mrityunjaymahanews
अन्य

शुक्रवार – सातच्या बातम्या

शुक्रवार 

दि.९ ऑक्टोबर २०२६

अशोक चराटी यांना महायुतीतून गोकुळची उमेदवारी …
वसंतराव धुरे यांच्या स्विकृतवरही शिक्कामोर्तब….
अंजनाताई महाविकास आघाडीतून रिंगणात

आजरा : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) करिता तालुक्यातील अशोक चराटी, श्रीमती अंजनाताई रेडेकर व वसंतराव धुरे या तीन उमेदवारांना उमेदवारीची संधी मिळाली आहे. पैकी धुरे हे अडीच वर्षाकरिता स्वीकृत संचालक म्हणून निवडले जाणार आहेत.

आजरा तालुक्याला महायुतीतून संधी मिळणार की नाही याबाबत उलट सुलट चर्चा असतानाच नेते मंडळींनी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख, आजऱ्याचे नगराध्यक्ष अशोक चराटी यांचे राजकीय वजन लक्षात घेऊन त्यांना भाजपातून उमेदवारी जाहीर केली आहे. जागावाटपाच्या तडजोडीत सुरुवातीला मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक वसंतराव धुरे यांचे नाव मागे पडले होते. त्यांनाही अडीच वर्षाकरिता स्वीकृत संचालकपदी संधी देण्याचे जाहीर केल्याने उत्तूर विभागाचा प्रश्नही आपोआप मार्गी लावण्यात नेतेमंडळींना यश आले आहे तर आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या आघाडीतून कै. केदारी रेडेकर संस्था समूहाच्या प्रमुख व गोकुळच्या विद्यमान संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात तीन पदांची लॉटरी आजरा तालुक्याला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्हा बँकेच्या राजकारणाची झालर…

गोकुळच्या चराटी व धुरे यांना संधीमागे जिल्हा बँकेच्या राजकारणाची झालर आहे. त्यामुळे चराटी यांना दुखावून अडचणी वाढवण्याऐवजी संधी देण्यास नेते मंडळींनी प्राधान्य दिल्याचे बोलले जाते.

डंपर पलटी होऊन चालकाचा मृत्यू

उत्तूर : प्रतिनिधी

उत्तूर ते गारगोटी मार्गावर पिंपळगावच्या दिशेने काँक्रिट घेऊन जाणारा सिमेंट मिक्सर डंपर पलटी झाल्याने चालक मुन्ना सुरेंद्र चौपाल (वय २९, रा. मुमेवाडी तिठ्ठा, ता. आजरा, मूळ रा. बिहार) यांचा मृत्यू झाला. गुरुवारी (८) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास देवीदास सावंत यांच्या घरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर हा अपघात झाला.

चौपाल हे एमएच ०५ डीके २२३६ क्रमांकाच्या वाहनातून काँक्रिट घेऊन पिंपळगावच्या दिशेने जात होते. दरम्यान, डंपरचा अँक्सल तुटल्याने वाहन घसरत मागे उत्तूरच्या दिशेने आले आणि रस्त्यावर पलटी झाले. यात चौपाल गंभीर जखमी झाले. मात्र, उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. याप्रकरणी उत्तूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल जमीर मकानदार पुढील तपास करीत आहेत.रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने या मार्गावर मोठ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची चर्चा आहे.

गावी परतण्यापूर्वीच काळाचा घाला…

चौपाल हे ९ ऑक्टोबर रोजी बिहारमधील आपल्या गावी जाणार होते. मात्र, त्याआधीच झालेल्या या दुर्दैवी घटनेने त्यांच्या कुटुंबीयांसह सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागासाठी मुक्कामी एसटी फेऱ्या सुरू करा – आजरा एकसंघ व्यापारी असोसिएशनची मागणी

आजरा : प्रतिनिधी

आजरा शहर हे तालुका व पंचक्रोशीतील नागरिकांच्या दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. शासकीय कामे, आरोग्य, शिक्षण, शेती साहित्य खरेदी-विक्रीसाठी ग्रामीण भागातील नागरिकांना आजरा येथे नियमित यावे लागते. मात्र अनेक ग्रामीण मार्गावर मुक्कामी बसफेऱ्या नसल्याने सकाळी लवकर येणे व सायंकाळी परत जाणे कठीण झाले आहे या पार्श्वभूमीवर आजरा शहर एकसंघ व्यापारी मंडळाच्या वतीने आगार व्यवस्थापक, आजरा आगार यांना निवेदन दिले.

पश्चिमेकडील किटवडे परिसर, पूर्वेकडील सुळे, कानोली, गजरगाव, मलिग्रे, दक्षिणेकडील इब्राहिमपूर, चंदगड, धनगरवाडा, भावेवाडी, चितळे, चाफवडे, वाटंगी, मोरेवाडी तर उत्तरेकडील गारगोटी, देवकांडगाव, विनायकवाडी, कोरिवडे, हरपवडे, पेरणोली, वजरे, महागोंड परिसरातील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

निवेदनावर असोसिएशनचे अध्यक्ष महेश नार्वेकर, उपाध्यक्ष यशवंत इंजल, सचिन इंदलकर आदींच्या सह्या आहेत.

शासकीय तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत पं. दीनदयाळ विद्यालयाचे यश

आजरा : प्रतिनिधी
आजरा येथे झालेल्या शासकीय तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत पं. दीनदयाळ विद्यालयच्या १७ वर्षे व १४ वर्षे वयोगटात झालेल्या विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करून यश मिळवले.

१७ वर्षे वयोगटात १०० मी.धावणे स्पर्धेत कु.तनुजा सुनील निकम तसेच भालाफेक स्पर्धेत कु मीरा सुनील हरेर या दोघींनी द्वितीय क्रमांक पटकावला.१४ वर्षे वयोगटात ४०० मीटर धावणे स्पर्धेत कु.खदिजा इब्राहिम माणगावकर द्वितीय क्रमांक तर कु.वैदही संभाजी राणे हिने तृतीय क्रमांक पटकावला.

या यशस्वी विद्यार्थिनींना एस .आर .कुंभार, एस. ए.निर्मळे यांचे मार्गदर्शन मिळाले.संस्थेचे अध्यक्ष प्रा . डॉ.सुधीर मुंज ,संस्थेचे सचिव मलिक कुमार बुरुड ,विद्यालयाचे मुख्याध्यापक एस .वाय.देसाई यांचे प्रोत्साहन लाभले.

मडिलगेतील आडाची गल्लीतील रस्ता तातडीने दुरुस्त करा – मनसेची मागणी

आजरा : प्रतिनिधी

मौजे मडिलगे ता. आजरा येथील आडाची गल्लीतील रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत खराब व खड्डेमय झाला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वार घसरून अपघात व जखमी होण्याचे प्रकार घडत असून धुळीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही दुरुस्ती झाली नाही, असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष आनंदा घंटे यांनी ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत मडिलगे यांना निवेदन दिले आहे.

रस्त्याची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर कविता आप्पा घंटे, कृष्णा बापू पाटील, आनंदा आप्पा घंटे, राकेश वांगणेकर आदींच्या सह्या आहेत.

काँक्रिटीकरणामुळे जोडरस्ते सखलात, ये-जा करताना अडचणी.

मुख्य रस्ता व जोडरस्त्यांची उंची समांतर करण्याची गरज.

उत्तूर : प्रतिनिधी 

उत्तूर-मुम्मेवाडी मार्गावरील काँक्रिटीकरणामुळे मुख्य रस्त्याची पातळी वाढली असून,त्याला जोडणारे तसेच गावात प्रवेश करणारे काही रस्ते तुलनेने खाली राहिले आहेत. त्यामुळे जोडरस्ते सखलात गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, विशेषतः उत्तूर स्मशानभूमीपासून आत गावाकडे येणारा रस्ता मुख्य रस्त्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात खाली राहणार असल्याने या रस्त्याच्या प्रवेशाच्या ठिकाणीच अडचणी निर्माण होत आहेत. मुख्य मार्गावरून या जोडरस्त्यावर उतरताना तसेच जोडरस्त्यावरून मुख्य मार्गावर येताना वाहनांना मोठा चढ-उतार पार करावा लागणार आहे.

यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांसह पादचाऱ्यांचीही गैरसोय होण्याची शक्यता आहे. काँक्रिटीकरणाच्या कामामुळे मुख्य रस्ता उंचावला. मात्र त्याला जोडणाऱ्या रस्त्यांची योग्य पद्धतीने उंची समायोजित न झाल्याने ठिकठिकाणी उंच-सखलपणा निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाचे पाणी साचणे, दुचाकी व चारचाकी वाहनांना चढ-उतार करताना अडचण येणे तसेच वृद्ध व विद्यार्थ्यांना ये – जा करताना त्रास होण्याची शक्यता आहे.

मुख्य रस्ता आणि त्याला जोडणाऱ्या रस्त्यांची उंची समांतर करून हा उंच-सखलपणा तातडीने दूर करणे आवश्यक आहे. रस्त्याचे काम पूर्ण करताना जोडरस्ते, प्रवेशमार्ग आणि पाण्याचा निचरा यांचाही समन्वयाने विचार होणे गरजेचे आहे.संबंधित अधिकारी व प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून सखलात गेलेल्या रस्त्यांची स्थिती तपासावी आणि आवश्यक त्या ठिकाणी भराव व दुरुस्तीची कामे करून मार्ग सुरळीत करावा. काँक्रिटीकरणामुळे गावकऱ्यांच्या दैनंदिन वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे.

आजचे पंचांग

दिनांक : ९ ऑक्टोबर २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : चतुर्दशी तिथी (रात्री ०९.३५ पर्यंत) त्यानंतर अमावस्या तिथी
नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी नक्षत्र (रात्री ०९.१९ पर्यंत) त्यानंतर हस्त नक्षत्र
योग : ब्रह्म योग (रात्री ११.२० पर्यंत) त्यानंतर इन्द्र योग
करण : विस्ती भद्रा करण (सकाळी ०९.५२ पर्यंत) त्यानंतर शकुनी करण
चंद्र राशी : कन्या राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी १०.५७ ते दुपारी १२.२६ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०२ ते दुपारी १२.४९
सूर्योदय : सकाळी ०६.३२
सूर्यास्त : सायंकाळी ०६.१९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक विशेष

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!