mrityunjaymahanews
अन्य

शनिवार सातच्या बातम्या

बिबट्याचे आगमन… इतर प्राण्यांचे पलायन

आजरा : प्रतिनिधी

आजरा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ठीकठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे. विशेष म्हणजे बिबट्या ज्या भागात दिसत आहे, त्या भागातून गवे, रानडुकरे, वानरे आणि इतर वन्य प्राण्यांनी आपला मुक्काम हलवल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या काही वर्षांत गवे आणि रानडुकरांनी भात, मका, ऊस पिकांचे मोठे नुकसान केले होते. वानरांनीही घरांवर, शेतात धुमाकूळ घातला होता. मात्र ज्या परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणा आणि दर्शन होत आहे, त्या भागातून हे प्राणी काढता पाय घेत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, तालुक्यात बिबट्याकडून अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ल्याची घटना घडलेली नाही. त्यामुळे बळीराजाकडून एकप्रकारे समाधान व्यक्त होत आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे का होईना, इतर वन्य प्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान तूर्तास थांबले असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

वन विभागाने मात्र नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे, लहान मुलांना एकटे सोडू नये आणि बिबट्या दिसल्यास वन विभागाला तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.

तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

Oplus_131072

आजरा : प्रतिनिधी

महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाच्या आदेशाची सात वर्षांपासून अंमलबजावणी न झाल्याने मसोली येथील शेतकरी निवृत्ती गजरगावकर यांनी आजरा तहसील समोर सुरू केलेले उपोषण मागे घेण्यात आले.

याबाबत तहसीलदारांनी लेखी आश्वासन दिले असून, मसोली गावच्या जमिनीच्या वादाबाबत फेरचौकशीचे कामकाज सुरू आहे. हे कामकाज अर्धन्यायीक असून कायदेविषयक बाबींची पडताळणी करून लवकरच गुणदोषावर निर्णय घेऊन कळवण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे.

या आश्वासनानंतर शेतकऱ्याने उपोषण मागे घेतले.

भात मळणीत गुंतला बळीराजा

आजरा : प्रतिनिधी

आजरा तालुक्यात भात पिकाच्या मळणीचा हंगाम सुरू झाला असून खळ्यांवर बळीराजाची लगबग वाढली आहे.

सध्या शेतकरी भाताची कापणी, ट्रॅक्टर व बैलजोडीच्या साहाय्याने मळणी करणे, तसेच खळ्यावरील भात वारा देऊन स्वच्छ करून घरी आणून ठेवण्याच्या कामात व्यस्त आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत संपूर्ण कुटुंब शेतात राबताना दिसत आहे.

यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची परिस्थिती असली तरी, पदरात पडेल ते आपले मानून बळीराजा जिद्दीने कामाला लागला आहे. हातात आलेले पीक वाया जाऊ नये म्हणून मळणीची कामे वेळेत उरकण्याची धावपळ सुरू आहे. मजुरांची टंचाई असल्याने अनेक ठिकाणी यांत्रिक मळणीला पसंती दिली जात आहे.

दरम्यान, शासनाने हमीभावाने खरेदी केंद्र तातडीने सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

उत्तूरवर पाणीटंचाईचे सावट गडद

पुढील सहा महिने पाण्याची कसोटी,नियोजनाची गरज.
अजूनही पाईपलाईनचे काम अपूर्णच.

उत्तूर : प्रतिनिधी 

उत्तूर परिसरात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पाण्याच्या टाकीत पाणी उपलब्ध असतानाही अनेक घरांपर्यंत अद्याप पाणी पोहोचलेले नाही. काही भागांत पाइपलाइनची कामे अपूर्ण आहेत, तर अनेक नागरिकांनी घरासमोरील पाइपला अद्याप चावी बसवलेली नाही. परिणामी, पाणीपुरवठा योजना असूनही प्रत्यक्ष पाणी वितरणाचा प्रश्न कायम आहे.

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी सहा महिने पाण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. ऑक्टोबर महिन्यातच पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने उन्हाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा किती काळ पुरेल, याचा विचार करून आतापासूनच नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.पाण्याची उपलब्धता आणि त्याचे योग्य वितरण या दोन्ही बाबी आगामी काळात निर्णायक ठरणार आहेत. धरणातून पाणी उपलब्ध झाले, तरी अपूर्ण पाइपलाइन आणि नळजोडण्यांना चाव्या नसल्यास त्याचा लाभ सर्व घरांपर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेने अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर देणे आवश्यक आहे.

नागरिकांनीही आपल्या घरासमोरील पाइपला चावी बसवून नळजोडणी कार्यान्वित करून घ्यावी. त्याचबरोबर पाण्याचा अनावश्यक वापर आणि अपव्यय रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रत्येक नळजोडणीला पाणीमीटर बसविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.पुढील सहा महिन्यांत पाण्याची उपलब्धता आणि त्याचे नियोजन हा उत्तूरसमोरील महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून राहण्याबरोबरच उपलब्ध पाणी किती काटकसरीने वापरले जाते, यावरही पाणीपुरवठ्याचे भवितव्य अवलंबून असेल. ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणांनी पाणीपुरवठ्याचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना वेळीच करणे गरजेचे आहे. नागरिकांनीही नळजोडणीला चावी बसविणे आणि पाण्याचा अपव्यय टाळणे याकडे दुर्लक्ष करू नये.

टाकीत पाणी असूनही घरांपर्यंत ते पोहोचत नसेल, तर योजनेच्या अंमलबजावणीचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आगामी उन्हाळ्यात संभाव्य टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने आताच पावले उचलावीत अन्यथा उत्तूरकरांना पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ येऊ शकते.

 

निधन वार्ता
सोपान पाटील

मेढेवाडी ता.आजरा येथील सोपान ज्ञानू पाटील (वय ४६ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी असा परिवार आहे.

आजचे पंचांग 

आजचे पंचांग
दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : आश्विन
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : षष्ठी तिथी (सायंकाळी ४.५७ पर्यंत) त्यानंतर सप्तमी तिथी
नक्षत्र : आर्द्रा नक्षत्र (सकाळी ७.११ पर्यंत) त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र
योग : सिद्ध योग (सायंकाळी ५.३१ पर्यंत) त्यानंतर साध्य योग
करण : वाणीजा करण (सायंकाळी ४.५७ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : मिथुन राशी (रात्री ११.५९ पर्यंत) त्यानंतर कर्क राशी
सूर्य राशी : तूळ राशी
अशुभ मुहूर्त :
राहु काळ : सकाळी ९.३१ ते सकाळी १०.५६ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : सकाळी ११.५९ ते दुपारी १२.४५
सूर्योदय : सकाळी ०६.३९
सूर्यास्त : सायंकाळी ०६.०४
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८

 

संबंधित पोस्ट

शिक्षक भरतीत शासनाची फसवणूक, मुख्याध्यापकासह पाच जणांविरोधात गुन्हा नोंद…डॉ.झाकीर हुसेन उर्दू हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रकार

mrityunjay mahanews

तर तालुका संघ निवडणूक लढण्याची तयारी…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींचा सविस्तर निकाल

mrityunjay mahanews
error: Content is protected !!