
चेहरे चर्चेतले…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रान उठल्या पासून आजरा तालुक्यामध्ये महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी आणि इंडिया ,महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी काँ. संपत देसाई ठिकठिकाणीच्या प्रचार सभांना हजेरी लावून प्रचाराचा धुरळा उठवत आहेत. या लोकसभा निवडणुकीत हे चेहरे तालुकावासीयांच्या नजरेत पुन्हा एकदा आले आहेत.
अशोकअण्णा…छे रजनीकांत
अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा यांनी प्रा. मंडलिक यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. तालुक्यामध्ये अशोकअण्णा बोल्ड आणि बिनधास्त अशी प्रतिमा असणारा नेता आहे. कोणाला काहीही वाटू दे मनात आहे ते स्पष्ट आणि जाहीररित्या बोलून टाकायचे असा अण्णांचा स्वभाव. यातून अनेक वेळा त्यांची विधाने धाडसी ठरतात. परवाच्याच आजरा येथील सभेमध्ये ते कागल मधून समरजितसिंह घाटगे यांना तर चंदगड मधून शिवाजी पाटील यांना पुढच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत आमदार करणारच असे सांगून मोकळे झाले. व्यासपीठावर चंदगडचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांचे मेहुणे प्रा. मंडलिक व महायुतीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांना दुखावणारी ही विधाने असूनही जे मनात आहे ते बोलून टाकले. एकंदर त्यांची प्रचार यंत्रणा राबवण्याची पद्धत व संघटन पाहून प्रा. मंडलिक यांनी हे अशोकअण्णा नसून हे तर जादूगार रजनीकांत आहेत असे सांगितले. उपस्थितांनीही प्रा. मंडलिक यांच्या विधानाला चांगलीच दाद दिली.
यश-अपयश या बाबींचा फारसा विचार न करता निवडणूक म्हटली की झोकून देऊन काम करायचे अशी अशोकअण्णांची वृत्ती. सोबत कोण आहे त्यांना घेऊन पुढे जायचे जे नसतील त्यांचा फारसा विचार करायचा नाही यामुळे अशोकआण्णा या लोकसभा निवडणुकीत निश्चितच चर्चेत आहेत.
कॉ संपत देसाई… दमदार वक्ता
तालुक्यात गेल्या पंचवीस -तीस वर्षापासून डाव्या चळवळीतून पुढे आलेला अभ्यासू कार्यकर्ता म्हणून संपत देसाई यांचा परिचय आहे. या लोकसभा निवडणुकीत ते इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारात दिसत आहेत. अत्यंत अभ्यासपूर्ण अशी मांडणी करून केवळ व्यासपीठावरील नव्हे तर समोरील श्रोत्यांवरही त्यांच्या वक्तृत्वाचा प्रभाव निश्चितच जाणवतो.प्रत्येक मुद्द्याला उदाहरणाची जोड देत अत्यंत प्रकटपणे आपली मते मांडायची ती समोरच्यांना पटवून द्यायची ही कला त्यांना चांगलीच अवगत आहे. तालुक्यातील शाहू छत्रपतींच्या संपर्क मेळावे व बैठकांमध्ये त्यांच्या हातात माईक निश्चितच दिला जातो. आपण शाहू छत्रपतींच्या पाठीशी राहण्याचा निर्णय का घेतला तिथपासून ते शाहू महाराजांना संसदेत का पाठवायचे इथपर्यंतची त्यांची मांडणी समोरच्या श्रोत्यांना भावणारी दिसते.
त्यांच्या भाषणामध्ये जातीपातीच्या राजकारणाला असणारा कडवा विरोध निश्चितच जाणवतो. त्यामुळे व्यासपीठावरील इतर व्यक्तेही त्यांच्या उपस्थितीत बोलताना कॉ. संपत देसाई व्यासपीठावर आहेत व ते आपल्या एखाद्या वादग्रस्त विधानाला थेट विरोध करू शकतात याचे भान ठेवूनच भाषण करताना दिसतात.
एकंदर लोकसभा प्रचाराच्या रणधुमाळीत तालुक्यामध्ये महायुतीकडून अशोक अण्णा चराटी व महाविकास आघाडीकडून काँ. संपत देसाई हे निश्चितच त्यांच्या एकंदर भाषणावरून चर्चेत दिसत आहेत.

आजरा तालुक्यात भाजपा कार्यकर्ते प्रचारासाठी घरोघरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी आजरा तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते गावोगावी व घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेत आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे यांना पुन्हा पंतप्रधान करणेसाठीआणि कोल्हापूर लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करताना हे कार्यकर्ते दिसत आहेत.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार,अरुण देसाई आणि नगरसेवक आनंदा कुंभार, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष उदयराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मसोलीसह विविध गावांमध्ये मतदारांशी संवाद साधण्यात आला.

गव्यांकडून काजू झाडांचे नुकसान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गवा रेड्यांच्या कळपाकडून डॉ.धनाजी गोविंद राणे रा. वेळवट्टी यांच्या हुंबराचे पाणी या शेतीमधील काजू झाडांचे गव्यांनी नुकसान केले आहे.
काजूची झाडे बुंध्यापासून उपसून टाकली आहेत. यापूर्वी हत्तीनेही त्यांच्या काजू पिकासह मेसकाट्यांचे मोठे नुकसान केले आहे. हत्ती व गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे



