


आजरा तालुका ‘राम’मय

आजरा:प्रतिनिधी
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीमध्ये भगवान रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापणाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जय राम जय जय राम… या जयघोषाने आजरा तालुक्यातील परिसर दुमदुमून निघाला. गावोगावी दिवसभर मिरवणुका, आरत्या, प्रसाद,भजने यासह धार्मिक कार्यक्रम व शोभायात्रा पार पडल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपुर्ण तालुका राममय झाला होता.
आजरा येथील श्रीराम मंदिरात सकाळी अभिषेक पूजा, दिंडी सोहळा, रामरक्षा पठण, पुष्प वृष्टी, हरिपाठ व रात्री किर्तन, भजनांचा कार्यक्रम पार पडला. जय राम श्रीराम नामाचा जयघोष, वारकरी भजन, भगव्या टोप्या अशा भक्तिमय वातावरणात आजरा शहरासह तालुक्यातील गावामध्ये दिंड्या पार पडल्या. आजरा येथे श्रीराम मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. सकाळी ८ वाजता श्रीराम मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. या शोभायात्रेत श्रीराम, लक्ष्मण आदी वेशभूषा करून लहान मुले सहभागी झाली होती. महिलांचे लेझीम पथक, वारकरी दिंड्या या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या.
शोभायात्रा श्रीराम मंदिरापासून सुरू करून वाणीगल्ली, सुतारगल्ली, सोमवारपेठ, गोठणगल्ली, कुंभारगल्ली, ग्रामदैवत श्री रवळनाथ देवालय, सुभाष चौकातून पुन्हा श्रीराम मंदिरात परीसरात आली. याठिकाणी शोभायात्रा आल्यानंतर सांगता करण्यात आली. यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. या शोभायात्रेदरम्यान श्रीराम जयराम जय जय राम… असा जयघोष सुरू होता. या जयघोषाने शहर परीसर दुमदूमुन गेला होता. रामतीर्थ येथे श्रीराम मंदिरात मूर्तीला अभिषेक घालण्यात आला व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
आजरा शहराबरोबरच तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रत्येक गावात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गावोगावी सकाळी श्रीरामांच्या प्रतिमेची मिरवणूक, धार्मिक विधी, प्रसाद वाटप करण्यात आले. काही गावांमध्ये महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. दिवसभर सुरू असलेल्या कार्यक्रमांमुळे संपूर्ण शहरात राममय वातावरण झाले.
रात्री येथे महाआरती व आतषबाजीचा कार्यक्रम पार पडला.



शिरसंगीत गवत गंजी जळाल्या

आजरा: प्रतिनिधी
सिरसंगी त्या.आजरा येथे विद्युत वाहिनीत शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत येथील रचलेल्या गवतगंजी व पयाण जळून खाक झाले असून यामध्ये सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सिरसंगी येथील वसंत गोपाळ येलगार यांच्या गोठ्यानजीक रचलेले पाच हजार पयाण पेंडी व दोन ट्रॉली गवत विद्युत वाहिनीच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाले आहे.सोमवारी दुपारी साडेतीन वाजता सदर घटना घडली असून यामध्ये एल्गार यांना सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आजरा नेसरी रोड रस्त्यानजीकच आग लागल्यामुळे वाहनधारकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. दुपारी लागलेल्या आगीमुळे आग विझवताना फार मोठी कसरत करावी लागली.
‘ शॉर्टसर्किट ‘ चे प्रकार वाढले
तालुक्यात गेल्या आठवड्यात शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दोन ट्रॅक्टर जळाले तर ठीक- ठिकाणी गवताचे नुकसान झाल्याचे प्रकार घडले आहेत.



आजऱ्यातील नाट्यमहोत्सवात सांगलीचे ‘ओॲसीस’ ची बाजी
.
आजरा:प्रतिनिधी
कै. रमेश टोपले स्मृती नाट्यमहोत्सवात सांगली येथील लोक रंगभूमी संस्थेने सादर केलेल्या ‘ओॲसीस’ या नाटकाने प्रेक्षकांची पसंती मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
दि. १४ ते २१ जानेवारी दरम्यान हा महोत्सव पार पडला.या महोत्सवात गोवा येथील वैभवी क्रिएशन या संस्थेने सादर केलेल्या ‘अग्गंबाई सूनबाई’ या नाटकाने द्वितीय तर कुसवडे, जि. सातारा येथील जागृती नाट्य कलामंच ने सादर केलेल्या ‘आम्ही दोघेच राहायचो घरात’ या नाटकाने तृतीय क्रमांक पटकाविला. तर उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी इरफान मुजावर (ओॲसीस), विक्रमसिंह बल्लाळ (आम्ही दोघेच राहायचो घरात), शेखर उसगावकर (अग्गंबाई सूनबाई) यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
स्त्री अभिनयासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक धनश्री गाडगीळ (ओॲसीस), द्वितीय क्रमांक पायल कदम (आम्ही दोघेच राहायचो घरात), तृतीय क्रमांक मारीया डिसोझा (अग्गंबाई सूनबाई), पुरुष अभिनयासाठी मयूर पाटील (ओॲसीस), विक्रमसिंह बल्लाळ (आम्ही दोघेच राहायचो घरात), नितीन रावळ (अग्गंबाई सूनबाई) यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांक देण्यात आले.
विजेत्या संस्था आणि कलाकार तसेच दिग्दर्शकांना आण्णाभाऊ आजरा तालुका सूतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णा चराटी, नवनाट्य कलामंच संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, दहाव्या कै. रमेश टोपले नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष योगेश पाटील, अनिकेत चराटी, ज्योत्स्ना चराटी-पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी आय. के. पाटील,सौ. मुग्धा चराटी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी योगेश पाटील, शंकर उर्फ भैय्या टोपले,प्रा.वासुदेव मायदेव, डॉ.अशोक बाचूळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



डेटरमीनेशन, डेडिकेशन आणि डेस्टिनेशनचा थ्री-डी फॉर्म्युला यशाचा गुरुमंत्र :
डॉ. प्रभावती पाटील

आजरा: प्रतिनिधी
नव्या युगात करिअरच्या नवनव्या संधी उपलब्ध आहेत. सर्जनशील लेखनामध्ये तर अनेक संधी आहेत. त्यामध्ये करिअर करण्यासाठी जाहिरात लेखन, ब्लॉग लेखन आणि न्युज हेडलाईन बनविण्यासारख्या नव्या क्षमता विकसित केल्या पाहिजेत. यासाठी प्रयत्नशील राहिल्यास करिअरची नवी वाट मनात आहे तशी मिळवू शकता. फक्त या नव्या करिअर वाटांसाठी थ्री डी म्हणजेच डेटरमीनेशन, डेडिकेशन आणि डेस्टिनेशनचा थ्री-डी फॉर्म्युला वापरा. करिअरच्या यशाचा हाच गुरुमंत्र आहे, असे प्रतिपादन दत्ताजीराव कदम, इचलकरंजी महाविद्यालयाच्या डॉ. प्रभावती पाटील यांनी केले.
आजरा महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाने आयोजित केलेल्या वन-डे-वर्कशॉपमध्ये त्या रिसोर्स पर्सन म्हणून विषय मांडत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सादळे होते. शिवाजी विद्यापीठ, लीड कॉलेज अंतर्गत यशवंतराव चव्हाण कॉलेज, हलकर्णी क्लस्टर मार्फत आजरा महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाने ‘क्रिएटिव्ह रायटींग: न्यु ट्रेंड्स अँड करिअर्स’ या विषयावर वर्कशॉप आयोजित केले होते. यावेळी या विषयाच्या अनुषंगाने दुसरे रिसोर्स पर्सन म्हणून प्रोफेसर डॉ. आय. आर जरळी यांनी थेरॉटिक मांडणी करताना सर्जनात्मक लेखनाचे विविध प्रकार अधोरेखित करीत या क्षमतेचे स्वरूप युनिक असल्याचे नमूद केले.
आजरा महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. रमेश चव्हाण यांनी प्रस्ताविकात हा नवा विषय प्रस्तावित करीत करिअरच्या नव्या वाटा विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या असून, यातून मिळणारे भान त्यांना त्यांचे भविष्य घडविण्यासाठी उपयुक्त ठरेल असा आशावाद व्यक्त केला. प्राचार्य डॉ. सादळे यांनी हा नवा विषय विद्यार्थ्यांना नवे रोजगार दालन उघडून देणार असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
वर्कशॉप उदघाटन मान्यवरांच्या हस्ते रोपास जलअभिषेक करून झाले. यावेळी इंग्रजी विभागाच्या निसबाह, सिद्धी, मिसबाह आणि सदफ या विद्यार्थिनींनी समयोचित सूत्रनिवेदन केले. डॉ.सलमा मणेर यांनी वर्कशॉपची तांत्रिक बाजू सांभाळत प्रा. शेखर शिउडकर यांच्यासह आभार मानले.
यावेळी आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील ७३ जणांनी या वर्कशॉपमध्ये सहभाग नोंदवला. उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, लीड कॉलेज समन्वयक डॉ. मल्हारराव ठोंबरे, डॉ.अशोक बाचुळकर, डॉ. आप्पासाहेब बुडके, प्रा. अलका मुंगुर्डेकर, प्रा. अनुराधा गोटखिंडे, प्रा. बाळासाहेब कांबळे, प्रा. संदीप देसाई आदी उपस्थित होते.



निवड
मोहन कांबळे

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य पदी सुळे, ता. आजरा येथील मोहन मारुती कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राज्याध्यक्ष विलास कुमरवार व सरचिटणीस दयानंद एरंडे यांनी त्यांना पत्र दिले आहे.





