

दहावी बारावी परीक्षांचे
संभाव्य वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून सुरू होणार आहेत. इयत्ता बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 पासून आणि दहावीची परीक्षा 2 मार्च 2023 पासून सुरु होणार आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.
महाराष्ट्र फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (दहावी) च्या लेखी परीक्षांची संभाव्य तारीख जाहीर करण्यात आली आहे. बारावीची परीक्षा मंगळवार दि. 21 फेब्रुवारी 2023 ते सोमवार दि. 20 मार्च 2023 या दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा गुरुवार दि. 2 मार्च 2023 ते शनिवार दि. 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. सदरचे संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर दि. 19 सप्टेंबर 2022 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
दहावी बोर्ड परीक्षेचे संभाव्य सविस्तर वेळापत्रक
2 मार्च – प्रथम भाषा ( मराठी, हिंदी उर्दू ,गुजराती व इतर प्रथम भाषा)
3 मार्च – द्वितीय वा तृतीय भाषा
6 मार्च – इंग्रजी
9 मार्च – हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
11 मार्च – संस्कृत, उर्दू ,गुजराती पाली ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
13 मार्च – गणित भाग – 1
15 मार्च – गणित भाग 2
17 मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
20 मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
23 मार्च – सामाजिक शास्त्र पेपर 1
25 मार्च – सामाजिक शास्त्र पेपर 2…….

होन्याळीला शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

आजरा (प्रतिनिधी)
होन्याळी (ता.आजरा ) येथील विहार ( चिक्या )संजय कानोलकर या बारा वर्षीय शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. रात्री उशीरा घटनेची नोँद पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरु होते.विहार सकाळी आपल्या आई वडीलासमवेत चिमणे रोडवरील शेताकडे गेला होता. दुपारी एक वाजता घरी जातो असे सांगून शेतातून निघून आला. सायंकाळी आई वडील घरी परतल्यावर विहार घरी नसल्याचे आढळले. यामुळे सर्वत्र शोधाशोध सुरु झाली. ग्रामस्थानी परिसरातील विहीरी व शेततळी शोधून पाहीली रात्री मोरबाळे यांच्या शेततळ्याकाठाला त्याचे चप्पल आढळले. शेततळ्याच्या पाण्यात शोधले असता त्याचा मृतदेह आढळला.
विहार पाचवीत शिकत होता. त्याच्या पश्चात आई वडील लहान भाऊ असा परिवार आहे.






