mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या …

वनविभागाचा कारभार चव्हाट्यावर

आमदार आबीटकर आक्रमक…

‘ त्या ‘  महिलेला मिळणार नुकसान भरपाई…

…………….आजरा – प्रतिनिधी……………..

     गेले चार महिने चर्चेत असणा-या  पेरणोली येथील शालन दारुडकर या गव्याच्या हल्ल्यातील जखमी शेतकरी महिलेच्या नुकसान भरपाई प्रकरणी आ. प्रकाश आबीटकर यांनी आक्रमक भूमिका  घेतल्यानंतर मार्गी लागले.मात्र या सर्व प्रकारात वनविभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे   वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित जखमी महिलेस नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले आहे. स्थानिक वनविभागाच्या एकंदर कारभाराबाबत यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी… शालन दारुडकर या शेतकरी महिलेला ऊस भांगलत असताना १८ जून रोजी शेतात गव्याने धडक दिल्याने ती जखमी झाली आहे. तिच्यावर आजतागायत उपचार सुरू आहेत. गेले साडेतीन महिने वनविभागाच्या पातळीवर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी या सामान्य कुटुंबातील महिलेचे प्रयत्न सुरू होते.

     घडलेल्या घटनेचे वनविभागाला गांभीर्य नसणे, चुकीच्या पद्धतीने घटनेचा पंचनामा करणे या कारणामुळे अद्याप संबंधित महिलेला नुकसान भरपाई मिळाली नव्हती. अखेरचा पर्याय म्हणून जखमी महिलेने आमदार प्रकाश आबीटकर यांच्याकडे दाद मागितली होती. आमदार आबिटकर यांनी याची गांभीर्याने दखल घेतली व कोल्हापूर येथील मुख्य वन संरक्षकांच्या कार्यालयात याबाबत बैठक लावली . बैठकीत सबळ पुरावे सादर केल्यावर उपवनसंरक्षक जी गुरूप्रसाद यांनी सदर महिलेला नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. संबंधित महिलेला नुकसान भरपाई देण्यात दिरंगाई केल्याबद्दल स्थानिक वन विभागाचे आ. आबीटकर यांनी वाभाडे काढले. चुकीचे पंचनामे करण्यात वन विभाग पुढे असतो तर खरी वस्तुस्थिती असूनही गरीब गरजू शेतकरी महिलेला नुकसान भरपाई मिळत नाही. नेमके अधिकारी करतात तरी काय? असा सवाल आ. आबीटकर यांनी उपस्थित करत या घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली.

     सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील यांनी आजऱ्यातील वनविभागाचा कारभाराची चौकशी करा . चुकीचे पंचनामे करून तालुक्यात भ्रष्टाचार होत आहे असा आरोप केला. हत्ती हाकण्यासाठी शासनाने दिलेल्या पैशाचा मोठा घोटाळा झाला असून याची चौकशी लावावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. याबाबत तातडीने चौकशी केली जाईल असे मुख्य वन संरक्षक रामानुज यांनी सांगितले.

कागदपत्रांमध्ये विसंगती

      घटनेनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला दाखला,महिलेचा जबाब व वनविभागाचा पंचनामा यात विसंगती असल्याने जखमी महिलेस नुकसाभरपाई मिळण्यास तांत्रिक अडचणी आल्याने दिरंगाई झाल्याचे स्पष्ट झाले.किमान यापुढे तरी वनविभागाने दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


अखेर प्रकाश ढवळे ठरले अपात्र… जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

…………….आजरा – प्रतिनिधी…………….

    पेद्रेवाडी ता.आजरा ग्रामपंचायतीचे सtदस्य प्रकाश शंकर ढवळे यांना तीन अपत्ये असल्याच्या कारणास्तव त्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र करण्यात यावे यासाठी अनिल गोपाळ डोंगरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती.

    याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच दिला असून ढवळे यांनी तीन अपत्ये असल्याचे पुरावे डोंगरे यांनी सादर केले असल्याचे स्पष्ट करून ढवळे यांना सदस्यपदावरून अपात्र ठरवले आहे.

     या निकालाने अनिल डोंगरे यांच्या गेल्या दोन वर्षाच्या लढ्याला यश आले आहे असे म्हणावे लागेल.


एकाच जागी असलेले

आज-यातील फिरते शौचालय


…………….आजरा – प्रतिनिधी………………

     आजरा नगरपंचायतीला गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये विविध माध्यमातून प्रचंड निधी उपलब्ध झाला आहे. याचाच एक भाग म्हणून शहरांमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने फिरते शौचालयही मंजूर झाले. चार महिन्यापूर्वी फिरत्या शौचालयाची गाडी देखील नगरपंचायतीकडे आली आहे.

     अग्निशमन करण्याकरता आलेली गाडी, मोटरसायकल्स याप्रमाणे हे फिरते शौचालय देखील गांधीनगर येथील पंप हाऊस परिसरात उभे करण्यात आले आहे.याचा कोणताही वापर नगरपंचायतीकडून केला जात नाही. जर वापरच करणार नसाल तर मग या फिरत्या शौचालयाची मागणी कशाकरता केली ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

    वापराअभावी हे फिरते शौचालय सडून जाण्यापूर्वीच त्याचा वापर करण्यात यावा अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.


नेते ठरवतील तो शब्द प्रमाण…

महाविकास आघाडीची बैठक


…………….आजरा – प्रतिनिधी………………

     आजरा साखर कारखाना निवडणूक पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रिफ व आमदार सतेज पाटील ठरवतील तो शब्द प्रमाण म्हणून काम करण्याचा प्राथमिक निर्धार करण्यात आला.

     आजरा साखर कारखाना निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रमुख नेते मंडळींच्या जोर बैठका सुरू झाल्या आहेत. रविवारी महाविकास आघाडीची बैठक आज-यात पार पडली. बैठकीमध्ये आजरा साखर कारखाना निवडणुकीची व्यूहरचना, त्याकरीता कराव्या लागणाऱ्या आघाडीची रचना याबाबत सविस्तर चर्चा झाली. पालकमंत्री मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला.

      बैठकीस गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई,माजी जि. प.अध्यक्ष उमेश आपटे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील,वसंतराव धुरे,शिवसेना तालुकाध्यक्ष युवराज पोवार यांच्यासह प्रमुख मंडळी उपस्थित होती.

बिनविरोधची शक्यता नाहीच…

     कारखान्यामध्ये सध्या सक्रिय असणाऱ्या दोन्ही गटांच्या प्रमुखांनी निवडणुकीसाठी जोर- बैठका सुरू केल्या असल्याने बिनविरोधची शक्यता धूसर झाली आहे. दोन्हीही आघाड्यांकडून निवडणुकीला सामोरे जाण्याची जोरदार तयारी सुरू आहे.


निधन वार्ता
संभाजी गावडे


     साळगाव ता. आजरा येथील संभाजी विष्णू गावडे ( वय ५३ ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.

     त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, भाऊ, आई असा मोठा परिवार आहे.येथील जनता बँकेच्या महागाव शाखेमध्ये ते कॅशियर म्हणून कार्यरत होते.

रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक १२ रोजी सकाळी नऊ वाजता आहे.

संभाजी हे साळगावचे माजी उपसरपंच अरविंद गावडे यांचे बंधू होत.


संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

शाहू छत्रपतींसाठी ‘ वंचित ‘ चे कार्यकर्ते सरसावले

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!