गुरुवार
दि.२२ ऑक्टोबर २०२६

माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेले षडयंत्र; हसन मुश्रीफ यांचा आरोप
आजरा साखर कारखान्याच्या २८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ ; चार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

आजरा : प्रतिनिधी
माझ्या मुलाचा केलेला पराभव हा ठरवून केलेले षडयंत्र आहे. मतदान केंद्रावरील आकडेवारी पाहिली, तर हे सहज लक्षात येईल, असा घणाघाती आरोप वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. आजरा साखर कारखान्याच्या २८ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना, अमृतनगर या कार्यस्थळावर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे नूतन संचालक व माजी आमदार राजेश पाटील होते. संचालक संभाजी रामचंद्र पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. शांता संभाजी पाटील यांच्या हस्ते काटापूजन करण्यात आले. उपाध्यक्ष अनिल फडके यांनी स्वागत केले, तर अध्यक्ष मकुंदराव देसाई यांनी प्रास्ताविकात कारखान्याच्या गळीत हंगामाच्या नियोजनाची माहिती दिली. यंदा चार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यानुसार तोडणी व ओढणी यंत्रणा कार्यान्वित केल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, वडिलांच्या निधनानंतर आपण शेतीत काम केले. टोमॅटो, वांगी यांचे उत्पादन घेतले, तसेच कोंबड्या आणि गाई पाळल्या. त्यामुळे शेतीचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव आहे. ‘मी अचानक पुढे आलेले नेतृत्व नाही, तर जमिनीत कसून तयार झालेले नेतृत्व आहे. कुणी कितीही प्रयत्न केले, तरी माझी पाळेमुळे जमिनीत घट्ट आहेत,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
सहकार क्षेत्रातील अनेक वर्षांच्या वाटचालीत दूध संघ, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, बँका आणि साखर कारखान्यांच्या निवडणुकांमध्ये विजय मिळविल्यानंतर आता पराभवाला सामोरे जावे लागले आहे. जीवनात अशा घटना घडत असतात. कधीकधी ठेच लागलेली बरी असते; त्यामुळे माणूस जमिनीवर येतो. या पराभवाचे चिंतन करून झालेल्या चुका दुरुस्त करूया, असे आवाहनही त्यांनी केले.
शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतीत चांगला फायदा होऊ शकतो. हवामानाची माहिती वेळेवर मिळाल्याने पाणी आणि खतांचे योग्य व्यवस्थापन करता येईल. परिणामी ऊस उत्पादनात वाढ करणे शक्य होईल, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार राजेश पाटील यांचेही भाषण झाले.
कार्यक्रमाला वसंतराव धुरे, विष्णुपंत केसरकर, सुधीर देसाई, रणजित देसाई, एम. के. देसाई, सुभाष देसाई, दीपक देसाई, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरकुटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, रचना होलम, मनिषा देसाई, काशिनाथ तेली, नामदेव नार्वेकर, रशीद पठाण, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, जयसिंग चव्हाण आणि कार्यकारी संचालक संभाजी सावंत आदी उपस्थित होते. रमेश देसाई यांनी सूत्रसंचालन केले, तर मारुती घोरपडे यांनी आभार मानले.

दुष्काळसदृश परिस्थितीत वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय; हरपवडे जंगलात वनराई बंधारा उभारला

आजरा : प्रतिनिधी
वन्यप्राण्यांना जंगलातच पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे आणि पाण्याच्या शोधात त्यांची होणारी भटकंती कमी व्हावी, या उद्देशाने वनपरिक्षेत्र आजरा (प्रा.), वनपरिमंडळ उत्तर आजरा, नियतक्षेत्र साळगाव अंतर्गत हरपवडे येथील जंगल कक्ष क्रमांक १६३ A मध्ये वनराई बंधारा घालण्यात आला.
उन्हाळ्यातील पाणीटंचाई व दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता, जंगलातील जलस्रोतांचे संवर्धन करून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची उपलब्धता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. या उपक्रमामुळे परिसरातील वन्यजीवांना पाण्याचा आधार मिळण्यास मदत होणार आहे.
हा उपक्रम श्री. सचिन सावंत (वनपरिक्षेत्र अधिकारी), श्री. कृष्णा डेळेकर (वनपाल, उत्तर आजरा), यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
यावेळी वनरक्षक साळगाव श्रीमती सरिता बावस्कर, वनमजूर श्री. कुंडलिक शिंदे, श्री. मधुकर दोरुगडे, वन्यजीव बचाव पथकाचे सदस्य श्री. समीर केरकर, अक्षय पाटील, सौरभ कोंडूस्कर, प्रवीण कांबळे तसेच हरपवडे धनगरवाडा येथील ग्रामस्थ श्री. विशाल गावडे व श्री. दादू येडगे यांनी सहकार्य केले.

आजरा शहर व परिसरात दसरा उत्साहात साजरा

आजरा शहर व परिसरात विजयादशमी अर्थात दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिरापासून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या पालखीचे ठीक ठिकाणी नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. पालखी मार्गावर भाविकांनी फुले उधळून दर्शन घेतले.
दसऱ्यानिमित्त नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सायंकाळी निमजगा माळ येथे पालखीतील सोने लुटण्याचा पारंपरिक कार्यक्रम मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने-चांदी व वाहन खरेदीवर नागरिकांचा अधिक भर दिसून आला.
शहरातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या मूर्तींचे रात्री उशिरापर्यंत विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात सवाद्य विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. तर काही मंडळांच्या मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका बुधवारी काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

आजचे पंचांग
दिनांक : २२ ऑक्टोबर २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : आश्विन
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : एकादशी तिथी (दुपारी ०२.४७ पर्यंत) त्यानंतर द्वादशी तिथी
नक्षत्र : शततारका नक्षत्र (रात्री ०८.४८ पर्यंत) त्यानंतर पूर्वाभाद्रपदा नक्षत्र
योग : वृद्धि योग (रात्री ११.३९ पर्यंत) त्यानंतर ध्रुव योग
करण : गराजा करण (दुपारी ०२.११ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : कुंभ राशी
सूर्य राशी : तूळ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०१.५० ते दुपारी ०३.१६ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०० ते दुपारी १२.४६
सूर्योदय : सकाळी ०६.३६
सूर्यास्त : सायंकाळी ०६.१०
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

करपेवाडीत दसरा महोत्सव उत्साहात,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

उत्तूर : प्रतिनिधी
करपेवाडी दसऱ्यानिमित्त करपेवाडी येथे विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. नृत्य, गायन व नाटिका अशा २० कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.यावेळी अग्निवीर म्हणून निवड झालेल्या प्रणय कसबेकर, पोलीस सेवेत निवड झालेले रोहित बोटे, हर्षवर्धन मांडरे व श्रीपाद कांबळे, तसेच कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिका म्हणून निवड झालेल्या जयश्री कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक गणपत रामचंद्र सुतार यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच मच्छिंद्र कडगावकर, उपसरपंच दत्ता मांडे, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील उपस्थित होते. आयोजनासाठी अंगणवाडी सेविका शोभा मांडे व मदतनीस सुमन कसबेकर यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन दीपक कांबळे सर यांनी केले.
