mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


विनयभंग… मारामारी
६ जणांविरोधात गुन्हा नोंद

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     शेळप ( ता.आजरा) येथे दोन कुटूंबात मारामारी होवून दोन्ही कडील ६ जण जखमी झाले आहेत.दोघांनीही परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केल्या असून आजरा पोलिसांनी मारामारी व विनयभंग प्रकरणी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शेळप बस थांब्यानजीक घडला.

     भिकाजी सिताराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राग मनात धरून भरत धोंडीबा पाटील, प्रकाश धोंडीबा पाटील, गौरव भरत पाटील व मनिषा प्रकाश पाटील यांनी भिकाजी सिताराम पाटील व सुमंता सिताराम पाटील यांना मारहाण केली.यात भिकाजी यांच्या डोक्याला व पायांना मार बसला आहे.

     मनिषा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मनिषा पाटील यांना अश्लील शिवीगाळ करत विनयभंग केला. शिवाय प्रकाश पाटील व भरत पाटील शेतावरुन परत येत असताना त्यांना अडवून काठीने मारहाण केली यामध्ये मनिषा, प्रकाश,भरत व मुलगी प्रिती जखमी झाले आहेत.

    दोघांच्या  परस्परविरोधी फिर्यादीनुसार आजरा पोलिसांनी दोन्ही कुटूंबातील ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील तेरा गावे मतदानावर बहिष्कार टाकणार…?

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

संकेश्वर- बांदा महागार्माचे काम गेली दोन वर्षे चालु आहे. सदर महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. तसेच त्या जमिनीमधील फळ झाडे, मेसकाटी, बांबू बेटे, घरे, विहिरी व बोअरवेलही उध्वस्त झालेली आहेत. त्याची रीतसर नुकसान भरपाई अद्याप आम्हाला मिळालेली नाही. 5 मे पर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्यास १३ गावे मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. याबाबतचे लेखी निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

    या पार्श्वभूमीवर बोलताना कॉ. शिवाजी गुरव म्हणाले, याकामी मोर्चे काढले, आंदोलने केली, ज्या त्या कार्यालयाचे अधिकारी व शासन, आमदार, खासदार यांना निवेदने दिली. तरी सुध्दा आजतागायत कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई व बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे होणारे नुकसान अद्याप मिळालेले नाही. असे असताना रस्ता महामार्गाचे ठेकेदार यांनी ९०% काम पूर्ण केलेले आहे.

     याकरिता भुसंपादन अधिकारी (उपविभागीय अधिकारी गारगोटी) यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये ३१ मार्च पर्यंत निवाड्याची रक्कम आदा करण्याचे मान्य केले होते. त्यानंतर आता आम्हा शेतकऱ्यांना फक्त निवाडा नोटीसा दिलेल्या आहेत. अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. काही शेतकऱ्यांच्या जमिनी वाढीवमध्ये दुसरा निवाडा करण्याचे ठरले आहे. तो सुध्दा अद्याप झालेला नाही. ज्या शेतकऱ्यांनी निवाडा नोटीस प्रमाणे कागदपत्राची पुर्तता करुन दिलेली आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम अद्याप मिळालेली नाही.

     निवाडा रक्कमेपैकी २०% कपात न करता संपूर्ण रक्कम मिळावी व रेडीरेकनर दराच्या चौपट रक्कम आम्हा शेतकऱ्यांना मिळावी. ही नुकसान भरपाई दि. ५/५/२०२४ पर्यंत न मिळालेस आजरा तालुक्यातील १३ गावातील शेतकरी व गडहिंग्लज तालुक्यातील ३ गावातील शेतकरी मिळून आम्ही मतदानावर बहिष्कार टाकत आहोत.

      याबाबत दिलेल्या लेखी निवेदनावर कॉ. शिवाजी गुरव, आप्पासाहेब पाटील, दिगंबर होरंबळे, विलास गोडसे, आनंदा येसणे, गणपती येसणे, संदीप कोंडुसकर आदींच्या सह्या आहेत.


लग्नांचा धुमधडाका… एकाच दिवशी पार पडले चाळीसवर विवाह


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा तालुक्यात काल रविवार दिनांक २८ रोजी लग्नाचा धुमधडाका उडाला तालुक्यात ठिकठिकाणी सुमारे चाळीसभर विवाह पार पडले.

      काल एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे आयोजित केल्याने संपूर्ण तालुक्यामध्ये लग्नाचा माहोल दिसत होता. गावा गावांमधील या विवाह सोहळ्यांमुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढानल झाल्याचे सांगण्यात येते.

पावसाने साथ दिली…

     गेले दोन ते तीन दिवस पावसाळी वातावरण होते काल मात्र पावसाने चांगली साथ दिल्याने हे विवाह सोहळे दणक्यात पार पडले. विवाहादरम्यान कोठेही विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे वृत्त नाही. ठिकठिकाणच्या विवाहांमुळे लोकसभेची विविध पक्षांची प्रचार यंत्रणाही थंडावली होती.

धोकादायक स्थितीतील उघड्या  डी.पी. कडे महावितरणचे दुर्लक्ष


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आरदाळ ता.आजरा येथील प्राथमिक शाळेजवळ विद्युत डि.पी. ची फ्युजपेटी गेली अनेक दिवस उघडी आहे. सदरच्या डी.पी. पेटीचे एक दार तुटलेल्या अवस्थेत पडून आहे. सदरची डी.पी. प्राथमिक शाळेजवळ आणि वर्दळीच्या रोडजवळ आहे त्यामुळे उघड्या अवस्थेतील डी.पी शाळेच्या मुलांना धोकादायक आहे.

      महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. सदरच्या डी.पी. ची फ्युजपेटी दुरुस्त करून लवकरात लवकर बंदिस्त करून घ्यावी अशी मागणी आरदाळ गावचे ग्रामस्थ करत आहेत.

संबंधित पोस्ट

हत्तीच्या हल्ल्यात वन कर्मचारी गंभीर जखमी

mrityunjay mahanews

मेंढोली येथे शेतकऱ्याचा मृत्यू…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

भोंदू बाबाच्या जादूटोण्याने मलिग्रे पंचकोशी हादरली…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!