mrityunjaymahanews
ठळक बातम्यामहाराष्ट्र

आजरा येथील ‘ते’ वादग्रस्त गाळे आज जमीनदोस्त होणार….डॉक्टर नजीर मुजावर यांचे निधन

अखेर ते वादग्रस्त गाळे आज होणार जमीनदोस्त …?

सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपंचायतीची संयुक्त कारवाई

गेल्या दोन महिन्यापासून वादग्रस्त ठरलेले आजरा येथील भुदरगड पतसंस्थेच्या शेजारील नऊ बेकायदेशीररीत्या बांधलेले गाळे अखेर नगरसेवक धनाजी पारपोलकर यांनी उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाने जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आज बुधवारी ही कारवाई होणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले.

काय आहे हे प्रकरण…?

आजरा शहरातून जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर भुदरगड पतसंस्था व बळीरामजी देसाई विद्या संकुल च्या दरम्यान असणाऱ्या मार्गावर गेल्या चार महिन्यात नऊ दुकान गाळे पक्के बांधकाम करून उभारण्यात आले आहेत. सदर गाळे बांधण्यापूर्वी सुमारे चाळीस फूट लांबीच्या क्षेत्रात छोट्या हलवण्या योग्य पाच टपऱ्या होत्या. यामध्ये छोटे व्यावसायिक व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत होते. या मार्गावरून शिवसेना गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची मिरवणूक निघण्याबरोबरच लक्ष्मी यात्रेचा रथही फिरतो. येथे जवळच दोन मोठ्या सहकारी बँका व छोट्या-मोठ्या पतसंस्था असल्याने पार्किंग करता ही जागा वापरली जात होती. अचानक पणे पक्क्या स्वरूपातील गाळे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयापासून नगरपंचायत अनभिज्ञ होती असे सांगण्यात येते. गाळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर येथील मूळ व्यवसायिकांना विश्वासात न घेता परस्पर काही नगरसेवकांनी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करून गाळ्यांचे वाटप केले. त्यामुळे शहरात उलट-सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या मनसेने यावर आक्रमक भूमिका घेत आठवडाभरापूर्वी भर बाजार दिवशी गाळयांची कुलपे तोडून गाळे मूळ व्यवसायिकांना देण्याचा प्रयत्न केला. या गाळे प्रकरणामुळे नगरपंचायतीचा कारभार चांगलाच चर्चेत आला. सत्ताधारी आघाडीचे नगरसेवक किशोर पारपोलकर यांनी सदर गाळे पाडावेत अन्यथा उपोषणाला बसणार असा थेट इशारा दिला होता. अखेर त्यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले.या आंदोलनाला शहरवासीयांचा पाठिंबा वाढत गेला. सत्ताधारी नगरसेवकांमध्ये या गाळे प्रकरणाबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरच नगरसेवक पारपोलकर यांनी उपोषण सुरू केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागासह नगरपंचायत प्रशासन हादरून गेले. मंगळवारी दुपारी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सावंत, मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, तहसीलदार विकास अहीर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर व आंदोलनामधील प्रमुख मंडळींची बैठक घेऊन याबाबत दोन तासात निर्णय देऊ असे सांगितले. या बैठकीमध्ये आंदोलन कर्त्याँच्यावतीने भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, डॉ. श्रध्दानंद ठाकूर, नितीन सोहनी, भास्कर बुरुड यांनी आक्रमक भूमिका घेत विनापरवाना सदर गाळे बांधण्यास नगरपंचायतीने हरकत का घेतली नाही? असा प्रश्न उपस्थित करत संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

मुख्याधिकारी पाटील यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन अखेर पाच वाजण्याच्या सुमारास नगरसेवक आनंदा कुंभार अभिषेक शिंपी यांच्याशी चर्चा केल्यानंतर गाळे जमीनदोस्त करण्यात येतील असे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. प्रथम गाळे जमीनदोस्त करा नंतरच आंदोलन मागे घेऊ असे आंदोलनकर्त्यानी स्पष्ट केल्यानंतर तातडीने पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम व नगरपंचायतीचा कर्मचारी वर्ग गाळ्यांच्या ठिकाणी गेला. याठिकाणी तणावपूर्ण वातावरण बनले होते. शहरातील सर्वच बेकायदेशीर गाळे काढून टाकावेत अशी मागणी ही काही नगरसेवकांसह उपस्थित करत होते. दरम्यान अंधार असल्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने आज बुधवारी सकाळी दहा वाजता गाळे पाडण्यात येतील असे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. आंदोलनस्थळी सत्ताधारी आघाडीचे प्रमुख अशोक चराटी यांनी जाऊन आंदोलनकर्त्यांना नगरसेवक पारपोलकर यांची तब्येत खालावत असल्याने आंदोलन मागे घ्यावे अशी विनंतीही केली. यावेळी मनसेचे परशुराम बामणे व चराटी यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर नगरसेवक किशोर पारपोलकर यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.

आज बुधवारी सदर कारवाईच्या पार्श्वभूमीवर जादा पोलीस फाटा मागवण्यात आला असल्याचेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आपणाला गाळे  मिळणार या आशेपोटी काही नगरसेवकांशी  व्यवसायिकांनी आर्थिक व्यवहार केले असल्याची चर्चा आहे हे गाळे  पाडण्यात येणार असल्याने या आर्थिक नुकसान ची जबाबदारी कोण घेणार ? हा प्रश्न आता अशा व्यावसायिकांसमोर निर्माण झाला आहे.

एकीकडे काही नगरसेवक या गाळे  प्रकरणापासून आपण अनभिज्ञ आहोत असे सांगत असले तरीही गाळे  उभारण्याबाबतची चर्चा सर्व नगरसेवकांसमोर झाली होती असे उपनगराध्यक्ष अनिरुद्ध केसरकर यांनी स्पष्ट केले. यामुळे या सर्व प्रकरणाला नगरपंचायत वर्तुळातील राजकीय संघर्षाची किनार असल्याचेही बोलले जाते.

शंकरराव शिंदे यांना पेन्शनर असोसिएशनचा विशेष पुरस्कार

आजरा येथील सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे शंकरराव शिंदे यांना महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने पेन्शनर्स व्यक्तीं साठी केलेल्या विशेष कार्याबद्दल निवृत्त सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आजरा तालुक्यातील व परिसरातील सेवानिवृत्त मंडळींचे प्रश्न सोडवण्याच्या कामामध्ये शिंदे यांचा नेहमी पुढाकार राहिला आहे. समाजसेवेतही ते सक्रिय आहेत. त्यांच्या या योगदानाचा विचार करुन सदर पुरस्कार त्यांना देण्यात आला. पुणे येथे पार पडलेल्या पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष एन.डी. मारणे, कार्याध्यक्ष सोमनाथ नाईक, कोषाध्यक्ष श्रीकांत वागळे, सरचिटणीस लक्ष्मण टेंबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

निधन वार्ता…डॉ.नजीर मुजावर

आजरा येथील सुप्रसिद्ध डॉक्टर नजीर मुजावर यांचे निधन झाले निधन समयी त्यांचे वय ७० वर्षे होते. आजरा येथील जुने अनुभवी व सामाजिक कार्यात अग्रस्थानी असणारे वैद्यकीय व्यावसायिक अशी त्यांची ओळख होती. ,

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :-

ज्योतिप्रसाद सावंत ( मुख्य संपादक)

9637598866

.mrityunjaymahanews.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

निवडणूक विशेष… आजरा अन्याय निवारण समिती आघाडी

mrityunjay mahanews

आजरा अर्बन बँकेचा अन्न प्रक्रिया सूक्ष्म उद्योजगांसाठी मेळावा उत्साहात

mrityunjay mahanews

प्रभाग १४ चा आश्वासक चेहरा : सिद्धेश नाईक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!