mrityunjaymahanews
अन्य

शुक्रवार – सातच्या बातम्या

शुक्रवार दि.१३ नोव्हेंबर २०२६

पेन्शनधारकांची फरफट थांबवा, एसबीआय बँकेची यंत्रणा तातडीने सुरळीत करण्याची मागणी 

आजरा : प्रतिनिधी

स्टेट बँक ऑफ इंडिया, आजरा शाखेत पेन्शनधारकांचे जीवन प्रमाणपत्र स्वीकारताना वारंवार तांत्रिक अडचणी येत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत सामाजिक सेवा प्रतिष्ठान आजरा प्रणीत अन्याय निवारण समितीने शाखा व्यवस्थापकांना निवेदन दिले.

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पेन्शन सुरू ठेवण्यासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार आजरा शहरासह ग्रामीण भागातील अनेक पेन्शनधारक बँकेत येत आहेत. मात्र सर्व्हर व तांत्रिक यंत्रणा वारंवार बंद पडत असल्याचे सांगून पेन्शनधारकांना खासगी एजन्सीकडे पाठविण्यात येत असून प्रत्येकाला ५० रुपये अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याच्या तक्रारी समितीकडे आल्या आहेत.

यावर बँक प्रशासनाकडून तांत्रिक अडचणींची कारणे पुढे केली जात असल्याबाबत समितीने आक्षेप नोंदविला. बँकेची स्वतःची यंत्रणा असताना ज्येष्ठ नागरिकांना खासगी एजन्सीकडे जाण्याची वेळ का यावी, तांत्रिक बिघाड दूर करणे ही बँक प्रशासनाची जबाबदारी नाही का, असा सवाल समितीने उपस्थित केला. वयोवृद्ध, दिव्यांग आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या पेन्शनधारकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असून वेळ, श्रम, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास होत असल्याचे समितीने स्पष्ट केले.

समितीने संगणकीय यंत्रणा व सर्व्हर तातडीने दुरुस्त करणे, शाखेतच जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा देणे, आवश्यक बायोमेट्रिक उपकरणे व मनुष्यबळ उपलब्ध करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष अथवा कर्मचारी नियुक्त करणे आणि पेन्शनधारकांवर कोणताही अनावश्यक आर्थिक भुर्दंड पडू न देणे या मागण्या केल्या. तसेच निवेदनातील सर्व मुद्द्यांबाबत बँक प्रशासनाने अधिकृत लेखी उत्तर द्यावे, अशी ठाम मागणी केली. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला.

यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे भाऊजी, कार्याध्यक्ष डॉ. श्रद्धानंद ठाकूर, सचिव पांडुरंग सावरतकर, तसेच सदस्य बंडोपंत चव्हाण, संतोष बांदिवडेकर, संजय जोशी, दिनकर जाधव, जोतिबा आजगेकर, मदन तानवडे, रविंद्र नेवरकर, दत्तात्रय सावंत, ऑगस्टीन नॉरोज, विलास रावजीचे व लक्ष्मण नाईक उपस्थित होते.

आजऱ्यात शनिवारी मोफत महाआरोग्य शिबिर

आजरा : प्रतिनिधी

आजऱ्याचे नगराध्यक्ष,अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख व आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष अशोकण्णा चराटी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार(१४ नोव्हेंबर) रोजी अभिष्टचिंतन सोहळा व मोफत महाआरोग्य शिबिर आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमू पाटील असून प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत. यावेळी खासदार धनंजय महाडिक आणि आमदार शिवाजीराव पाटील उपस्थित राहणार आहेत.

वाढदिवसाचे औचित्य साधून नागरिकांसाठी मोफत महाआरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सहकार्याने तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून अत्याधुनिक मशिनरीद्वारे विविध वैद्यकीय तपासण्या व उपचार मोफत करण्यात येणार आहेत. या शिबिरामध्ये दृष्टी तपासणी, श्रवण तपासणी, चष्मे वाटप, श्रवणयंत्र सुविधा, महिला आरोग्य तपासणी, सोनोग्राफी, मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग तपासणी, ईसीजी, 2D इको, एक्स-रे आणि रक्त तपासणी आणि अद्यावत कॅन्सर व्हॅनद्वारे कर्करोग तपासणी व उपचार अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तालुक्यातील गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये असाध्य रोगांचे निदान झाल्यास पुढील उपचार व शस्त्रक्रियाही शासकीय योजनेंतर्गत मोफत करून देण्यात येणार आहे.

ग्रंथ ज्ञानयज्ञ आणि शब्दयज्ञ तेवत ठेवतात : विश्वास सुतार

आर्दाळमध्ये ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न

उत्तूर : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या कोवळ्या वयातच लेखन-वाचनाची आवड निर्माण झाली, तर भविष्यात उत्तम लेखक आणि कवी घडू शकतात. लेखनासाठी भरपूर वाचन आवश्यक असून, निसर्गाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी असली पाहिजे. ग्रंथ ज्ञानयज्ञ आणि शब्दयज्ञाची परंपरा तेवत ठेवतात, असे प्रतिपादन शाहूवाडीचे विस्तार अधिकारी विश्वास सुतार यांनी केले.आर्दाळ येथील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी स्वलिखित केलेल्या ‘बालचमुच्या काव्यकळ्या’ या कविता संग्रहाचे आणि लेखक किरण चव्हाण लिखित ‘माता, माती आणि भक्ती’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सुतार बोलत होते.अध्यक्षस्थानी संदानंद पुडंपळ होते. मुख्याध्यापक शरद पाटील यांनी प्रास्ताविक केले.

सुतार म्हणाले, पोटाची भूक भागविण्यासाठी जशी भाकरीची गरज असते, तशीच ज्ञानाची भूक भागविण्यासाठी पुस्तकांची गरज असते. समाजात वाचनसंस्कृती वाढून नवे लेखक आणि कवी निर्माण झाले पाहिजेत.

लेखक किरण चव्हाण यांनी आपल्या संघर्षमय जीवनप्रवासातील अनुभव सांगत विद्यार्थ्यांना लेखनासाठी प्रेरित केले. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कै. सुभाष चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ऑनलाइन निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी उत्तूरचे सरपंच किरण आमणगी, शैलेन्द्र आमणगी, आर्दाळचे सरपंच सौ. पाटील, अमोल भांबरे, सचिन पावले, शिवाजी गुरव, तानाजी पुंडपळ यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री सुतार सर यांनी आभार मानले.

कोवाडेत स्वामी प्रतिष्ठान तर्फे दीपावलीनिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम उत्साहात संपन्न

कानोली : प्रतिनिधी

स्वामी प्रतिष्ठान कोवाडे यांच्या वतीने दीपावलीचे औचित्य साधून गावात विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये युवा व जनजागृती कार्यक्रम, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, शिवप्रेमींसाठी स्वराज्य गड-किल्ले बांधणी स्पर्धा तसेच कोवाडे-दाभेवाडी परिसरातील निराधार महिला व पुरुषांना फराळ वाटप अशा विविध उपक्रमांचा समावेश होता.

दिनांक ९ नोव्हेंबर रोजी आयोजित युवा व जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैशाली वडवळेकर , रविंद्र गुडूळकर , नंदकुमार देसाई , गुरुदेव साबळे गुरुजी व सुरेश देशमुख  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास होरटे  यांनी केले.

यावेळी गुरुदेव साबळे  व नंदकुमार देसाई  यांनी शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव मांडत विद्यार्थ्यांना शिक्षणातील बदलत्या संधी व आव्हानांबाबत मार्गदर्शन केले. रविंद्र गुडूळकर  यांनी युवकांना नोकरीच्या संधी, व्यवसायातील आव्हाने, उद्योजकता, जिद्द आणि योग्य मित्रपरिवाराचे महत्त्व पटवून दिले. तर मुख्य वक्त्या वैशाली वडवळेकर मॅडम यांनी शिक्षणाचे महत्त्व, व्यसनमुक्ती, किशोरवयीन मुलांची निर्णयक्षमता, सोशल मीडियाचा योग्य वापर आणि पालकांची मुलांप्रती असलेली जबाबदारी यावर प्रभावी मार्गदर्शन केले.

याशिवाय महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे म्हणून रांगोळी स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला स्पर्धा आणि नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व स्वराज्याची प्रेरणा मिळावी या उद्देशाने स्वराज्य गड-किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सर्व स्पर्धांना गावातील महिला, विद्यार्थी व शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले असून सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे प्रतिष्ठानच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.

दीपावलीचा आनंद समाजातील गरजूंपर्यंत पोहोचावा या सामाजिक भावनेतून कोवाडे-दाभेवाडी परिसरातील निराधार महिला व पुरुषांना फराळाचे वाटप करण्यात आले.

या सर्व उपक्रमांच्या यशस्वितेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश देसाई यांच्यासह ओंकार देसाई, संतोष चिमणे, अमर नार्वेकर, अक्षय साठे, विशाल साळी, युवराज गोंधळी, किशोर माणगावकर, प्रमोद साठे, प्रतीक साठे, शुभम देसाई, शिवराज देसाई, कार्तिक गोंधळी, सौरभ देसाई, सुहास देसाई, अनिकेत देसाई, सचिन बराटे, सतीश देवेकर, प्रशांत देसाई, अभी देवेकर यांच्यासह प्रतिष्ठानच्या सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.

सिद्धिविनायक कॉलनी समोर बस थांबा करण्याची मागणी…

आजरा : प्रतिनिधी

सिद्धिविनायक कॉलनी, मुल्ला कॉलनी,लाडजी कॉलनी व कोर्टातील नागरिकांचा होणारा त्रास लक्षात घेता कॉलनीच्या कोपऱ्यावर विनंती बस थांबा करावी अशी मागणी मा. उपनगराध्यक्ष अनिरुद्ध(बाळ)केसरकर व नगरसेविका सौ. अन्वी अनिरुद्ध केसरकर यांनी आगार प्रमुख श्री पृथ्वीराज चव्हाण यांना केल व तसे निवेदन त्यांना दिले यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवानी कुंभार हिचे अल्पशा आजाराने निधन

उत्तूर येथील शिवानी सागर कुंभार (वय १७) हिचे अल्पशा आजाराने निधन झाले. दहावीच्या परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवून तिने साधना कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता.

गेली चार महिने ती आजाराशी झुंज देत होती. मात्र, उपचार सुरू असतानाच अखेर तिची जीवनज्योत मावळली. हुशार व अभ्यासू असलेल्या शिवानीच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

तिच्या पश्चात आई-वडील, एक बहीण व एक भाऊ असा परिवार आहे.

निधन वार्ता

पार्वती लोखंडे

उत्तूर : उत्तूर येथील पार्वती शंकरराव लोखंडे (वय ८२) यांचे गुरुवार (दि. १२ नोव्हेंबर) रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. उत्तूर गावचे प्रतिष्ठित व्यापारी सुनील लोखंडे यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात चार मुले, चार सुना व सात नातवंडे असा परिवार आहे.

हिराबाई होडगे

कोवाडे ता. आजरा येथील हिराबाई विठोबा होडगे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा परशुराम होडगे, दोन मुली सून नातवंडे असा परिवार आहे.

सुरेखा कोंडुसकर

चांदेवाडी ता. आजरा येथील श्रीमती सुरेखा अर्जुन कोंडूसकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.पं. दीनदयाळ विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी व शिंदे सेनेचे कार्यकर्ते विजय कोंडुसकर यांच्या त्या आई होत.

नंदाताई नाईक

आरदाळ ता. आजरा येथील नंदाताई पांडुरंग नाईक यांचे आकस्मिक निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे.

आजचे पंचांग

दिनांक : १३ नोव्हेंबर २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : कार्तिक
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : चतुर्थी तिथी (रात्री ०८.४२ पर्यंत) त्यानंतर पंचमी तिथी
नक्षत्र : मूळ नक्षत्र (सायंकाळी ०५.१६ पर्यंत) त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र
योग : धृति योग (१४ नोव्हेंबर पहाटे ०५.२२ पर्यंत) त्यानंतर शूल योग
करण : वाणीजा करण (सकाळी ०७.२४ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : धनु राशी
सूर्य राशी : तूळ राशी
अशुभ मुहूर्त :
राहु काळ : सकाळी १०.५८ ते दुपारी १२.२३ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०० ते दुपारी १२.४५
सूर्योदय : सकाळी ०६.४६
सूर्यास्त : सायंकाळी ०५.५९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

रविवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

राजेंद्र देसाई यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!