mrityunjaymahanews
अन्य

रविवार सातच्या बातम्या

रविवार दिनांक ६ सप्टेंबर २०२६

शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा : सुधीर देसाई

पेरणोली येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम

पेरणोली : प्रतिनिधी

विविध शासकीय योजना शेतकऱ्यांसाठी शासनाच्यावतीने दिल्या जातात. सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई यांनी केले.

पेरणोली (ता. आजरा) येथे शेतकरी मार्गदर्शन व मका बियाणे वाटप कार्यक्रम झाला. सरपंच वनश्री देसाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. या वेळी श्री. देसाई यांनी मार्गदर्शन केले. उपसरपंच संकेत सावंत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र सावंत, स्वाभिमानीचे उपजिल्हा प्रमुख तानाजी देसाई, शिवसेना उबाठाचे तालु‌का प्रमुख युवराज पोवार, शिवसेन्ना उपतालुका प्रमुख काकासो देसाई, सर्जेराव देसाई, अमरसिंह पोवार, ग्रामपंचायत सदस्या शुभदा सावंत, संदिप नावलकर, रणजित फगरे, आजरा कारखाना संचालक हरीश कांबळे प्रमुख उपस्थित होते.

आजरा पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग व पशुवैद्यकीय चिकित्सालय पेरणोली यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

रविंद्र देसाई यांनी स्वागत केले. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय सहाय्यक आयुक्त डॉ. पी. सी. मुत्येपोड, पश्वैदकीय अधिकारी पी.डी. ढेकळे यांनी मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत अधिकारी अमिषा देवर्डेकर, पांडुरंग पाईम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव मोहिते, ग्रामपंचायत अधिकारी अमिषा देवर्डेकर, पांडरंग पाईम, हिंद्राव कालेकर, एस. व्ही. कालेकर यंच्यासह दूध संस्था, सेवा संस्थाचे पदाधिकारी, सोहाळे, बाची, साळगाव, मूंग्रसवाडी, पेरणोली, हरपवडे, कोरिवडे, देवकांडगाव, विनायकवाडी येथील शेतकरी उपस्थित होते. पशुधन पर्यवेक्षक डॉ. संतोष कांबळे यांनी आभार मानले.

व्यंकटराव हायस्कूल मध्ये शिक्षक दिन साजरा

आजरा : प्रतिनिधी

थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, आजरा तालुक्याचे सुपुत्र ज्येष्ठ शिक्षणतज्ञ जे पी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये शिक्षक दिन संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष श्री जयवंतराव शिंपी यांचे शुभ हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य श्री.संजयकुमार पाटील , पर्यवेक्षिका सौ.व्ही जे शेलार , प्राथमिक मुख्याध्यापक श्री आर व्ही देसाई, श्री एम ए पाटील व सर्व स्टाफ उपस्थित होता. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक वृंदांना भेट देऊन आदर व्यक्त केला.

ज्ञानदानाचे पवित्र कार्य हे भाग्यानेच मिळते. ज्ञानदान ही सेवा म्हणून आपल्या संकुलातील सर्व शिक्षक अतिशय मनोभावे सत्कार्य करत आहेत. या कार्याकडे पाहून या संकुलाचा समाजामध्ये अभिमान वाढत आहे याचे आम्हाला कौतुक वाटते असे मत व्यक्त करून संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी शिक्षक वृंद्धांना शुभेच्छा दिल्या.

शिक्षक आणि त्यांचे कार्य प्रत्यक्ष कृतीतून अनुभवता यावे म्हणून शाळेतील  विद्यार्थ्यांनी एक दिवस शिक्षक होण्याचा अनुभव घेतला. अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षक व त्यांचे अध्यापनाचे कार्य सुरळीत पार पाडले. विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून क्षितिज थोरवत याने आपले काम विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने पूर्ण केले.

आजरा हायस्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात संपन्न

आजरा : प्रतिनिधी

जनता एज्युकेशन सोसायटी संचालित आजरा हायस्कूल येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सण आणि सांस्कृतिक विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक श्री. ए. आर. व्हसकोटी सर व ज्येष्ठ शिक्षक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. उपस्थित सर्व मान्यवर शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

यावेळी विद्यार्थिनी कु. दिप्ती सावंत हिने शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच थोर शिक्षणतज्ज्ञ श्री. जे. पी. नाईक यांच्या कार्याविषयी कु. जोहा हिंग्लजकर हिने माहिती दिली.

यानंतर विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत शाळेचे मुख्याध्यापक श्री. ए. आर. व्हसकोटी सर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अक्षरा सर्जेराव पाटील हिने केले, तर आभार कु. वेदिका पोतदार हिने मानले.

पंडित दीनदयाळ विद्यालय मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

आजरा : प्रतिनिधी

पंडित दीनदयाळ विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन विजय राजोपाध्ये यांनी केले. इ.पाचवीच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींनी सर्व शिक्षकांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यातून तयार केलेली सुंदर भेट कार्ड शिक्षकांना देऊन सन्मान केला.

इ. दहावीच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी शाळेचे कामकाज पाहिले. विद्यालयाचे सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी होते.

मडिलगे हायस्कूलमध्ये ज्ञानदीप प्रश्नमंजुषा उत्साहात

मडिलगे : प्रतिनिधी

५ सप्टेंबर शिक्षक दिन व पद्मभूषण डॉ. जे.पी. नाईक यांच्या जयंतीनिमित्त जे.पी. नाईक प्रतिष्ठान, आजरा आणि जनता शिक्षण संस्था संचलित मडिलगे हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात पार पडली.

प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि मुख्याध्यापक सामंत सर यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. के.व्ही. येसणे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धा झाली.

इयत्ता ८ वी ते १० वी साठी तीन गट करण्यात आले होते, त्यांना अनुक्रमे डॉ. जे.पी. नाईक, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अशी नावे देण्यात आली होती. यामध्ये भारतीय परंपरा, इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, विज्ञान, गणित व चालू घडामोडींवर आधारित प्रश्न विचारण्यात आले.

स्पर्धेचे संचालन व प्रश्नमंजुषा तयार करण्यासाठी शंकर आपटे, मुख्याध्यापक सामंत सर, येसणे मॅडम, निऊंगरे मॅडम, मुल्ला सर यांनी सहकार्य केले. यावेळी सौ. श्रद्धा कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती.

पार्वती-शंकर शैक्षणिक संकुलात शिक्षक दिन विविध उपक्रमांनी साजरा.

उत्तूर : प्रतिनिधी 

श्री शिवपुत्र शंकर करंबळी मेमोरियल एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित पार्वती-शंकर शैक्षणिक संस्थेच्या विद्यामंदिर व विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व डॉ. जे. पी. नाईक यांची जयंती शिक्षक दिनानिमित्त विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष बसवराजआण्णा करंबळी, उपाध्यक्ष विश्वनाथआण्णा करंबळी, सचिव सुरेश मुरगुडे, संचालक डॉ. व्ही. एम. पाकले, विनायक करंबळी व प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी इयत्ता दहावीतील ६१ विद्यार्थ्यांनी विद्यार्थी-शिक्षक उपक्रमातून मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भूमिका पार पाडत इयत्ता १ ली ते ९ वीच्या वर्गांचे अध्यापन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रप्रमुख श्रीनाथ पाटील यांच्या हस्ते झाले. मार्गदर्शन करताना त्यांनी निरीक्षण, सराव आणि सातत्य या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो, असा प्रेरणादायी संदेश दिला. अनुभव कथनात विद्यार्थ्यांनी शिक्षक व्यवसायाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे नियोजन सौ. वैशाली पाटील व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. सूत्रसंचालन शौर्या पाटील व गायत्री एकल यांनी, तर आभार मयूर हातकर यांनी मानले.

आजऱ्यात तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

आजरा : प्रतिनिधी

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा यांच्या वतीने ‘मृत्युंजय’ कार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंच’तर्फे कै. लक्ष्मण धोंडिबा पाटील (गुरुजी) व कै. रमेश वामन टोपले (सर) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आजरा तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मृत्युंजयकार शिवाजी सावंत सभागृह, आजरा येथे होणार आहे.

स्पर्धेचे दोन गट करण्यात आले असून, प्राथमिक गट (इयत्ता ५ वी ते ७ वी) यासाठी ‘महाराष्ट्र माझा’, ‘माझे वाचन’, ‘वृक्षप्राण्यांची गावाकडे वाटचाल’, ‘माझा आवडता देशभक्त’ आणि ‘मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांची मला आवडलेली व्यक्तिरेखा’ हे विषय देण्यात आले आहेत.

माध्यमिक गट (इयत्ता ८ वी ते १० वी) यासाठी ‘किल्ले संवर्धन काळाची गरज’, ‘एआय आणि आजचा विद्यार्थी’, ‘युगंधर’ मधील श्रीकृष्ण’, ‘माझे आवडते पुस्तक’ आणि ‘मी क्रीडांगण बोलत आहे’ हे विषय आहेत.

दोन्ही गटांतील विजेत्यांना प्रथम तीन क्रमांकांसाठी अनुक्रमे १५०१, १२०१ व १००१ रुपये, तसेच स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेला प्रत्येक गटासाठी दोन स्पर्धक पाठविता येणार आहेत.

स्पर्धकांची नावे दि. ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत शाळेमार्फत वाचनालयाकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत, उपाध्यक्षा विद्या हेरर, कार्यवाह कुंडलिक नावळकर व सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी यांनी सर्व शाळांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे.

आजचे पंचांग

दिनांक : ६ सप्टेंबर २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : दशमी तिथी (रात्री ०७.२९ पर्यंत) त्यानंतर एकादशी तिथी
नक्षत्र : आर्द्रा नक्षत्र (रात्री ०७.५२ पर्यंत) त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र
योग : सिद्धि योग (सकाळी ०९.४४ पर्यंत) त्यानंतर व्यातीपात योग
करण : वाणीजा करण (सकाळी ०८.४१ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण (रात्री ०७.२९ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : मिथुन राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०५.१५ ते सायंकाळी ०६.४८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१२ ते दुपारी ०१.०१
सूर्योदय : सकाळी ०६.२६
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

अपघातात तरुण ठार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

बेलेवाडीत दर्शन…? लिंगवाडीत हल्ल्यात बैलाचा मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!