळगाव,पेरणोली , हरपवडे, कोरिवडे, देवकांडगाव, दाभिल,शेळप या गावांमध्ये वंचित चे कार्यकर्ते घराघरात जाऊन शाहू छत्रपतींना विजयी करण्याचे आवाहन करत आहेत.

यावेळी प्रथमच ‘वंचित’ चे कार्यकर्ते उत्साहाने व ताकतीने प्रचार यंत्रणेत उतरले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. राजर्षी शाहू महाराज हे आमचे आदर्श आहेत त्यांच्या विचारांचा व रक्ताचा वारसा चालवणारे शाहू छत्रपती यांना संसदेत पाठवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे यावेळी दत्तात्रय कांबळे यांनी सांगितले.
तो कृतघ्नपणा ठरेल…
जातीभेदाच्या भिंतीच्या पलीकडे जाऊन राजर्षी शाहूंनी कोल्हापूर जिल्हा व महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला पुरोगामी दिशा व विचार देण्याचे काम केले आहे. बहुजन समाजासाठी त्यांचे योगदान कदापिही विसरून चालणार नाही.ते विसरल्यास तो कृतघ्नपणा ठरेल. अशा या राजर्षी शाहूंचे विचार कृतज्ञतेच्या भावनेतून दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी राजश्री शाहूंना विजयी करावे असे आवाहन यावेळी कार्यकर्ते करत आहेत.

यहाँ पे सब शांती शांती है...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीचा प्रचार मागील आठवड्यात शिगेला पोहोचलेला असताना सध्या मात्र तालुक्यामध्ये प्रचार यंत्रणेत मरगळ आल्याचे दिसत असून दोन्ही बाजूने प्रचार यंत्रणा थंडावल्या असून सर्वत्र शांतता दिसत आहे.
उन्हाचा तडाखा,विवाह सोहळे, यात्रा-जत्रा,सुट्टया यामुळे प्रचार यंत्रणा थंडावल्याचे दिसत आहे. मध्येच पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा शेतीकामात गुंतला आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांच्या नेतेमंडळींना आपलेच कार्यकर्ते घेऊन ठीक ठिकाणी मोजक्या मतदारांना भेटी देताना चे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. हाताच्या बोटावर मोजण्याइतके मतदार आणि ढीगभर कार्यकर्ते असेच या फोटोंमधून स्पष्ट होत आहे.
मतदारांनाही निवडणुकीबाबत फारशी उत्सुकता दिसत नाही. या सर्वाचा परिणाम म्हणून मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आता व्यक्त होऊ लागली आहे.
एकंदर तालुक्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे तापलेले वातावरण मतदानापूर्वी हळूहळू शांत होऊ लागले आहे.

आजरा साखर कारखान्याकडे बिड भागातील तोडणी वाहतुकदारांना ॲडव्हान्सचे वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ या गळीत हंगामाकरीता ४ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून त्यानुसार कारखान्यास आवश्यक सक्षम तोडणी वाहतुकीचे करार करणेचे काम सुरू आहे. ज्या वाहतुकदारांचे कराराच्या कागदपत्रांची पुर्तता पुर्ण झालेली आहे अशा वाहतुकदारांना धोरणा नुसार कारखाना संचालक व अधिकारी यांचे हस्ते ॲडव्हान्सच्या पहिल्या हप्त्याच्या चेकचे वाटप करणेत आले तसेच कारखान्यांने ठेवलेल्या उद्दिष्टा प्रमाणे ऊस उपलब्ध व्हावा या करीता आजरा गडहिंग्लज, चंदगड या भागातील ऊस नोंदीचे काम सुरू असून सदर ऊस गाळपाकरीता आणणेसाठी प्राधान्यांने स्थानिक यंत्रणा करणेचे धोरण संचालक मंडळाने आखले आहे. त्याकरीता आजरा गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील स्थानिक तोडणी वाहतुक यंत्रणेचे करार करणेचे काम चालू आहे. ज्या स्थानिक तोडणी वाहतुक कंत्राटदारांना करार करावयाचे असतील त्यांनी कारखाना कार्यस्थळ गवसे येथे शेती ऑफिसशी संपर्क साधून आपले करार करावेत असे आवाहन कारखान्याचे चेअरमन, श्री. वसंतराव धुरे यांनी सांगीतले.
यावेळी संचालक श्री. मुंकुदराव देसाई, श्री. मारूती घोरपडे, श्री.दिपक देसाई, श्री. रणजित देसाई, श्री.राजेश जोशीलकर, श्री.अशोक तर्डेकर, श्री.हरी कांबळे, श्री. रशिद पठाण, प्र.कार्यकारी संचालक श्री. व्यंकटेश ज्योती. मुख्य शेती अधिकारी श्री. युवराज पाटील, श्री.भुषण देसाई, अॅग्री ओव्हरसिअर अन्य अधिकारी व कारखाना कर्मचारी उपस्थित होते.

भाजपाच्या गावोगावी भेटीगाठी

. आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारसाठी प्रत्येक गावामध्ये गाठीभेटी घेण्यात आल्या.
शेखर मंडलिक यांच्यासोबत भाजप तालुका अध्यक्ष बाळ केसरकर, शिवाजी खामकर, आभिजित शिंदे,रुपेश परीट,राहुल पेंडसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राज्य मार्ग, महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे आंदोलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राज्यमार्ग व महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या वतीने आजरा येथे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले यावेळी सहाय्यक अभियंता एम्.एस्.मेत्री यांनी निवेदन स्वीकारले आंदोलनादरम्यान तहसील कार्यालयातून आंदोलनकर्त्यांची विचारपूस करून निवडणुकीनंतर बैठक घेण्याबाबत आश्वासन देण्यात आले.
आंदोलनामध्ये शिवाजी गुरव गणपतराव येसणे, शिवाजी इंगळे, शंकर पुंडपळ, सदू शिवणे, विशाल गुरव, आनंदा येसणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


