mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


भटक्या कुत्र्यांची धरपकड सुरू

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहर व परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास प्रचंड वाढला असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी शहरवासीय आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीकडून निपाणी येथील विशेष पथक पाचारण करण्यात आले असून भटक्या कुत्र्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.

शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड आहे आठ दिवसापूर्वी भटक्या कुत्र्यांकडून पाच बकरी मारण्यात आली होती. लहान मुले, महिला व वयोवृद्ध नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, चावा घेणे, धावत्या गाड्यांचा पाठलाग करताना अपघात होणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गेली चार ते पाच वर्षे केली जात होती. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास अन्याय निवारण समितीच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर नगरपंचायतीने तातडीने कुत्री पकडण्याची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.बुधवारी रात्रीपासून शहरामध्ये बऱ्यापैकी कुत्र्यांना या पथकाने पकडून ताब्यात घेतले आहे.

लोकशाही टिकवण्यासाठी  भाजपला सत्तेतून हद्दपार करा…
माजी जि.प. अध्यक्ष उमेश आपटे

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     लोकसभेची निवडणूक ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. ही कांही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, त्यामुळे या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहून लोकशाही टिकवायची असेल तर भाजपला सत्तेतून हद्दपार करा असे आवाहन माजी जि.प. अध्यक्ष उमेश आपटे यांनी केले. ते किटवडे ता. आजरा येथून चालू झालेल्या जनसंपर्क यात्रेत बोलत होते.

     ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले, २०१४ साली लोकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपाने लोकांची फसवणूक केली आहे. महागाईने कळस केला आहे. आरोग्य शिक्षणापासून सर्वच व्यवस्था शासन मोडायला निघाले आहे. हे थांबवायचं असेल तर भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांना सत्तेतून हद्दपार केलेच पाहिजे.

      श्रमिक मुक्ती दलाचे कॉ. संपत देसाई म्हणाले, जाती-धर्मात फुट पडून आपली सत्तेची पोळी हे भाजत आहेत. आपल्या जगण्या मारण्याच्या प्रश्नावर लोक एकत्र येऊच नयेत यासाठी धर्म जातीचा उपयोग केला जात आहे. याला आवरायचं असेल तर यावेळी भाजपा आणि मित्र पक्षाचा पराभव केलाच पाहिजे.

     राष्ट्रवादीचे मुकुंददादा देसाई म्हणाले, आम्ही इंडिया राजर्षी शाहू महाराजांचा वैचारिक वारसा असलेले आपले उमेदवार सर्व जातीधर्मातील स्त्री-पुरुषांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहेत म्हणूनच आपण एक दिलाने त्यांच्या पाठीशी राहून त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून संसदेत पाठवूया.

     यावेळी गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, युवराज पवार, अभिषेक शिंपी यांनीही मनोगते व्यक्त केली. किटवडे येथून सुरु झालेली जनसंपर्क मोहीम लिंगवाडी, आंबाडे, घाटकरवाडी, धनगरमोळा, गवसे येथे सभा घेऊन सांगता झाली. या जनसंपर्क यात्रेत उदयराज पवार, रणजीत देसाई, प्रकाश मोरुस्कर, गोविंद पाटील, संकेत सावंत उत्तम देसाई, शिवाजी पाटील, महादेव हेब्बाळकर, सहदेव प्रभू, संतोष पाटील विक्रम देसाई दिनेश कुरुणकर विलास पाटील अशोक पोवार हे सहभागी झाले होते. इंडिया आघाडीचे तालुका समन्वयक रवींद्र भाटले यांनी आभार मानले.

१५ गावे ११ वाड्यांवर पाणीटंचाईचे संकट…?


        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तालुक्याच्या टंचाई आराखड्यात १५ गावे व ११ वाड्यांचा समावेश केला आहे. भविष्यातील पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेता कूपनलिका व खासगी विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. यासाठी २३ लाख ४० हजारांचा प्रस्तावही तयार केला आहे.

     मुमेवाडी, वझरे, वाटंगी, मलिग्रे, चव्हाणवाडी, श्रृंगारवाडी, हाळोली,
किणे, चितळे, महागोंड, आरदाळ, चाफवडे, हरपवडे, शेळप व पारपोली या गावांमध्ये तर चितळे पैकी जेऊर, भावेवाडी, धनगरवाडा, हाळोली पैकी दर्डेवाडी, किणेपैकी चाळोबावाडी, महागोंडपैकी महागोंडवाडी, श्रृंगारवाडी उचंगी पैकी हुडा, कोवाड पैकी दाभेवाडी, मलिग्रे पैकी कागिनवाडी, वझरे पैकी घागरवाडी, पारपोली पैकी खेडगे येथे पाणीटंचाईची शक्यता आहे.

संघर्ष सुरू…

       शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे .स्थानिक लघु पाटबंधारे तलावासह पाणी प्रकल्पातील पाणी सोडण्यास बुडीत क्षेत्रातील शेतकरी विरोध करू लागले आहेत. प्रथम आम्हाला पाणी द्या मगच इतरांची सोय करा अशी मागणी सुरू केली आहे.


आजऱ्यात महामार्गाचे अधिकारी धारेवर…
रस्ता लवकर करण्याची मागणी

. 

     आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

     संकेश्वर-बांदा महामार्गाचे आजरा शहरातील काम २५ मार्च पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने देण्यात आले होते. मात्र अद्याप शहरातील बरेचसे काम बाकी आहे. शहरातील संभाजी चौक ते आजरा पेट्रोल पंप या दरम्यानचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आजरा येथे हायवेच्या अधिकाऱ्यांना नागरीकांनी धारेवर धरले.

     शहरातील रखडलेल्या कामामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. धुळीमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास होत आहे. रस्त्याकडेला असलेली काजूची झाडे धुळीमुळे निष्क्रिय झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे..

     आजरा पेट्रोल पंप ते संभाजी चौकापर्यंत रस्ता खोदून जवळपास सहा महिने झाले आहे, खडी आणि धुळीमुळे लोकांना त्रास होत आहे. दुकानदारांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. व्यापार ठप्प झाले आहे.
नाईक गल्लीत वाहने घेऊन जाणे अडचणीचे होत आहे. मृतदेह नेताना अडचण येत आहे. एखाद्या रुग्णाला दवाखान्यात पोहोचविताना रूग्णवाहीका चालकांच्या नाकीनऊ येत आहे. पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईन वारंवार फुटल्यामुळे पाण्याची टंचाई भासत आहे. व्यापारी व रहिवाशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालत रस्ता लवकर पूर्ण करण्याची मागणी केली.

     यावेळी रजाक सोनेखान, इस्माईल सोनेखान, नजीर सोनेखान, सलीम सोनेखान, महमद हनीफ सोनेखान, इलाही बागवान, आरिफ खेडेकर, हसन तकीलदार, अमानुल्ला हेरेकर आदि उपस्थित होते.

शिंदे गट युवासेना आजरा तालुका अध्यक्षपदी शिवराज लोखंडे

      आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     वझरे ता आजरा येथील शिवराज संभाजी लोखंडे यांची शिंदे गटाच्या युवा शिवसेना आजरा तालूकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. गडहिंग्लज येथील पक्षाचा पदाधिकारी मेळाव्यात ही निवड करण्यात आली. यावेळी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले.

     शिवसेना पक्षाचे निरीक्षक उदय सावंत , कुणाल हजारे,शरद कणसे , जिल्हाप्रमुख राजेखान जमादार , उपजिल्हा प्रमुख अनिरुद्ध रेडेकर , जिल्हा संघटक महेश भादवणकर , आजरा तालुका प्रमुख संजय पाटील , गडहिंग्लज तालुका प्रमुख संजय सकपाळ , युवासेना गडहिंग्लज तालुका प्रमुख वैभव ठोंबरे आदी उपस्थित होते.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चित्री प्रकल्प १००% भरला…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!