गुरुवार
दि.८ ऑक्टोबर २०२६


शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’च्या मागणीसाठी आजऱ्यात मोर्चा

आजरा : प्रतिनिधी
२० पटसंख्येखालील शाळा बंद करण्याच्या शासनाच्या हालचालींच्या निषेधार्थ व मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजरा येथे ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाची सुरुवात शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. घोषणाबाजी करत मोर्चा तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला. शासकीय शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा, सरकारी शिक्षण व्यवस्था सक्षम करावी, गावातच दर्जेदार शिक्षण द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी बोलताना कॉ. संजय तरडेकर यांनी सरकारी शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क असून शाळा बंद करण्याऐवजी सुविधा देऊन सक्षम कराव्यात, असे सांगितले. पटसंख्या कमी असल्याच्या कारणाने शाळा बंद केल्यास ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अधिकारावर गदा येईल, असेही त्यांनी नमूद केले.
त्यानंतर तहसीलदार कार्यालयात निवासी नायक तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चात शिक्षक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व विविध गावांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गव्याच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
आजरा : प्रतिनिधी
आजरा – पेरणोली मार्गावर साळगाव जवळ गव्याने दुचाकीला धडक दिल्याने धनाजी प्रकाश जाधव रा. पेरणोली (ता. आजरा) जखमी झाले. आज सकाळी ८ वाजता अपघात झाला. वनविभागाने या घटनेचा पंचनामा केला आहे.
श्री. जाधव हे पेरणोलीहून आजऱ्याकडे येत होते. वनसंशोधन केंद्राजवळ श्री. जाधव यांच्या दुचाकीला रस्त्यावर आलेल्या गव्याने धडक दिली. जाधव हे दुचाकीसह रस्त्याकडेला पडले. त्यांच्यावर आजऱ्यातील खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना गडहिंग्लजकडे हलवण्यात आले आहे. वनपाल कृष्णा डेळेकर यांनी घटनेची माहीती घेतली.

धनगरमोळा येथील शाळा व अंगणवाडीत सुविधा द्या – शाळा वाचवा मंचची मागणी

आजरा : प्रतिनिधी
मौजे धनगरमोळा येथील प्राथमिक शाळा व अंगणवाडीमध्ये मूलभूत भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याबाबत शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, आजरा यांच्यावतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती आजरा यांना निवेदन देण्यात आले.
धनगरमोळा प्राथमिक शाळेतील वीजपुरवठा गेल्या वर्षभरापासून बंद आहे. मुला-मुलींची स्वच्छतागृहे व मुतारी बंद अवस्थेत आहेत, तर स्वच्छ व सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोयीच्या परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे.
अंगणवाडीची इमारत असूनही तेथेही वीज, स्वच्छतागृह, पाणी यासारख्या सुविधा नाहीत. ही बाब बालकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर आहे.
अशा परिस्थितीत गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळणार? सुविधा न दिल्याने पटसंख्या कमी होते आणि नंतर पटसंख्या कमी असल्याचे कारण देऊन शाळा बंद करण्याचा विचार होतो, असा सवाल मंचने उपस्थित केला.
त्यामुळे शाळा व अंगणवाडीची तातडीने पाहणी करून वीजपुरवठा सुरळीत करावा, स्वच्छतागृहे दुरुस्त करून वापरण्यायोग्य करावीत, पिण्याच्या पाण्यासह आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर नारायण भडांगे, प्रकाश मोरुस्कर कृष्णा खरुडे, परशुराम शेटगे, मारुती शेठगे, मारुती पाटील , कॉ. दत्ता कांबळे, संतोष शेडगे यांच्यासह शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंचच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

आजरा साखर सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी महादेव सरोळकर तर व्हा. चेअरमनपदी सौ. रजनी जाधव बिनविरोध

आजरा : प्रतिनिधी
आजरा साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, गवसे या संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच उत्साहात पार पडली. या निवडणुकीत चेअरमनपदी महादेव विठोबा सरोळकर तर व्हाईस चेअरमनपदी सौ. रजनी रवींद्र जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. येजरे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड सभा पार पडली. बैठकीत चेअरमन पदासाठी महादेव सरोळकर यांचे नाव संचालक प्रशांत जाधव यांनी सुचवले, तर त्यास संचालक पांडुरंग दोरुगडे यांनी अनुमोदन दिले. तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी सौ. रजनी जाधव यांचे नाव संचालक विजय माने यांनी सुचवले आणि त्यास संचालक प्रभाकर कांबळे यांनी अनुमोदन दिले. सभेस संचालक दयानंद लोहार, सागर मांगले, कृष्णाजी कांबळे, सौ. सुरेखा भुजंग यांच्यासह संस्थेचे व्यवस्थापक संदीप पाटकर व क्लार्क दशरथ मळेकर उपस्थित होते.

निधन वार्ता
रमेश रक्ताडे

उत्तुर ता. आजरा येथील रमेश शिवराम रक्ताडे (वय ४८ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. अंत्यविधी आज गुरुवारी सकाळी करण्यात येणार आहेत.

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत आजरा हायस्कूलचे यश

आजरा : प्रतिनिधी
आजरा येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. १७ वर्षे आणि १४ वर्षे वयोगटात झालेल्या विविध मैदानी व रिले प्रकारात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.
१७ वर्षे वयोगटात १०० मीटर धावणे मुले प्रकारात महम्मद आय्याज यासीन माणगावकर याने प्रथम क्रमांक, २०० मीटर धावणे मुले प्रकारात अनंत संतोष गिरी याने प्रथम क्रमांक पटकावला. २०० मीटर धावणे मुली, लांब उडी मुली आणि उंच उडी मुली या तीन प्रकारात दीपा रामचंद्र गावडे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. ४ × १०० मीटर रिले मुले प्रकारात महम्मद आय्याज यासीन माणगावकर, अनंत संतोष गिरी, सिद्धिक नजबूलाक वाडीकर, जीवन निंगाप्पा कांबळे, प्रज्वल प्रकाश लाड या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. तर ४ × १०० मीटर रिले मुली प्रकारात दीपा रामचंद्र गावडे, साक्षी गंगाराम गावडे, श्रेया प्रदीप पाचवडेकर, श्रेया गजानन पाटील, श्रद्धा उत्तम सलामवाडे या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. ४ × ४०० मीटर रिले मुले व मुली या दोन्ही प्रकारात आजरा हायस्कूलच्या संघांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
१४ वर्षे वयोगटात मुले १०० मीटर धावणे प्रकारात नियंत अजित पवार याने प्रथम क्रमांक तर उत्कर्ष उमेश जाधव याने तृतीय क्रमांक मिळवला. मुली १०० मीटर धावणे प्रकारात अन्वी राहुल नेवरेकर हिने प्रथम क्रमांक, २०० मीटर धावणे मुली प्रकारात उत्कर्षा अनिल निर्मळे हिने प्रथम क्रमांक, २०० मीटर धावणे मुले प्रकारात महंमद रहीम तुला बुडे खान याने द्वितीय क्रमांक, थाळीफेक मुले प्रकारात उत्कर्ष उमेश जाधव याने तृतीय क्रमांक मिळवला. ४ × १०० मीटर रिले मुले प्रकारात उत्कर्ष उमेश जाधव, मोहम्मद रहीम तुला बुडे खान, आरुष नितीन कुंभार, नियत अजित पोवार, ऋतुराज सागर गिरी गोसावी या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. ४ × १०० मीटर रिले मुली प्रकारात उत्कर्षा अनिल निर्मळे, मुंतहा नवीद सय्यद, श्रावणी तानाजी इलगे, अन्वी राहुल नेवरेकर, अफिफा साधिक नेसरीकर या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
या यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक एम. एस. गोरे, एम. व्ही. पाटील आणि ए. एस. नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशासाठी जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी, सर्व संचालक व सल्लागार, तसेच मुख्याध्यापक ए. आर. व्हसकोटी, पर्यवेक्षक एम. एस. गोरे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांचे प्रोत्साहन लाभले.

आजचे पंचांग
दिनांक : ८ ऑक्टोबर २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : त्रयोदशी तिथी (रात्री १०.१५ पर्यंत) त्यानंतर चतुर्दशी तिथी
नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी नक्षत्र (रात्री ०९.१९ पर्यंत) त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र
योग : शुक्ल योग (९ ऑक्टोबर रात्री १२.५७ पर्यंत) त्यानंतर ब्रह्म योग
करण : गराजा करण (सकाळी १०.४३ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : सिंह राशी (९ ऑक्टोबर सकाळी ०३.१७ पर्यंत) त्यानंतर कन्या राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०१.५४ ते दुपारी ०३.२३ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०२ ते दुपारी १२.४९
सूर्योदय : सकाळी ०६.३२
सूर्यास्त : सायंकाळी ०६.२०
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
